व्हीएस न्यूज - एनडीएमध्ये सामील झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे केवळ आमदारच नाही तर लवकरच ते मंत्री होतील, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश असेल असेही ते म्हणाले.
विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, विधान परिषदेची ही जागा भाजपाच्या उमेदवारांनी लढवावी, असा कोअर कमिटीत निर्णय झाला. त्याबाबत नारायण राणे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. त्यावर त्यांचे समाधान झाले आहे.
नारायण राणे हे एनडीएत सामील झाले आहेत. आगामी काळात पक्ष नक्कीच त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेईल. ते आमदारच नव्हे, तर लवकरच मंत्री होतील. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा नक्कीच समावेश असेल,असेही दानवे म्हणाले.
भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांना देण्यात आलेल्या उमेदवारी बाबत बोलताना ते म्हणाले की, प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत काही नावांची विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून प्रसाद लाड यांचे नाव निश्चित करण्यात आले. ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला कळविण्यात आले. तिथून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लाड इतर पक्षातून आले असले तरी ते आता भाजपाचे आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ देणे हे पक्षाचे काम आहे, असेही दानवे म्हणाले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002