व्हीएस न्यूज – पुणे महानगरपालिकेने सात वर्षांपूर्वी सार्वजनिक वाहतुकीचे सक्षमीकरण करण्यासाठी मेट्रो प्रकल्पाला मान्यता दिली. दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनकडून त्यासाठी मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प आराखडाही तयार करून घेण्यात आला. पुण्याला मेट्रो प्रकल्पाला मान्यता देणारी देशातील पहिली महापालिका असा मानही मिळाला. पण त्यानंतर मेट्रो प्रकल्प प्रत्येक टप्प्यावर रखडला.
तेथील मेट्रो प्रकल्पाला पुण्यातील अतिहुशार माणसांमुळे विलंब होत असल्याची टीका केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी यावेळी नागपूर आणि पुण्यातील मेट्रो प्रकल्पांची तुलना करताना पुण्यातील भाजप नेत्यांना टोला लगावला. खूपच सुंदर पद्धतीने मेट्रोचा आराखडा तयार करण्यात आला आहे. पण पुण्यातील काही अतिहुशार माणसांमुळे त्यावर बरीच चर्चा होते आणि मतभेद होतात. पुण्यातील मेट्रो प्रकल्प या सर्व कारणांमुळे रखडला आहे. याउलट आमच्या नागपूरात एकछत्री अंमल असल्याने सर्व कामे पटापट होत आहेत, असे गडकरी यांनी म्हटले.
व्हीएस न्यूज - भारत हा हिंदू राष्ट्रच असून भाषा, धर्म, राहणीमान आणि परंपरा वेगवेगळ्या असूनही हिंदुत्वामुळेच भारत एकसंध आहे, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडले आहे. भारत पाकिस्तानला शत्रू मानत नाही. पण पाकिस्तानने अद्याप भारताबाबतची भूमिका बदलली नाही, असेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे गुवाहाटीत रविवारी एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले, भारताने पाकिस्तानला शत्रू मानणे कधीच बंद केले. मात्र, दुर्दैवाने पाकिस्तानने अजूनही भारताबाबतची भूमिका बदलली नाही. हडप्पा, मोहंजोदारो आता पाकिस्तानमध्ये असले तो भारताचाच एक भाग आहे. पण पाकने हे कधी स्वीकारलेच नाही.पाकने हिंदुत्व स्वीकारले नाही आणि म्हणून तो वेगळा देश झाला, असे त्यांनी नमूद केले. बांगलादेशबाबतही त्यांनी हीच भूमिका मांडली. बांगलादेशमध्येही बंगाली भाषा बोलणारे अनेक जण आहे. मात्र तरी देखील तो स्वतंत्र देश का?, कारण त्यांनी देखील हिंदुत्व स्वीकारले नाही, असे त्यांनी आवर्जून सांगितले. हिंदुत्वात विविधतेला स्थान आहे. मात्र विभाजनाला स्थान नाही. म्हणूनच भारत हा हिंदू राष्ट्र आहे, असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – जगभरात जलद गतीने प्रगती करणा-या अर्थव्यवस्थांचा विचार करता भारत २०१८ मध्ये चीनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकणार असल्याचे स्पष्ट होत आहे. याबाबत सँक्टम वेल्थ मॅनेजमेंटने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार, यावर्षी भारतीय भांडवली बाजार जगात पाचवा सर्वात मोठा भांडवली बाजार होणार आहे. ज्यावेळी जगभरातील देश आर्थिक संकटांशी सामना करत असतील त्यावेळी भारताची अर्थव्यवस्था मात्र जलद गतीने पुढे झेपावत असेल असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
या अहवालानुसार, ज्यावेळी विकसित देशांचा विकासदर २ ते ३ टक्क्य़ांशी रेंगाळत असेल त्यावेळी भारताचा विकासदर हा ७.५ टक्क्य़ांवर पोहोचलेला असणार आहे. या व्यतिरिक्त इतर विकसनशील देशांच्या तुलनेतही भारत पुढेच असणार आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी चीनच्या विकासदराची गती धीमी झालेली असेल. भारतीय भांडवली बाजारात इक्विटीच्या माध्यमातून मिळणारा परतावा देखील ६ ते ८ टक्क्य़ांपर्यंत असेल असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. खरे तर हे निश्चित उत्पन्नाबाबतच शक्य असते. तथापि, जर भारतात महागाई वाढलेली असली, किंवा किंमती वाढलेल्या असल्या, तर मात्र बाजाराची गती त्या प्रमाणात असणार नाही, असेही पुढे म्हटलेले आहे. या वर्षी शेअर बाजारात जलद गती पाहायला मिळू शकते. निफ्टीने जलदगतीने उसळी मारलेली आहे. सध्या निफ्टी १०,४९० ते १०,५८० इतका आहे. या वर्षीच्या शेवटापर्यंत तो ११,२०० पासून ते ११,५०० पर्यंत जाण्याची शक्यता आहे असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.
व्हीएस न्यूज - भारतातील १ टक्का श्रीमंताकडे देशातील ७३ टक्के संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे. तर ६७ कोटी भारतीयांच्या संपत्तीमध्ये फक्त एक टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती एका अहवालातून उघड झाली आहे. भारतातील गरीब आणि श्रीमंतांमधील दरी यानिमित्ताने समोर आली आहे.
दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या पार्श्वभूमीवर ऑक्सफॅम या संस्थेचा ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ हा अहवाल रविवारी प्रसिद्ध झाला. देशातील आणि जागतिक पातळीवरील आर्थिक विषमता या अहवालातून समोर येते. जागतिक पातळीवर गेल्या वर्षभरात तयार झालेल्या एकूण संपत्तीतील ८२ टक्के वाटा हा एक टक्का लोकांकडे गेला. ३ अब्ज ७० लाख लोकांच्या संपत्तीमध्ये काहीच वाढ झालेली नाही. भारतातही फार वेगळे चित्र नाही. भारतातील एक टक्का श्रीमंतांच्या संपत्तीमध्ये जवळपास २०. ९ लाख कोटी रुपयांनी वाढ झाली. जगातील १० देशांमधील सुमारे ७० हजार लोकांची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. सीईओंच्या पगारात कपात करावी, असे सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ६० टक्के लोकांना वाटते. भारतातील ३७ टक्के अब्जाधीशांकडे वारसाहक्काने संपत्ती आल्याचे अहवालातून समोर येते. ऑक्सफॅमच्या भारतातील सीईओ निशा अग्रवाल यांनी या अहवालावर चिंता व्यक्त केली आहे. ‘केंद्र सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आर्थिक सोयीसुविधांचा लाभ मूठभर लोकांपर्यंतच पोहोचत असल्याचे यानिमित्ताने दिसते’, असे त्या म्हणाल्यात.
व्हीएस न्यूज – ओम प्रकाश रावत यांच्या नावावर मुख्य निवडणूक आयुक्तपदी शिक्कामोर्तब करण्यात आले असून या संदर्भातली घोषणा केंद्र सरकारने केली आहे. ही माहिती केंद्र सरकारने जारी केलेल्या एका पत्रकानुसार समोर आली आहे. आता ओम प्रकाश रावत अचल कुमार ज्योती यांच्या जागी काम पाहतील.
२३ जानेवारीला अचल कुमार ज्योती यांचा कार्यकाळ संपत असल्यामुळे ओम प्रकाश रावत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नसीम जैदी ज्योती यांच्या आधी मुख्य निवडणूक आयुक्त होते. जुलै २०१७ मध्ये त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर अचल कुमार ज्योती यांनी हे पद स्वीकारले. आता ज्योती यांचा कार्यकाळ संपल्याने ओम प्रकाश रावत हे मुख्य निवडणूक आयुक्त असतील.
व्हीएस न्यूज - समाजातील अनेक ध्येयवेडी माणसे स्वत:चा उदरनिर्वाह करून समाजासाठी आणि देशासाठीही काम करत असतात. अशाच प्रकारे देशाच्या रक्षणार्थ ‘जॉईन इंडियन आर्मी’ हा संदेश घेऊन भोसरीतील ‘मराठा वॉरियर्स’ या ग्रुपच्या १० ध्येयवेड्या तरुणांनी सायकलीवर पुणे ते वाघा बार्डर हि अनोखी मोहीम नुकतीच यशस्वीरीत्या पार पाडली.
भोसरी येथील ‘मराठा वॉरिअर्स’ या समूहातील राम फुगे, विश्वास काशिद, प्रशांत जाधव, निलेश धावडे, प्रज्ञेश मोळक, संतोष दरेकर, बजरंग मोळक, विजय हरगुडे, संदीप शिंदे व आठ वर्षीय अंशुमन धावडे अशा या ध्येयवेड्या तरुणांचा मोहिमेत सहभाग होता. या समुहाने सीमेवर लढा देणाऱ्या भारतीय सैन्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तसेच जास्तीत जास्त तरुणांनी भारतीय सैन्यदलात सहभागी व्हावे यासाठी भोसरी ते वाघा बॉर्डर या तब्बल २००० किलोमीटरच्या सायकल रॅलीचे आयोजन केले होते. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान व पंजाब अशा ४ राज्यातून १८ दिवस प्रवास करुन या दहा सायकलस्वारांनी २ हजार किलोमीटर अंतर पूर्ण केले. नुकतेच हे सायकलस्वार मोहीम फत्ते करून परतले आहेत. चार राज्यांच्या सीमा ओलांडून देशरक्षणार्थ संदेश देणे हे सर्वांसाठीच अभिमानाची बाब असल्याचे यावेळी सायकलस्वारांनी सांगितले.
या मोहिमे दरम्यान मार्गातील शाळा व महाविद्यालयांना भेटी देऊन तेथील तरुणांना त्यांनी ‘भारतीय लष्कारामधील संधी’ यावर प्रबोधन केले. तसेच सायकल व आरोग्याचे महत्त्वही त्यांनी पटवून दिले. या मोहिमेसाठी गेल्या ६ महिन्यांपासून या तरुणांची तयारी चालू होती. त्यात फिटनेस आणि नियमित सरावावर विशेष लक्ष देण्यावर सर्वांचा भर होता. मराठा वॉरियर्सचे प्रमुख राम फुगे म्हणाले की, प्रत्येक वेळी काही तरी नवीन करायचे ठरवले होते. पुणे ते सिंगापूर असा ३ वर्षांपूर्वी दुचाकीने प्रवास केला आहे. तसेच ‘पुणे ते लेह-लडाख’ असा दुचाकीने प्रवास केला आहे. मराठी माणसे सैन्यात मोठ्या पदावर पोहोचली पाहिजेत, असा संदेश घेऊन सायकल वरून २००० किलोमीटरचे अंतर पूर्ण केल्याचा अभिमान आहे. राज्याराज्यांतील विविधता आणि त्यातही देशातील एकात्मता ठिकठिकाणी दिसून आली तसेच तरुण विद्यार्थ्यांमध्ये देशरक्षणाची उत्स्फूर्त इच्छा आहे. याचे समाधान असल्याचेही त्यांनी सांगितले.
१८ दिवसांचा खडतर प्रवास आणि स्थानिकांची मदत…
मराठा वारीयर्स च्या सर्व सदस्यांना मोहिमेत प्रवासात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. राजस्थानात मुक्कामासाठी अनेक ठिकाणी स्थानिकांनी मदत केली, जैन मंदिर तसेच गोशाळा अशा ठिकाणी सायकलस्वारांनी मुक्काम केले, छप्पर येथे राजस्थान पोलीसांनी सायकलस्वारांची व्यवस्था उदघाटनही न झालेल्या हॉटेलमध्ये केली. पंजाबमध्ये काही रस्त्यांवर बेशिस्त वाहनचालकांमुळे सायकलस्वारांना त्रासाला सामोरे जावे लागले, तसेच अमृतसर मध्ये दाट धुक्यात दहा फुटांवरीलही दिसत नसताना सर्वच सायकलस्वारांनी काळजीपूर्वक प्रवास पूर्ण केला.
ठिकठिकाणी स्वागत आणि जल्लोष…
मराठा वॉरियर्सच्या सर्व सायकलस्वारांचे भोसरी येथून प्रस्थान केल्यापासून ठिकठिकीणी स्थानिकांनी स्वागत केले. राजस्थान येथील आमदार फुलसिंग मीना, बडोदा येथे महाराज सत्यजित गायकवाड यांनी स्वागत केले तसेच उदयपूर येथील महाराज लक्ष्यराज सिंग यांनी आपल्या आलिशान पॅलेस मध्ये जंगी स्वागत केले व पुढील प्रवासासाठी शुभेच्छाही दिल्या. वाघा बॉर्डर वर बीएसएफ चे अधिकारी सैनी यांनी सर्व मोहिमवीरांचा सत्कार केला, यावेळी मराठा वारीयर्सचे सदस्य अक्षरशः भारावून गेले.
सोशल मीडियातून पाठिंबा…
सोशल मीडियातूनही या सायकलस्वारांच्या वाघा मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. दिवसभरात कापलेले अंतर आणि प्रवासात आलेले दुर्मिळ अनुभव सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडत होते ज्याला सर्व स्तरांतून चांगलीच पसंती मिळाली.
व्हीएस न्यूज : जीवनात सकारात्मक दृष्टीकोन ठेवला की यश नक्कीच मिळते. नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या क्षेत्रात काम करीत असताना नवीन आव्हानांना सामोरे जा. यातूनच आपण प्रगती करू शकतो. केंद्र सरकारने सुरू केलेल्या मेक इन इंडिया, मेड इन इंडिया, कौशल्य विकास या योजना चांगल्या आहेत. सेवा आणि निर्मिती क्षेत्रासाठी त्या फायद्याच्या आहेत. नोटबंदी किंवा जीएसटी या निर्णयांचा औद्योगिक क्षेत्रावर कोणत्याही प्रकारे नकारात्मक परिणाम झाला नाही. हे निर्णय विकासासाठी फायद्याचेच आहेत, असे मत ऑरबिटल ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजच्या व्यवस्थापकीय संचालिका मंजिरी बिचे यांनी शुक्रवारी आकुर्डी येथे व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस. बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि सत्यता' या विषयावरील दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी बिचे बोलत होत्या. यावेळी सिल्व्हर ग्रुप ऑफ इंडस्ट्रिजचे संचालक निरज शहा पीसीईटी ट्रस्टचे विश्वस्त भाईजान काझी, व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रा. डॉ. हंसराज थोरात आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
पुढे बोलताना बिचे म्हणाल्या की, सरकारने नोटबंदी, जीएसटी कर प्रणाली अंमलात आणली. हे निर्णय चुकीचे असून भारतीय अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होईल, असे बोलले जात होते. परंतु, औद्योगिकीकरणाच्या दृष्टीकोनातून विचार केल्यास या निर्णयांचा सकारात्मक परिणाम झाला आहे. बाजार पेठेला स्थैर्य मिळाले असून परदेशी गुंतवणुक वाढली आहे. जीएसटी कर प्रणाली औद्योगिक क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाची होती. पूर्वी अनेक कर होते. जीएसटीमुळे हे विविध कर रद्द होवून संपूर्ण देशात एकच कर प्रणाली आली, असे बिचे यांनी सांगितले.
भारतामधील औद्योगिक क्षेत्राचा अधिक वेगाने विकास होण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याची आवश्यकता आहे. देशाच्या विकासासाठी आयटी तसेच औद्योगिक विभागाची प्रगती गरजेची आहे. असे निरज शहा यांनी सांगितले. माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे जागतिक स्तरावर खूप महत्त्व असून अनेक प्रकारच्या रोजगार संधी निर्माण होतात. मात्र, जागतिक मंदीच्या काळात अनेक कंपन्यांमधून कामगार कपात करण्यात आली. याउलट निर्मिती क्षेत्र ज्यामध्ये औद्योगिक कंपन्यांचा समावेश होतो. त्यांचा विचार केल्यास मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होते. केंद्र सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांमुळे भारतात सुमारे 18 लाख रोजगार निर्माण झाले, असे शहा यांनी सांगितले.
जागतिक स्तरावर चीनची अर्थव्यवस्था आणि तेथील जोमाने सुरू असलेल्या औद्योगिक विकासाची चर्चा नेहमीच होते. यामध्ये चीन आघाडीवर असल्याचेही बोलले जाते. परंतु, चीन पेक्षा भारतामध्ये औद्योगिक वाढ होण्यासाठी पोषक वातावरण, अनेक संधी आहेत. तरुणांची संख्या अधिक असून, नव कल्पना, कौशल्य विकास, तंत्रज्ञानाची माहिती यामध्ये भारतीय आघाडीवर आहेत. यापुढील काळात जागतिक पातळीवर भारताचा बोलबाला अधिक वाढेल. आपल्या समोर येणा-या अडचणीवर सोडविण्यासाठी नीट अभ्यास करून त्याचे उत्तर शोधण्याची आवश्यकता आहे. आपल्याकडे असलेले ज्ञान अधिक विकसित कसे होईल, त्याचा सर्वांना फायदा कसा मिळेल, याचा विचार विद्यार्थ्यांनी करावा, असे शहा म्हणाले.
पीसीइटीचे विश्वस्त भाईजान काझी आपल्या प्रास्ताविकात म्हणाले की, एस. बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट मध्ये अनेक उद्योजक, कार्पोरेट क्षेत्रामध्ये कार्यरत असलेले अधिकारी घडविण्याचे कार्य केले आहे. संस्थेची यशाची चढती कमान अशीच वाढावी यासठी पीसीइटीच्या विश्वस्तांकडून सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन काझी यांनी दिले. यानंतर दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुवाहाटी विद्यापीठातील प्रा. डॉ. जी. जी. बनिक म्हणाले की, केंद्र सरकारने केलेली नोटबंदी, त्यानंतर आलेली जीएसटी कर प्रणाली हे निर्णय चांगले की वाईट यावर दोन मतप्रवाह आहेत. जागतिक परिस्थितीचा आढावा घेतला तर 160 देशांमध्ये जीएसटी प्रणाली वापरली जात आहे. भारताचा विचार केला तर जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तूंच्या किंमती कमी होत आहेत. सरकारला अधिक कर मिळवायचा आहे. त्यासाठी कराचे दर वाढविण्यापेक्षा कमी दराने अधिक लोकांकडून कर मिळवल्यास उत्पन्नामध्ये वाढ होईल, हे साधे गणित मांडलेले आहे. जीएसटीचा छोट्या व्यापा-यांना फटका बसेल असे सांगितले जाते. परंतु, हा समज पूर्णपणे चुकीचा आहे. 2018-19 या आर्थिक वर्षात जीएसटी कर प्रणाली सुरळीत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
‘मृण्मय’ उत्सवाचे शिरोडकर यांच्या हस्ते उद्घाटन
व्हीएस न्यूज - कलात्मक रचना, उत्कृष्ठ सादरीकरण आणि नीट नेटकेपणा या त्रिसुत्रीचे काटेकोरपणे पालन केल्यास प्रत्येक वास्तुविशारद यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन अमिटी स्कुल ऑफ आर्किटेक्ट प्लॅनिंगचे संचालक प्रा. अभिजीत शिरोडकर यांनी केले. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या आकुर्डी येथील एस.बी.पाटील कॉलेज ऑफ आर्किटेक्चर ॲण्ड डिझाईन या महाविद्यालयात ‘मृण्मय - द सिड’ या वार्षिक उत्सवाचे उद्घाटन प्रा. शिरोडकर यांच्या हस्ते झाले.
यावेळी पीसीईटीचे विश्वस्त भाईजान काझी, महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र सोनवणे, प्रा. गुरुदिप चिखलकर, प्रा. रुजुता पाठक, प्रा. अजय हराळे, ज्येष्ठ अभियंता दत्तात्रय कड, प्रा. स्वाती गोडबोले आदी उपस्थित होते.
प्रा. शिरोडकर म्हणाले की, ज्याप्रमाणे प्रत्येक शब्दाला अर्थ असतो त्याप्रमाणे वास्तुविशारदाने काढलेल्या प्रत्येक रेषेला महत्व असते. ‘नॅनो’ तंत्रज्ञानाचा युगात कमीत कमी जागेत कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देणे हे वास्तुविशारदाचे कौशल्य असते. त्याच्या भौमितीय ज्ञाना बरोबरच रंगांच्या विविध छटांचा वापर करुन कलात्मकता जपावी यातूनच अभिनव कलाकृतीची निर्मिती होईल. तंत्रज्ञान विकसित नसतानाच्या काळात देखील भारतात अनेक अजरामर एैतिहासिक वास्तू उभारण्यात आल्या आहेत त्या वास्तूंचा चिकित्सक पणे अभ्यास करावा व आपले अनुभव विश्व विकसित करावे असेही प्रा. शिरोडकर म्हणाले. यावेळी प्रा. शिरोडकर यांच्या हस्ते‘अेआयसीए’ (AICA-Appreciation for Innovative and Creative Approach) या स्मरकेचे प्रकाशन करण्यात आले.
काझी म्हणाले की, पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व शाखांमध्ये विद्यार्थी व प्राध्यापकांना उत्तमोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न विश्वस्त मंडळ करत असते. हि संस्था फक्त विद्यार्थी घडवत नाही तर देशाचा जबाबदार नागरीक घडविण्याचे काम येथील प्राध्यापक करतात. प्रास्ताविक गुरुदिप चिखलीकर, स्वागत प्राचार्य महेंद्र सोनवणे, सुत्रसंचालन प्रणाली भांबुरे, लिखिता मधुमतला आणि आभार प्रा. चित्रा श्रीवास्तव यांनी मानले.
या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
व्हीएस न्यूज - केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ. सत्यपाल सिंह यांनी औरंगाबादमध्ये आयोजित अखिल भारतीय वैदीक संमेलनाच्या उद्घाटन समारंभात डार्विनचा मानवी उत्क्रांतीचा सिद्धांत संपूर्णपणे चुकीचा असल्याचे वक्तव्य केले आहे.
माकडापासून माणूस निर्माण झाल्याचा उल्लेख वेद, पुराणांमध्ये कुठेही नाही. तसेच हा सिद्धांत विज्ञानाच्या माध्यमातून देखील चूक असल्याचे मत सिंह यांनी मांडले. त्याचबरोबर सत्यपाल सिंह यांनी यावेळी डार्विन थेअरी पुर्णपणे चूक असल्याची माहिती अभ्यासक्रमातून देखील द्यायला हवी अशी मागणी केली.
शुक्रवारी ३ दिवसीय अखिल भारतीय वैदीक संमेलनाचे उद्धाटन झाले. शोभायात्रेने या संमेलनाची सुरुवात करण्यात आली. अनेक संत, महंत तसेच वेद पंडितांनी या संमेलनाला उपस्थिती लावली आहे. जीवनासाठी वेद महत्वाचे आहे. संस्कृती जपायची असेल तर वेद जपणे महत्वाचे असल्याचे मत सत्यपाल सिंह यांनी संमेलनात बोलताना मांडले. वेद जगभरासाठी आणि जगातील सर्व धर्मियांसाठी असल्याचेही सिंह यावेळी म्हणाले.
व्हीएस न्यूज - अहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही या सगळ्यांना ठोठावण्यात आला आहे. जातीयता ही एड्ससारखी समाजात पसरू नये म्हणून या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केली होती, जी न्यायालयाने मान्य केली. अशी माहिती विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली आहे. २०१३ मध्ये तीन दलित युवकांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती. त्याचप्रकरणी सहाजणांना नाशिक सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
सोनईतील सचिन धारू (२४) या तरुणाचे पोपट उर्फ रघुनाथ विश्वनाथ दरंदलेच्या (४८) मुलीशी प्रेमसंबंध होते. ते विवाह करणार असल्याचे समजल्यावर मुलीच्या कुटुंबीयांनी सचिनच्या हत्येचा कट रचला. शौचालयाच्या टाकीची सफाई करण्याच्या बहाण्याने त्यांनी सचिनसह संदीप थनवार, सागर उर्फ तिलक कंडारे यांना दरंदले वस्तीवर बोलावले. तिथे त्या तिघांची अत्यंत अमानूषपणे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. या हत्याकांडाने राज्यभरात खळबळ उडाली होती. सोमवारी न्यायालयाने याप्रकरणात पोपट उर्फ रघूनाथ दरंदले, रमेश दरंदले, प्रकाश दरंदले, गणेश उर्फ प्रवीण दरंदले, संदीप कुल्हे, अशोक नवगिरेला दोषी ठरवले होते.
दलित समाजाच्या तरुणाचे सवर्ण वर्गातील मुलीशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणातून, ‘ऑनर किलिंग’ मधून तरुणासह तिघांची अत्यंत निर्घृण पद्धतीने गणेशवाडी येथे हत्या करण्यात आली. हत्या करणारे ऊस बागायतदार होते. हत्या झालेले मेहतर समाजातील सफाई कामगार होते. हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे हात, पाय, धड, मुंडके ऊस कापण्याच्या अडकित्याने तुकडे करून ते कूपनलिकेत टाकले होते. अक्षरश: थरकाप उडवणारी ही घटना होती.
व्हीएस न्यूज – मंत्रिमंडळ प्रवेशाचा मुहूर्त लांबत चालल्याने हताश झालेल्या माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माझ्या सहनशीलतेचा अंत बघू नका, काहीही करा पण मला लवकर मंत्री करा, असे साकडेच घातले.
काँग्रेस आणि आमदारकीचा गेल्या सप्टेंबर महिन्यात राजीनामा दिलेल्या राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन मंत्री करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. पण राणे यांची पदोपदी भाजपकडून अडवणूक करण्यात आली आहे. भाजपमध्ये अधिकृतपणे राणे यांना प्रवेश देण्यात आला नाही. पण त्यांच्यासमोर स्वतंत्र पक्ष स्थापन करून राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा देण्याची अट घालण्यात आली. राणे यांनी त्यानुसार महाराष्ट्र स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीला पाठिंबा जाहीर केला. राणे यांना विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी किंवा पाठिंबा देण्याचे भाजपने टाळले. शिवसेना नाराज होईल म्हणून राणे यांचा पत्ता कापण्यात आला. पुन्हा आमदारकी मिळविण्यासाठीही राणे यांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
राणे यांना मंत्रिमंडळात समावेश करण्याचे आश्वासन देण्यात आले असले, तरी कोणत्या ना कोणत्या कारणाने मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर टाकण्यात येत आहे. राणे यांची नाराजी शुक्रवारी पत्रकार परिषदेत उफाळून आली. २०१८ सुरू झाले, मग तुमचा मंत्रिमंडळातील समावेश कधी, या प्रश्नावर राणे यांनी माझी सहनशीलता संपण्यापूर्वी निर्णय घ्यावा, असे उद्गार काढले.
व्हीएस न्यूज – मोदी सरकारने दोन दिवसांपूर्वीच हज यात्रेवरील अनुदान बंद करण्याचा निर्णय घेतला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हाच मुद्दा उचलून धरत एक व्यंगचित्र काढले असून हे व्यंगचित्र राज ठाकरे यांच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रकाशितही करण्यात आले आहे. हे व्यंगचित्र ‘(अनु)दान आणि (राष्ट्र)धर्म’ असे शीर्षक देऊन रेखाटण्यात आले आहे.
या व्यंगचित्रात भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संवाद साधते आहे असे दाखवण्यात आले आहे. भारतीय हज यात्रेकरू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागे उभे आहेत असेही दाखवण्यात आले आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भारतमाता सांगते आहे, ते अनुदान काढून घेतले ते योग्यच आहे. देशात इतरही खूप फुटकळ अनुदाने आहेत. तीपण काढून घ्या. त्याचप्रमाणे भारतातील बांगलादेशी घुसखोर, पाकिस्तानातील घुसखोर यांनाही हाकलून द्या असेही भारतमाता पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगते आहे. तर या घुसखोरांच्या मागे ‘भारतातील अतिरेकी घडवणारे मदरसे’ असे चित्रही रेखाटण्यात आले आहे.
हज यात्रेचे अनुदान बंद करण्याच्या मुद्द्यावरून हे व्यंगचित्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काढले आहे. तसेच त्यांनी या व्यंगचित्रातून पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांना हाकलून दिले पाहिजे अशीही भूमिका घेतली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002