व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने कासारवाडी येथे बांधण्यात येणार्या शाळेच्या इमारतीसाठी राज्यसभा खासदार रेखा यांच्या खासदार निधीतून ३ कोटी रुपयांचे आर्थिक सहाय्य जिल्हाधिकारी कार्यालयात जमा झाले आहे. आवश्यक कागदपत्रे सादर करून हा निधी घेण्यासंदर्भातील पत्र महापालिका आयुक्तांना प्राप्त झाले आहे. या निधीसाठी माजी विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शाम लांडे यांनी पाठपुरावा केला आहे.
कासारवाडी येथील सर्व्हे क्रमांक ४२० येथील छत्रपती शाहू महाराज विद्यामंदिराच्या आवारात पाच मजली प्रशस्त शाळा महापालिका बांधणार आहे. या शाळेच्या इमारतीसाठी १३ कोटी ७१ लाख ३२ हजार १९७ रुपये खर्च असून, त्या खर्चास स्थायी समितीने मंजुरी दिली आहे. दोन वर्षांत इमारत बांधली जाणार आहे. एकूण भूखंडाचे क्षेत्र ८ हजार ९११.३० चौरस मीटर आहे. सद्यःस्थितीत शाळेचे क्षेत्र तीन हजार ७८९.२१ चौरस मीटर आहे. दोन हजार ८६१.८१ चौरस मीटरमध्ये बांधकाम करण्यात येणार आहे.
इमारतीसाठी निधी मागण्यासाठी पत्र पाठविण्याची मागणी नगरसेवक शाम लांडे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे ८ नोव्हेंबर २०१७ ला केली होती. त्याला खासदार रेखा यांनी प्रतिसाद देत जानेवारी २०१८ ला जिल्हा नियोजन समितीकडे पत्र पाठवून निधी वर्ग करण्याची सूचना केली आहे. त्यानुसार तीन कोटींचा निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे नुकताच वर्ग झाला आहे. सदर निधी महापालिकेने घ्यावा, असे पत्र जिल्हाधिकार्यांनी २४ जानेवारीला आयुक्त हर्डीकर यांना पाठविले आहे, अशी माहिती नगरसेवक शाम लांडे यांनी दिली.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी पुण्यतिथी निमित्त त्यांच्या प्रतिमेस महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सिमा सावळे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत झालेल्या या कार्यक्रमास नगरसदस्या अनुराधा गोरखे, सह आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे,कामगार कल्याण अधिकारी विजय साबळे, प्रशासन अधिकारी रामकिसन लटपटे, माहिती व जनसंपर्कचे किशोर केदारी, रमेश भोसले आदी उपस्थित होते. महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार देशाच्या स्वातंञ्यासाठी प्राणार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ आदर व्यक्त करण्यासाठी यावेळी २ मिनिटे मौन (स्तब्धता) पाळून त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
व्हीएस न्यूज - केंद्र व राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्रात पेट्रोलचा प्रती लिटर दर 80 रुपयांहून जास्त झाला आहे. याच्या निषेधार्थ पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 30 जानेवारी) सकाळी 10 वाजता निगडीतील भक्ती शक्ती चौकातून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकापर्यंत सायकल रॅली काढण्यात आली. कॉंग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनीरॅलीचे नेतृत्व केले. यामध्ये, कॉंग्रेसचे सर्व सेलचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू, भगिनींनी या रॅलीत सहभागी झाले.
व्हीएस न्यूज - धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर सरकारवर चौहूबाजूंनी टीका होत आहे. धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी बोलताना खासदार राजू शेट्टींनी उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. तसेच या प्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी शेट्टींनी केली आहे.
शेतकरी धर्मा पाटील यांच्या मृत्यूनंतर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांच्या जमिनीचे पुनर्मूल्यांकन करण्यात येईल आणि पाटील कुटुंबावर अन्याय होणार नाही, असे आश्वासन दिले. यामुळे येवढे होऊनही अजून आश्वासन देत असल्याने शेट्टींनी बावनकुळेंना धारेवर धरले.
मुख्यमंत्र्यांना धर्मा पाटील भेटले होते. मात्र मुख्यमंत्र्यांनी त्यांची दखल घेतली नाही. या प्रकरणी न्यायालयीन चौकशी व्हावी आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. तसेच शेतकरी संघटना पाटील कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी असल्याचे शेट्टी यावेळी म्हणाले.
राज्यात जमीन अधिग्रहणात दलालांचा सुळसुळाट पाहायला मिळतो. दलाल आणि अधिकाऱ्यांचे संगनमत असते. संबंधितांवर कारवाई करायला हवी, असेही शेट्टी म्हणाले. पाटलांच्या मृत्यूसाठी जमीन अधिग्रहण घोटाळा जबाबदार असल्याचा दावा खासदारांनी यावेळी केला.
व्हीएस न्यूज - ट्रक पाठीमागे घेत असताना कंपनीत खाली बसून काम करणाऱ्या महिलेच्या अंगावरून ट्रकच्या चाकाखाली आली. त्यामुळे महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी साडेनऊ वाजता तळवडे येथील ज्योतीबानगर मधील मधुबन ट्रेड स्टिल येथे घडली. मंगल जालींदर सुर्यवंशी (वय-59, रा. नवनिर्माण हौसिंग सोसायटी, रूपीनगर, तळवडे) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. त्यांचा मुलगा सुनिल सुर्यवंशी याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, ट्रक चालक योगेश मधुकर आगाव (वय-21, रा. बालघरे वस्ती, कुदळवाडी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार, सुर्यवंशी या तळवडे येथील मधुबन स्टिल प्रा.लि कंपनीत कामाला होत्या. रविवारी सकाळी साडेनऊ वाजता त्या कंपनीत खाली बसून काम करत होत्या. ट्रक चालक योगेशने ट्रक पाठीमागे घेत असताना पाहिले नाही. खाली बसलेल्या मंगल सुर्यवंशी यांच्या अंगावरून चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. फौजदार एस. वाय होळकर अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - रिसॉर्ट मॅनेजरने रिसॉर्ट रूम्स व पार्टी लॉन्सच्या बुकिंगच्या पैशांची आफरातफर करत 16 लाख रूपये स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. हा प्रकार सुसगाव येथील सन्नीज वर्ल्ड रिसॉर्ट येथे नुकताच उघडकीस आला आहे. अनिल नारायण बुचडे (वय-45, रा. भास्कर आनंद अपार्टमेंट, फ्लॅट नं. 401, साकोरे नगर, विमाननगर) असे गुन्हा दाखल झालेल्या मॅनेजरचे नाव आहे. याप्रकरणी चंद्रशेखर निम्हण (वय-33, रा. पाषाण) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुचडे हा सुसगाव येथील सन्नीज वर्ल्ड रिसॉर्टमध्ये मॅनेजर म्हणून कामाला होता. त्याने 21 ते 25 जानेवारी या कालावधीत हॉटेल रिसॉर्ट व पार्टी लॉन्ससाठी बुकींग झालेल्या 16 लाख रूपये मालकांना न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरले. बुडचे याने पैशांचा केलेली अफरातफर फिर्यादी यांच्या लक्षात येताच त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002