व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने आयकर (TDS) कायद्यातील तरतूदी व कार्यपध्दती संदर्भात जागृती निर्माण होण्याच्या दृष्टीने महापालिकेच्या सर्व आहरण वितरण अधिकारी आणि आयकर विषयक काम करणा-या कर्मचा-यांसाठी एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ऑटोक्लस्टर चिंचवड येथे झालेल्या या कार्यशाळेस मुख्यलेखापाल राजेश लांडे, आयकर विभागाचे उपआयुक्त डॉ. आदित्य साओले, आयकर विभागाचे आयकर निरीक्षक श्री. अरफळे, एनएसडीएल चे प्रतिनिधी अॅड शीतल लोहाडे, आयकर सल्लागार दिलीप दिक्षित, लेखाधिकारी प्रशांत झंनकर, रमेश जोशी, उपलेखापाल सुधिर शिंदे तसेच प्रशांत डोळस, रमेश भोसले,किशोर केदारी यांच्यासह महापालिकेचे आहरण वितरण अधिकारी व संबंधित कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यशाळेत पुणे आयकर विभागाचे उपआयुक्त डॉ. आदित्य साओले यांनी आयकराशी संबंधित विविध तांत्रिक बाबीची माहिती तसेच आयकराचा व आयकर पत्रकाचा भरणा वेळेत केला नाही तर दंडात्मक कारवाई होऊ शकते. आणि होणा-या या दंडाबाबतच्या तरतुदींची सविस्तर माहितीही यावेळी डॉ. आदित्य साओले यांनी दिली. आयकर (TDS) का कपात करावा व कपात केल्यानंतर तो विहित मुदतीत का भरणे आवश्यक आहे. यासंदर्भात व कपात केलेल्या कराचा विनियोग कशा पद्धतीने केला जातो या विषयी माहिती दिली.
अॅड शीतल लोहाडे यांनी संगणकीय सादरीकरणाद्वारे आयकराच्या टी.डी.एस. विषयी माहिती ऑनलाईन पद्धतीने आपला आयकर भरण्यासाठी फाईल कशी करावी याबद्दल विस्तृतपणे माहिती दिली तसेच कर्मचा-यांचा अथवा मनपाच्या संबंधित असलेल्या ठेकेदारांचा टी.डी.एस. कपात करताना तो कशा पद्धतीने व किती प्रमाणात कपात करावा याविषयीही त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. कर्मचारी, पुरवठादार व ठेकेदार यांच्या देयकातून, वेतनातुन कपात केलेला कर व त्यांचे रिटर्नस (विवरणपत्र) त्रैमासिक विवरणपत्र दाखल करण्यासाठी लागणारी कार्यपध्दती व दाखल करताना वा दाखल केल्यानंतर येणा-या तांत्रिक अडचणीमुंळे ज्या काही चुका (तृट्या) त्या विवरणपत्रामध्ये राहील्या असतील तर त्या बाबत दुबार विवरणपत्र कशाप्रकारे दाखल करावेत यासंदर्भातील माहिती ॲड. शितल लोहाडे यांनी दिली. आयकर कपातीविषयीचे सादरीकरण झाल्यानंतर आयकर (TDS) संदर्भातील विवरणपत्र दाखल करताना व दाखल केल्यानंतर कोणकोणत्या अडचणी येतात या बाबत व तसेच आयकराबाबतच्या इतरही प्रश्नासंदर्भातील प्रश्नोउत्तराचे चर्चासत्र यावेळी पार पडले. यामध्ये सर्व आहरण वितरण अधिका-यांनी व संबंधित कर्मचा-यांनी आयकराविषयी विचारलेल्या विविध प्रश्नांची समाधानकारक उत्तरे डॉ. आदित्य साओले व अॅड. शीतल लोहाडे यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यलेखापाल राजेश लांडे यांनी केले. सुत्रसंचालन माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी यांनी केले तर आभार लेखाधिकारी प्रशांत झंनकर यांनी मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लेखाधिकारी प्रशांत झंनकर, रमेश जोशी, उपलेखापाल सुधिर शिंदे तसेच प्रशांत डोळस यांनी विशेष कार्य केले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002