व्हीएस न्यूज - काँग्रेसमधील औपचारिक नेतृत्वबदलाची प्रक्रिया सुरू करताना काँग्रेस महासमितीने सोमवारी पक्षाध्यक्षपदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. उपाध्यक्ष राहुल गांधी यांची बिनविरोध निवड होणे अपेक्षित असल्याने ५ डिसेंबर रोजीच त्यांच्या पक्षाभिषेकाची औपचारिक घोषणा होऊ शकते. मात्र, यदाकदाचित निवडणूक झालीच तर १९ डिसेंबर रोजी त्याचा निकाल जाहीर होईल.
सोमवारी सकाळी ‘१०, जनपथ’ या सोनिया गांधी यांच्या निवासस्थानी महासमितीची बैठक झाली. त्याला स्वत: राहुल, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यासह सर्व महत्त्वाचे नेते झाडून हजर होते. त्यामध्ये पक्षाध्यक्षपदाच्या निवडणूक कार्यक्रमाला मान्यता देण्यात आली. ४ डिसेंबपर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे आणि ५ डिसेंबरला छाननी आहे. बहुतेक प्रदेश काँग्रेस समित्यांनी एकमुखी शिफारस केल्याने एकटय़ा राहुल यांचाच अर्ज अपेक्षित असल्याने ५ डिसेंबरलाच अधिकृत घोषणा होऊ शकते.
१९९८पासून पक्षाध्यक्ष असलेल्या आपल्या मातोश्री सोनिया यांच्याकडून राहुल यांनी सूत्रे घेण्याची फक्त औपचारिकताच होती. यापूर्वी पक्षाभिषेकाचे अनेक मुहूर्त काढले होते. पण स्वत: राहुल यांची तयारी नसणे आणि लागोपाठच्या पराभवांच्या मालिकांनी पक्षाभिषेक लांबणीवर पडत होता. मात्र, पक्षाचे दैनंदिन कामकाज राहुल हेच पाहत होते. पण अमेरिकेच्या गाजलेल्या दौऱ्यानंतर राहुल यांच्याबाबतच्या प्रतिमेत झालेला विलक्षण बदल आणि त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या गुजरात बालेकिल्लय़ात धडक मारण्यास सुरुवात केल्यानंतर पक्षाभिषेकाची हीच वेळ योग्य असल्याच्या निष्कर्षांवर पक्षनेतृत्व आले आणि त्यानुसार औपचारिक निवडीची प्रक्रिया चालू केली. त्याचे संकेत सोनियांनी मध्यंतरीच दिले होते. स्वत: राहुल यांनीही अमेरिकेतील कार्यक्रमामध्ये जबाबदारी स्वीकारण्यास तयार असल्याचे जाहीर केले होते. अपेक्षेनुसार निवडणूक बिनविरोध झाल्यास गुजरातमधील पहिल्या टप्प्यातील मतदानाअगोदरच राहुल हे अध्यक्ष झालेले असतील. ९ डिसेंबरला पहिला टप्पा, तर १४ डिसेंबरला दुसरा टप्पा आहे.
संसदीय पक्ष व ‘यूपीए’चे अध्यक्षपद सोनियांकडेच?
आपल्या मुलाकडे पक्षाची सूत्रे सोपविल्यानंतर सोनिया गांधी या काही ‘निवृत्त’ होणार नसल्याचे संकेत सोमवारी मिळाले. काँग्रेस संसदीय पक्षाचे आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अध्यक्षपद त्यांच्याकडेच राहणार असल्याचे समजते. यासंदर्भात छेडले असता मुख्य प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले, ‘सोनियाजींच्या संदर्भात मी अन्य दिवशी बोलेन.’ प्रकृती अस्वास्थ्यामुळे सोनिया सध्या फार सक्रिय नसतात.
औपचारिकतेचे वेळापत्रक…
१ डिसेंबर : अधिसूचना प्रकाशित
४ डिसेंबर : अर्ज भरण्याची अंतिम तारीख
५ डिसेंबर : अर्जाची छाननी
११ डिसेंबर : अर्ज माघारीची मुदत
१६ डिसेंबर : (गरज पडल्यास) मतदान
१९ डिसेंबर : (मतदान झाल्यास) निकाल
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002