व्हीएस न्यूज - युवा विश्वचषक (१९ वर्षांखालील) क्रिकेट स्पध्रेकरिता न्यूझीलंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक आणि माजी कसोटीपटू राहुल द्रविड यांनी भारतीय युवा संघाच्या कामगिरीवर विश्वास व्यक्त केला आहे. आगामी सहा ते आठ महिन्यांच्या काळात या युवा संघातील खेळाडूंना भारताच्या ‘अ’ संघाकडून खेळताना पाहण्याचे लक्ष्य द्रविडने डोळ्यासमोर ठेवले आहे.
‘युवा विश्वचषक स्पध्रेत रोमांचक आव्हान असतात आणि या खेळाडूंसाठी ही चांगली संधी आहे. भारताच्या राष्ट्रीय संघात स्थान मिळवण्याच्या दिशेने हे पहिले पाऊल आहे. युवा क्रिकेटपासून सुरू होणारा हा प्रवास संधी मिळत गेल्यानंतर प्रथम श्रेणी, भारत ‘अ’ आणि त्यानंतर राष्ट्रीय संघ असा त्याचा प्रवास होत असतो,’ असे द्रविड यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की,‘युवा खेळाडूंसोबत मी क्रिकेटच्या इतर प्रकाराबद्दलही चर्चा करतो. पुढील ६ ते ८ महिन्यांत या खेळाडूंनी भारताच्या ‘अ’ संघात स्थान मिळवल्यास, आनंदच होईल. युवा विश्वचषक स्पध्रेतून खेळाडू घडायला सुरूवात होते.
मुंबईचा खेळाडू पृथ्वी शॉच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ युवा विश्वचषक स्पध्रेत खेळणार आहे. पृथ्वीने यापूर्वी न्यूझीलंडविरुद्धच्या सराव सामन्यात भारत ‘अ’ संघाचे प्रतिनिधीत्व केले होते. त्यामुळे या युवा संघातून भारताच्या वरिष्ठ संघात स्थान मिळवण्यात कोणते खेळाडू आघाडीवर आहेत, याबाबत द्रविडला विचारले असता तो म्हणाला,‘युवा आणि भारत ‘अ’संघाचा प्रशिक्षक म्हणून या खेळाडूंकडून मला बरेच काही शिकायला मिळाले. या पिढीचा विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांना क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांशी जुळवून घ्यायचे आहे. हे खूप मोठे आव्हान आहे. हा खेळ बराच बदलला आहे. त्यामुळे वरिष्ठ संघात यापैकी कोण खेळेल याबाबत मी सांगू शकत नाही. प्रत्येक खेळाडूमध्ये क्षमता आहे.’
व्हीएस न्यूज - तिहेरी तलाक ही मुस्लिम समाजातील प्रथा संपवण्यासाठी अखेर आज (गुरूवार) संसदेत मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक सादर करण्यात आले. कायदा मंत्री रवीशंकर प्रसाद यांनी प्रश्नोत्तरानंतर हे विधेयक संसदेसमोर मांडले. अपेक्षेप्रमाणे एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी या विधेयकाला विरोध केला. हा कायदा मुलभूत अधिकाराचे उल्लंघन करत असल्याचे ओवेसी यांनी म्हटले. हे विधेयक सदोष असून यात बऱ्याच बाबी विरोधाभास निर्माण करणारे असल्याचे मत बीजेडीचे खासदार भ्रृतहारी मेहताब यांनी मांडले. काँग्रेसनेही विधेयकाचे स्वागत केले असले तरी काही अटींचा पुर्नविचार करण्याची त्यांनी मागणी केली आहे. दरम्यान, हे विधेयक महिलांच्या सन्मानासाठी असल्याचे रवीशंकर प्रसाद यांनी म्हटले.
तिहेरी तलाक विधेयकावर बोलताना प्रसाद म्हणाले की, पंतप्रधान मोदी असेपर्यंत कोणत्याही महिलेवर अन्याय होणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने कायदा करण्यास सांगितले होते. त्यांच्याच आदेशाचे पालन केले जात आहे. हा कायदा महिलांचे हक्क आणि न्याय यासाठी असून प्रार्थना, परंपरा किंवा धर्माशी संबंधित नसल्याचेही ते म्हणाले.
या विधेयकात तिहेरी तलाकप्रकरणी दोषींसाठी ३ वर्षे शिक्षेची तरतूद आहे. याला काही पक्षांचा विरोध आहे. २०११ च्या जनगणनेनुसार देशात ८.४ कोटी मुस्लिम महिला आहेत आणि प्रत्येकी एक घटस्फोटित पुरूषांच्या तुलनेत ४ महिला याप्रकरणी पीडित आहेत. अनेक मुलींचे वय १५ वर्षांपेक्षा कमी असताना केले जातात. २००१ ते २०११ या कालावधीत मुस्लिम महिलांना घटस्फोट देण्याचे प्रमाण ४० टक्क्यांनी वाढले आहे.
व्हीएस न्यूज - पिंपळे निलख – वाकड रोड ‘पोस्टरमुक्त’ करण्यात आला आहे. येथील संपूर्ण रोडवरील पथ दिव्यांच्या खांबावर बेकायदा पोस्टर लावण्यात आले होते. स्वत: तुषार कामठे यांनी अतिक्रमन मोहिमेत सहभागी होत हा रस्ता ‘पोस्टरमुक्त’ केला.
पिंपळे निलख आणि वाकड परिसराची झपाट्याने वाढ होत आहे. त्यापुढेच असणार्या हिंजवडी आयटी पार्कमुळे येथील मुख्य रस्त्यांवर कायम मोठी वर्दळ असते. या रस्त्यावरील पथदिव्यांच्या खांबावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टरमुळे रात्रीच्या वेळी रस्त्यावर अपुरा प्रकाश पडत होता. तसेच वाहनचालकांना वाहन वळविताना अडथळा होत होता. या पोस्टरमुळे प्रभागाचे विद्रुपीकरण झाले होते. याबाबतची तक्रार पिंपरी चिंचवड गृहनिर्माण संस्था महासंघाच्या सदस्यांनी स्थानिक नगरसेवक तुषार कामठे यांच्याकडे केली होती. त्यानुसार कामठे यांनी याबाबत महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी पोस्टर काढण्याच्या सुचना केल्या होत्या. तसेच पत्रव्यवहार देखील केला होता. मात्र महापालिका प्रशासनाने याकडे अर्थपूर्ण कानाडोळ करत कारवाईत दिरंगाई केली होती. त्यामुळे नगरसेवक तुषार कामठे यांनी स्वत:च हे अनधिकृत पोस्टर काढण्याचा निर्णय केला. त्यानुसार त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांचे पथक स्थापन करुन वाकड रोडवरील बेकायदा पोस्टर काढुन घेतले व वाकड रोड पोस्टरमुक्त केला. तसेच काढण्यात आलेले पोस्टर “ड” क्षेत्रीय कार्यालयाच्या प्रवेशद्वासमोर टाकुन महापालिका प्रशासनाचा निषेध केला.
व्हीएस न्यूज - नियमानुसार सर्व देयक रक्कम देऊन क्रेडीट कार्ड बंद केल्यानंतरही एचडीएफसी बँकेकडून निगडी प्राधिकरण येथील एका ग्राहकाला वारंवार पैसे भरण्यासाठी सांगितले जात होते. त्यासाठी बचत खात्यातील रक्कमही परस्पर खात्यातून काढून घेण्यात आली होती. बँकेच्या या मनमानी कारभाराबद्दल पोलीस व रिजर्व बँकेकडे ग्राहकाने तक्रार करताच आरबीआयने तक्रारीची दखल घेत कायदेशीर कारवाईचे आश्वासन दिले आहे.
निगडी प्राधिकरण येथील रहिवासी रणजीत इंगळे यांनी त्यांचे एचडीएफसी बँकेचे क्रेडीट कार्ड २०१६ मध्ये बंद केले. त्यासाठी लागणारी रक्कम धनादेशाद्वारे बँकेत जमा केली. मात्र त्यानंतरही इंगळे यांना त्यांच्या मोबाईलवर वेळोवेळी बँकेकडून पैसे भरण्यासाठी विचारणे केली जाऊ लागली. यावर इंगळे यांनी बँकेत जाऊन आपण रक्कम भरली असल्याचे सांगितले. मात्र तरीही बँकेने इंगळे यांचे एचएडीएफसी बँकेतील बचत खात्यातून परस्पर आठ हजार रुपये रोखून धरत ते पुढे काढून घेतले. याप्रकरणी इंगळे यांनी बँकेच्या व्यवस्थापकाकडेही तक्रार केली, त्यांना मेल केले. मात्र त्या मेलला कोणतेही उत्तर न देता परस्पर तक्रार निकाली काढल्याचे बँकेने एसएमएसद्वारे सांगितले. यावेळी इंगळे यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ल यांना आपल्या सोबत झालेल्या फसवणुकीची माहिती निवेदनाद्वारे दिली. तेच निवेदन पुढे इंगळे यांनी थेट रिजर्व बँक ऑफ इंडियाला दिले. इंगळे यांच्या तक्रारीची दखल घेत आरबीआयने इंगळे यांनी जागरूकपणे तक्रार केल्याबद्दल अभिनंदन केले असून त्यांच्या तक्रारीचे कायदेशीर पद्धतीने निवारण केले जाईल व त्याची माहितीही त्यांना दिले जाईल असे आश्वासन दिले आहे. एका तक्रारीमुळे खासगी बँकांच्या मनमानी काराभाराला आळा बसेल असे मत इंगळे यांनी व्यक्त केले आहे.
व्हीएस न्यूज – भारतीय अर्थव्यवस्था आर्थिक विकासदराच्याबाबतीत (जीडीपी) आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्स या दोन बड्या देशांना मागे टाकेल, असा अंदाज वर्तविण्यात आला असून यासंबंधीचा अहवाल ‘द सेंटर फॉर इकॉनॉमिक्स अँड बिझनेस रिसर्च’ने (सीईबीआर) प्रसिद्ध केला आहे.
या अहवालानुसार वीज आणि तंत्रज्ञान आगामी वर्षात कमी किंमतीत उपलब्ध होऊन एकूणच जागतिक अर्थव्यवस्थेत तेजी पाहायला मिळेल. त्याचबरोबर जागतिक बाजारपेठेत आशियाई देशांच्या अर्थव्यवस्था वर्चस्व गाजवतील. यामध्ये वरच्या स्थानावर भारतीय अर्थव्यवस्था असेल. या एकूणच परिस्थितीमुळे जगातील आघाडीच्या दहा अर्थव्यवस्थांच्या यादीत आगामी १५ वर्षात आशियाई देशांचे वर्चस्व असेल, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सध्या तात्पुरत्या स्वरुपाचे धक्के भारतीय अर्थव्यवस्थेला बसत असून भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास सध्या नोटाबंदी आणि जीएसटीच्या निर्बंधांमुळे काहीसा मंदावला आहे. पण तरीही भारतीय अर्थव्यवस्था आगामी वर्षात ब्रिटन आणि फ्रान्सला सहजपणे मागे टाकून जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होईल, असे सीईबीआरचे उपाध्यक्ष डग्लस मॅकविल्यम्स यांनी सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002