व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये यंदा काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत. गुजरातमध्ये २२ वर्षांपासून सत्ता राखलेल्या भाजपला या निवडणुकीत काँग्रेसने आव्हान दिले आहे. त्याचेच प्रतिबिंब निवडणूकपूर्व सर्वेक्षणातून पाहायला मिळत आहे. यंदा पहिल्यांदाच काँग्रेस आणि भाजपला प्रत्येकी ४३% मतदान होईल, असा अंदाज सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आला आहे. ‘एबीपी-लोकनिती-सीएसडीएस’ने हे सर्वेक्षण केले आहे.
भाजप आणि काँग्रेसला होणाऱ्या मतदानाची टक्केवारी सारखी असेल, असा अंदाज आहे. मात्र असे असले तरी भाजपला ९१ ते ९९ जागा मिळतील, तर काँग्रेसला ७८ ते ८६ जागांवर समाधान मानावे लागेल. या जागांची सरासरी काढल्यास भाजपला ९५, तर काँग्रेसला ८२ जागा मिळतील. त्यामुळे मतदानाची टक्केवारी जरी समान असली, तरी भाजप वरचढ ठरताना दिसत आहे. मात्र तरीही भाजपच्या जागा १०० पेक्षा कमी होतील, असे सर्वेक्षण पहिल्यांदाच समोर आले आहे.
नोटाबंदी आणि जीएसटी हे मुद्दे या निवडणुकीच्या केंद्रस्थानी आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधींनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर तीव्र शाब्दिक हल्ले केले. या हल्ल्यांना यश मिळताना दिसत आहे. जीएसटीवरुन गुजरातचे व्यापारी नाराज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, ४४ टक्के व्यापारी जीएसटीच्या अंमलबजावणीवर नाराज आहेत. तर ३७ टक्के व्यापारी जीएसटीवर खूष आहेत. व्यापारी वर्गाचा विचार केल्यास ४० टक्के व्यापारी वर्ग भाजपच्या बाजूने आहेत. तर ४३ टक्के वर्ग काँग्रेसला अनुकूल आहे.
गुजरातमध्ये जातीय राजकारणानेही जोर पकडला असून दलित, आदिवासी आणि पटेल काँग्रेसच्या बाजूने आहेत. तर सवर्ण आणि कोळी समाज भाजपला अनुकूल आहे. दोन दशकांपासून भाजपसोबत असणारा पटेल समाज आता काँग्रेसकडे जाताना दिसत आहे. तर कोळी समुदाय काँग्रेसची साथ सोडून भाजपच्या बाजूने सरकतो आहे. याशिवाय भाजपची आदिवासी मतपेढी आता काँग्रेसकडे गेली आहे.
शहरी आणि ग्रामीण भागातील आकडेवारी पाहिल्यास ग्रामीण भागात काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत आहे. ग्रामीण भागातील ४३ टक्के जनता भाजपला मतदान करेल, असा सर्वेक्षणचा अंदाज आहे. तर ४९ टक्के मतदार काँग्रेसला साथ देतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. शहरी भागात भाजप काँग्रेसपेक्षा खूप पुढे आहे. शहरांमध्ये भाजपला ४६ टक्के मतदारांची साथ लाभेल. तर काँग्रेसला ३० टक्के जनता मतदान करेल, असे सर्वेक्षण सांगते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002