व्हीएस न्यूज - यवतमाळ जिल्ह्यातील वणी ग्रामीण रुग्णालयातून नवजात बाळाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, बाळाला सुखरुप त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळेच असे प्रकार घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरु आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, वणी येथे रजानगर हिंगणघाट येथील नुसरत अब्दुल सत्तार ही महिला प्रसुतीसाठी वणीतील रुग्णालयात दाखल झाली होती. रविवारी तिने एका बाळाला जन्म दिला. त्यानंतर मंगळवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास रुग्णालयातूनच तिच्या बाळाचे अपहरण करण्यात आले. सर्व झोपेत असताना हा प्रकार घडला. नुसरतला जाग आल्यानंतर तिने रुग्णालयात आरडाओरडा सुरु केला. बाळाची शोधाशोध सुरू झाली. परंतु बाळाचा थांगपत्ता लागला नाही. त्यानंतर या घटनेची पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवत एका आरोपीला अटक केली. त्यानंतर बाळाच्या शोधात एक पथक पाठविण्यात आले. वणी येथून २०० किमी अंतरावरुन पोलीस पथकाने बाळाला ताब्यात घेऊन त्याला आईच्या स्वाधीन केले. बाळाचे अपहरण करण्यामागे कोणता हेतू होता याबाबतची सविस्तर माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक वणी येथील पत्रकार परिषदेमध्ये देणार आहेत.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी भाजपवर निशाणा साधला. नोटाबंदीच्या माध्यमातून अनेक श्रीमंत लोकांचा काळा पैसा पांढरा झाला. तर गरीबांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अमित शहा यांच्या संपत्तीत ३०० पटींनी तर त्यांच्या मुलाच्या संपत्तीत १६००० पटींनी वाढ झाली. हेच नोटाबंदीचे सर्वोच्च यश म्हणायला हवे, अशी खोचक टीका लालूंनी केली. तसेच त्यांनी भाजपशी हातमिळवणी केलेल्या नितीश कुमार यांच्यावरही निशाणा साधला. घोटाळ्यांचे सूत्रधार असलेल्या नितीश कुमार यांना भाजपचा पाठिंबा असल्याचे लालूंनी म्हटले.
एका व्यक्तीचा अहंकार शमविण्यासाठी ८ नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये १५० लोकांचा बळी गेला. आम्ही भाजपचा विरोध करतो म्हणून आमच्यावर सीबीआयकडून छापे मारण्यात आले. मात्र,यामध्ये काळा पैसा मिळाला का, याचे उत्तर त्यांनी द्यावे. माझ्या संपूर्ण कुटुंबाला यामध्ये गोवण्याचा प्रयत्न होत आहे. मी त्यांच्याविरुद्ध लढतोय म्हणून ते असे करत आहेत. नितीश कुमार यांच्याप्रमाणे मीदेखील हार मानावी, असा त्यांचा प्रयत्न आहे. याशिवाय, सरकारने घेतलेला जीएसटीचा निर्णयही अयोग्य आहे. जगात ज्या ठिकाणी जीएसटी व्यवस्था अंमलात आणली गेली तिथे ती कायमच अपयशी ठरली. नोटाबंदी आणि जीएसटीमुळे देशात भाजपविरोधी वातावरण निर्माण झाले आहे, असे लालू प्रसाद यादव यांनी सांगितले. यापूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या उंबरठय़ावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी, नोटाबंदी आणि जीएसटी हे दोन निर्णय हा देशाच्या अर्थकारणावर आघात असून नोटाबंदी ही तर संघटित लूटच आहे, अशी घणाघाती टीका केली होती.
व्हीएस न्यूज - दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागांसाठी आम आदमी पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरु असून, यात रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नावाचाही समावेश आहे. ‘आप’च्या नेत्यांनी रघुराम राजन यांच्याशी संपर्क साधल्याचे वृत्त असून आता रघुराम राजन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत ‘आप’ एकतर्फी विजय मिळवला होता. ७० पैकी ६६ जागांवर आपचे आमदार आहेत. त्यामुळे जानेवारी २०१८ मध्ये दिल्लीतील राज्यसभेच्या तीन जागा आपच्या वाट्याला येणार आहेत. या तीन जागांसाठी पक्षातील नेत्यांऐवजी बाहेरच्या मंडळींना उमेदवारी देण्याचा ‘आप’चा प्रयत्न आहे. शिक्षण, अर्थ अशा विविध क्षेत्रांमधील दिग्गजांना उमेदवारी देण्याचा आपचा इरादा आहे.
राज्यसभेतील तीन पैकी एका जागेसाठी रघुराम राजन यांना उमेदवारी देण्यासाठी आपचे प्रयत्न सुरु असल्याचे वृत्त ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिले आहे. ‘आप’च्या वरिष्ठ नेत्यांनी रघुराम राजन यांच्याशी संपर्क साधला आहे. चर्चा सुरु असली तरी याबाबत अंतिम निर्णय झालेला नाही, असे वृत्तात म्हटले आहे. चर्चा सध्या प्राथमिक स्तरावरच आहे, असेही आपमधील सूत्रांनी स्पष्ट केले. बाहेरुन उमेदवार आयात केल्यास पक्षात नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत. आपमधील वरिष्ठ नेते कुमार विश्वास हेदेखील राज्यसभेच्या उमेदवारीसाठी इच्छुक आहेत. ओखलामधील आमदार अमानतुल्ला खान यांच्याशी वाद झाल्यानंतरही कुमार विश्वास यांनी पक्ष सोडला नव्हता. राज्यसभेचे आश्वासन मिळाल्याने कुमार विश्वास यांनी पक्ष सोडला नव्हता, अशी चर्चा होती. कुमार विश्वास यांना राज्यसभेची उमेदवारी मिळू नये, यासाठी प्रयत्न सुरु असल्याचा आरोप आपला सोडचिठ्ठी देणारे कपिल मिश्रा यांनी केला होता. त्यामुळे दिग्गजांना उमेदवारी दिल्यास पक्षात नाराजी पसरण्याची चिन्हे आहेत.
व्हीएस न्यूज - पृथ्वीवरील वाढती लोकसंख्या आणि ऊर्जेचा मोठ्या प्रमाणावरील वापरामुळे २६०० सालापर्यंत पृथ्वी आगीचा गोळा होईल, अशी भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांनी व्यक्त केली. पृथ्वीवर मानवजातीचे अस्तित्व टिकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करण्याची गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. बीजिंगमधील टेंसेंट वी या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये हॉकिंग पृथ्वी ग्रहाच्या भविष्याबद्दल बोलत होते.
‘जगाची लोकसंख्या झपाट्याने वाढते आहे. त्यामुळे आपण या वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ऊर्जेची निर्मिती करत आहोत. या अती ऊर्जा निर्मितीमुळे पृथ्वीचे तापमान वाढते आहे. याचा मोठा फटका भविष्यात मानवजातीला बसणार आहे,’ असे मत हॉकिंग यांनी व्यक्त केले. पृथ्वीचे बदलणारे तापमान आणि या तापमान बदलाचा पृथ्वीच्या वातावरणावर होणारा परिणाम याबाबत गंभीर विचार करणे ही काळाची गरज आहे. सर्वांनी यासंदर्भात एकत्रितपणे विचार केला तरच या संकटाचा सामना करता येईल, असे हॉकिंग यांनी म्हटले आहे. याआधीही अनेकदा हॉकिंग यांनी पृथ्वीवरील वाढते प्रदूषण आणि त्याचा मानवजातीच्या अस्तित्वाला असणाऱ्या धोक्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. माणसाला आपले अस्तित्व टिकवण्यासाठी वस्ती करण्यायोग्य ग्रहाचा शोध आत्तापासूनच घ्यावा लागेल, असे हॉकिंग यापूर्वी म्हणाले होते.
हॉकिंग यांनी यावेळी ब्रेकथ्रू स्टारशॉट संकल्पनेचे समर्थनही या वेळी केले. ब्रेकथ्रू स्टारशॉट या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत प्रकाशाच्या वेगाने प्रवास करणारी अंतराळयाने तयार करण्याच्या शक्यतांवर विचार केला जात आहे. अशी अंतराळयाने विकसित झाल्यास पृथ्वीवरून मंगळावर पोहोचण्यासाठी फक्त एक तासाचा प्रवास करावा लागेल, असेही हॉकिंग यांनी सांगितले. तर सौरमालेच्या काठावर असणाऱ्या प्लुटोपर्यंत पोहोचण्यासाठी २४ तास लागतील. मात्र इतके वेगवान यान तयार करुनही पृथ्वीप्रमाणे जीवसृष्टी असण्याची शक्यता असणाऱ्या आपल्या सौरमालेपासून जवळच्या अल्फा सेंच्युरी या तारकासमुहापर्यंत पोहोचण्यासाठी तब्बल वीस वर्षे लागतील, अशी माहिती हॉकिंग यांनी दिली.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीच्या निर्णयानंतर लोकांवर आपत्तींचा डोंगर कोसळला असताना त्यात कुठली नैतिकता होती, असा परखड सवाल नोटाबंदीला वर्ष पूर्ण झाले असतानाच माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी या निर्णयामुळे केला आहे. नोटाबंदीच्या निर्णयाने अनेक लोकांनी प्राण गमावले, तर लाखो लोकांनी नोक ऱ्या गमावल्या हे सत्य नाकारता येणार नाही. आजचा नोटाबंदीचा दिवस नेहमीच काळा दिवस म्हणून लोकांच्या स्मरणात राहील. जो काही काळा पैसा नष्ट झाल्याचे भासवले जात आहे तो गुजरात निवडणुकीच्या प्रचारात मागच्या दाराने परत वापरात येणार आहे, अशी भीती आहे, असा आरोप त्यांनी केला.
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी नोटाबंदीचा निर्णय हा नैतिकतेसाठी होता, असे वक्तव्य केले होते. त्यावर चिदम्बरम यांनी सांगितले, की अर्थमंत्र्यांनी हा निर्णय नैतिक होता असे म्हटले असले तरी १५ कोटी रोजंदारी कर्मचाऱ्यांनी यात नोक ऱ्या गमावल्या, लाखो लोकांवर आपत्तींचे डोंगर कोसळले, यात कुठली नैतिकता होती? जानेवारी ते एप्रिल २०१७ या काळात १५ लाख कायम कर्मचाऱ्यांच्या नोक ऱ्या गेल्या, अनेक लघु व मध्यम उद्योग बंद पडले. काळा पैसा पांढरा करण्यासाठी हा कुठला नैतिक मार्ग शोधून काढण्यात आला हे समजत नाही. सुरत, भिवंडी, मोरादाबाद, आग्रा, लुधियाना, तिरूप्पूर यांसारखी औद्योगिक उपनगरे नोटाबंदीमुळे ठप्प झाली, हीच नोटाबंदीमागची नैतिकता होती काय, असा सवाल त्यांनी केला. नोटाबंदीचा आजचा पहिला काळा स्मृतिदिन आहे. त्यात भरडल्या गेलेल्या लोकांच्या वेदनात आम्ही सामील आहोत, असे चिदम्बरम यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - जीएसटीअंतर्गत सर्वाधिक कर लावण्यात आलेल्या वस्तू आता स्वस्त होऊ शकतात. बिहारचे उपमुख्यमंत्री आणि जीएसटी परिषदेचे सदस्य सुशील मोदी यांनी याबद्दलचे संकेत दिले आहेत. जीएसटी अंतर्गत २८ टक्के कर आकारल्या जाणाऱ्या ८० टक्के वस्तूंवरील कर कमी केला जाणार असल्याचे सुशील मोदींनी म्हटले. या सर्व वस्तूंवर १८ टक्के कर आकारला जाणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. जीएसटीमुळे व्यापारी वर्गात मोठी नाराजी आहे. त्यातच विधानसभा निवडणूक होऊ घातलेल्या गुजरातमध्ये व्यापारी वर्गाचे प्रमाण मोठे आहे. त्याच पार्श्वभूमीवर २८ टक्के जीएसटी आकारला जाणाऱ्या वस्तूंवरील कर कमी केला जाण्याची शक्यता आहे.
सध्या एकूण २२७ वस्तूंवर २८ टक्के इतका जीएसटी आकारला जातो. याबद्दल सुशील मोदींनी महत्त्वपूर्ण विधान केले आहे. ‘गुरुवारपासून जीएसटी परिषदेच्या बैठकीला सुरुवात होत आहे. २८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंवर यापुढे १८ टक्केच जीएसटी आकारण्याचा निर्णय या बैठकीत घेतला जाऊ शकतो. याशिवाय १८ टक्के कराच्या टप्प्यात येणाऱ्या अनेक वस्तूंचा समावेश १२ टक्क्यांच्या टप्प्यात करण्यात यावा, अशी शिफारसदेखील करण्यात आली आहे,’ असे मोदींनी सांगितले. ते बिहार चेंबर ऑफ कॉमर्सच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी खाद्य, टेक्स्टाईल, बांधकाम व्यवसाय आणि अन्य क्षेत्रातील संघटनांच्या प्रतिनिधींची भेट घेतली.
२८ टक्के जीएसटी असलेल्या ८० टक्के वस्तूंचा समावेश १८ टक्क्यांच्या टप्प्यात झाल्यास व्यापारी, व्यावसायिक आणि ग्राहकांना मोठा दिलासा मिळेल. आतापर्यंत जीएसटी परिषदेने १०० हून अधिक वस्तू आणि सेवांवरील कर कमी केला आहे. आज आणि उद्या (९ आणि १० नोव्हेंबर) आसामची राजधानी असलेल्या गुवाहाटीमध्ये जीएसटी परिषदेची बैठक होणार आहे. या बैठकीत कर कपातीचा निर्णय घेतला जातो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
व्हीएस न्यूज - आयकर विभागाच्या एका पथकाने आज सकाळी चेन्नईतील जया टीव्हीच्या कार्यालयावर छापा टाकला आहे. जया टीव्हीचे नियंत्रण अण्णा द्रमुकच्या नेत्या शशिकला यांच्याकडे आहे. याशिवाय शशिकला यांच्या कुटुंबातील सदस्य, त्यांचे समर्थक यांच्या घरांवर आणि कार्यालयांवरही छापे टाकण्यात आले आहेत. आयकर विभागाने तामिळनाडूतील ८० ठिकाणी धाडी टाकल्या असल्याची माहिती समोर आली आहे. तर देशात एकूण १८७ ठिकाणी धाडी टाकल्या गेल्या आहेत.
आयकर विभागाच्या १० अधिकाऱ्यांनी सकाळी सहाच्या सुमारास इक्कटथुथंगल येथील जया टीव्हीच्या कार्यालयावर छापा टाकला. यानंतर त्यांनी संपूर्ण कार्यालयाची झाडाझडती घेतली. आयकर विभागाचा हा छापा शशिकला आणि त्यांच्या समर्थकांसाठी मोठा धक्का मानला जात आहे. मात्र शशिकला यांच्या समर्थकांनी हे छापासत्र राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचे म्हटले आहे.
कर न भरल्याची माहिती मिळाल्याने जया टीव्हीच्या कार्यालयासह इतर ठिकाणी छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ‘करचोरी करण्यात आल्याची माहिती मिळाल्याने छापे टाकण्यात आले असून वाहिनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर नजर ठेवली जात आहे,’ अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ऑपरेशन क्लीन मनीच्या अंतर्गत हे छापे टाकण्यात आल्याची माहिती आयकर विभागाच्या दुसऱ्या अधिकाऱ्याने दिली. आतापर्यंत तामिळनाडूमध्ये ८० ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत.
बोगस कंपन्या, संशयित गुंतवणूक यांच्याबद्दलचा तपास करण्यासाठी आयकर विभागाकडून छापे टाकण्यात आले. या प्रकरणावर भाष्य करताना, ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आल्याचा आरोप जया टीव्हीच्या वकिलांनी केला. ‘केंद्र सरकारकडून जाणूनबुजून कारवाई केली जात आहे. सरकारच्या या कारवाईने आम्ही घाबरणार नाही. आम्ही कायदेशीर संघर्ष करु,’ अशी प्रतिक्रिया जया टीव्हीच्या वकिलांनी दिली.
व्हीएस न्यूज - मुंबईच्या वडाळा येथील म्हैसूर कॉलनी स्थानकाजवळ मोनोरेलच्या दोन डब्यांना आग लागल्याची घटना घडली आहे. पहाटे सव्वा पाचच्या सुमारास ही घटना घडली. या आगीवर अर्ध्या तासात नियंत्रण मिळवण्यात यश आले. यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र या घटनेमुळे मोनोरेलची सेवा ठप्प झाली असून त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
वडाळ्याहून चेंबूरला जाणाऱ्या मोनोरेलच्या दोन डब्यांना पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी आग लागली. म्हैसूर कॉलनीजवळ ही घटना घडली. आग लागल्याचे समजताच अग्निशमल दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती अग्निशमन दलाकडून सांगण्यात आले. मात्र या दुर्घटनेमुळे मोनोरेलची वाहतूक ठप्प झाली आहे.
आग विझवण्यात आल्यानंतर मोनोरेल कारखान्यात नेण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. या आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या मार्गावरील वाहतूक लवकरच पूर्ववत होईल, असे मोनोरेल प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. मात्र याआधी अनेकदा दुर्घटना झाल्यावर मोनोरेलची सेवा पूर्ववत होण्यास कित्येक तास लागत असल्याचे दिसून आले आहे. काही वेळा मोनोरेलची सेवा सुरळीत होण्यास एक दिवसाचा कालावधीही लागला आहे.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीला ८ नोव्हेंबर रोजी एक वर्ष पूर्ण होत असून मध्य रेल्वेवरील तिकीट व पास काढताना केल्या जाणाऱ्या कॅशलेस व्यवहारात आतापर्यंत चार टक्के वाढ झाली आहे. २०१७ च्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे दिवसाला १,६८४ प्रवाशांकडून पास तर १ लाख २३ हजार १०८ प्रवाशांकडून तिकीट काढले जात असल्याची माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात नोटाबंदी करताच ५०० व १००० रुपयांच्या नोटा खपवण्यासाठी रेल्वे स्थानकांवर एकच झुंबड उडाली. यात सुट्टय़ा पैशांवरून बरेच वादही झाले. नोटाबंदीनंतर केंद्र सरकारकडून कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार रेल्वेकडून प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर पीओएस मशीन बसवण्याचा निर्णय घेण्यात आला.
मध्य रेल्वेने ६२४ तिकीट खिडक्यांवर ही यंत्रे बसविली. या मशीन बसवल्यानंतर डेबिट, क्रेडिटचा वापर करत डिसेंबर महिन्यात दिवसाला २२ पास तर १,९८१ प्रवाशांनी तिकीट खरेदी केले. जानेवारी २०१७ मध्ये हाच आकडा दिवसाला ८२६ पास आणि ७३ हजार ७१३ तिकीटपर्यंत पोहोचला. ऑक्टोबर २०१७ पर्यंत दररोज डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे १ लाख २३ हजार तिकिटे आणि १,६८४ पास विक्री झाली. पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचे सांगितले.
व्हीएस न्यूज - केंद्रात एकाधिकारशाही वाढीला लागली आहे. लोकांचे मूलभूत अधिकार आणि हक्क यावर गदा येते आहे. अत्यंत चिंताजनक वातावरण सध्या भारतात आहे. लोकसभा निवडणुकांच्या आधी देशाच्या जनतेला भरमसाठ आश्वासने देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात सरकारविरोधात नाराजीचा सूर आता निघतो आहे कारण एकही आश्वासन पूर्ण झालेले नाही, अशी टीका करत शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. रायगड जिल्ह्यातील कर्जत या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबीरात त्यांनी ही टीका केली.
वाढत्या शेतकरी आत्महत्यांवरून त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका केली. मागील तीन वर्षांमध्ये महाराष्ट्रासह देशभरात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या झाल्या आहेत. शेतमालाला योग्य भाव मिळत नसल्याने या आत्महत्या होत आहेत आणि महागाईही वाढली आहे. शेतकरी आत्महत्यांचा आलेख उंचावतोय हे दुर्दैवी आहे, असेही पवार यांनी आपल्या भाषणात म्हटले.
शेतकरी कर्जमाफीवरून तर सरकारने क्रूर थट्टा सुरु केली आहे. कर्जमाफी केल्याचे बॅनर पाहिले . पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हाती काहीही आले नाही. ‘मी लाभार्थी हे माझे सरकार, कामगिरी दमदार’ असल्या जाहिराती हे सरकार करताना दिसते आहे. वास्तव मात्र शेतकऱ्याची फसवणूक हेच आहे. आपण जाहिरात करायची ठरवली तर ‘मी अपमानित’ असे शेतकरी म्हणताना दाखवावा लागेल कारण या सरकारने शेतकऱ्याचा अपमानच केला आहे. जाहिरातीतले शेतकरी नाही तर सत्तेच्या खुर्चीवर बसलेले ‘लाभार्थी’ झाले आहेत, असाही टोला शरद पवारांनी लगावला.
महत्त्वाच्या सगळ्या वर्तमान पत्रांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच जाहिराती दिसतात. वृत्तपत्र क्षेत्रालाही मंदीची झळ बसली आहे. माझ्या लहान भावाकडूनच मला या वृत्तपत्र व्यवसायातील मंदीबाबत समजत असते. मात्र पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या जाहिराती येत असल्यामुळे वृत्तपत्र व्यवसाय टिकला आहे असे पवारांनी म्हणताच एकच हशा पिकला. शेतकऱ्यांच्या हाती पैसा आलाच नाही त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांनी काळी दिवाळी साजरी केली. मंदी आल्यामुळे अनेकांचे रोजगार गेले. व्यापारी वर्गालाही याचा मंदीचा फटका बसला अशीही टीका शरद पवारांनी केली.
वाढत्या रेल्वे अपघातांवरही शरद पवारांनी चिंता व्यक्त केली. सुमारे ६५ लाख लोक मुंबईच्या लोकलमधून दररोज प्रवास करतात. दिवसाला १० लोकांचा जीव जातो आणि साधारण तितकेच लोक जखमी होतात. मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी काय उपाय योजना करण्यात आल्या आहेत ? असाही प्रश्न शरद पवारांनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला.
व्हीएस न्यूज - उत्तर भारतामध्ये मंगळवारची पहाट गडद धुक्यामध्ये उजाडली असून पंजाब, हरयाणा, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांना धुक्याने वेढा घातला. दिल्लीमध्ये धुरक्याचे प्रमाण इतके होते की त्यामुळे सर्व प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर करावी लागली.‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पर्यावरणीय आणीबाणी जाहीर करण्याची विनंती केली आहे. या संस्थेने सद्यस्थितीत घराबाहेर पडू नये असे आवाहन केले आहे. सुदृढ व्यक्तीला श्वास घेण्यासाठी वाईट असे वातावरण असल्याचे संस्थेकडून स्पष्ट करण्यात आले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही थंडी सुरू होताच राजधानी दिल्लीत काळे धुके दाटण्यास सुरुवात झाली असून हा वाढत्या प्रदूषणाचा परिणाम आहे. त्यामुळे दिल्ली, उत्तर प्रदेश व हरयाणा या राज्यांनी हवेचा दर्जा सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना का केल्या नाहीत अशा शब्दात राष्ट्रीय हरित लवादानेही या राज्यांच्या सरकारांना फटकारले आहे. मात्र दिल्लीमधील धुरक्याने आज धोक्याचीही पातळी ओलांडल्यामुळे सरकारला शाळांना सुट्टी करावी लागली. दिवसा नागरिक आणि शालेय विद्यार्थी मास्क घालून शहरांत फिरत होते.
हरित लवादाची टीका…
राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्या. स्वतंत्रकुमार यांनी एका याचिकेवरून राज्य सरकारांवर टीका केली असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता गृहित धरून आधीच उपाययोजना करण्याची गरज होती असे म्हटले आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिल्लीतील हवेची स्थिती अतिशय वाईट असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाने सांगितले की, प्रदूषणाची पातळी एवढी जास्त आहे की मुलांना श्वास घेणे कठीण जात आहे. त्यामुळे आमच्या सूचनेनुसार तुम्ही हेलिकॉप्टरमधून पाण्याचे फवारे का सोडले नाहीत. राज्य सरकारांनी प्रदूषणाची स्थिती थंडीच्या दिवसात जास्त उग्र असते हे माहिती असताना आगाऊ उपाययोजना का केल्या नाहीत याचे उत्तर द्यावे असा आदेश लवादाने दिला आहे.
सीआयएसएफ जवानांना मास्क…
दिल्ली विमानतळावर काम करणाऱ्या औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांना नऊ हजार मास्क पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षा दलाचे संचालक ओ. पी. सिंह यांनी विषारी धुक्यापासून जवानांचे रक्षण करण्यासाठी नऊ हजार मास्क मागवले आहेत. त्यातील २ हजार मास्क तातडीने मिळणार असून सात हजार मास्क नंतर ठिकठिकाणच्या सीआयएसएफ जवानांना दिले जातील, गेल्य वर्षी नोव्हेंबरमध्ये सीआयएसएफने अशाच प्रकारच्या उपाययोजना केल्या होत्या.
झाले काय?
केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या १७, १८ व १९ ऑक्टोबरच्या अहवालानुसार दिल्लीतील हवेचा दर्जा भीषण झाला आहे. दिल्लीत मोटारींची संख्या अधिक असल्याने प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे, शिवाय कचरा जाळण्याने त्यात भर पडत आहे.
मंगळवार सकाळपासून दिल्ली आणि उत्तर भारतामधील हवेचा शुद्धता निर्देशांक घसरला. काही भागांतील दृश्यता २०० मीटपर्यंतचा परिसरापर्यंत घटली. पंजाब, हरयाणा आदी राज्यांतही अशीच स्थिती होती. लहान मुले प्रौढांहून अधिक वेगाने श्वास घेत असल्यामुळे त्यांच्यावर या धुरक्याचा तीव्र परिणाम होत असल्यामुळे दिल्लीतील अतिप्रदूषित वातावरणात शाळांना सुट्टी देण्यात यावी अशी मागणी ‘इंडियन मेडिकल असोसिएशन’ने सरकारकडे केली. त्यानंतर संध्याकाळी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष शिसोदिया यांनी प्राथमिक शाळांना सुट्टी जाहीर केली.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे. हिंदी शायरीचा आधार घेत राहुल गांधींनी सरकारवर टीकास्त्र सोडले. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ असे ट्विट त्यांनी केले आहे.
नोटाबंदीला बुधवारी एक वर्ष पूर्ण झाले असून काँग्रेसने या मुद्द्यावरुन सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे. राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे सरकारवर टीका केली. नोटाबंदी ही एक आपत्ती आहे. आम्ही या आपत्तीमुळे उद्ध्वस्त झालेल्या कोट्यवधी प्रामाणिक भारतीयांच्या पाठीशी आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणताही विचार न करता नोटाबंदीचा निर्णय घेतला, असे त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. राहुल गांधी यांनी एका हिंदी शायरीचा दाखला देत सरकारला इशाराच दिला. ‘एक आँसू भी हुकूमत के लिए खतरा है, तुमने देखा नहीं आँखों का समुंदर होना’ ही शायरी त्यांनी ट्विट केली. नोटाबंदीनंतर रांगेत थांबलेल्या आणि रडणाऱ्या वृद्धाचा फोटो त्यांनी या शायरीसोबत ट्विट केला आहे.
नरेंद्र मोदी यांनी वर्षभूरापूर्वी रिझर्व्ह बँकेला डावलून आणि मंत्रिमंडळांनाखोलीत डांबून नोटाबंदीसारखा निर्णय जाहीर केला. यामुळे असंघटित कामगार आणि छोटे उद्योगधंदे उद्ध्वस्त झाले, असा आरोप त्यांनी केला. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्यांनी हा लेख लिहीला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002