व्हीएस न्यूज - भारताची अर्थव्यवस्था २०२८ सालापर्यंत जपानला मागे टाकून जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनेल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच या अमेरिकी ब्रोकरेज संस्थेने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालात म्हटले आहे. ‘इंडिया २०२८ : द लास्ट ब्रिक इन द वॉल’ असे या अहवालाचे शीर्षक आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने यापूर्वीच ब्राझिल आणि रशियाला मागे टाकले असून ती आता चीनच्या पाठोपाठ ‘ब्रिक्स’ देशांमधील (ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका) दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. यानंतर भारत २०१९ पर्यंत फ्रान्स आणि ब्रिटनला मागे टाकून अमेरिका, चीन, जपान व जर्मनीच्या पाठोपाठ जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली असेल. तर २०२८ पर्यंत जर्मनी आणि जपानलाही मागे टाकून भारत तिसऱ्या क्रमांकावर आला असेल, असे बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंचने अहवालात म्हटले आहे.
भारतीय अर्थव्यवस्थेने २०२८ पर्यंत नाममात्र सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या बाबतीत (अमेरिकी डॉलरमधील नॉमिनल जीडीपी) जर्मनी व जपानला मागे टाकले असेल. जपानच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सध्या १.६ टक्के आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर आगामी काळात १० टक्क्य़ांवर राहिल, असे भाकित या अहवालात केले आहे. भारताच्या अर्थव्यवस्थेचा आकार गेल्या वर्षी २.२६ ट्रिलियन डॉलर इतका होता. तो २०२८ मध्ये नेमका केवढा असेल हे मात्र अहवालात नमूद केलेले नाही.
देशाच्या अर्थव्यवस्थेची ही वाढ प्रामुख्याने सेवा क्षेत्राच्या कामगिरीमुळे होईल, असे अहवालात म्हटले आहे. त्याशिवाय देशात अवलंबित्व गुणोत्तर (डिपेन्डन्सी रेशो) घटत आहे. म्हणजेच देशातील १५ ते ६४ वर्षे वयोगटातील उत्पादक लोकसंख्येचे ० ते १५ व ६४ वर्षांवरील अनुत्पादक लोकसंख्येशी असलेले गुणोत्तर घटत आहे. हे गुणोत्तर १९९० च्या दशकात ७१.७ टक्के होते, सध्या ५२.२ टक्के आहे आणि २०२८ मध्ये ४६.२ टक्क्य़ांवर येईल. त्यामुळे जीडीपीच्या प्रमाणात बचतीची टक्केवारी ३२ वर कायम राहिल. वाढत्या बचतीमुळे २०२८ पर्यंत गुंतवणुकीचा दर ३५ टक्क्य़ांवर जाईल. या काळात चालू खात्यातील तूट जीडीपीच्या २ ते २.५ टक्का इतकी असेल. त्यामुळे विकासदर १० टक्क्य़ांवर जाईल. याशिवाय आर्थिक परिपक्वता (फायनान्शियल मॅच्युरिटी), आर्थिक उदारीकरण आणि अधिकाधिक नागरिकांना आर्थिक मुख्य प्रवाहात आणणे यामुळे विकासाला हातभार लागेल, असे अहवालात म्हटले आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002