व्हिएस न्युज - चिखली येथील घरकुल परिसरात समर्थ हाऊसिंग सोसायटी, एफ-१६ आणि मराठवाडा जनविकास संघ यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. मराठवाडा जनविकास संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि छत्रपती शिवाजी महाराज वनश्री राज्यस्तरीय वृक्षमित्र पुरस्कारप्राप्त अरुण पवार यांच्या पुढाकाराने पिंपळ, आवळा, वड, चिंच, कडुलिंब, आंबा, जांभूळ आणि करंज यांसारख्या विविध देशी वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात आली. याशिवाय फळझाडे आणि पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त रोपांचेही वृक्षारोपण करण्यात आले.
या उपक्रमावेळी सोसायटीचे अध्यक्ष अशोक मगर, मीनाताई मोहिते, सुभाष लांडगे, लक्ष्मण जाधव, रंगनाथ आवारे, बिभीषण पवार, सुग्रीव पाटील, चतुरभुज चव्हाण यांच्यासह सोसायटीचे सर्व सभासद, स्वामी महिला बचत गट आणि समर्थ महिला बचत गटाच्या सदस्यांची उपस्थिती होती. घरकुल परिसरात राबविण्यात आलेल्या या वृक्षारोपण उपक्रमाचे रहिवाशांनी कौतुक केले. केवळ झाडे लावून न थांबता त्यांचे संगोपन आणि संवर्धन करण्याचा संकल्पही यावेळी रहिवाशांनी केला.

राज्यभरात ५० हजारांहून अधिक झाडांची लागवड
वृक्षमित्र अरुण पवार हे अनेक वर्षांपासून वृक्षारोपण आणि पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. त्यांनी नुकतेच जांबवडे येथील भंडारा डोंगराच्या पायथ्याशी एक हजार झाडांचे वृक्षारोपण केले. आतापर्यंत राज्यभरात ५० हजारांहून अधिक झाडे लावून त्यांचे संगोपन केल्याचे त्यांनी सांगितले. वृक्षारोपण करण्यास इच्छुक असलेल्या नागरिकांना आणि संस्थांना ते देशी वृक्ष, फळझाडे व फुलझाडांची रोपे उपलब्ध करून देतात. या उपक्रमात अनेक संस्था आणि नागरिक सहभागी झाले आहेत. झाडे लावण्याबरोबरच त्यांना नियमित पाणी देऊन जगविणे आणि त्यांचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचा त्यांचा आग्रह आहे.
‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना राबविण्याचे आवाहन'
“दुष्काळावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावून ती जगविली पाहिजेत. आपल्या कुटुंबात जेवढे सदस्य आहेत, तेवढी किमान झाडे प्रत्येक कुटुंबाने लावावीत. ‘एक व्यक्ती, एक झाड’ ही संकल्पना प्रत्येक कुटुंबासाठी बंधनकारक करावी, असे आवाहन आम्ही कोरोना काळात जिल्हाधिकारी, वन विभाग आणि महापालिका प्रशासनाला केले होते. याबाबत पत्रव्यवहार करून सातत्याने पाठपुरावाही केला आहे. प्रशासनाने या संकल्पनेची गांभीर्याने अंमलबजावणी केल्यास पर्यावरण संवर्धनाला मोठी मदत होईल,” असे अरुण पवार यांनी सांगितले.
वाढते तापमान, पाणीटंचाई आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने वृक्षारोपणाबरोबरच वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारणे गरजेचे आहे. घरकुल परिसरातील या उपक्रमातून नागरिकांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.
