व्हीएस न्यूज - तामिळनाडूसह केरळ किनारपट्टीवर हाहाकार उडवल्यानंतर आता ओखी चक्रीवादळ मुंबई किनारपट्टीच्या दिशेने वळले आहे. मुंबई, ठाण्यासह रायगड परिसरातील काही भागात सोमवारी सायंकाळी पाऊस सुरु झाल्याने ओखी चक्रीवादळाचा परिणाम कोकण किनारपट्टीवर जाणवू लागला आहे.
दरम्यान, ओखी चक्रीवादळाचा संभाव्य धोका लक्षात घेत राज्य सरकारने मंगळवारी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गातील शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ही घोषणा केली.
रविवारी कोकणात समुद्र किना-यावर लाटांनी रौद्ररुप धारण केले होते. समुद्राला आलेल्या उधाणात मालवण बंदरात उभी असलेली पोलिसांची ‘सिंधू ५’ ही गस्तीनौका बुडाली. गस्तीनौकेत लाटांचे पाणी घुसल्यामुळे ही नौका बुडाली.
ओखी वादळामुळे सोमवारी सायंकाळी मुंबईसह ठाणे परिसरात पावसाने हजेरी लावली. वेगाने वारे वाहण्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तवला आहे. किना-यालगतच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबई आणि कोकणात मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बुधवारपर्यंत काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर किनारपट्टीतही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या भागात पुढच्या २४ तासात ढगाळ वातावरणासह तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे.
ओखी वादळाचा फटका रत्नागिरीसह रायगड समुद्रकिना-याला बसला आहे. उरण समुद्रकिनारी ५ छोट्या बोटी बुडाल्याचे वृत्त आहे. सुदैवाने बोटीत कुणीही नव्हते. एक बोट माणकेश्वर किना-यावर बुडाली. दरम्यान, उरण ते मुंबई दरम्यानची प्रवासी लाँच सेवा सोमवारी सकाळी ९ वाजल्यापासून बंद ठेवण्यात आली आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002