व्हीएस न्यूज - काँग्रसच्या अध्यक्षपदी अखेर अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा सोमवारी करण्यात आली. येत्या १६ तारखेला राहुल गांधी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात त्यांची आई सोनिया गांधी यांच्याकडून अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारतील. त्यांच्या निवडीचे महाराष्ट्रात जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईतील टिळक भवनात राहुल यांच्या निवडीचे स्वागत करण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस मुख्यालय असलेल्या ‘टिळक भवन’मध्ये जल्लोष करण्यात आला.
काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत निवडणुकीसाठी राहुल गांधी यांनी ४ डिसेंबरला अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, राहुल यांच्याविरोधात एकही उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला नव्हता. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची सोमवार ही शेवटची तारीख होती. राहुल यांच्या विरोधात एकही अर्ज आलेला नसल्यामुळे त्यांची निवड बिनविरोध झाली. सोनिया गांधी या गेल्या १९ वर्षे काँग्रेसच्या अध्यक्षपदी होत्या.
काँग्रेसच्या इतिहासात प्रथमच एखाद्या व्यक्तीने इतक्या दीर्घकाळ पक्षाचे अध्यक्षपद भूषविले होते. मात्र, राहुल गांधी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे कधी जाणार, याची चर्चा सातत्याने सुरू होती. लोकसभा निवडणुकांनंतर सोनिया गांधी या प्रकृतीच्या कारणामुळे संघटनेच्या कामकाजापासून दूर राहू लागल्यानंतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा राहुल यांनी अध्यक्षपद स्वीकारण्यासाठी आग्रह धरला होता.
लोकसभेनंतर काँग्रेस पक्षाला लागलेल्या पराभवाच्या ग्रहणामुळे राहुल यांच्याकडे पक्षाची सूत्रे देण्यासाठी योग्य मुहूर्त सापडत नव्हता. याशिवाय, राहुल गांधी यांनीदेखील ही जबाबदारी स्वीकारण्यासाठी फारशी उत्सुकता दाखवली नव्हती. मात्र, मध्यंतरी अमेरिकेत झालेल्या एका चर्चासत्रात राहुल यांनी आपण निवडणूक लढवण्यास आणि पक्षाचे नेतृत्त्व स्वीकारण्यासाठी तयार असल्याचे सांगितले होते. तेव्हापासून राहुल गांधी यांच्या व्यक्तिमत्त्वात कमालीचा बदल पाहायला मिळाला होता.
गेल्या काही दिवसांपासून ते गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचा झंझावती प्रचार करत आहेत. यावेळी त्यांच्या देहबोली आणि भाषणांमध्ये कमालीचा आत्मविश्वास जाणवत आहे. याच पार्श्वभूमीचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेसकडून गुजरात निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याच्या आधीच राहुल यांना पक्षाध्यक्षपदी बसवण्यात आल्याची शक्यता आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002