व्हीएस न्यूज - शेतक-यांना कर्जमाफी जाहीर करूनही ऑनलाईन घोळामुळे अद्यापही त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. या ऑनलाईन घोळाला जबाबदार असणारे माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे सचिव विजय गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. त्यांच्यासह अन्य दहा सनदी अधिका-यांच्या मंगळवारी बदल्या करण्यात आल्या.
कर्जमाफीचा ऑनलाइन घोळ आयटी विभागाच्या प्रधान सचिवांना अखेर भोवला. या विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार गौतम यांची अखेर बदली करण्यात आली आहे. कर्जमाफीचा ऑनलाईन घोळ समोर येताच गेल्याच आठवडय़ात त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. अखेर त्यांची बदली करण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी दहा सनदी अधिका-यांच्या बदलीचे आदेश जारी केले. विजयकुमार गौतम यांच्या जागी धारावी झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पाचे विशेष सेवा अधिकारी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नेमणूक करण्यात आली आहे. विजयकुमार गौतम यांची वित्त विभागात (लेखा व कोषागारे) प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. वित्त विभागात (लेखा व कोषागारे) कार्यरत असलेल्या वंदना कृष्णा यांची वित्त विभागात वित्तीय सुधारणा येथे नियुक्ती करण्यात आली आहे. याठिकाणी कार्यरत असलेले आर. ए. राजीव यांची वित्त विभागात (व्यय) प्रधान सचिव पदावर नेमणूक करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. देसाई यांची संचालक, आपत्ती व्यवस्थापन विभाग, मंत्रालय येथे तर लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसाळ यांची महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी विभागाचे आयुक्त म्हणून तर मुख्य सचिव कार्यालयाचे सहसचिव सूरज मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती झाली आहे. रोहयोचे आयुक्त एस. जी. कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर, आपत्ती व्यवस्थापन विभागाचे संचालक राजीव निवतकर यांची मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तर गडचिरोलीचे सहाय्यक जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली करण्यात आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002