व्हिएस न्यूज – काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आपण आता निवृत्त होत असल्याचे स्पष्ट केले आहे. १६ डिसेंबरला दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात सोनिया गांधी काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची सूत्रे सुपूर्द करतील. मात्र शुक्रवारीच त्यांनी आता आपण निवृत्त होत असल्याचे सांगितले. राहुल गांधी यांची अध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर सोनिया गांधी या निवृत्त होतील, अशी अटकळ होती. त्याला आता पूर्णविराम मिळाला आहे.
मी राजकारणातून निवृत्त होत नसल्याचेही त्या सांगायला विसरल्या नाहीत. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काही पत्रकारांनी त्यांना काँग्रेसची पुढची पावले काय असतील, असा प्रश्न विचारला ज्यानंतर त्यांनी मी आता अध्यक्षपदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले. मागील काही काळापासून सोनिया गांधींनी स्वत:ला सक्रिय राजकारणापासून दूर ठेवले आहे. गुजरात विधानसभा आणि हिमाचल विधानसभा निवडणुकांच्या प्रचारातही त्यांनी सहभाग घेतला नाही.
त्यांची प्रकृती बिघडल्याच्याही काही बातम्या मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. त्यामुळेच त्या काँग्रेस अध्यक्षपदावर फार काळ राहणार नाहीत हे स्पष्ट झाले होते. अपेक्षेप्रमाणे राहुल गांधी हेच काँग्रेसचे नवे अध्यक्ष असतील हे पक्षाकडून सांगण्यात आले. त्यानंतर आता सोनिया गांधी यांनी आपण पदावरून निवृत्त होत असल्याचे म्हटले.