व्हीएस न्यूज - गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली भाजपने सहाव्यांदा सत्ता स्थापन केली असली तरी पुढील मुख्यमंत्री कोण होणार हा मोठा प्रश्न आहे. कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, केंद्रीय राज्यमंत्री मनसुखलाल मांडवीय यांच्या नावाची चर्चा सुरू असतानाच विजय रुपाणी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. गुजरातमध्ये भाजपला तीन आकडी संख्या गाठण्यातही यश आलेले नाही. त्यामुळे पुन्हा पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवारही सक्षम द्यावा लागणार आहे. येत्या एक-दोन दिवसांत संसदीय समितीची बैठक होणार असून, यामध्ये मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार निश्चित करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांना बढती देऊन पटेल समुदायाला आपल्याकडे आकर्षित करण्याचे काम भाजप करण्याची शक्यता आहे.
सलग २२ वर्षे राज्य करणा-या भाजपसाठी ही निवडणूक सर्वात कठीण मानली जात होती. २०१२ मध्ये ११५ जागा जिंकणाऱ्या भाजपचा विजयरथ यंदा ९९ वर अडखळला. गुजरातचा गड राखण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना यश आले असले तरी मुख्यमंत्रीपदावर कोणाला संधी द्यायची असा पेच पक्ष नेतृत्वासमोर निर्माण झाला आहे.
या निवडणुकीत जिग्नेश मेवानी, अल्पेश ठाकोर यांनी विजय मिळविल्याने विधानसभेतही कडव्या विरोधाचा सामना भाजपला करावा लागणार आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलनेही यापुढे आंदोलन सुरु ठेवणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर सक्षम नेता निवडीचे आव्हान पंतप्रधान आणि भाजपच्या अध्यक्षांसमोर आहे.
दोन्ही राज्यात निरीक्षक जाणार…
मुख्यमंत्री कोण होणार याबाबत भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बैठकीत दोन्ही राज्यांमध्ये २-२ नेते पाठवून निर्णय घेण्यात येणार आहे. अरुण जेटली आणि भाजपचे खासदार सरोज पांडे गुजरातमध्ये, तर नरेंद्र तोमर आणि निर्मला सीतारामन हिमाचल प्रदेशमध्ये पक्षाच्या आमदारांना भेटणार आहेत आणि मुख्यमंत्र्याची निवड करणार आहे.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002