व्हीएस न्यूज - काँग्रेसकडून ६० वर्षांचा हिशोब मागणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आता काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे. ‘२२ वर्षांचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या,’ असे ट्विट करत काँग्रेसच्या उपाध्यक्षांनी मोदींवर निशाणा साधला आहे. भाजप गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्तेत आहे. त्याचाच संदर्भ देत राहुल गांधींनी मोदींकडे २२ वर्षांचा हिशोब मागितला आहे.
‘२२ सालों का हिसाब, जनता मांगे जवाब,’ असे राहुल गांधींनी ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटमधून राहुल यांनी पंतप्रधान मोदींना एक प्रश्नदेखील विचारला आहे. ‘२०१२ मध्ये ५० लाख घरे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. ५ वर्षांमध्ये ४.७२ घरांची उभारणी करण्यात आली. मग घरांचे आश्वासन पूर्ण करायला ४५ वर्षे लागणार का?,’ असा सवाल राहुल गांधींनी केला आहे. मोदींनी ५ वर्षांमध्ये ५० लाख घरे बांधण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ५ वर्षांमध्ये ५ लाख घरेदेखील बांधली गेली नसल्याने आश्वासनाच्या पूर्ततेसाठी आणखी ४५ वर्षे लागणार का, असा प्रश्न राहुल यांनी उपस्थित केला आहे.
राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये ‘पंतप्रधानांसाठी पहिला प्रश्न’ असे म्हटले आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आधीच्या काही दिवसांमध्ये राहुल गांधींकडून मोदींना दररोज प्रश्न विचारले जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राहुल गांधींनी याआधीही ट्विटरवरुन पंतप्रधान मोदींना लक्ष्य केले आहे. ‘साहेब घाबरल्या घाबरल्यासारखे वाटतात. शाह-जादा, राफेलच्या प्रश्नांवर ते गप्प का असतात?,’ असे प्रश्न विचारत राहुल यांनी मोदींवर थेट टीकास्त्र सोडले आहे.
राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी हाफिज सईदच्या सुटकेवरुनही मोदींना टोला लगावला होता. ‘गळाभेट कामी आली नाही,’ अशा शब्दांमध्ये राहुल गांधींनी मोदींना चिमटा काढला होता. मोदी आणि ट्रम्प यांच्या गळाभेटीचा संदर्भ देत राहुल यांनी पंतप्रधानांवर हल्लाबोल केला होता. ‘आणखी काही गळाभेटींची गरज आहे,’ असा चिमटादेखील त्यांनी काढला होता. या टीकेला प्रत्युत्तर देताना, ‘हाफिज सईदच्या सुटकेमुळे काँग्रेसचा आनंद गगनात मावेनासा झाला होता,’ असा मोदींनी म्हटले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002