व्हीएस न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काढण्यात आलेली जनआक्रोश हल्लाबोल पदयात्रा नागपूरच्या हद्दीत प्रवेश करीत असतानाच वर्धा रस्त्यावर चक्काजाम करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख यांना पोलिसांनी काही काळ अटक करून पुन्हा त्यांची सुटका केली.
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्य सरकारच्या विरोधात नागपूरमध्ये मंगळवारी हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या १ डिसेंबरपासून यवतमाळपासून हल्लाबोल पदयात्रा सुरू केली. पदयात्रेच्या ११ व्या दिवशी ही पदयात्रा सोमवारी नागपूर शहरात पोहोचली. या पदयात्रेचे नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे व माजी मंत्री अनिल देशमुख करीत होते. या पदयात्रेत जवळपास दीड हजारावर कार्यकर्ते होते व शांततेत ते नागपुरात येत होते. या पदयात्रेला नागपूर पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडविले. त्यामुळे सर्वजण रस्त्यावर बसले.
सुप्रिया सुळे व अनिल देशमुख पोलिसांशी चर्चा करीत होते. दिंडी शांततेने येत आहे. वाहतुकीला कोणताही त्रास होत नाही, हे सांगत असताना पोलिसांनी अडेलतट्टू भूमिका घेऊन सुप्रिया सुळे व अनिल देशमुख यांना पोलिस व्हॅनमध्ये बसविले. हल्लाबोल हल्लाबोल अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी या अटकेचा निषेध केला. सुप्रिया सुळे यांना अटक केल्यामुळे शांत राहिलेले कार्यकर्ते संतप्त झाले. या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडय़ांची हवा सोडली तसेच पोलिस व्हॅनच्या टपावर चढले. कार्यकर्ते संतप्त झाल्यानंतर काही वेळांनी पोलिसांनी खासदार सुळे व अनिल देशमुख यांची सुटका केली.
आमदार बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेले
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विमानतळाजवळ चक्काजाम आंदोलन सुरु केले त्यावेळी महिला पोलिस आंदोलकांना ताब्यात घेत असताना राष्ट्रवादीचे आमदार संदीप बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून गेल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. बजोरिया हे यवतमाळमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. सुप्रिया सुळेंना ताब्यात घेण्याचा महिला पोलीस प्रयत्न करत होते. त्यावेळी बजोरिया यांनी पोलिसांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, बजोरिया महिला पोलिसांच्या अंगावर धावून जात असल्याचे लक्षात येताच त्यांच्या इतर कार्यकर्त्यांनी त्यांना तत्काळ आवरले.
‘हल्लाबोल’ची जय्यत तयारी
फडणवीस सरकारच्या विरोधात मंगळवारी विरोधी पक्षांकडून काढण्यात येणा-या हल्लाबोल मोर्चाची जय्यत तयारी झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002