रमाई घरकुल योजनेंतर्गत घरांसाठी अनुदानाचा प्रस्ताव तयार करावा
पिंपरी – चिंचवड
2017-10-16
व्हीएस न्यूज – रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीय अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी समाजकल्याण विभागाकडून अनुदान मिळण्याबाबतचा प्रस्ताव पालिकेने तयार करून राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी सर्वहारा उत्कर्ष चिंतन समाज सामाजिक संघटनेने केली आहे.
यासंदर्भात आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात संघटनेचे प्रा. बी. बी. शिंदे यांनी म्हटले आहे की, रमाई घरकुल आवास योजनेंतर्गत मागासवर्गीयांना तसेच अल्पसंख्यांकांना राहत्या घराची डागडुजी करण्यासाठी किंवा ते घर पुन्हा बांधण्यासाठी शासनाने अनुदान द्यावे, अशी मागणी राज्य शासनाकडे केली होती. त्यावेळी राज्य शासनाकडून रमाई गरकूल आवास योजनेंतर्गत मिळणाऱ्या अनुदानाच्या माहितीचा जीआर दाखविण्यात आला. त्यानुसार अनुदान देण्याचा ठराव पालिकेने मंजूर करून राज्य शासनाकडे पाठविल्याची तरतूद आहे. यासाठी पालिका प्रशासनाने नागरिकांची घरे दुरूस्त करणे किंवा बांधण्यासाठी अनुदान द्यावे, त्याबाबतचा प्रस्ताव तयार करून राज्य शासनाच्या मंजुरीसाठी पाठवावा, अशी मागणी शिंदे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.