व्हीएस न्यूज - गुजरातमधील सत्ता टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. मोदींनी बुधवारी गुजरातमध्ये चार प्रचारसभा घेतल्या. यामधील तीन सभा सौराष्ट्र आणि एक सभा दक्षिण गुजरातमध्ये झाली. दक्षिण गुजरात येथील नवसारीतील प्रचारसभेला मोदी संबोधित करत असताना जवळच्या एका मशिदीतून ‘अजान’चा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी दोन मिनिटांसाठी भाषण थांबवले.
पंतप्रधान मोदींनी नवसारीतील सभेत बोलताना काँग्रेसवर हल्लाबोल केला. मोदींचे भाषण सुरु असताना जवळील मशिदीतून अजानचा आवाज ऐकू आला. त्यामुळे मोदींनी त्यांचे भाषण दोन मिनिटांसाठी थांबवले. अजान संपवल्यावर मोदींनी त्यांचे भाषण पुन्हा सुरु केले. यावेळी त्यांनी जीएसटीवरुन काँग्रेसवर हल्लाबोल केला. जीएसटीचा उल्लेख ‘गब्बर सिंग टॅक्स’ असा करणाऱ्या काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींवर त्यांनी टीकास्त्र सोडले. काँग्रेसचा जीएसटी म्हणजे‘ग्रँड स्टुपिड थॉट’ असल्याचे म्हटले.
काँग्रेसला अभिप्रेत असलेल्या जीएसटीची अंमलबजावणी झाली असती, तर गरिबांसाठी जीवनावश्यक वस्तूंवरही १८ टक्के इतका कर आकारला गेला असता. त्याचवेळी सिगारेट आणि मद्यावरही १८ टक्के कर लागला असता. त्यामुळे सिगारेट आणि मद्य स्वस्त झाले असते. जीवनावश्यक वस्तू आणि मद्यावर एकच कर लागणे, हे तर्काला धरून आहे का?, असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसचा मुद्दा खोडून काढण्याचा प्रयत्न केला. काँग्रेसच्या नेत्यांनी आयुष्यभर गोरगरीब जनतेला लुटले. त्यांनी आतापर्यंत जनतेची खूप लूट केली आहे. अशा लूटमारांकडून काय अपेक्षा ठेवणार? असा सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.
यावेळी मोदींनी भाजप सरकारच्या कार्यकाळात झालेल्या विकासकामांची माहिती जनतेला दिली. जलसंधारण आणि कृषी क्षेत्रात भाजप सरकारने भरीव कामगिरी केल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस कूपनलिकेसारख्या लहान कामांचे श्रेय घेत आहे. मात्र भाजपने सत्ताकाळात मोठेमोठ्या जलवाहिन्यांची कामे केली, असे मोदींनी म्हटले. काँग्रेससाठी विकासाचा अर्थ फक्त हँडपंप (कूपनलिका) आहे. तर भाजपसाठी विकासाचा अर्थ जलवाहिन्यांची कामे पूर्ण करुन पाण्यासाठी होणारी लोकांची पायपीट थांबवणे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002