व्हीएस न्यूज - शाळाबाह्य विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारकडून सर्व पातळीवर प्रयत्न झाले. मात्र यात पाहिजे तितके यश काही मिळालेले नाही. असे असतानाही पालकांच्या संपर्कात राहा आणि मुलांना शाळेत आणा, असे नवे फर्मान शिक्षण विभागाने शिक्षकांसाठी काढले आहे. याचबरोबरच शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी परिसरात फिरण्याची सवय स्वत:ला लावून घ्या, असाही उल्लेखही विभागाच्या एका पत्रात करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांपासून राज्यात शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निरुत्तरितच आहे.
गेल्या दोन वर्षांपासून मुलांचे स्थलांतर रोखण्यासाठी आणि शाळाबाह्य मुलांना शाळेत आणण्यासाठी शिक्षण विभागाने अनेक मोहिमा आखल्या. मात्र शाळाबाह्य मुलांची संख्या कमी झालेली नाही. सध्या वेगवेगळ्या अहवालांचा आधार घेत राज्यात साधारण ४ लाख २० हजार मुले शाळाबाह्य असल्याचे शासनानेच कबूल केले आहे. आता पुढील वर्षीच्या शैक्षणिक आराखडय़ात या मुलांची संख्या शून्यावर आणण्याचा उद्देश शिक्षण विभागाने ठेवला आहे. त्यासाठी शाळाबाह्य मुलांच्या पालकांचे संपर्क क्रमांक मिळवण्याची सूचना शिक्षण विभागाकडून शिक्षकांना करण्यात आली आहे.काही दिवसांपूर्वी शिक्षण विभागाचे एक वरिष्ठ अधिकारी जालना जिल्ह्याच्या दौ-यावर गेले होते. त्यावेळी परिसरात फेरफटका मारताना एका पालावर दोन मुले आढळली. अधिका-यांनी माध्यमांसह सर्व कनिष्ठ अधिका-यांना जागे केले. सर्व शिक्षण विभाग कामाला लागला; चक्क दोन मुलांचा शाळेत प्रवेश झाला आणि त्यांच्यावरचा शाळाबाह्य हा शिक्का पुसला गेला. त्यावेळी शाळाबाह्य मुलांच्या पालकांकडे मोबाईल असतो. त्याचा क्रमांक मिळाल्यास मुलांवरील शाळाबाह्य हा शिक्का पुसला जाईल, या विचारातून या मुलांच्या पालकांचे मोबाईल क्रमांक मिळवण्याचे फर्मान शिक्षण विभागाकडून सुटले आहे.
शाळाबाह्य मुलांची संख्या घटण्याचे गुपित…
राज्यात साधारण ४ लाख २० हजार शाळाबाह्य मुले आहेत. मात्र त्यातील ३ लाख २२ हजार मुले ही मान्यता क्रमांक नसलेल्या शाळांमध्ये आहेत. त्यामुळे ही मुले शाळाबाह्य दिसत आहेत. सध्या अनधिकृत असलेल्या शाळांना यूडीएस क्रमांक मिळाला की शाळाबाह्य मुलांची संख्याही कमी दिसेल. शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांचे शिक्षण या कार्यात आपण शेवटच्या टप्प्यावर पोहोचलो आहोत, अशा आशयाचा उल्लेखही या पत्रात करण्यात आला आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002