पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे भारती न्यायाधीश यांच्या बालगीतांचा कार्यक्रम
व्हिएस न्यूज - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतर्फे आयोजित अभिजात मराठी भाषा सप्ताहांतर्गत सुप्रसिद्ध गीतकार, गायिका आणि संगीतकार भारती न्यायाधीश यांच्या बालगीतांच्या मैफलीला चिमुकल्यांसह शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विविध विषयांवरील सुरेल बालगीतांनी आचार्य अत्रे रंगमंदिरातील वातावरण आनंदमय झाले.
संत तुकारामनगर येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात मंगळवारी (दि. ६) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मराठी भाषेचे संवर्धन, प्रचार आणि प्रसार करण्याच्या उद्देशाने महापालिकेच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विशेष अधिकारी व मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड यांच्या अधिपत्याखाली हा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात 'या हो या, या हो या, गणपती बाप्पा लवकर या' या गीताने झाली. त्यानंतर भारती न्यायाधीश आणि बालकलावंत ध्वनी गुप्ता, ईरा चायनाखवा व शौर्यवी मांडवगडे यांनी एकापेक्षा एक सरस बालगीते सादर केली.
'आमच्या घरची मनीमाऊ', 'कावळेदादा काव काव', 'झुक झुक झुक निघाली जंगलक्वीन', 'हत्तुल्या रे हत्तुल्या' आणि 'कोंबडीने शिकविले पिल्लाला' या गीतांनी विद्यार्थ्यांची विशेष दाद मिळवली. बालगीतांमधून प्राणी-पक्ष्यांचे भावविश्व, लहान मुलांच्या कल्पना आणि दैनंदिन जीवनातील गंमतीदार प्रसंग सुरेल पद्धतीने उलगडण्यात आले.
'डुबी डुबी डम डम' या गीताने मैफलीची सांगता झाली. मराठी भाषेची गोडी लहान वयातच मुलांमध्ये निर्माण व्हावी, तसेच बालगीतांच्या माध्यमातून मराठी साहित्य आणि संस्कृतीची ओळख व्हावी, या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.
या कार्यक्रमासाठी महापालिकेचे ग्रंथालय समन्वयक प्रवीण चाबुकस्वार, प्रशासकीय अधिकारी दत्तात्रय सूर्यवंशी, किशोर केदारी आणि साळवे यांचे सहकार्य लाभले.
ADDRESS
VS News, Khararwadi,
Pimpri-Chinchwad
CONTACTS
Email: vsnews24x7@gmail.com
Phone: +91 91724 53002