व्हीएस न्यूज – गेली पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागातील कचरा काही दिवसांपासून नियमितपणे उचलला जात नसल्याच्च्या निषेधार्थ मनसेने पालिका मुख्यालयासमोर“कचरा फेको’ आंदोलन केले.
याप्रकरणी महापालिका कर्मचारी विलास बाबासाहेब वाबळे (वय 55, रा चऱ्होली) यांनी फिर्याद दिली असून, मनसेचे नगरसेवक व शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नसल्याच्या निषेधार्थ मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 13) महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर कचरा टाकण्यात आला. या आंदोलनात रुपेश पटेकर, राजु भालेराव, अश्विनी बांगर, सीमा बेलापुरकर, मयूर चिंचवडे व इतर 25 कार्यकर्ते सहभागी झाले होते. सार्वजनिक रस्ता अडवून, मोठमोठ्याने घोषणा देत कचरा टाकून सार्वजनिक ठिकाणी संसर्ग निर्माण होईल, या हेतूने दोन पोती कचरा आणून टाकत सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन कामकाजात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - बारा वर्षापूर्वी अंमलात आलेला माहिती कायदा 2005 अद्यापपर्यंत बारा टक्के लोकांपर्यंत देखील पोहचला नाही. वस्तूतः कलम 26 नुसार हा कायदा सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजेत. ते मागच्या सरकारने केले नाहीत आणि नवीन पारदर्शक सरकार देखील करत नाही. कोणत्याही सरकारला पारदर्शक कारभार नको असतो, अशी टिका माहिती कायदा अभ्यासक व ज्येष्ठ व्याख्याते विवेक वेलणकर यांनी केली.
माहिती कायदा दिनानिमित्त स्वराज्य बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेच्या वतीने भोसरीतील विरंगुळा केंद्र येथे आयोजित कार्यक्रमात वेलणकर बोलत होते. यावेळी प्रशिक्षक सुनील पाटील यांचा माहिती कायदा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. पुरस्काराचे स्वरुप 5 हजार 555 रुपये रोख, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ असे होते. संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय सायकर, ज्येष्ठ नागरीक महासंघाचे अध्यक्ष पंढरीनाथ कामथे, सूर्यकांत मुथीयान, एस. एन. महाजन, संदीप जाधव आदी उपस्थित होते.
वेलणकर म्हणाले की, 2014 मध्ये आंतरराष्ट्रीय बाजारात 110 रुपये प्रती बॅरल प्रमाणे कच्चे तेल मिळत होते. सन 2015 ते 17 दरम्यान हाच दर 40 रुपये प्रती बॅरल झाला. या दोन वर्षांत केंद्र सरकारची 5 लाख कोटी रुपयांची आयातीची बचत झाली. यातून केंद्र सरकारने डिझेल, पेट्रोलचे दर कमी करणे अपेक्षित असताना उलट चौपट करवाढ करुन देशातील नागरीकांना महागाईच्या खाईत लोटले. विजय मल्ल्याने बुडविलेले नऊ हजार कोटी रुपये एसबीआय बॅंकेने सामान्य खातेदारांच्या खात्यातून बेकायदेशीररित्या वसूल केले. बचत खात्यात किमान 5 हजार रुपये शिल्लक ठेवण्याचा बेकायदेशीर नियम आणला. त्यातून एप्रिल ते जून या तीन महिन्यात भारतातील 46 मेट्रो सिटी मधून 3.5 कोटी रुपये अन्यायकारपणे दंड वसूल केला आहे. याचा सर्वांत जास्त आर्थिक फटका ज्येष्ठ नागरिकांना बसला आहे. तसेच पीएमपीएलने जिल्हा वाहतूक समितीच्या परवानगी शिवाय ज्येष्ठ नागरिकांच्या पासमध्ये दुप्पट वाढ केली. ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2017 पासून पुणे आणि पिंपरी मध्ये सह्यांची मोहीम सुरु करण्यात येणार असल्याची माहिती वेलणकर यांनी दिली.
सुनील पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले की, सार्वजनिक शिस्तीचा अभाव, अस्तित्वात असणा-या कायद्यांविषयी जनतेत व अधिकाऱ्यांमध्ये आदर, भिती नसल्यामुळे माहिती कायद्याची गरज निर्माण झाली. हा कायदा खूप प्रबळ व सशक्त आहे. शासकीय अधिकारी या माहितीचे विश्वस्त आहे. परंतु, सामान्य जनतेला माहिती न देण्यासाठी अधिकारी मालकासारखे वागतात. या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी जनतेनेच पुढे यावे, असे आवाहन सुनील पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या संयोजनात पंकज खटाणे, सुमित लगस, रोहन सोनाळे, कल्पना थोरात, प्रमोद चोबे, किरण सावंत यांनी सहभाग घेतला. स्वागत दत्तात्रय सायकर, सूत्रसंचालन प्रा. एस.आर. शिंदे यांनी केले. तर आभार रोहन सोनाळे यांनी मानले.
व्हीएस न्यूज – यमुनानगर व परिसरात पिण्याच्या पाण्याची कृत्रिम टंचाई जाणवत आहे, अनेक घरांना उंचवटा असल्याने एक तासही पाणी जात नाही, त्यामुळे महापालिकेतर्फे यमुनानगरमध्ये चोविस तास पाणी पुरवठा पुर्ववत करावा, अशी मागणी शिवसेनेच्या महिला शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्तांकडे केली आहे.
त्यांनी निवेदनात म्हटले की, नवनगर विकास प्राधिकरणाने विना टाकीचे गृहप्रकल्प यमुनानगर याठिकाणी बांधलेले आहेत. तसेच अनेक घरे उंचावर आहेत. त्यामुळे परिसरात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली होती. तत्कालीन आयुक्त आशिष शर्मा यांनी 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्यासाठी यमुनानगरची प्रायोगिक तत्वावर निवड केली होती. यामुळे यमुनानगरच्या नागरिकांना पाणी मिळू लागले होते. आता तो प्रकल्प बंद केला असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. संपुर्ण शहरात 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प राबविण्याचे महापालिका नियोजन करित आहे. मात्र, त्यातून यमुनानगरचे प्रकल्प बंद करणे योग्य नाही. त्यामुळे 24 बाय 7 पाण्याचा प्रकल्प यमुनानगरमध्ये तातडीने सुरु करावा, अशीही मागणी उबाळे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज– राष्ट्रीय आयुर्वेद दिनानिमित्त पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील आयुर्वेद महाविद्यालय, रुग्णायल व संशोधन केंद्राच्या वतीने मंगळवारी (दि. 17) सकाळी साडेनऊ वाजता महाविद्यालयात शल्यतंत्र, पंचकर्म व रचना शरीर विभागातर्फे व्याधीतील वेदनांचे आयुर्वेदीय व्यवस्थापन या विषयावर परिसंवादाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमात अर्थो रुग्णालयाचे संचालक डॉ. मंगेश देशपांडे, निरामय रुग्णालयाचे संचालक डॉ. यशवंत नांदकर, शल्यचिकित्सक विदर्भ आयुर्वेद महाविद्यालय डॉ सुभाष वार्ष्णेय मार्गदर्शन करणार आहेत. तसेच व्याधीत वेदनांचे आयुर्वेदीय व्यवस्थापन या विषयावर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या पोस्टर प्रदर्शन व संशोधनाचे सादरीकरण करण्यात येणार आहे, अशी माहिती आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. पी. पांडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीय अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेने तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेने केली आहे.
यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात संघटनेचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी म्हटले आहे की, रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीयांना तसेच अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी किंवा ते घर पुन्हा बांधण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यावेळी राज्य शासनाकडून रमाई गरकूल आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या माहितीचा जीआर दाखविण्यात आला. त्यानुसार अनुदान देण्याचा ठराव पालिकेने मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविल्याची तरतूद आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांची घरे दुरूस्त करणे किंवा बांधण्यासाठी अनुदान द्यावे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
व्हीएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने आयोजित केलेल्या महापौर चषक आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन रविवारी (दि.15) महापौर नितीन काळजे यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत इराणच्या आंतरराष्ट्रीय मल्लांसह अनेक राष्ट्रीय मल्लांच्या सहभागाने ही स्पर्धा चर्चेत आली आहे. या स्पर्धेतील विजेत्याला चांदीची गदा देऊन सन्मानित केले जाणार आहे. रात्री उशिरापर्यंत अटीतटीचे सामने सुरु होते.
या स्पर्धेवर पावसाचे सावट होते. त्याकरिता लाखो रुपये खर्चुन तयार केलेचे मैदान भिजण्यपासून वाचविण्यासाठी प्लास्टिकच्या आच्छादनाचा वापर करण्यात आला. दुपारी मोशी गावातून मानाच्या चांदीच्या गदेची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. ही मिरवणूक स्पर्धेच्याठिकाणी आल्यानंतर मैदानाला फेरी मारण्यात आली. त्यानंतर हनुमानाच्या मुर्तीची पूजा झाल्यानंतर मैदानातील मल्लांचे डावपेच सुरु झाले. यावेळी पाऊस थांबल्याने संयोजकांनी सुटकेचा निश्वास टाकला. ओघावत्या सूत्रसंचालनामुळे स्पर्धेची रंगत आणखी वाढत होती. तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धा असल्याने अनेक निकष कटाक्षाने पाळले जात होते. यासाठी आंतरराष्ट्रीय पंचांचे सहकार्य लाभत होते.
छोट्या मल्लांच्या कुस्तीने या स्पर्धेची सुरुवात झाली. या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रकमेसह चषक देऊन सन्मानित करण्यात आले. या स्पर्धेला राज्यातील अनेक नामवंत वस्तादांनी हजेरी लावली. यावेळी आमदार लक्षमण जगताप, आमदार महेश लांडगे, क्रीडा समिती सभापती लक्षमण सस्ते, कुस्तीगीर संघटनेचे पदाधिकारी हनुमंत गावडे,आप्पा खुटवड, ऑलम्पिक खेळाडू मारुती आडकर, आंतरराष्ट्रीय पंच दिनेश गुंड आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - भारतीय जनता पार्टीचे राज्य महाराष्ट्राच्या हिताचे नाही. शेतक-यांना कर्जमुक्ती करावी अशी मागणी शिवसेनेने प्रथम नाशिक मध्ये केली. त्यानंतर चारच दिवसात कर्जमुक्ती जाहीर झाली. ही कर्जमुक्ती शेतक-यांच्या तोंडाला पाने पुसल्यासारखी आहे. सत्तेत राहून हे जाहीरपणे सांगण्याची हिंम्मत शिवसेनेत आहे. शिवसेना राजकारणात‘कच्चा लिंबू’ नाही. सत्तेची उलथापालट शिवसेना केंव्हाही करु शकते. महाराष्ट्रात कधीही निवडणूका होतील अशी आरोळी समोरील पक्ष ठोकतात. त्यांची हिंम्मत असेल तर निवडणूका घ्याव्यात. शिवसेना निवडणुकीला तयार आहे. महाराष्ट्रात एक हाती सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेची संघटना बांधणी सुरु झाली आहे. कधीही निवडणूका घेतल्या तरीही शिवसेना स्वबळावर सत्तेत येईल. असा ठाम विश्वास शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी चिंचवड येथे व्यक्त केला.
भोसरी, पिंपरी, चिंचवड विधानसभा निहाय मतदार संघांची बैठक घेण्यात आली. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी खासदार श्रीरंग बारणे,खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, शिवसेना शहर प्रमुख व मनपा गटनेते राहूल कलाटे, शहर संघटिका सुलभा उबाळे, मधुकर बाबर,भगवान वाल्हेकर आदी उपस्थित होते.
यावेळी संजय राऊत पुढे म्हणाले की, हिमाचल प्रदेश आणि गुजरात मध्ये एकाच वेळी निवडणूका होणार असतील तर अद्यापपर्यंत गुजरातच्या तारखा जाहीर का केल्या नाहीत? याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. सत्तेत राहून आंदोलने करणे हा विरोधाभास नाही तर विरोधी पक्ष आपले काम व्यवस्थित करत नसल्यामुळे शिवसेना जनतेच्या प्रश्नांसाठी आंदोलने करीत आहे. मुंबईतील मनसेचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न बीजेपी करीत होते. पण त्यांच्या हाताला काही लागले नाही म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे. किरीट सोम्मया काय म्हणतात याला मी महत्व देत नाही. मुंबईत कायम शिवसेनेचा महापौर राहील. नांदेड मध्ये शिवसेनेचे नगरसेवक, आमदार आणि कॉंग्रेसचे नगरसेवक भाजपाने फोडले तरीही जनतेने त्यांना नाकारले. शिवसेनेला कायम लढण्याची सवय आहे. त्यामुळे सत्तेचा फायदा शिवसेनेला कधीही झाला नाही. या सरकारच्या कोणत्याही पापाचे शिवसेना भागीदार नाही. त्यामुळे आम्ही रोज सरकारला उठथा लाथ बसता बुक्का मारीत आहोत. असेही खासदार संजय राऊत म्हणाले.
व्हीएस न्यूज - पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याशेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारावा या मागणीसाठी डीबीएन् ग्रुपचे पिंपरी विधानसभा अध्यक्ष आणि लोकजनशक्ती पार्टीचे शहराध्यक्ष धुराजी राणोजी शिंदे आणि आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी आज शुक्रवारी (दि 13 ऑक्टोबर 2017) रोजी महापौर नितीन काळजे, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे आणि आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे जाहिर अभिनंदन केले. धुराजी शिंदे यांच्या हस्ते त्यांना रमाबाई आंबेडकर यांची प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी धुराजी शिंदे, सरिता जामनिक, विशाल कसबे, हिराभाई लांडगे, अरुण मैराळे, शरद कांबळे, संजय ओव्हाळ,दत्ता गोडसे, नसीम शेख, मनोज गजभार, माऊली बोराटे, उमेश गायकवाड आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी अशी मागणी केली की, आगामी अर्थसंकल्पात या विषयी आर्थिक तरतूद करावी आणि पुढील वर्षभरात रमाबाई आंबेडकरांचा पुर्णाकृती पुतळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी उभा करावा.
10 जानेवारी 2017 रोजी मा. आयुक्त पिंपरी चिंचवड मनपा यांच्याकडे प्रथम धुराजी राणोजी शिंदे यांनी पिंपरी चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या शेजारी रमाबाई आंबेडकर यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्याची मागणी केली होती. तसेच 16 जून 2017 रोजी एक दिवसाचे लक्षणिक उपोषण केले होते.
यावेळी धुराजी शिंदे यांच्या समवेत पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील, बौध्द विकास महासंघाचे अध्यक्ष शरद जाधव, डीबीएन्.ग्रुपचे शहराध्यक्ष नितीन वाघमारे, पुतळा पुष्पहार समितीचे पदाधिकारी, लोकजनशक्ती पार्टीचे महाराष्ट्र सचिव सचिन जाधव, कायदा सल्लागार ॲड. सुनिल जामनिक, महिला शहराध्यक्षा ॲड. सरीता जामनिक, डीबीएन् ग्रुप रिक्षा वाहतुक आघाडीचे शहराध्यक्ष हिरा लांडगे, मोशी अध्यक्ष माऊली बोराटे, एन्एस्युआयचे शहराध्यक्ष विशाल कसबे, बिरसा मुंडा संघटनेचे पांडूरंग परचंडराव, पिंपरी चिंचवड शहर सचिव लोकजनशक्ती पार्टी अरुण मैराळे, कार्याध्यक्ष दत्ता गोडसे, धम्म दिप प्रतिष्ठानचे राहूल वडमारे, भिमाई महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सज्जनबाई गायकवाड, यशोधरा महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा भामाबाई जगताप, एम्आयएम्चे शहर प्रवक्ते धम्मराज साळवे, भारतीय बौध्द महासंघाचे पिंपरी अध्यक्ष मनोज गजभार, पिपल्स रिपब्लीकन शहराध्यक्ष सुनिल ढसाळ, ज्ञानेश्वर बोरकर, फारुख कुरेशी, नसीम शेख, प्रविण कांबळे, दत्ता प्रधान, शिवाजी कदम, उमेश गायकवाड, शरद कांबळे, कौसाबाई गजभार, राधाबाई गायकवाड, कमल कांबळे, सुमन कांबळे, संजीवनी शिंदे, सखूबाई शिंदे, कांताबाई कांबळे, सुशाला शिंदे, सुनिता दळवी, विजय कांबळे, केशर वाघमारे, ललीता सावंत आदींसह अनेक आंबेडकर अनुयायांनी एक दिवशीय लाक्षणिक उपोषणात सहभाग घेतला होता. यानंतर मनपा प्रशासनाने रमाबाई आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याबाबत कारवाई सुरु केली.
व्हीएस न्यूज – मुंबई येथील आंतरराष्ट्रीय बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या धर्तीवर मोशी येथील नियोजित आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्राचे भूमिपुजन पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते गुरुवारी (दि.12) करण्यात आहे. गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या या कामाला अखेर मुहूर्त लागला आहे.
या कार्यक्रमाला यावेळी महापौर नितीन काळजे, आमदार महेश लांडगे, नगरसेविका सारिका बोऱ्हाडे, अश्विनी जाधव, जिल्हाधिकारी सौरभ राव, महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश खडके आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून मौजे मोशी येथे सेक्टर क्रमांक 5 व 8 मधील सुमारे 98 हेक्टर जागेमध्ये “आंतरराष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ उभारण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या उभारणीसाठी प्रशासकीय मान्यता, विविध विभागाच्या परवानगी मिळविण्याचे काम प्राधिकरण प्रशासनाकडून सुरु आहे. पिंपरी- चिंचवड शहरात व चाकण परिसरात बहुराष्ट्रीय उद्योग समूहांचे उत्पादन प्रकल्प आहेत. आंतरराष्ट्रीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्रामुळे या परिसरात येणाऱ्या उद्योग समुहांच्या प्रकल्पांमध्ये भर पडणार असून, त्यामुळे भूमिपुत्रांना नोकरीच्या संधीही निर्माण होणार आहेत. या केंद्रामुळे अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांची उत्पादने विक्रीसाठी व्यासपीठ तयार होणार आहे. तसेच,स्थानिक कंपन्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
व्हीएस न्यूज - आग लागण्याच्या दुर्घटनांमुळे दिवाळीत आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर (फ्लाईंग लॅटर्न) पुणे व मुंबई पोलीस आयुक्तांनी बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने राज्यभरात ही बंदी कायम केली असून, आकाश कंदील उडविण्याबरोबरच विक्री व साठा करण्यावर बंदी घातली आहे. आकाशात दिवे उडविल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वात पेटविल्यानंतर पॅराशुटप्रमाणे हा आकाश कंदील उंच जातो. त्यानंतर पुन्हा दिवा जमिनीच्या दिशेने येतो. हा दिवा खाली झेपावताना तो घरांच्या छतांवर तसेच झाडांवर पडतात. त्यामुळे आग लागण्याच्या घटना दरवर्षी दिवाळीदरम्यान घडतात. दिवाळी पहाट कार्यक्रमांबरोबरच रात्री उशिरापर्यंत “फ्लाईंग लॅटर्न’ आकाशात झेपावताना दिसतात. अशाप्रकारे 17 जानेवारी 2015 मध्ये उडविलेला आकाश कंदील मालाडमधील इमारतीवर ठेवलेल्या बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लाकडी फळ्या व इतर बांधकाम साहित्यावर पडून मोठी आग लागली होती. या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस उपायुक्तांनी आकाशात सोडण्यात येणाऱ्या दिव्यांवर बंदी घातली आहे. आकाशात दिवे सोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहेत.
या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालयाने खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त,नगरपालिका मुख्याधिकारी व विशेष नियोजन प्राधिकरणांच्या अग्निशमन अधिकाऱ्यांना कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. आकाश कंदीलाचा वापर करुन, दहशतवादी कृत्य घडण्याची शक्यता नाकारता येत नसून, या पार्श्वभूमीवर अमेरिका, थायलंडसारख्या देशांकडूनही “फ्लाईंग लॅटर्न’वर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय राष्ट्रीय अग्निशमन सुरक्षा संस्थेने देखील अशाप्रकारच्या आकाश कंदीलवर बंदी घालण्याचे समर्थन केले आहे. यामुळे महापालिका व पोलीस प्रशासनाची जबाबदारी वाढली आहे.
व्हीएस न्यूज – पर्यावरण संरक्षणसाठी एक प्रभावी उपक्रम म्हणून “फटाके मुक्त दिवाळी’ साजरी करण्याचा संकल्प मॉडर्न निगडी संकुलातील 1500 शालेय विद्यार्थ्यांनी केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फटाकेमुक्त दिवाळीची सामूहिक प्रतिज्ञा घेतली व पैशाची बचत करून पुस्तके खरेदी करणे, अनाथाश्रमाला व वृद्धाश्रमाला मदत करण्याचा संकल्प घेतला.
याप्रसंगी प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्थेचे उपकार्यवाह शरद इनामदार यांनी मार्गदर्शन करताना फटाके उडविण्याची परंपरा, सद्यस्थितीत पर्यावरणाची होणारी हानी,परिसरातील पशुपक्षी यांवर होणाऱ्या परिणामाचे गांभीर्य समजावून सांगितले. त्याचबरोबर प्रदूषणातून कॅन्सरसारख्या भयावह रोगाची कल्पना विध्यार्थ्यांना दिली. विदेशी फटाक्यांतून निर्माण होणाऱ्या घातक रासायनिक पदार्थांमुळे फटाक्यांपासून स्वतःला, कुटुंबाला अलिप्त ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक गोकुळ कांबळे,पर्यवेक्षिका सुमती पाटसकर, अनिसच्या कार्यकत्या श्रीमती बुद्धीसागर यांनी विद्यार्थ्यांना बहुमोल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रतिज्ञा वाचन विजय गायकवाड यांनी केले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002