विधान परिषदेसाठी आज मतदान
व्हीएस न्यूज - माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवार, दि. ७ डिसेंबर रोजी पोटनिवडणूक होत असून, शिवसेनेसह अपक्षांचा पाठिंबा आणि नियोजनबद्ध संपर्क यामुळे भाजपचे उमेदवार प्रसाद लाड यांना विजयाची दाट संधी आहे, तर काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने हे चमत्काराच्या आशेवर असले तरी मते फुटण्याच्या शक्यतेने दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना चिंता सतावत आहे.
विधान भवनात गुरुवारी, ७ डिसेंबरला सकाळी ९ ते ४ या वेळेत विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. भाजपचे उमेदवार प्रसाद लाड आणि काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांच्यात ही लढत होत आहे. संख्याबळ पाहता प्रसाद लाड यांचा विजय सहज होऊ शकतो अशी परिस्थिती असली तरी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने चमत्काराच्या आशेवर आहेत. विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेनेचे ६३, काँग्रेसचे ४२, राष्ट्रवादी ४१, शेकाप आणि बहुजन विकास आघाडीचे प्रत्येकी ३, अपक्ष ७, एमआयएमचे २ तर; सपा, रासप, मनसे, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि भारिपचा प्रत्येकी एक आमदार आहे. उमेदवाराला जिंकण्यासाठी १४५ मतांचा आकडा पार करावा लागणार आहे.
भाजपचे प्रसाद लाड यांना शिवसेना आणि अपक्षांचा पाठिंबा असून, लाड हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे असल्याने विरोधकांची काही मते फोडण्यात त्यांना यश मिळू शकते. मतदान संपल्यानंतर सायंकाळी ५ वाजता मतमोजणी सुरू होईल. लाड यांनी भाजप-सेना युतीच्या आमदारांसह अपक्ष व मित्र पक्षांच्या आमदारांच्या गाठीभेटीवर भर दिला आहे. दुसरीकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाली. यावेळी दिलीप माने यांच्या विजयासाठी रणनीती आखतानाच आपली मतांमध्ये फूट पडू नये यासाठी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आली. तरीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मतांमधील फुटीची चिंता दोन्ही पक्षांच्या नेत्यांना सतावत असल्याचे या बैठकीद्वारे दिसून आले.
ताज हॉटेलमध्ये युतीच्या आमदारांची बैठक…
विधान परिषद पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना आणि अपक्ष आमदारांची संयुक्त बैठक सायंकाळी ताज हॉटेलमध्ये झाली. प्रसाद लाड यांच्या प्रचारार्थ झालेल्या या बैठकीनंतर युती आणि अपक्ष आमदारांनी मेजवानीही घेतली. या बैठकीत दोन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी आमदारांना मार्गदर्शन केले. भाजपच्या आमदारांना भाजपचे मुख्य प्रतोद राज पुरोहित यांनी त्यासंदर्भात निरोप दिले होते.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002