व्हीएस न्यूज - पद्मावत चित्रपट प्रदर्शित करण्यास न्यायालयाने परवानगी दिली असली तरी संजय लीला भन्साळी यांच्यासमोरील अडचणी कमी होताना दिसत नाहीत. राजस्थानसह गुजरातमध्येही चित्रपटावरून वाद वाढताना दिसत आहे. मंगळवारी अहमदाबादमधील मॉलमध्ये तोडफोड आणि जाळपोळीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री नितीन पटेल यांनी राज्यात शांतता राखण्यासाठी लोकांनी चित्रपटावर बहिष्कार टाकण्याचे अपील केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे हा वाद सहजासहजी संपणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
‘नवभारत टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, पटेल म्हणाले की, गुजरात सरकारने राजपूत समाजातील लोकांच्या भावनांचा सन्मान करत चित्रपटावर बंदी घातली होती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यात चित्रपट दाखवण्यास सांगितले आणि त्यामुळे राज्यात तणाव आहे. राज्य सरकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचबरोबर काही चित्रपटगृहांनीही स्वेच्छेने चित्रपट प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही लोकांना अपील करतो की, त्यांनी चित्रपटावर बहिष्कार टाकावा.
याचदरम्यान, करणी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष लोकेंद्रसिंह कालवी हेही गुजरातला आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी चित्रपट पाहायला जाणाऱ्यांनाही इशारा दिला. ज्यांना हा चित्रपट पाहायचा आहे, त्यांनी रिलिजच्या दहा दिवसानंतर इंटरनेटवर पाहावी, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकांना आम्ही चित्रपटगृहात हा सिनेमा पाहू देणार नाही. मी सर्वज्ञंना २५ जानेवारीला सहकार्य करण्याचे आवाहन करतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, अहमदाबादमधील सुमारे आठ मल्टिफ्लेक्सनी चित्रपट प्रदर्शित करणार नसल्याचे म्हटले. हिंसेच्या भीतीमुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. आंदोलनकर्त्यांनी मॉल्समध्ये तर तोडफोड व जाळपोळ केलीच. शिवाय बाहेर उभ्या असलेल्या दुचाकीही त्यांनी पेटवल्या होत्या.
व्हीएस न्यूज – चिंचवड- वाल्हेकरवाडी परिसरात प्रभाग क्रमांक १७ मधील शिवनगरी, चिंचवडे कॉलनी आदी ठिकाणी रस्ते डांबरीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. भाजपाचे नगरसेवक नामदेवराव ढाके यांच्या पाठपुराव्याने विकासकामांचा नारळ फोडून शुभारंभ झाला.
या प्रसंगी, ज्येष्ठ नागरिक ढोले काका, वसंत नारखेडे, कैलास रोटे, सचिन वाणी, सामाजिक कार्यकर्ता योगेश महाजन, महापालिका अधिकारी हुमेश मोने, श्री. शेवाळे आदी उपस्थित होते. यावेळी, नगरसेवक नामदेवराव ढाके म्हणाले, गेल्या वर्षभरात प्रभागातील अनेक विकास कामांना सुरुवात करण्यात आली आहे. त्यामध्ये, प्रभागातील नागरिकांसाठी जास्त दाबाने पाणी पुरवठा होण्यासाठी नवीन पाईप लाईन, ड्रेनेजची कामे तसेच प्रभाग स्वच्छता अभियान राबवून अनेक विकास कामांना प्राधान्य देण्यात येत आहे. महापालिकेच्या सन २०१७-१८ या वर्षासाठी निधी मंजूर झाला असून त्या माध्यमातून कामांना सुरुवात करण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज - आयपीएल सिझन ११ ची सुरवात ६ एप्रिल रोजी होणार असून या सिझन मधला पहिला सामना मुंबईत ७ एप्रिलला होणार आहे. अंतिम सामना २७ मे रोजी मुंबईतच होणार असल्याचे एएनआय न्यूज ने आयपीएलचे प्रमुख अधिकारी राजीव शुक्ला याच्या हवाल्याने जाहीर केले आहे. यंदाच्या सिझन मध्ये ८ टीम सहभागी होत आहेत.
यंदा दोन वर्षांपूर्वी बंदी घातल्या गेलेल्या चेन्नई सुपरकिंग्स व राजस्थान रॉयल स्पर्धेत सहभागी होणार आहेत तर गेल्या दोन सिझन मध्ये सहभागी असलेल्या गुजराथ लायन्स व रायझिंग पुणे सुपर जायंट्स या दोन टीम स्पर्धेत खेळणार नाहीत. आयपीएल साठी खेळाडूंचे लिलाव २७ व २८ जानेवारीला बंगलोर येथे होत आहेत. यात सहभागी असलेल्या ५७६ खेळाडूंपैकी ३६० भारतीय खेळाडू आहेत. आत्तापर्यंत झालेल्या १० सिझन मध्ये मुंबई इंडियन्सने सर्वाधिक ३ वेळा ट्रॉफी जिंकली आहे.
व्हीएस न्यूज - बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा यंदाच्या जगातील सर्वात प्रतिष्ठीत ऑस्कर अवार्ड साठीची नामांकने जाहीर करणार आहे. क्वांटिको टीव्ही सीरिअल मधून हॉलीवूड मध्ये आपली स्वतंत्र ओळख तिने निर्माण केली आहे. ऑस्कर नामांकने जाहीर करण्याचा मान मिळवून तिने आपल्या यशात मानाचा तुरा खोवला आहे. तिच्यासोबत रीझारियो, रेबेल विल्सन, मिशेल योह, मोशेल रोड्ग्रीग हेही नामांकने जाहीर करणार आहेत.
ऑस्कर चा ९० वा सोहळा ४ मार्च रोजी होणार असून त्यासाठीचे शुटींग पूर्ण झाले असल्याचे समजते. सध्या प्रियांका हॉलीवूड मधील तिचा दुसरा चित्रपट द कीड मन्स जेक च्या कलाकारांसोबत सुदान फिल्म फेस्टिव्हल मध्ये सहभागी झाली आहे. प्रियांकाने २०१६ साली सर्वप्रथम ऑस्कर अवार्ड कार्यक्रमात सहभाग घेतला होता.
व्हीएस न्यूज - एमआयएम पक्षाचे सर्वेसर्वा आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद येथील आयोजित जाहीर सभेत बोलताना मुस्लिम द्वेषातून ट्रिपल तलाक हा कायदा तयार करण्यात आला असून मुस्लिमांचे या कायद्यामुळे शोषण होणार आहे आणि मुस्लिमांनी कायद्याविरोधात एकवटले पाहिजे. या कायद्याला आज जर विरोध केला नाही तर भविष्यात मुस्लिमांच्या शरियतवरही बंदी घातली जाऊ शकते,असे मत व्यक्त केले. त्याचबरोबर ट्रिपल तलाक हा चुकीचा असून जो कुणी आपल्या पत्नीला ट्रिपल तलाक देईल त्याला समाजातून बहिष्कृत करा, असे आवाहन ओवैसी यांनी समाजबांधवांना केले.
असदुद्दीन ओवेसी हे महाराष्ट्र दौऱ्यावर असून औरंगाबादेत त्यांची पहिली जाहीर सभा पार पडली. आमदार इम्तियाज जलील, गफार कादरी यांच्यासह एमआयएम पक्षाचे अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
ओवेसी यावेळी बोलताना म्हणाले, की १४ टक्के मुस्लिम समाज आज देशात आहे. पण कधीच त्यांच्या प्रश्नांवर उपाययोजना केल्या जात नाहीत. पण सध्या एका चित्रपटाला विरोध केला तर राजपूत समाजसाठी कमिटी बनवली जाते. चित्रपटाचे नाव बदलले जाते. तीनशे कट पाडले जातात. तो समाज फक्त चार टक्के आहे आणि मुस्लिम समाज हा १४ टक्के असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
ट्रिपल तलाकच्या मुद्द्यावर देशात अनेक प्रश्न असताना सुद्धा चर्चा घडवून आणली. मीडिया ट्रायल घेतला गेला आणि ट्रिपल तलाक विरोधी पक्षपाती कायदा पास करून घेतला. फक्त मुस्लिम द्वेषातून हे सगळे सध्याचे सरकार करत आहे. मुस्लिमांनी याला एकत्र येऊन उत्तर दिले पाहिजे. पण आपल्यात काही सुधारणा मुस्लिमांनीही केल्या पाहिजेत. ट्रिपल तलाक देणे हे योग्य नसून जर कोणी ट्रिपल तलाक देत असेल तर त्या तलाक देणाऱ्याला समाजातून बहिष्कृत केले पाहिजे असेही ओवेसी यावेळी म्हणाले.
व्हीएस न्यूज - मुंबईत पेट्रोल-डिझेलच्या दरांचा भडका उडाला आहे. सोमवारी पेट्रोलने ८० रुपयांचा पल्ला पार केला असून डिझेलचे दरही ६७.१० रुपयांवर पोहोचले. गेल्या ५० दिवसांमध्ये पेट्रोलची सातत्याने दरवाढ झाली असून या काळात पेट्रोल १२.३९ रुपयांनी महागले. १ डिसेंबर २०१७ पासून सोमवापर्यंत दर दिवशी पेट्रोलच्या किमती काही पैशांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, डिझेलची ही गेल्या चार वर्षांमधील दुसरी उच्चतम किंमत असल्याचे वाहतूक क्षेत्रातून सांगण्यात आले.
ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्टच्या सुकाणू समितीचे अध्यक्ष बाल मल्कीत सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने तेल किमतीचे दर निश्चित करण्याचे अधिकार उत्पादक कंपन्यांना दिले आहेत. रोजच्या रोज वाढणाऱ्या किमतींवर नियंत्रण ठेवण्याची कोणतीही व्यवस्था सरकारकडे सद्यस्थितीत अस्तित्वात नाही. केंद्राचा अबकारी कर आणि विविध राज्यांकडून आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमुळे या किमती वाढत आहेत.
संघटनेच्या वतीने रोजच्या रोज दरवाढ करण्याऐवजी तीन महिन्यांनी दरांमध्ये फरक करावा, पेट्रोल आणि डिझेलाही वस्तू सेवा कराच्या कार्यकक्षेत घ्यावे आणि सध्या केलेली दरवाढ विशेषत: डिझेलची दरवाढ मागे घ्यावी, अशा प्रमुख मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या आहेत. या दरवाढीचा थेट फटका सर्वसामान्य जनतेला बसू शकतो, असा दावाही मालवाहतूकदारांकडून केला जात आहे.
चौफेर न्यूज - बलात्काराच्या घटनांमध्ये होत असलेली वाढ आणि आरोपीची शिक्षा याबाबत हरयाणा सरकार एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
१२ वर्षे किंवा त्याहून लहान वयाच्या मुलीवर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाल्यास संबंधित व्यक्तीला फाशीची शिक्षा सुनावण्यात येऊ शकते. अशाप्रकारे कठोर नियम झाल्याने लहान मुलींवरील बलात्काराचे प्रमाण कमी होईल, अशी सरकारला आशा आहे. यासंदर्भातील विधेयक लवकरच विधानसभेत सादर होणार असल्याचे संकेत राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी नुकतेच दिले. आता मध्यप्रदेशमध्ये १२ वर्षाच्या आतील मुलीवर बलात्कार झाल्यास संबंधित गुन्हेगाराला फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे, त्यापाठोपाठ आता हरयाणामध्येही अशाप्रकारची तरतूद होण्याची शक्यता आहे.
मागच्या काही दिवसांत हरयाणामध्ये बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली असल्याचे समोर आले आहे. यामुळे खट्टर यांच्या सरकारवर सर्वच स्तरातून जोरदार टीकाही होत आहे. तसेच लहान वयातील मुलींवर बलात्कार झाल्याच्या घटना जास्त असल्याने याविषयात कठोर कायदे करण्याची आवश्यकता असल्याचे खट्टर म्हणाले. याशिवाय बलात्काराच्या घटनांचा लवकरात लवकर निकाल लागावा, यासाठी फास्ट ट्रॅक कोर्ट सुरू करण्याचा विचार असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय मागील वर्षी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या बलात्काराच्या घटनांमधील २५ टक्के घटना या बनावट असल्याचेही खट्टर यांनी यावेळी स्पष्ट केले. तसेच माध्यमांनीही बलात्काराच्या बातम्या देताना विशेष काळजी घ्यावी,असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
खट्टर म्हणाले, सध्या बलात्काराच्या घटनांमध्ये ७५ टक्के गुन्हेगार हे संबंधित मुलगी किंवा महिला हिच्या नात्यातील असल्याचे समोर येते. त्यामुळे पोलिसांबरोबरच नागरिकांनीही अशा घटना घडू नयेत, याबाबत जनजागृती करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. याशिवाय राज्यात सध्या प्रलंबित असलेल्या बलात्काराच्या घटनांचा तपास लवकरात लवकर लावण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. हरयाणामध्ये एका ११ वर्षाच्या आणि १५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून त्यांचा खून करण्यात आल्याच्या धक्कादायक घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर खट्टर यांनी आपले म्हणणे स्पष्ट केले.
व्हीएस न्यूज - एकाचवेळी विधानसभा व लोकसभा निवडणुका घेणे हे २०२४ पूर्वी शक्य होणार नाही, कारण त्यात घटनादुरूस्ती आधी करावी लागेल, असे मत माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी.एस.कृष्णमूर्ती यांनी व्यक्त केले आहे. दोन्ही निवडणुका दर पाच वर्षांनी एकाच वेळी घेणे ही खरेतर आदर्श पद्धत असेल, असे सांगून ते म्हणाले की, तसे लगेच करता येणे शक्य नाही कारण त्यासाठी आधी घटनादुरूस्ती करावी लागेल. पंतप्रधान मोदी यांनी दोन्ही निवडणुका एकाचवेळी घेण्याच्या मांडलेल्या प्रस्तावावर छेडले असता त्यांनी हे उत्तर दिले.
ते म्हणाले की, आपण वेस्टमिनिस्टर पद्धत वापरतो. जर आपण अमेरिकी पद्धत वापरत असतो तर त्यात कार्यकारी मंडळाची ठरावीक मुदत असते. जरी कुणी सत्ताभ्रष्ट झाले तरी दुसऱ्या कुणाची तरी निवड केली जाते, तोपर्यंत आधीचे सरकार कायम राहते. समांतर निवडणुकांना दुसरा पर्याय म्हणजे सर्व निवडणुका एका वर्षांच्या ठरावीक कालावधीत घेणे हा आहे. संसदीय समितीने हा पर्याय सुचवला असून त्यावर अजून अभ्यास करावा लागेल. त्याच्या अंमलबजावणीसाठीही घटनादुरूस्ती करावी लागेल.
प्रशासकीय पातळीवर व पैसे वाचवण्यासाठी एकाचवेळी निवडणुका घेणे हा सोयीचा उपाय आहे. त्यामुळे व्यक्तिगत टीका टिपणी, विखारी प्रचार,सूडाचे राजकारण हे प्रकार नेहमीच चालतात, ते बंद होतील असे सांगून ते म्हणाले की, २०१९ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेणे शक्य नाही कारण काही राज्यातील सरकारांची पाच वर्षांची मुदत ही आताच सुरू झाली आहे. काही राज्यात निवडणुका अपेक्षित आहेत. २०२४ मध्ये एकाचवेळी निवडणुका घेता येणे शक्य आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था यांच्या निवडणुका एकाच मतदार यादीवर घेण्याच्या पंतप्रधानांच्या सूचनेवर त्यांनी, निवडणूक आयोगाने हीच भूमिका वेळोवेळी मांडली आहे. पण एकच मतदार यादी वापरण्याच्या प्रयोगातही राज्यांच्या निवडणूक कायद्यात बदल करावा लागेल.
व्हीएस न्यूज - प्रवाशांच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी रेल्वेकडून देशातील सर्व ८५०० स्थानकांवर आणि ११ हजार रेल्वेंमध्ये १२ लाख सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहेत. त्यासाठी २०१८-१९च्या अर्थसंकल्पामध्ये साधारण ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे.
सध्या देशातील ३९५ स्थानके आणि ५० रेल्वेवर सीसीटीव्ही बसवलेले आहेत ही सुविधा सर्व स्थानके आणि रेल्वेवर विस्तारित करण्यात येणार आहे. येत्या दोन वर्षांत राजधानी, शताब्दी, दुरंतो, लोकल पॅसेंजर तसेच उपनगरीय रेल्वे आदी सर्व रेल्वेंमध्ये सीसीटीव्ही बसवण्याची योजना आहे. त्यानुसार रेल्वेच्या प्रत्येक डब्यात आठ सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील. त्यात दरवाजे, मार्गिका, प्रवाशांची आसने असलेले कक्ष आदी ठिकाणांचा समावेश असेल. या कॅमेऱ्यांचा खर्च भागवण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात सुमारे ३००० कोटी रुपयांची तरतूद करण्यात येईल. याशिवाय अन्य मार्गही शोधले जात आहेत. तसेच निधीची कमतरता भासल्यास खुल्या बाजारातूनही भांडवल उभे केले जाईल. गेल्या काही दिवसांत रुळांवरून रेल्वे घसरण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याने रेल्वे प्रशासनाकडून सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जात आहे. असे प्रकार टाळण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या जात आहेत.
सुरक्षारक्षक नसलेल्या ४९४३ रेल्वे क्रॉसिंगवर रक्षकांची सोय करणे किंवा अन्य मार्ग उपलब्ध करून देणे, जुने रूळ बदलणे, सध्याच्या रुळांना मजबुती प्रदान करणे अशा उपायांचा विचार केला जात आहे. २०२० सालापर्यंत अशी सर्व ठिकाणे सुरक्षित करण्याचे उद्दिष्ट आहे.
व्हीएस न्यूज - भारतातील परदेशी गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु असतानाच जगातील टॉप कंपन्यांच्या सीईओंचा एक अहवाल समोर आला आहे. जगात गुंतवणुकीसाठी आकर्षक देशांची एक यादी तयार करण्यात आली असून या यादीत भारत पाचव्या स्थानी पोहोचला आहे. भारताने जपानला मागे टाकले असून या यादीत अमेरिकेने पहिले स्थान पटकावले आहे.
‘प्राईसवॉटर हाऊस कुपर्स’ या संस्थेने एक अहवाल तयार केला असून जगभरातील टॉप कंपन्यांच्या सीईओंची मते जाणून घेतल्यानंतर हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जगातील परदेशी गुंतवणुकासाठी फेव्हरेट डेस्टिनेशन कोणते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. या यादीत अमेरिका पहिल्या स्थानी आहे. अमेरिकेत गुंतवणुकीसाठी पुरेशा संधी आहेत, असे अहवालात म्हटले आहे. अमेरिकेत गुंतवणूक करण्यासाठी अनेक सीईओंनी पसंती दर्शवली आहे. चीन या यादीत दुसऱ्या स्थानी असून जर्मनी तिसऱ्या स्थानी आहे. तर युरोप चौथ्या आणि भारत पाचव्या स्थानी आहे. या यादीत भारताने जपानला मागे टाकले आहे. भारतातील गुंतवणुकीचे प्रमाण वाढवण्यासाठी मोदी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. भारत उद्योगस्नेही देश असल्याचा दावा मोदी सरकारकडून केला जात आहे. दावोसमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्येही मोदींकडून ‘मेक इन इंडिया’चा प्रसार केला जाणार आहे. मोदी या परिषदेत भारतीय अर्थव्यवस्थेचा लेखाजोखा मांडणार आहेत. नोटाबंदी आणि वस्तू व सेवा कर या काहीसे अयशस्वी मानले जाणाऱ्या पावलांचे समर्थन ते यावेळी करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हा अहवाल समोर आला आहे.
नाणेनिधीकडूनही दिलासा….
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही (आयएमएफ) खूशखबर दिली असून या वर्षी म्हणजे सन २०१८-१९ मध्ये भारताचा विकासदर ७.४ टक्के राहील, असे भाकीत या वित्तीय संस्थेने केले आहे. त्या तुलनेत चीनच्या अर्थव्यवस्थेची गती ६.८ टक्के राहण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी नोटाबंदी आणि वस्तू व सेवा करप्रणालीची अंमलबजावणी या दोन प्रमुख कारणांमुळे विकासदर तुलनेत कमी होऊन ६.७ टक्क्यांवर आला होता. २०१९-२० मध्ये विकासाचा वेग ७.८ टक्क्यांच्या आसपास राहील.
व्हीएस न्यूज - यावर्षी ६९ व्या प्रजासत्ताक दिनी होणाऱ्या राजपथावरील पथसंचलनासाठी महाराष्ट्राच्यावतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळया’वर आधारित चित्ररथ सज्ज झाला असून चित्ररथात सहभागी होणाऱ्या कलाकारांनी कसून सराव केला असून चित्ररथाची बांधणीही पूर्ण झाली आहे.
राजपथावरील पथसंचलनात महाराष्ट्रासह १४ राज्यांचे आणि ९ केंद्रीय मंत्रालयांचे असे एकूण २३ चित्ररथ सहभागी होणार असल्याचे संरक्षण मंत्रालयाचे जनसंपर्क अधिकारी नम्पीबौ मरिनमई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरवर्षी राजपथावर प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात देशाच्या विविध राज्यांची संस्कृती व वैशिष्ट्ये दर्शविणारे दर्जेदार चित्ररथ प्रदर्शित करण्याची परंपरा आहे. पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला बहुतांश वेळा प्रथम क्रमांकाने गौरविण्यात आले आहे. यावर्षी हीच गौरवशाली परंपरा कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्राच्या वतीने ‘शिवराज्याभिषेक सोहळया’वर आधारित चित्ररथ राजपथावर प्रदर्शित होत आहे.
जे.जे.स्कुल ऑफ आर्टचे निवृत्त प्राध्यापक नरेंद्र विचारे यांनी राज्याच्या चित्ररथाचे संकल्पनाचित्र तसेच, त्रिमिती प्रतिकृती तयार केली आहे. जागतिक ख्यातीचे कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण ४० कारागीरांनी अतिशय आकर्षक चित्ररथ उभारला आहे. चित्ररथाच्या प्रारंभी किल्याची प्रतिकृती असून यावर मधोमध अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आहे. याच ठिकाणी दोन मोठ्या तोफा आणि ध्वज, तुतारी-भालेधारी मावळे यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या मध्यभागी रायगडाची प्रतिकृती दर्शविण्यात आली असून याठिकाणी सिंहासनावर बसलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आभूषण देणारा दरबारी आणि त्याच्या शेजारी पुरोहीत गागाभट्ट उभे आहेत. या दरबारात इंग्रज अधिकारी सर हेन्री ऑक्सिडन दिसत आहेत. तसेच, न्यायाचा तराजू व त्या भोवती विविध फिरत्या प्रतिकृती आहेत. त्याच्या शेजारी ध्वजधारी, अश्वारूढ मावळ्यांच्या प्रतिकृती दर्शविण्यात आल्या आहेत. दरबारात छत्रपती शिवाजी महाराजांच्या शेजारी बसलेल्या सोयराबाई आणि संभाजीराजेही दर्शविण्यात आलेले आहेत. चित्ररथाच्या मागच्या भागात आसनस्थ असलेल्या राजमाता जिजाऊ दर्शविण्यात आल्या आहेत. चित्ररथाच्या दोन्ही बाजूस राजमुद्रा तसचे शिवराई व होण ही नाणी प्रतिकृती रूपात दर्शविण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर सर्वस्तरातून बेळगावमध्ये जाऊन कर्नाटकचे गोडवे गायल्याने टीका होते आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर जन्मावे तर कर्नाटकमध्येच हे कन्नड अभिमान गीत गायल्याने सोशल मीडियाबरोबरचं राजकीय नेत्यांकडूनही टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. तसेच त्यांनी चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी टि्वट करून संताप व्यक्त केला आहे. मराठी भाषिकांना कर्नाटकात वाईट वागणूक मिळते. पाटील यांना हे माहीत असतानाही बेळगावातील एका कार्यक्रमात कन्नड गीत गाणे अयोग्य आहे. त्यांच्या वागण्याचा धिक्कार असून त्यांनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी अजित पवार यांनी केली आहे. परराज्यात आपल्या मंत्र्याने जरूर जावे, पण स्वतःच्या राज्याची अस्मिता जपावी, असा टोलाही पवार यांनी लगावला.
दरम्यान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे. मराठी माणसाच्या पाठीत चंद्रकांत पाटलांनी खंजीर खुपसला, अशी टीका धनंजय मुंडेंनी केली. महाराष्ट्रात भाजपचे गुजराती प्रेम ज्ञात होते, पण आता कन्नड प्रेमही उघड झाले आहे. कर्नाटकात जाऊन कन्नड प्रेमाचे गोडवे गाणाऱ्या पाटलांनी सीमावासीय आणि मराठी माणसांच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांनी राज्यातील जनतेची माफी मागावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002