व्हीएस न्यूज - सत्ता गेल्यापासून भाजपसोबतच्या जवळिकीबाबत राष्ट्रवादीबद्दल उलटसुलट चर्चा सुरू असते. पण, गेल्या चार दिवसांपासून भाजप सरकारविरोधातील हल्लाबोल आंदोलनात राष्ट्रवादीचे पहिल्या फळीतील नेते प्रथमच प्रत्यक्षात रस्त्यावर उतरले आहेत. यवतमाळ ते नागपूर या पदयात्रेत अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आदी नेते दररोज १० ते १५ किमी पायपीट करीत शेतकरी आणि नागरिकांशी संवाद साधत आहेत.
विदर्भात पक्षाची पाटी तशी कोरीच आहे. विदर्भात ताकद वाढविण्याच्या उद्देशाने अलीकडेच पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी चार दिवस विदर्भाचा दौरा केला. यापाठोपाठ यवतमाळ ते नागपूर अशी ११ दिवसांची पदयात्रा राष्ट्रवादीने काढली आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील, धनंजय मुंडे आदी नेते या पदयात्रेत सहभागी झाले आहेत. दररोज १२ ते १५ किमी पायपीट करीत हे सारे नेते शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत. यात्रेचा आजचा चौथा दिवस असून, यवतमाळपासून सुरू झालेल्या या यात्रेत शेतकऱ्यांबद्दल सरकारची अनास्था असल्याची जनभावना दिसल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले. कापसाच्या पिकावर बोंडआळी आल्याने शेतकऱ्यांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. पण कुठेही पंचनामे झालेले नाहीत. कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळालेला नाही. कापूस आणि सोयाबीन पिकाचे नुकसान झाले आहे. मदतीबाबत सरकारकडून अवाक्षर काढले जात नाही, अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली. पदयात्रेत शेतात जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात येतो तेव्हा शेतकरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सरकारच्या विरोधात नाराजी व्यक्त करतात, असा अनुभव आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
अधिवेशन बंद पाडणार
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला, याची सविस्तर माहिती व शेतकऱ्यांच्या नावाची यादी सरकारने द्यावी, अशी मागणी आम्ही हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी करणार आहोत. ही आकडेवारी दिल्याशिवाय हिवाळी अधिवेशनाचे कामकाज चालू देणार नाही, असा इशारा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी वर्धा जिल्ह्य़ात दिला.
पवार आणि सुप्रिया सुळे
१९८० मध्ये शरद पवार यांनी जळगाव ते नागपूर अशी शेतकऱ्यांची दिंडीयात्रा काढली होती. शेतकऱ्यांचे कर्जमाफ व्हावे, अशी मागणी तेव्हा पवारांनी केली होती. पवारांची ती पदयात्रा तेव्हा चांगलीच गाजली होती. पवारांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांची कन्या सुप्रिया सुळे या प्रथमच प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्या आहेत. पदयात्रेमुळे लोकांशी संपर्क साधता येतो, असे सुप्रियाताईंनी सांगितले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002