व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या निवडणुकीत माझी उमेदवारी असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. शिवसेनेतच फूट पडली असती आणि त्यांच्या आमदारांनी मला मते दिली असती. माझ्या विरोधात तीन-तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सोमवारी व्यक्त केली. भाजपाची भूमिका पटल्यामुळेच आपण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
विधान परिषद पोट निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर झाली. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाही. माझ्या उमेदवारीला शिवसेनेच्या विरोधाचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही, असेही राणे म्हणाले.
विधान परिषद निवडणूक न लढविण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले की, रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि माझी ‘वर्षा’वर बैठक झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेमुळे मला उमेदवारी मिळाली नाही हे मला मान्य नाही. मला उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. नारायण राणेंना विरोध करण्यासाठी तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, असेही राणे म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत राणे उमेदवार असतील तर तिन्ही पक्ष एकत्र येतील, असे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी कधी आपल्या पक्षातल्या तरी एखाद्या आमदाराला प्रेमाने हाक मारली आहे का? असा प्रतिसवाल राणे यांनी केला.
शिवसेनेचा समाचार घेताना ते म्हणाले की, नारायण राणेंसारखे शिवसेनेत कार्यकर्ते होते म्हणून आज शिवसेना टिकली आहे. उध्दव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. जूनच्या आधी काहीही होऊ शकते. मी लवकरच आमदार होईन. मी मुख्यमंत्री राहिलोय, मला आमदारकीचे काय कौतुक आहे? असा सवाल करत माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, असेही राणे यांनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002