व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवडमधील विजेच्या विविध तक्रारींबाबत तसेच वीजवितरण विभागात असलेल्या विविध समस्यांचे निराकरण करण्याची मागणी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.
नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनादरम्यान ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांची बैठक झाली. या बैठकीत आमदार जगताप यांनी पिंपरी चिंचवडमधील नागरिकांना विजेसंदर्भात येणाऱ्या अडचणी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्यासमोर मांडल्या. शहराच्या अनेक भागात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत असल्याकडे त्यांनी ऊर्जामंत्र्यांचे लक्ष वेधले. त्याचप्रमाणे इन्फ्रा १ व २ (पायाभूत सुविधा) ची उभारणी व कार्यवाही चुकीच्या पद्धतीने झाले असल्याने त्याची चौकशी करण्याची मागणी आमदार जगताप यांनी केली. शहरातील नादुरूस्त असलेले वीजमीटर तक्रारीनंतर तातडीने बदलले जात नसल्याचेही आमदार जगताप यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या निदर्शनास आणून दिले. शहरातील सहा सबस्टेशन पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्याची आग्रही मागणी आमदार जगताप यांनी केली. त्यावर ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी आमदार जगताप यांनी मांडलेल्या सर्व समस्यांचे येत्या १५ जानेवारीपर्यंत निराकरण करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीला महावितरणचे मुख्य व्यवस्थापन संचालक संजीवकुमार, अधीक्षक अभियंता दिवाकरन, कार्यकारी अभियंता शिवाजी वायफळकर, वीजवितरण समितीचे सदस्य रामकृष्ण राणे, गोरक्ष अंबरुळे आदी उपस्थित होते. दरम्यान, ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या उपस्थित होणाऱ्या या बैठकीबाबत पूर्वकल्पना देऊनही पुणे विभागाचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे बैठकीला गैरहजर होते. त्यामुळे ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी दूरध्वनीवरून शिंदे यांना चांगलेच फैलावर घेतले. तसेच प्रशासकीय शिस्त पाळण्याची सक्त ताकीद दिली.
व्हीएस न्यूज - पिंपळे सौदागरमध्ये ‘अमृत योजने’अंतर्गत ३५ लाख लिटर पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. नगरसेवक शत्रुघ्न काटे व नगरसेविका निर्मला कुटे यांनी आज पाणीपुरवठा अधिकाऱ्यांसोबत पाहणी करून टाकी उभारण्याची जागा निश्चित केली आली.
शत्रुघ्न काटे म्हणाले की, पिंपळे सौदागर परिसरात दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत आहे. वाढती लोकसंख्या पाहता भविष्यात पाण्याची कमतरता पडू शकते. त्यामुळेच परिसरात सुरळीत पाणीपुरवठा व्हावा, तसेच पाणीसाठा वाढावा म्हणून येथे पाण्याची टाकी उभारण्यात येत आहे. ‘अमृत योजने’अंतर्गत ही टाकी बांधण्यात येणार असून जमिनीवर २५ लाख लिटर आणि भूमिगत १० लाख लिटर अशी एकूण ३५ लाख लिटर पाण्याची टाकी बांधण्याचे काम सुरु करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
निर्मला कुटे म्हणाल्या की, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता रामदास तांबे, उपअभियंता राजेंद्र जावळे, उद्यान स्थापत्य विभाग अधिकारी संजय कांबळे, नगररचना विभागाचे संतोष जगदाळे आदींसोबत आज टाकी बांधण्याच्या जागेची पाहणी केली. येथील आयसीआयसीआय बँके समोरील उद्यानामध्ये टाकीची जागा निश्चित करण्यात आली. या पाण्याच्या टाकीचे भूमिपूजन १५ जानेवारी पर्यंत करण्याचा प्रयत्न असून त्याबाबत संबंधित अधिकार्यांना तशा सुचना दिल्याचे नगरसेवक शत्रुघ्न काटे व निर्मला कुटे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - मांजरी येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या वार्ताहराला सहायक पोलीस आयुक्त नीलेश मोरे यांनी शनिवारी मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी, अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन दिले. यासंदर्भात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलिस आयुक्तांनी दिले.
वार्तांकन करीत असताना पत्रकार ज्ञानेश भुकेले यांना वानवडीचे सहायक पोलिस आयुक्त निलेश मोरे यांनी शासकीय कर्तव्य बजावण्याचा आव आणत थेट गाडीत डांबून नेले. त्यांनी वार्ताहराला शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली. तसेच, ‘विद्यार्थी आंदोलनाबाबत चुकीच्या पद्धतीने प्रश्न विचारून मोबाइलवर रेकॉर्डिंग केले’, असा माफीनामाही लिहून घेतला. शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी गेल्या दोन दिवसांपासून विविध मागण्यांबाबत बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ‘लोकसत्ता’चे वार्ताहर ज्ञानेश भुकेले या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी वसतिगृहाच्या आवारात आले होते. आंदोलनाच्या ठिकाणी बंदोबस्तासाठी पोलीस अधिकारी व त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी भुकेले यांना ओढून नेत थेट पोलीस व्हॉनमध्ये बसविले. त्यानंतर एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे वागणूक देऊन भुकेले यांना थेट हडपसर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. भुकेले यांना धमकावून त्यांच्याकडून जबरदस्तीने माफीनामा लिहून घेतला. हा सर्व प्रकार पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या निदर्शनास आणून दिला. यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अनिल मोरे, सीताराम लांडगे, धनराज माने, सागर बोदगिरे, तुकाराम गोडसे, दिगंबर माने, अमित कुचेकर, दीपक पाटील, तुषार पायगुडे, विशाल भालेराव, दीपक बल्हाडे आदी उपस्थित होते. याबाबत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002