व्हीएस न्यूज – वारंवार सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करणारे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कधी कोणाच्या कानशिलात तरी मारली आहे का? असा सवाल करून माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे यांनी आजची शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली असल्याची घणाघाती टीका शुक्रवारी केली. दरम्यान, शिवरायांच्या संकल्पनेतील लोककल्याणकारी राज्य निर्मितीसाठी तसेच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या घटनेलाच धर्मग्रंथ मानून समाजवादी लोकशाहीच्या माध्यमातून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घटना तयार करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याच कार्यक्रमात स्वाभिमान पक्षाच्या झेंडय़ाचेही अनावरण करण्यात आले.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना झाल्यानंतर राणे यांनी आपल्या महाराष्ट्र दौ-याचा प्रारंभ ऐतिहासिक शाहूनगरीतून केला. दिवसभरात महाराष्ट्राची कुलस्वामिनी अंबाबाईचे आशीर्वाद घेतल्यानंतर शिवछत्रपती शिवाजी महाराज,राजर्षी शाहू महाराज यांच्या पुतळय़ास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर ज्या ऐतिहासिक दसरा चौकात विजयादशमीला सोने लुटले जाते त्याच चौकात राणे यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या विचारांचे सोने वाटले.‘यायला लागतंय’ असे घोषवाक्य घेऊन संपूर्ण करवीर नगरीत झळकलेल्या फलकांवरील आवाहनाला कोल्हापूरच्या नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला आणि दसरा चौकाचा सारा परिसर तुडुंब भरून गेला होता. रात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या या सभेत राणे यांच्या आक्रमक आणि आवेशपूर्ण विचारांचे सोने लुटूनच करवीरकर नागरिक परिवर्तनाचा संदेश घेऊन परतताना दिसत होते.
राणे यांनी आपल्या आवेशपूर्ण आणि आपल्या स्वभावाला साजेल असेच अत्यंत आक्रमक भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा चांगलाच समाचार घेतला. वर्तमानपत्रांतून गेल्या काही दिवसांत होत असलेल्या आरोपांना आणि टीकेला त्यांनी उत्तर दिले. विशेषत: उद्धव ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार ‘प्रहार’ केले.
वारंवार सत्तेवर लाथ मारण्याची भाषा करणा-या उद्धव ठाकरेंनी आतापर्यंत कोणाच्या कानशिलातही मारली नसेल अशी खिल्ली उडवतानाच उद्धव ठाकरे एखाद्या बँकेच्या मॅनेजर (सुरुवातीला भाषण करताना माजी खासदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरे म्हणजे एखाद्या बँकेचा मॅनेजर वाटतो असा उल्लेख केला होता.) नव्हे तर देवळातला पुजारी वाटतो असे म्हटले. पुजा-याचे लक्ष देवाकडे किंवा भक्ताकडे नसते. तर भक्त किती दक्षिणा टाकतो त्याच्याकडे असते. त्याचप्रमाणे उद्धव महापालिकेतून किती टक्केवारी मिळते, महापौर बंगला आपल्याला कसा बळकावता येईल, आमदारांकडून आपल्याला किती आणि कसे पैसे मिळतील याकडेच त्यांचे लक्ष असते आणि केवळ त्याच्यासाठीच सरकारला वेठीस धरण्याचे काम ते करीत आहेत. सत्तेत असताना जनतेला न्याय मिळवून देण्याचे सोडून ते मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांवर टीका करतात. सत्तेत राहूनही ते शेतक-यांना न्याय मिळवून देऊ शकत नाहीत, उलट सरकारला वेठीस धरून जनतेची फसवणूक सुरू आहे, असेही राणे म्हणाले.
मराठी माणसाच्या न्याय्यहक्कांसाठी लढणारी शिवसेना आता राहिलेली नाही. उद्धव यांनी मुंबई पूर्ण भकास केली आहे. माझ्यावर आकसाने टीका करणारे उद्धव ठाकरे यांची आजची शिवसेना म्हणजे केवळ टक्केवारी घेणारा पक्ष झाला आहे. मुंबई महापालिका हेच त्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन आहे. मुंबईतून मराठी माणूस हद्दपार होण्यास उद्धव ठाकरेच कारणीभूत असल्याचा आरोप राणे यांनी केला.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002