व्हीएस न्यूज - भारतीय स्थलांतरित लोकांमुळे अमेरिकेतील लोकांचे रोजगार कमी झाले असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला तरी प्रत्यक्षात भारतीय कंपन्यांमुळे तेथे ११३००० रोजगार निर्माण झाले असून एकूण १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय उद्योग महासंघाच्या अहवालात देण्यात आली आहे.
इंडियन रूट्स अमेरिकन सॉइल हा अहवाल महासंघाने प्रसारित केला असून त्यात म्हटले आहे, की भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत कंपनी सामाजिक उत्तरदायित्वापोटी १४७ दशलक्ष डॉलर्स, तर संशोधन व विकासावर ५८८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च केले आहेत.
या वार्षिक अहवालात बरीच माहिती तपशिलाने देण्यात आली असून त्यात अमेरिकेच्या प्रगतीत भारताचे असलेले योगदान सामोरे आले आहे. अमेरिका, प्युटरेरिको व इतर भागात भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेतील पन्नास राज्यात तसेच कोलंबिया व प्युटरेरिकोत १०० भारतीय कंपन्यांमधून ११३४२३ कामगार आहेत.
एकूण गुंतवणूक १७.९ अब्ज डॉलर्सची असून पाच प्रमुख राज्यात भारतीय कंपन्यांचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणात आहे. पाच राज्यात भारतीय कंपन्यांमध्ये जास्त रोजगार असून कामगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. न्यूजर्सी (८५७२),टेक्सास (७२७१), कॅलिफोर्निया (६७४९), न्यूयॉर्क (५१३५), जॉर्जिया (४५५४). भारतीय कंपन्यांची गुंतवणूक सर्वाधिक असलेली राज्ये पुढीलप्रमाणे आहेत- न्यूयॉर्क (१.५७ अब्ज डॉलर्स), न्यूजर्सी (१.५६ अब्ज डॉलर्स), मॅसॅच्युसेट्स (९३१ दशलक्ष डॉलर्स) कॅलिफोर्निया (५४२ दशलक्ष डॉलर्स), व्योमिंग (४३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), प्रत्येक राज्य किंवा प्रदेशात भारतीय कंपन्यांची सरासरी १८७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून तेथे आणखी गुंतवणूक करण्याचा ८५ टक्के कंपन्यांचा इरादा आहे. ८७ टक्के कंपन्या पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त स्थानिक कामगारांना रोजगार देणार आहेत. काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार इलिनॉइस येथे भारतीय कंपन्यांची १९५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून ३८०० रोजगार निर्माण झाले आहेत.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योग व व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढतच जाणार असून त्यातून अमेरिकेत हजारो रोजगार निर्माण होतील.’
– नवतेज सरना, अमेरिकेतील भारताचे राजदूत…
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002