व्हीएस न्यूज - विधान परिषद पोटनिवडणुकीत शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार प्रसाद लाड हे अपेक्षेपेक्षा जास्त मते घेऊन विजयी झाले. प्रसाद लाड यांना २०९ मते मिळाली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी दिलीप माने यांना केवळ ७३ मतांवर समाधान मानावे लागले. दोन मते बाद झाली.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसमुक्त होताना राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या एका जागेसाठी गुरुवारी मतदान झाले. भाजपच्या वतीने प्रसाद लाड निवडणुकीच्या रिंगणात होते, तर काँग्रेसने दिलीप माने यांना निवडणुकीच्या मैदानात उतरविले होते. शिवसेनेने प्रसाद लाड यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला तेव्हाच त्यांचा विजय होणार हे निश्चित झाले होते. तरीही काँग्रेसने‘अदृश्य’ बाणांच्या भरोशावर ‘चमत्कार’ घडविणार असल्याचे सांगत माने यांना मैदानात उतरविले होते. चमत्कार तर झाला नाहीच, उलट काँग्रेस – राष्ट्रवादीची नऊ मते फुटली. प्रसाद लाड यांचा अपेक्षेपेक्षा अधिक दणदणीत विजय झाला. दरम्यान, विधान परिषदेवर विजयी झाल्याबद्दल प्रसाद लाड यांचे महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी अभिनंदन केले आहे.
भाजपा-शिवसेना युतीकडे पुढीलप्रमाणे मते होती. भाजपा १२२, शिवसेना ६३ आणि अपक्ष ७. युतीच्या एकूण मतांची संख्या १९२ होती. मात्र प्रत्यक्षात लाड यांना २०९ मते मिळाली. काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीकडे काँग्रेस –४२, राष्ट्रवादी काँग्रेस ४१ अशी ८३ मते होती. मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला केवळ ७३ मते मिळाली. त्यात काँग्रेसचे कालिदास कोळंबकर आणि नितेश राणे यांनी भाजपाला उघडपणे मतदान केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांना आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दोन मते बाद ठरली आहेत. एमआयएमने या मतदानावर बहिष्कार घातला होता.
………………………………………………
भाजपा-शिवसेना युतीकडील मतदारांची संख्या
भाजप – १२२
शिवसेना – ६३
अपक्ष – ७
एकूण – १९२
…………………………………………………
काँग्रेस – राष्ट्रवादीकडील मतदारांची संख्या
काँग्रेस – ४२
राष्ट्रवादी – ४१
एकूण – ८३
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002