मनसेचा १५ दिवसांची अल्टीमेटम, शहराध्यक्ष सचिन चिखले यांची माहिती
व्हीएस न्यूज – शहरातील राष्ट्रीयकृत बॅंकांमधील मराठी कामकाज कालबाह्य होत चालले असल्याचा मुद्दा घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना पुन्हा खळ्ळखट्याक करणार आहे. येत्या पंधरा दिवसांत सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी आर्थिक कामकाजात मराठी भाषेचा वापर सुरू करावा, अन्यथा “मनसे स्टाईल’ने आंदोलन करण्याचा इशारा मनसेचे गटनेते सचिन चिखले यांनी पत्रकार परिषदेत गुरूवारी (दि. 23) दिला.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बॅंकांमधील मराठीच्या वापरासाठी आंदोलन छेडण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात हे आंदोलन करण्यात येणार आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेने परिपत्रक काढून सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांना ग्राहकांच्या सोयीसाठी कामकाजामध्ये प्रादेशिक भाषेचा वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, रिझर्व्ह बॅंकेचे आदेश धाब्यावर बसवून सर्वच राष्ट्रीयकृत बॅंका मराठीचा वापर करण्यास उदासिन आहेत. त्याचा त्रास शहरातील मराठी भाषिक नागरिकांना होत आहे. त्यासाठी शहरातील सर्व राष्ट्रीयकृत बॅंकांनी कामकाज मराठीत करावे, असे चिखले यांनी सांगितले.
बॅंकांचे विविध प्रकारचे फॉर्म, माहितीपत्रके, सूचना फलक, बॅंकेच्या नावाचा फलक हा मराठी भाषेत असावा. बॅंकांच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांशी मराठीतून संवाद साधावा, अशा प्रमुख मागण्या आहेत. या मागण्यांचे पत्र मनसेतर्फे सर्व राष्ट्रीयकृत बॅंकामधील व्यवस्थापनाला देण्यात येणार आहे. त्यांना पंधरा दिवसांची मुदत देखील दिली जाणार आहे. तरीही, कामकाजात मराठी भाषेचा वापर करण्यास उदासिनता दिसून आल्यास संबंधित बॅंकांमध्ये मनसे स्टाईलने खळ्ळखट्याक आंदोलन केले जाईल, असे चिखले यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेला मनसचे शहर सचिव राजू सावळे, हेमंत डांगे, राजेश अवसरे, रुपेश पाटेकर, संजय यादव, विशाल मानकरी, सुशांत साळवी, अक्षय नाळे, सुरेश सकट, संगिता देशमुख, विद्या कुलकर्णी आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचालित तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचा (एनएमव्हीपीएम) दुबई येथील मोगरासिस या प्रथितयश आयटी कंपनीसोबत औद्योगिक शैक्षणिक सामंजस्य करार नुकताच करण्यात आला. मोगरासिसचे संचालक विपुल टापरे आणि पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट व नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक डॉ. गिरीष देसाई यांनी या करारावर स्वाक्षरी केल्या.
या करारांतर्गत कॅम्पस प्लेसमेंट, विद्यार्थी प्रशिक्षण, संशोधन कार्य आदी महत्वपूर्ण बाबींवर एकत्रितपणे काम सुरु होणार असल्याची माहिती प्रा. विजय नवले यांनी दिली. यावेळी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, उपाध्यक्ष आमदार संजय तथा बाळा भेगडे, सचिव संतोष खांडगे, खजिनदार सुरेशभाई शहा, पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार एस.डी.गराडे,विश्वस्त भाईजान काझी, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, पद्माकर विसपुते, प्राचार्य डॉ. राजेंद्र कानफाडे यांनी या कराराविषयी समाधान व्यक्त करून अभिनंदन केले.
व्हीएस न्यूज – महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम प्रतिबंध विभागामार्फत काळेवाडी आणि रहाटणी परिसरात नव्याने सुरु असलेल्या 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात आली.
त्यामध्ये पाच हजार 300 चौरस फूट इतके क्षेत्रफळ मोकळे केले. ब आणि ग क्षेत्रीय कार्यालयाने काळेवाडीतील विजयनगर येथील महाराष्ट्र कॉलनी, इंडियन कॉलनी आणि स्वप्ननगरी कॉलनीतील पूररेषेतील तळमजल्यावरील तीन बांधकामे पाडली. रहाटणीतील बळीराज कॉलनी परिसरातील दोन हजार 500 चौरस फुटांची तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली.
साईज्योत कॉलनी येथील दोन पक्की बांधकामे, एक पत्राशेड तसेच तीन वाढीव बांधकामे पाडण्यात आली. कार्यकारी अभियंता मकरंद निकम, मनोज सेठिया यांच्या नियंत्रणाखाली ही कारवाई करण्यात आली. यापुढेही कारवाई सुरु राहणार असून नागरिकांनी विनापरवाना बांधकाम करु नये, असे आवाहन महापालिकेने केले आहे.
व्हीएस न्यूज – शहरात ई-कचरा (निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू)ही दुर्लक्षित बाब असल्यामुळे त्याचे घातक परिणाम आज शहराच्या सार्वजनिक आरोग्यावर जाणवू लागले आहेत. ही बाब गंभीरतने हातळण्यासाठी पर्यावरण संवर्धन समिती (ईसीए)या सामाजिक संस्थेने पुढकार घेतला आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय स्तरावर या विषयी दोन बैठका झाल्या आहेत. ई-कचरा संकलन गरजेचे झाले असून या संदर्भात महाभियान राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. 17 डिसेंबर रोजी सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत ई-वेस्ट संकलन महाअभियान संपूर्ण शहरात राबविले जाणार आहे.
या संदर्भात 23 नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता ई प्रभाग भोसरीच्या मुख्य कार्यालयात बैठक संपन्न झाली. यावेळी ई प्रभागातील हौसिंग सोसाट्याचे पदाधिकारी उपस्थित होते. ईसीएचे अध्यक्ष व या महाभियानाचे प्रमुख पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील यांनी यावेळी उपस्थितांना ई-वेस्ट संकलनाबाबत सविस्तर माहिती दिली. तसेच पाटील यांनी ई-कचऱ्यामुळे मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांची माहिती देताना सांगितले की आपल्याकडे साठून असलेला इलेक्ट्रॉनिक कचरा ई वेस्ट भंगार साहित्य खरेदी करणारे हातगाडी वाले यांना न देता ते शास्त्रीय पद्धतीने विघटन करणाऱ्या यंत्रणांना देण्यात यावा यासाठी जनजागृती करण्यात येईल.
यावेळी ई क्षेत्रीय कार्यालय अध्यक्ष भीमाताई फुगे, पर्यावरण तज्ञ विकास पाटील, इसीएचे पुरषोत्तम पिंपळे, प्रभाकर मेरुकर, दत्तात्रेय कुमठेकर, मनपा आरोग्य अधिकारी प्रभाकर तावरे, कमिन्स इंडिया कंपनीचे पदाधिकारी संपत खैरे, नितीन साबळे, सायकलरचे प्रतिनिधी रणजीत भगत, विकास आंबले आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड शहरात एकूण 200 ई- वेस्ट संकलन केंद्र महा अभियानातंर्गत उभारली जाणार आहेत. प्रत्येक केंद्रावर विविध कॉलेजची मुले-मुली उपस्थित राहणार आहेत. ज्या सोसायट्या 100 किलो किंवा त्यापेक्षा जास्त ई-वेस्ट देतील त्यांचा इसीएकडून विशेष सन्मान केला जाणार आहे. ज्याना ह्या ई वेस्ट संकलन केंद्रावर स्वयंसेवक म्हणून काम करायचे असेल त्यांनी इसीएकडे संपर्क करावा, असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज – येथील एका कापड व्यापाऱ्याचा गळा आवळून खून करण्यात आला. शवविच्छेदन अहवालातून ही बाब उघडकीस आली आहे. ही घटना मंगळवारी (दि. 22) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.
कुलवंत जनजीत जुनेजा (वय 37, रा. मोनिका अपार्टमेंट, पिंपरी) हे सकाळी पाचच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
या घटनेचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल मागवला असता त्यामध्ये जुनेजा यांचा मृत्यू हा बेशुद्ध पडण्यामुळे झाला नाही तर गळा आवळल्याने श्वास गुदमरुन झाल्याचे समोर आले. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पिंपरी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – अज्ञात वाहनाच्या धडकेने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.23) सकाळी नऊच्या सुमारास चिखली येथील सरकारी दवाखान्यासमोर घडली.
दीपक वसंतराव पाटील (वय 30, रा. जाधववाडी, चिखली) असे मयत कामगाराचे नाव आहे. मयताचे सासरे तानाजी बापू इंगळकर (वय 54, रा. देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक पाटील त्यांच्या दुचाकीवरुन (एमएच 10, बीक्यू 6018) कामासाठी जात असताना एका अज्ञात वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. यामध्ये पाटील यांच्या डाव्या खांद्याला व डोक्याला दुखापत झाली. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले पण त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. दीपक पाटील हे म्हाळुंगे येथील एका खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करत होते. निगडी पोलीस तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज – शहरात विकास कामे करण्यासाठी महापालिकेत सल्लागारांचा सुळसुळाट झाला आहे. मागील स्थायी समितीत पेव्हींग ब्लॉकच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला. त्यानंतर बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत पिंपळे सौदागर आणि पिंपळे निलखमधील रस्त्यांच्या कामासाठी सल्लागार नेमण्यात आला आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने गेल्या आठ महिन्यात केवळ सल्लागार नियुक्तीचा कार्यक्रम हाती घेवून पध्दतशीरपणे करदात्या नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी सुरु केली आहे.
या सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. महापालिकेच्या ड क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रभाग क्रमांक 28 मधील पिंपळे सौदागर आणि प्रभाग क्रमांक 26 मधील पिंपळे निलख येथील विकास कामे करणेसाठी मे. इन्फिनिटी कॅन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यामध्ये पिंपळे सौदागर मधील झरवरी रस्ता यु.टी.डब्ल्यु.टी. पध्दतीने विकसित करणे, पिंपळे सौदागर स्मशानभूमी ते सर्व्हे नं.23 पर्यंतचा 12.00 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे, रहाटणी मनपा शाळा ते पिंपळे सौदागर स्मशानभूमी पर्यंतच्या रस्त्याचे यु.टी.डब्ल्यु. टी. पध्दतीने कॉक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक 26 मधील ताब्यात असलेले डी. पी. रस्ते विकसित करणे, पिंपळे निलख येथील रक्षक चौक ते पिंपळे निलख गावठाणातून संरक्षण विभागाच्या हद्दीतुन जाणाऱ्या या 18.00 मी. डी.पी. रस्त्यास सब-वे करणे, ताब्यात येणारा 12.00 मी. रुंदीचा डी. पी. रस्ता विकसित करणे या कामासाठी सल्लागार नियुक्ती केलेला आहे. या विकास कामांच्या निविदा पूर्व व निविदा पश्चात्य बाबींकरिता मे. इन्फिनिटी कंन्स्लटिंग इंजिनिअर्स यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.
नाशिक फाटा ते हिंजवडी पर्यंतचे बीआरटीएस कॉरीडॉर क्रमांक 3 वर विविध स्थापत्य विषयक कामे करणेकामी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार यांची नेमणूक करण्यात आली. या रस्त्यावर वाढलेली प्रचंड वाहतूक लक्षात घेता सुदर्शननगर चौक याठिकाणी ग्रेड सेपरेटर व एफ. ओ. बी. बांधणे, गोविंद गार्डन चौकात सब-वे बांधण्याचा प्रस्तावित आहे. याशिवाय बीआरटीएस कॉरीडॉर क्रमांक 3 वर वाकडच्या पुणे-बैंगलोंर महामार्गावरील पुलापासून हिंजवडीपर्यंत रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत 30 मीटर रस्ताची रुंदी 45 मीटर करण्यात येणार आहे. त्यामुळे त्या रस्त्यावर हिंजवडीकडील वाहतुकीची कोंडी सोडविण्यात येणार आहे. त्यानुसार 2017-18 च्या अंदाज पत्रकांतील नाशिक फाटा ते वाकड या बीआरटीएस रस्त्यावर सब-वे, पीयुपी बांधणे, एफओबी या लेखाशिर्षावर कामास रु.10 कोटी इतकी प्रशासकीय मान्यता असून त्यातील 1 कोटीची तरतुद केली आहे. त्यामुळे महामार्गावर रस्ता विकसित करणे, निगडी ते दापोडी या रस्त्यावरील वल्लभनगर पिंपरीतील सबवेचे सुशोभिकरण करणे या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापक सल्लागार म्हणून मे. इन्फ्रा किंग कन्सल्टींग इंजिनियर्स प्रा. लि. यांची नेमणूक करण्यात आली. तर सांगवी-किवळे रस्त्यावर बीआरटीएस बस डॉकीचे जागेचे मजबुतीकरण करणे या कामास मे. पेव्हटेक कन्सल्टंट पुणे यांची नेमणूक करण्यात आली. या विकास कामांना ऐनवेळी स्थायीत समितीच्या सभेत मंजुरी दिली आहे.
महापौर काळजे यांचा स्पेन दौरा
व्हीएस न्यूज – स्पेन येथील बार्सिलोना शहरात नागरिक स्वयंशिस्त बाळगतात, त्या शहरात नागरिकांशी संबंधित सर्व सेवा-सुविधा ऑनलाईन आहेत. त्यामुळे मनुष्यबळ संख्या कमी लागून विविध सॉफ्टवेअरच्या माध्यमांतून ऑनलाईन सुविधांवर भर दिला आहे. त्यादृष्टीने पिंपरी-चिंचवडच्या स्मार्ट सिटी योजनेत “डिजीटल इंडिया’वर सर्वांधिक लक्ष केंद्रीय करुन नागरिकांना घर बसल्या सुविधा देण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
स्पेन येथील बार्सिलोना शहरात स्मार्ट सिटी एक्स्पो वर्ल्ड कॉंग्रेस या 14 ते 16 नोव्हेंबरच्या आयोजित एक्झीबिशन व कॉन्फरसला महापौर काळजे यांनी उपस्थित राहून सहभाग घेतला. याविषयी ते माहिती देताना म्हणाले की, त्या शहरात महापालिका व शासनाच्या नागरिकांशी निगडीत असणाऱ्या विविध सेवा-सुविधांचे ऑनलाईन पध्दतीने एकत्रित करुन कामकाजाचे नियोजन केले आहे. संकेतस्थळाच्या डॅशबोर्डद्वारे अत्यंत सुव्यवस्थित आणि बिनचुकपणे त्या सेवा पुरविल्या आहेत. त्यांनी सर्व मिळकतींचा मिळकत भरणा संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन आहे. सर्व रुग्णालयात रुग्णांना केस पेपर ऑनलाईन देवून आरोग्य सेवा पुरविली जाते.
पालिकेच्या सर्व विभागाच्या निविदा कामकाजही ऑनलाईन करीत आहेत. वीज चालु अथवा बंद झाल्यास त्याचे नियोजन देखील संगणकाद्वारे चालविले जात आहे. कचरा संकलन आणि वाहतुकीचे नियोजन, त्या कचऱ्यांची विल्हेवाट लावताना कमी मनुष्यबळात यांत्रिकीकरणाचा वापर अधिक होतोय, जलःनिस्सारण हे संगणकाद्वारे नियंत्रण ठेवून देखभाल दुरुस्तीचे कामे होत आहेत. शहरात महत्वांच्या ठिकाणी पार्किंग व्यवस्था व सद्यस्थिती अपडेट माहिती मोबाईल ऍपद्वारे सर्वाना मिळते. त्यामुळे वाहनाचे पार्किंग केले जात आहे. यामुळे रस्त्यावरील गर्दीची कमी होवून वाहतुकी कोडींवर नियंत्रण राहत आहेत. वाहतुकीचे नियोजन देखील संपुर्ण शहराचे संगणकाद्वारे करुन त्यांची प्रत्येक रस्त्यांवरची परस्थितीची माहिती संबंधित प्रशासनाला मिळत आहे.
दरम्यान, त्या शहराचा कारभार कमी मनुष्यबळात संगणकीय डॅशबोर्डच्या माध्यमातून चालविला जात आहे. शहरातील वाहतुकीचे नियोजन, पार्किंग व्यवस्था, कचरा उचलून, कचऱ्यांची विल्हेवाट लावली जात आहे. त्यानुसार सर्व कारभार ऑनलाईन करुन त्यांचे नियोजन व्यवस्थित केले जात आहे. त्यामुळे आपल्या शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याकरिता आणि नागरिकांशी निगडीत सुविधांचे अद्ययावतीकरण करुन संगणकाच्या डॅशबोर्डवर एकत्रीत त्याचे नियंत्रण व पाहणी करणे आवश्यक आहे. त्या अनुषंगाने कृती करण्यासंबंधीची उपाययोजना राबविल्यास प्रशासन अधिकाधिक वेगवान व लोकाभिमुख होईल, असेही महापौर काळजे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाद्वारे 133 पैकी 126 नगरसेवकांसाठी आरोग्य विमा योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये महापौर नितीन काळजे, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, जैवविविधता समिती सभापती उषा मुंढे, शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे, अमित गावडे यांच्यासह शिवसेनेच्या सर्व नगरसेवकांनी विमा घेण्यास स्थायी समितीच्या सभेत नकार दिला आहे.
दरम्यान, या योजनेसाठी येणाऱ्या 18 लाख रुपये खर्चाला स्थायी समितीने मान्यता दिली. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. महापालिकेत नगरसेवकांचे संख्याबळ 128 आहे. तर पाच स्वीकृत सदस्य असे एकूण 133नगरसेवक आहेत. या 133 नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी महापालिकेतर्फे आरोग्य विमा योजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, 128 नगरसेवकांपैकी सात नगरसेवकांनी यापूर्वीच आरोग्य विमा योजनेची सवलत स्वीकारण्यास नकार दर्शविला आहे. आता शिवसेनेच्या नऊ नगरसेवकांनी आणि स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे, सदस्य उषा मुंढे यांनीही आरोग्य विमा नाकारला आहे. त्यामुळे 108 अधिक पाच स्वीकृत अशा 113नगरसेवक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी पाच लाखांपर्यंत आरोग्य विमा योजना लागू करण्यात येणार आहे. हा विमा नगरसेवक दाम्पत्य आणि त्यांच्या 21 वर्षापर्यंतच्या दोन अपत्यांसाठी लागू राहणार आहे.
या विमा योजनेसाठी महापालिकेतर्फे इच्छुक विमा कंपन्यांकडून निविदा मागविण्यात आल्या. निविदा दर 19 लाख 66 हजार रुपये निश्चित करण्यात आला. मात्र, पहिल्यांदा एकाही निविदाधारकाने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे पुन्हा निविदा मागविण्यात आल्या. त्यानंतर पुन्हा दोनदा मुदतवाढ देण्यात आली. मात्र, मार्श इंडिया इन्शुरन्स ब्रोकर्स प्रायव्हेट लिमिटेड या एकाच कंपनीची निविदा प्राप्त झाली. त्यांनी निविदा दरापेक्षा नऊ टक्के कमी म्हणजेच 17लाख 89 हजार रुपये दर सादर केला. त्यानुसार, मार्श ब्रोकर्स कंपनीबरोबर करारनामा करण्यात येणार आहे.
व्हीएस न्यूज - शहरातील विकास कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 121 कोटी 49 लाख 27 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे. यासह महापालिकेच्या वतीने इंडियन बॉडी बिल्डींग फेडरेशन यांच्या वतीने सांगवीत महापौर चषक राज्यस्तरीय शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या स्पर्धांच्या प्रत्यक्षात येणाऱ्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. चिखली सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी ईडब्लुएस गृहप्रकल्पात विविध आरक्षणे विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी येणाऱ्या सुमारे 76 लाख 05 हजार रुपयांच्या खर्चास मान्यात देण्यात आली. नागरवस्ती विकास योजनेतून विविध कल्याणकारी योजना राबविल्या जातात. निःसमर्थ (अपंग) कल्याणकारी योजनेतून अपंग व्यक्तींना व्यवसायास अर्थसहाय्य देण्यात येते. त्यानूसार दोन पात्र लाभार्थ्यांना सुमारे 1 लाख 87 हजार रुपयास मान्यता देण्यात आली.
पुनावळे येथे उद्यान विकसित करण्यासाठी अमृत योजनेतून येणाऱ्या सुमारे 1 कोटी 09 लाख 84 हजार रुपयांच्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. पालिका जलशुद्धीकरण केंद्राच्या सेक्टर 26 मधील जलशुद्धीकरण प्रक्रियेसाठी द्रवरुप स्वरुपातील पॉली अल्युमिनियम क्लेराईड व पावडर स्वरुपातील पॉली अल्युमिनियम क्लोराईड पुरविणे, याकरिता होणाऱ्या 46 लाख 16 हजार रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
आकुर्डी मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत सेक्टर 22 मधील जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 51 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. च-होली, चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत शेलारवस्ती, पाटीलनगर, धर्मराजनगर परिसरातील जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरित ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणाऱ्या सुमारे 35 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
दरम्यान, चिखली मैलाशुद्धीकरण केंद्रांतर्गत ताम्हाणे वस्तीत जुन्या जलनिःसारण नलिका बदलणे व उर्वरीत ठिकाणी जलनिःसारण नलिका टाकण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख 35 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. तसेच फुगेवाडी पंपीग स्टेशन अंतर्गत येणाऱ्या जुन्या मलनिःसारण नलिका आवश्यक त्या ठिकाणी बदलण्यासाठी येणाऱ्या सुमारे 36 लाख 89 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
मनपा इमारत सुधारण्यास मान्यता…
भोसरीतील गव्हाणेवस्ती येथे मनपा इमारतीची सुधारणा करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 86 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. शहरात फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 33 लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली. प्रभाग क्र.25 मधील फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 31 लाख 47 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता दिली. प्रभाग क्र.24 मधील फुटपाथची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे 30 लाख 31 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे.
बंद कंटेनरला तवेराची धडक बसल्याने घडली घटना..
व्हीएस न्यूज - जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर भरधाव तवेरा गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला मागून धडक दिल्याने एक जण ठार तर तिघे जखमी झाले. ही घटना गुरूवारी पहाटेच्या सुमारास घडली असून मृत व जखमी हे आयकर अधिकारी असल्याचे सांगण्यात येते. हा अपघात देहू रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमरजाई मंदिराजवळ झाला.
अधिक माहिती अशी, आयकर विभागाचे काही अधिकारी कामानिमित्त मुंबईहून पुण्याकडे तवेरा गाडीतून (एमएच १२ एफसी २६१५) येत होते. जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील अमरजाई मंदिराजवळ लोखंडाचे खांब घेऊन जात असलेला कंटेनर (एमएच ०६ के ७९४४) उभा होता. तवेरा चालकाला याचा अंदाज आला नाही. भरधाव असलेल्या तवेराने त्या कंटेनरला मागून जोराची धडक दिली. यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर चालकासह तिघे जखमी झाले. अभिषेक त्यागी असे मृताचे नाव असून ते आयकर विभागात निरीक्षक म्हणून कार्यरत होते, असे सांगण्यात येते. तर उपसंचालक आनंद उपाध्याय, कृष्णकांत मिश्रा व चालक गंभीर जखमी असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे. वाहनं उभी करण्याची जागा नसतानाही कंटेनर तिथे उभा होता. चालकाने योग्य ती दक्षता घेऊन कंटनेर उभा केला असता तर हा अपघात झाला नसता, असे सांगण्यात येते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002