व्हीएस न्यूज - जेष्ठ सिने अभिनेते ऋषी कपूर व अभिनेते रणधीर कपूर यांच्या हस्ते १६ व्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या विस्तारित चित्रपट महोत्सवाचे चिंचवड येथे शुक्रवार दि.१२ जानेवारी सायंकाळी ६.३० वाजता होणार असल्याची माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पिंपरी येथे झालेल्या या पत्रकार परिषदेला आयुक्त श्रावण हर्डीकर, सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, उपमहापौर शैलजा मोरे, नगरसेविका भीमाताई फुगे, सहशहर अभियंता प्रविण तुपे, आदी उपस्थित होते.
पुणे फिल्म फाऊंडेशन, महाराष्ट्र शासन आणि पिंपरी चिंचवड महापालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित १६ वा पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल या विस्तारित चित्रपट महोत्सवाचे पिंपरी चिंचवड विभागातील उद्घाटन शुक्रवार दि.१२ जानेवारी रोजी सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. जेष्ठ सिने अभिनेते ऋषी कपूर व अभिनेते रणधीर कपूर यांच्या हस्ते होणार उद्घाटन होणार असून यावेळी पिफ चे अध्यक्ष व संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित राहणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमापूर्वी सायं. ५ वाजता पुण्यातील नामवंत गायक विवेक पांडे व गायिका कोमल, निवेदक घनशाम अग्रवाल व संगीत संयोजन चिंतन मोढा यांचा सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमानंतर पुनश्च उर्वरित सुमधुर गीतांचा कार्यक्रम होणार असून, त्यानंतर लगेचच सायलेंट मिस्ट व सिक्रेट इनग्रिडीएन्ट हे जागतिक स्तरावरील प्रसिध्द चित्रपट दाखविण्यात येणार आहे.
दि.१३ ते १८ जानेवारी दरम्यान या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये विविध भाषेतील व देशातील एकूण ४६ चित्रपट तसेच ५ प्रदर्शित न झालेले मराठी चित्रपट कार्निव्हल सिनेमा चिंचवड येथील स्क्रीन नं. ३ व ४ मध्ये दाखविण्यात येणार आहेत. तरी शहरातील जास्तीजास्त नागरिकांनी या पर्वणीचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.
व्हीएस न्यूज - भोसरी गावचे ज्येष्ठ नागरिक पै. आनंदा (आण्णा) धोंडीबा लांडगे (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी (दि. 9 जानेवारी) राहत्या घरी वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, तीन मुले, एक विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष व दैनिक महाराष्ट्र टाइम्सच्या पिंपरी कार्यालयाचे मुख्य वार्ताहर सुनिल लांडगे यांचे ते वडील होत.
भोसरीतील स्मशानभूमित मंगळवारी दुपारी आनंदा लांडगे यांच्या अंत्यसंस्कार प्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, विलास लांडे, ज्येष्ठ माजी नगरसेवक वसंत लोंढे, पिंपरी चिंचवड श्रमिक पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नंदकुमार सातुर्डेकर, पवना सहकारी बँकेचे उपाध्यक्ष जयनाथ काटे आदींनी त्यांना श्रध्दांजली वाहिली. यावेळी पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नगरसेवक, नगरसेविका आणि शिक्षण,सामाजिक, राजकीय, सहकार, शेती, उद्योग, व्यवसाय, व्यापार क्षेत्रातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.
' स्पंदन - २०१८' वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न
व्हीएस न्यूज - ' विद्यार्थी हा देशाच्या विकासातील अविभाज्य घटक आहे.स्पर्धेत टिकून राहाण्यासाठी अभ्यासाबरोबरच क्रीडा स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांचा शारीरिक व मानसिक विकास होण्यास मदत होते. ' असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी केले. ताथवडे येथील बालाजी कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्सच्या 'स्पंदन - २०१८' या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाचे उदघाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. कुलगुरूंच्या हस्ते यावेळी विविध क्रीडाप्रकारांमधील विजयी संघ,शंभर टक्के उपस्थिती, वार्षिक परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक मिळवणारे विद्यार्थी अशा ८० विद्यार्थ्यांना पारितोषिके आणि प्रशस्ती पत्रके देण्यात आली.बालाजी कॉलेजमधील शिस्त, अभ्यास पद्धतीचे त्यांनी यावेळी कौतुक केले.संस्थापक कर्नल डॉ ए.बालसुब्रमान्यम यांच्या अध्यक्षतेखाली महाविद्यालयाचा हा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता.
संचालक डॉ.जी.के.शिरुडे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्राचार्य डॉ.गणपतराव शितोळे, महाविद्यालय विकास समितीच्या अध्यक्षा डॉ. डिम्पल सैनी यांनी प्रास्ताविक केले. प्रा.अरुण वानखडे, प्रा.मोनिका कुलकर्णी यांनी नियोजन केले. तर डॉ.जयश्री नाम्बियार यांनी उपस्थितांचे आभार मानले.
व्हीएस न्यूज - पंक्चर झालेल्या मोटारीचे टायर बदलण्यास मदतीचा बहाणा करून एका टोळक्याने चालकाला मारहाण करीत त्यांच्याकडील बारा हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरदस्तीने हिसकावून नेला. हा प्रकार रविवारी रात्री साडेअकरा वाजता बाणेर येथे मर्चिडीस बेंझ शोरूम समोर घडला. याप्रकरणी दोघांना अटक केली असून एक अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. सागर उत्तम तडाके (वय-20, रा. काळभोरनगर, आकुर्डी), अशोक ऊर्फ खंड्या जाधव (वय-20, रा. इंदिरानगर वसाहत, चिंचवड स्टेशन) असे अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. 17 वर्षीय अल्पवनीय मुलाला ताब्यात घेण्यात आले असून त्याचे दोन साथीदार फरार आहेत. याप्रकरणी सचिन ढावरे (वय-23, रा. अशोकनगर, ताथवडे) याने हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन याची मोटार रविवारी रात्री साडेअकरा वाजता बाणेर येथील मर्चिडीझ बॅझ शोरूम समोर पंक्चर झाली. त्यावेळी ते पंक्चर झालेले टायर बदलत असताना दोन दुचाकीवरून आलेल्या पाच आरोपींनी त्याला मदतीचा बहाणा केला. सचिनला आरोपीने मारहाण करत त्याच्या खिशातील 12 हजार रूपये किंमतीचा मोबाईल घेवून आरोपी पसार झाले. सचिनने त्वरीत 100 नंबरवर फोन केल्यानंतर पोलीसांनी आरोपींचा पाठलाग करत तिघांना ताब्यात घेतले. तर दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले. फौजदार एम. के. आबनावे अधिक तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - 11 जणांच्या टोळक्याने हातात तलवारी, काड्या, सिमेंट ब्लॉकने दहशत माजवित सहा गाड्यांची, घरांच्या काचांची तोडफोड केली. ही घटना रामनगरमधील सैनिक वसाहत परिसरात सोमवारी रात्री साडेदहा ते अकराच्या दरम्यान घडली. पोलिसांनी याप्रकरणी दोघांना अटक केली आहे. चोवीस तासात वाहन तोडफोडीच्या तीन घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. सागर दत्तु नलावडे (वय 21, रा. रामनगर), सागर गणेश भिसे (वय 19, रा. दत्तनगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विनोद राकेश पवार, पवन विष्णू लष्करे, सुरज गायकवाड, अजय विश्वनाथ ओव्हाळ, वैभव ओव्हाळ, सागर सातकर, अभिषेक गाणगाव, निसार शेख, युवराज माने (सर्व राहणार चिंचवड) हे फरार आहेत. याप्रकरणी आण्णासाहेब माधवराव शिरसाट (वय-60 रा. रामनगर चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहननगर परिसरात सोमवारी रात्री टोळक्यांनी परिसात दहशत निर्माण करण्यासाठी वाहनांची तोडफोड केली. या टोळक्याने तलवार, लाठ्या आणि सिमेंटच्या गट्टूच्या सहाय्याने वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सहा गाड्या फोडल्या असून 23 हजार 400 रुपयांचे नुकसान झाले. फिर्यादी यांच्याकडील अडीच हजार रुपये या टोळक्याने तलवारीच्या धाकाने काढून घेतले. पिंपरी पोलीस फरार आरोपींचा कसोशिने तपास करत आहेत....Read More
व्हीएस न्यूज - अन्नधान्याचे उत्पन्न मोठ्याप्रमाणावर होऊन सुद्धा योग्य प्रणालीचा अभाव असल्याने तसेच सरकारकडून त्याची खरेदी योग्य भावात होत नसल्याने दिवसेंदिवस अन्नधान्याचे उत्पन्न कमी होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतीमाल शासनाने योग्य हमीभावाने खरेदी करून देशातील इतर भागांमध्ये उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शेतकऱ्यांना याचा लाभ होईल व अन्नधान्याचे उत्पन्न वाढेल अशा आशयाचे व भारतामध्ये क्रिकेट, टेनिस व बँडमिंटन यांसारख्या खेळांना व खेळाडूंना सुप्रसिद्ध व त्याचबरोबर चांगल्या सुविधा ही मिळतात परंतु देशामधी ऑलम्पिक खेळाडूंना मात्र कोणत्याही प्रकारच्या चांगली सुविधा मिळत नसल्याने ऑलम्पिक खेळाला तरुणांची पसंती कमी आहे. देशातील ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे तसेच नवनवीन खेळाडू तयार व्हावेत यासाठी त्यांना उत्तम प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जेणेकरून देशाला उत्कृष्ट दर्जाचे ऑलम्पिक खेळाडू मिळतील अशा आशयाची दोन खाजगी विधेयक खासदार श्रीरंग बारणे यांनी लोकसभेत सादर केले.
देशातील शेतकऱ्यांना शेतीसंबंधी माहिती देण्यासाठी सरकार आणि कृषी विभागामार्फत विविध कार्यक्रम राबविले जात आहेत. उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, मध्य प्रदेश तसेच महाराष्ट्रातील काही भागातील शेतकरी विविध तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करीत आहेत. परंतु दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाची नासाडी होते व हा शेतीमाल ज्यावेळी बाजारामध्ये विक्रीसाठी जातो तेव्हा त्याचा योग्य मोबदला मिळत नाही आणि शेतकऱ्यांची मिळकत दिवसेंदिवस कमी होत चालल्याने शेतकरी हताश होऊन आत्महत्या करीत आहे. यावर्षी चांगल्या प्रमाणात पेरणी होऊन तसेच शेतीसाठी अनुकूल वातावरण असूनसुद्धा भाजी व इतर धान्न्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य शेतकऱ्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण झाले आहे.
नागरिकांच्या हितासाठी विविध धोरणे उभी करून त्याची योग्य अंमलबजावणी करणे हे कल्याणकारी राज्यासाठी महत्वपूर्ण आहे परंतु शेतीशी संबंधित अशा धोरणांची योग्य अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे देशाला स्वतंत्र मिळून ७० वर्षे होऊन सुद्धा देशातील शेतकऱ्यांच्या परस्थिती मध्ये कोणतीही सुधारणा झालेली दिसत नाही. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षणाच्या अहवालानुसार देशातील ८६ टक्के शेतकर्यांकडे दोन हेक्टर पेक्षा कमी जमीन आहे परिणामतः उत्पन्नही कमी होत असल्याने त्यांना आपली उपजीविका भागविणे कठीण होत आहे. तर दुसरीकडे मोठी शेती असलेले शेतकरी आयकरामध्ये करोडो रुपयांची सूट मिळवीत आहेत. ही तफावत कमी करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांच्या शेतीमालाला सरकाने योग्य हमीभावाने खरेदी करावीत.
तसेच देशातील बहुतांश नागरिक आपल्या मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी मेडिकल किंवा इंजिनियरिंग सारख्या शाखांना पसंती देत आहेत. परंतु खेळामध्ये त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारची प्रेरणा मिळत नाही. ऑलम्पिक मध्ये खेळण्यासाठी बहुतांशी खेळाडू हे ग्रामीण भागातच तयार होत असतात परंतु त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. देशाचे नाव जागतिक स्थरावर उंचाविण्यासाठी ऑलम्पिक खेळाडू चिकाटीने परिश्रम घेत असतात परंतु त्यांना सरकारकडून चांगल्या सुविधा व प्रोत्साहन मिळत नसल्याने हळू हळू त्यांचा या खेळाकडे वळण्याचा कल कमी होत चालला आहे. क्रिकेटसारख्या इतर खेळामधील खेळाडूना सरकार कडून शासकीय व निमशासकीय नोकरी लवकर मिळू शकते पण दुसरीकडे जो ऑलम्पिक खेळाडू आहे त्या खेळाडूला सरकारकडून तुटपुंजी मदत मिळते. त्यामुळे सरकारने ऑलम्पिक सारख्या खेळासाठी बजेटमध्ये जास्तीत जास्त तरतूद करून ऑलम्पिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी खाजगी विधेयकाद्वारे लोकसभेत केली असे बारणे यांनी दिलेल्या प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - जीवन जगणे ही कला आहे. ती आत्मसात केल्याशिवाय जीवन सुखी, समृध्द व यशस्वी होणे शक्य नाही. व्यसनाधीन व्यक्ती स्वत:च्या हाताने स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका पोरांना दु:खाच्या घाईत लोटतात, हे प्रत्यक्ष पाहुण देखील अनेक युवक युवती व्यसनाकडे आकर्षित होत आहेत. त्यांना यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली सद्गुरु श्री वामनराव पै यांच्या ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या जीवनविद्या मिशनच्या प्रबोधन चळवळीतून मिळावी व अवघा समाज सुखी व समृध्दी व्हावा. या उद्देशाने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली ५१ वा पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त जीवनविद्या मिशनचे प्रल्हाद वामनराव पै यांचे प्रबोधनपर व्याख्यान भोसरीत आयोजित करण्यात आले आहे. शुक्रवार दि.१२ जानेवारी ते रविवार दि. १४ जानेवारी २०१८ पर्यंत ‘सुखी जीवनाचे गुपित’या विषयावर भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृहाशेजारील गाव जत्रा मैदानावर हा कार्यक्रम होईल. अशी माहिती कार्यक्रमाचे निमंत्रण आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी पिंपरी येथे पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे पक्षनेते एकनाथ पवार, स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, नगरसेवक ॲड. नितीन लांडगे, राहुल जाधव, शिक्षणमंडळाचे माजी सभापती भाईजान काझी, जीवनविद्या मिशनचे माजी अध्यक्ष शैलेश जोशी, सचिन बबनराव लांडगे, नगरसेवक कुंदन गायकवाड, संतोष लोंढे, उत्तम केंदळे, वसंत बोराटे, लक्ष्मण सस्ते, लक्ष्मण उंडे, विकास डोळस, राजेंद्र लांडगे, नगरसेविका भिमाबाई फुगे, सारीका लांडगे, यशोदा बोईनवाड, प्रा. सोनाली गव्हाणे, हिराबाई घुले, नम्रता लोंढे, सुवर्णा बुर्डे, योगिता नागरगोजे, सुजाता घोलप, साधना मळेकर, स्वीनल म्हेत्रे, अश्विनी जाधव, माजी नगरसेवक महादेव गव्हाणे, तसेच बाळासाहेब गव्हाणे, विजय फुगे,प्रताप मोहिते, संतोष जाधव, सचिन तापकिर, अजित बुर्डे, गणेश तापकीर, नंदू दाभाडे, बबन बोराटे, बापू घोलप, सुहास ताम्हाणे, केतन झोरे, सागर हिंगणे, किसन बावकर, मनोज गायकवाड आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - पोलिसात तक्रार दिली या रागातून शेजाऱ्यावरच कोयत्याने वार करण्यात आले. ही घटना देहूरोड येथील आंबेडकरनगर येथे रविवारी रात्री आठ वाजता घडली. अविनाश ज्ञानदेव भोसले (वय 40 रा.आंबेडकरनगर) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. विजय राजू पिल्ले (रा. आंबेडकरनगर) असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसले व पिल्ले हे दोघे शेजारी राहतात. पिल्ले हा त्याच्या मित्रमंडळींना घेऊन रात्री दारातच गप्पा मारत बसतो. वेळोवेळी सांगूनही तो ऐकत नाही अशी तक्रार भोसले यांनी 2 जानेवारीला देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल केली होती. याच तक्रारीचा राग मनात धरून 'तू माझ्या विरुद्ध अशी तक्रार पोलिसात का केली', असा जाब विचारात पिल्ले यांनी भोसलेच्या हातावर कोयत्याने वार केले. यामध्ये भोसले गंभीर जखमी झाले आहेत. देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - विदेशी दारूची बेकायदेशीररीत्या विक्री करणाऱ्या एका हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकला. तळवडे येथे ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी पोलिसांकडे नागरिकांनी यासंबंधी तक्रार केली होती. त्यानुसार पोलिसांनी तळवडे येथील कृष्णाई हॉटेलवर कारवाई करून 1190 रुपयांची विदेशी दारू जप्त केली. हॉटेल मालक फरार झाला आहे. निगडी पोलीस पुढील तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - टेम्पो ट्रॅव्हलरने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना माणगाव, पारखी वस्ती येथे सोमवारी पहाटे घडली. मंगेश मुरलीधर कणसे (वय 25, मूळ रा, लिंबाचीवाडी सातारा) संभाजी बिराप्पा गराळे (वय 25, मूळ राहणार जत, सांगली) असे मृत्यू झालेल्या दोघांची नाव आहेत. याप्रकरणी वैभव कणे (वय-30, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगेश व संभाजी पिरंगुट येथे एका कंपनीत कामाला होते. सोमवारी पहाटे ते माणगावातून गोठवडे येथे दुचाकीवरून जात होते. पारखी वस्ती येथे एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या दुचाकीला पाठीमागून जोरात धडक दिली. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. फौजदार महेश आबनावे अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002