पंचरंगी लढतीत प्रतिस्पर्धी रवींद्र शोभणे यांचा पराभव
व्हीएस न्यूज - बडोदा येथे फेब्रुवारी २०१८ मध्ये होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत देशमुख यांची निवड झाली आहे. रविवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या पंचरंगी निवडणुकीत देशमुख यांना ४२७ मते मिळाली तर त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी रवींद्र शोभणे यांना ३५७ मते मिळाली.
बडोदा येथे होणा-या ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची निवडणूक रविवारी झाली. या निवडणुकीच्या रिंगणात लक्ष्मीकांत देशमुख, रवींद्र शोभणे, राजन खान, किशोर सानप, रवींद्र गुर्जर हे पाचजण होते. या पंचरंगी निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे अवघ्या मराठी साहित्यविश्वाचे लक्ष लागले होते. या अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या निवडणुकीत कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख यांनी घवघवीत मते घेऊन बाजी मारली. शनिवारी संध्याकाळी पाच वाजता संमेलनाध्यक्ष पदासाठीचे मतदान पूर्ण झाल्यानंतर रविवारी सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. दुपारी पावणे दोनच्या सुमारास मतमोजणी पूर्ण झाली आणि देशमुख विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिका-यांनी केली.
या निवडणुकीत मराठवाडा साहित्य परिषदेने लक्ष्मीकांत देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला होता. तर शोभणे यांच्यामागे विदर्भ साहित्य संघ उभा होता. नागपुरातून डॉ. शोभणे आणि डॉ. किशोर सानप अशी दोन नावे असल्यामुळे विदर्भ साहित्य संघाची मते विभाजित झाली आणि त्याचा देशमुख यांना फायदा झाल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, देशमुख यांच्या निवडीमुळे त्यांच्यावर सर्वच क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
देशमुख यांनी विपुल साहित्य लेखन केले आहे. त्यांच्या ‘पाणी ! पाणी !!’ आणि ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी’ या कादंबरींना ‘मराठवाडा साहित्य पुरस्कार’ मिळालेला आहे. याशिवाय महाराष्ट्र साहित्य परिषद, महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार, टाइम्स ऑफ इंडिया सोशल ऑनर अॅवार्ड आणि महाराष्ट्र शासनाच्या आदर्श जिल्हाधिकारी पुरस्कारानेही त्यांना गौरविण्यात आलेले आहे. याशिवाय २०१० मध्ये पुण्यात भरलेले दुसरे शासकीय कर्मचारी साहित्य संमेलन, नागपूर येथे झालेले तिसरे परीक्षा साहित्य संमेलन, सांगलीतील पहिले लोकजागर संमेलन आणि नांदेड येथे झालेल्या ३८ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. देशमुख यांची नऊ पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.
देशमुख यांचा अल्प परिचय-
शिक्षण : एम. एस्सी (केमिस्ट्री), एम. ए. (मराठी साहित्य), एमबीए (पब्लिक पॉलिसी), सर्टिफिकेट कोर्स इन इंटरनॅशनल पॉलिसी.
नोकरी : भारतीय प्रशासन सेवा. माजी सनदी अधिकारी
वास्तव्य : मूळ गाव मुरूम (जि. उस्मानाबाद), सध्या मुक्काम- पुणे
देशमुख यांची साहित्य संपदा….
कादंबरी : सलोमी, होते कुरूप वेडे, अंधेरनगरी, ऑक्टोपस, इन्किलाब विरुद्ध जिहाद आणि हरवलेले बालपण
कथासंग्रह : कथांजली, अंतरीच्या गूढगर्भी, पाणी! पाणी!!, नंबर वन, सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी, अग्नीपथ आणि मृगतृष्णा
नाटके/ बालनाटके : अखेरची रात्र आणि दूरदर्शन हाजिर हो..
ललितेत्तर साहित्य : प्रशासननामा, बखर भारतीय प्रशासनाची, अविस्मरणीय कोल्हापूर, मधुबाला ते गांधी
संपादित : लक्षदीप (लक्ष्मीकांत देशमुख यांचे निवडक साहित्य), अन्वयार्थ ( लक्ष्मीकांत देशमुख यांच्या साहित्याची समग्र समीक्षा) आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम.
इंग्रजी साहित्य : द रिअल हिरो अँड अदर स्टोरीज, अॅडमिनिस्ट्रेशन्स गुड अँड ग्रेटनेस आणि करिष्मॅटीक कोल्हापूर.
हिंदी साहित्य : खोया हुआ बचपन (प्रकाशनाच्या मार्गावर)
स्फूट साहित्य : नाती जपून ठेवा (नातेसंबंधावरील लेखमाला) आणि बी पॉझिटिव्ह (लेखमाला).
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002