व्हीएस न्यूज - ओखी या चक्रीवादळाने तामिळनाडू व केरळला जोरदार तडाखा दिला असून, त्यात १२ ठार तर एकूण तीस जण बेपत्ता झाले. अरबी समुद्रात शुक्रवारी बेपत्ता नागरिकांचे शोधकार्य नौदलाने सुरू केले असून, समुद्र खवळलेला आहे. वादळानंतर जोरदार पाऊस झाला आहे. दोन्ही राज्यांत पाऊस कोसळत असून आता हे वादळ लक्षद्वीपकडे सरकत आहे.
केरळातून शोधमोहिमेसाठी १३ बोटी व ३८ कर्मचारी रवाना झाले असून तामिळनाडूतून चार जणांसह एक बोट शोधमोहिमेवर गेली आहे. नौदलाच्या हेलिकॉप्टरने आठ जणांना वाचवले आहे. काही मच्छीमार समुद्रात पडून तरंगताना दिसले असता हेलिकॉप्टरने त्यांना बाहेर काढले असल्याचे संरक्षण दलाच्या प्रवक्त्याने सांगितले.
तामिळनाडूतील कन्याकुमारी, तुतीकोरीन व तिरुनैवेली जिल्हय़ांना पावसाने झोडपून काढले आहे. लागोपाठ तीन दिवस पाऊस चालू आहे. आता वादळाचा धोका कमी झाला असून, ते कन्याकुमारीपासून ७० किमी अंतरावर आहे. नंतर ते अरबी समुद्राकडे गेले आहे. ओखी वादळ ईशान्येकडील मिनिकॉय बेटात तीव्र चक्रीवादळात रूपांतरित झाले, ते आता पुढील २४ तासांत लक्षद्वीपकडे जाणार आहे. वादळाचा वेग ताशी ११० ते १२० किमी होता. पुढील २४ तासांत लक्षद्वीपमध्ये ताशी १३० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे, असे हवामान विभागाने सांगितले. लक्षद्वीप येथे काही ठिकाणी २० सेमी पावसाची शक्यता आहे.
अनेक मच्छीमार बेपत्ता…
चेन्नई व आजूबाजूच्या भागातही जोरदार पाऊस झाला. नौदलाने केरळ व तामिळनाडूतून डॉर्नियर विमाने व अॅडव्हान्स्ड लाइट हेलिकॉप्टर पाठवले आहे. कन्याकुमारीतील पाच मच्छीमार परतलेले नसून ते दोन दिवसांपूर्वी समुद्रात गेले होते. केरळ किनाऱ्यावर पाच जहाजे पाठवण्यात आली आहेत. तेथे अनेक मच्छीमार बेपत्ता आहेत. लक्षद्वीप येथे मदत सामग्रीने भरलेली दोन जहाजे तयार ठेवली आहेत.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002