व्हीएस न्यूज - पोलिसांची खासगी सुरक्षा घेणा-यांना आता आपला खिसा अधिकच रिकामा करावा लागणार आहे. कारण आता पोलिसांची खासगी सुरक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ही रक्कम ७५ हजार रुपये इतकी होती. राज्य सरकारतर्फे हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यासंबंधी आलेल्या प्रस्तावाला मुख्य न्यायधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंजुरी दिली आहे.
ब्लॅकमेलर, चोर, दरोडेखोरांपासून जीवाला धोका असणारे अनेक जण पोलिसांचे संरक्षण घेतात. संरक्षण घेणा-याची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल, तर सर्वसामान्यांच्या करातील पैशांचा वापर यासाठी का करावा, असा सवाल उपस्थित केला होता. यापुढे पोलीस संरक्षण घेण्यासाठी राज्य सरकारला दरमहिना एका हवालदारासाठी ९५,४१८ रुपये, तर पोलीस नाईकसाठी १.२ लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्क्यांहून जास्त नसणार याचीही राज्य सरकार काळजी घेईल. तीन महिन्यांच्या सुरक्षेचा खर्च अनामत रक्कम म्हणून सरकारच्या खात्यात भरावी लागणार आहे.
तसेच पोलीस गाडीची मागणी असल्यास अधिकचे पैसे आकारले जाणार आहेत. दरम्यान, पन्नास हजारपेक्षा कमी उत्पन्न असणा-यांना ही रक्कम भरावी लागणार नाही. राज्य सरकारचे वकील आशुतोष कुंभारकोनी यांनी राज्य सरकारच्या या नव्या नियमाचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती मंगेश सोनक यांच्यापुढे सादर केला होता.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002