व्हीएस न्यूज - राम मंदिराचा तिढा सुटायला आणखी काही वेळ लागू शकतो. यात दोन्ही पक्षकारांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. हा तिढा सोडवणे अशक्यप्राय वाटत असले तरी यावर तोडगा निघू शकतो, असा विश्वास ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केला.
राम मंदिर-बाबरी मशिद वादात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करणारे श्री श्री रविशंकर यांनी गुरूवारी अयोध्येत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी हा तिढा सुटायला आणखी काही वेळ जावा लागेल, असे मत व्यक्त केले. परंतु त्यासाठी दोन्ही पक्षकारांनी एकमेकांना सहकार्य केले पाहिजे. हा तिढा आत्ताच सुटेल अशी आशा घेऊन मी येथे आलेलो नाही. कदाचित त्यासाठी आणखी दोन-तीन महिन्यांचा अवधी लागेल. मात्र, आपल्या देशात पुरेपूर स्नेह आहे. त्यामुळे राम मंदिराचा तिढा सोडवणे अशक्यप्राय वाटत असले तरी त्यावर तोडगा निघू शकतो. हा तिढा कसा सुटेल, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मात्र, ही वेळ चांगली आणि सकारात्मक आहे, असे त्यांनी सांगितले. लोकांनाही या समस्येवर उत्तर हवे आहे. ही प्रक्रिया नक्कीच सोपी नाही. मात्र, मला प्रत्येकाशी बोलू द्यावे. तुर्तास कोणताही निष्कर्ष काढणे योग्य ठरणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुस्लिम समाजाचा राम मंदिराला विरोध नसल्याचेही यावेळी श्री श्री रविशंकर यांनी स्पष्ट केले. मला माहिती आहे की, काहीजण आमच्याशी सहमत नसतील. मात्र, बहुतांश मुस्लिम समाजाचा राम मंदिराला विरोध नाही. समाजातील तरूण आणि दोन्ही बाजूच्या नेत्यांमधील संवादामुळे या वादावर तोडगा काढणे शक्य होईल, असेही श्री श्री रविशंकर यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002