व्हीएस न्यूज - पुढील वर्षापासून महाराष्ट्र व गोव्यातील नागरिकांना राज्यांतील टपाल कार्यालयामधून (पोस्ट ऑफिस) आधार कार्ड मिळणार आहेत. या दोन्ही राज्यांमधील १२००हून अधिक पोस्ट कार्यालयांमध्ये आधार क्रमांकासाठी नोंदणी प्रक्रियाही २०१८पासून सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र व गोवा सर्कलचे मुख्य पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल यांनी दिली.
या सुविधेमुळे ज्या नागरिकांकडे अद्याप आधार कार्ड नाहीत, त्यांना पोस्टात जाऊन आधार कार्ड तयार करुन घेता येणार आहे. गोवा आणि महाराष्ट्रातील एकूण २ हजार २१६ पोस्ट कार्यालयांपैकी १ हजार २९३ कार्यालयंमध्ये ही सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अगरवाल यांनी सांगितले. या सुविधेमुळे सध्या आधार कार्ड केंद्रांवरील गोंधळ आणि त्यांच्या मर्यादित संख्येमुळे नागरिकांना सहन करावा लागणारा मनस्ताप कमी होईल. पोस्टात आधार कार्ड काढण्याची सुविधा मिळाल्याचा सर्वाधिक फायदा ग्रामीण भागातील जनतेला होईल. दोन्ही राज्यांमधील पोस्टामधील कर्मचाऱ्यांना आधार कार्ड संदर्भातील प्रशिक्षण देण्यात येत असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले. चार हजार कर्मचाऱ्यांना आधार कार्ड तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज - गुजरातमध्ये काँग्रेसला अनुकूल परिस्थिती असून तिथे काँग्रेसला अच्छे दिन येतील, असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तवले आहे. गुजरातमध्ये काँग्रेससोबत आघाडी करण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
गडचिरोलीत बुधवारी शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले. ‘मी लाभार्थी’ म्हणून मोठमोठ्या जाहिराती दिल्या जात आहेत. पण त्यात कर्जमाफीचे किती लाभार्थी आहेत, हे कळलेले नाही, असा टोला त्यांनी लगावला. नागपूरमध्ये हत्यांचे प्रमाण वाढत आहे. सांगलीतील एका तरुणाच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनाच अटक करण्यात आली. या घटना धक्कादायक आहेत. हे कायद्याचे राज्य आहे का?, असे पवार म्हणालेत. राज्यात ज्या घटना घडतात त्यावर मुख्यमंत्र्यांची गृहमंत्री म्हणून मी एकही प्रतिक्रिया ऐकलेली नाही,असे सांगत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
केंद्र व राज्य सरकारच्या मदतीने देशभरात गोरक्षकाचा सुळसुळाट झाला असून यामुळे दलित आणि मुस्लिमांना असुरक्षित वाटत असल्याचा दावा पवारांनी केला. राष्ट्रीय कृषी विकासाचा दर फक्त ३ टक्के असून केंद्र सरकार याबाबत दिशाभूल करत असल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या माध्यमातून जनतेने स्वतंत्र विदर्भाची मागणी लावून धरली तरच त्यांना पाठिंबा देऊ असे त्यांनी सांगितले.
माजी मंत्री आबांची आठवण…
गडचिरोलीतील सभेत शरद पवारांनी दिवंगत गृहमंत्री आर.आर.पाटील यांची आठवणही सांगितली. गडचिरोली हा हैदराबाद व महाराष्ट्राला जोडणारा जिल्हा असून या जिल्ह्याचा अजूनही विकास झालेला नाही. दळणवळणाची सुविधाही चांगली नाहीत. याची जाणीव आर आर पाटील यांना झाली आणि त्यांनी स्वतःहून गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मागितले होते, असे पवार यांनी नमूद केले. गडचिरोलीत कायदा व सुव्यवस्थेचा मुख्य प्रश्न असल्याचे नेहमी सांगितले जाते. पण मला त्यापेक्षा आर्थिक कारण महत्त्वाचे वाटते. आर आर पाटील यांनीही त्यावरच काम केले होते, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.
व्हीएस न्यूज - केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले (वय ८८) यांचे अल्प आजाराने मुंबईत निधन झाले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आई हौसाबाई आठवले (वय ८८) यांचे आज (गुरूवार) अल्प आजाराने मुंबईत निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू होते. सकाळी सातच्या सुमारास वांद्रे येथील गुरूनानक रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
हौसाबाई आठवले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ‘संविधान’ बंगल्यावर सकाळी ११ वाजेपर्यंत ठेवण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता त्यांच्यावर खेरवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील. पतीचे निधन झाल्यानंतर त्यांनी मोठ्या कष्टाने रामदास आठवले यांना सांभाळले. दुसऱ्यांच्या शेतीवर मजुरी करून त्यांनी रामदास आठवले यांचे शिक्षण पूर्ण केले. रामदास आठवले यांनी जेव्हा पहिल्यांदा मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हाही त्या शेतात मजुरी करत होत्या. याचवर्षी जुलै महिन्यात रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी हौसाबाई आठवले यांचा सत्कार केला होता.
व्हीएस न्यूज - पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. पत्नीचा खून करून पतीने आत्महत्या केल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली. ही घटना बुधवारी रात्री घडली. संतोष कुंभार व राजश्री कुंभार असे मृत दाम्पत्याचे नाव आहे. संतोष यांचा चांदीच्या मुर्त्या तयार करण्याचा व्यवसाय होता. गेल्या अनेक वर्षांपासून ते शुक्रवार पेठेत राहतात. बुधवारी रात्री त्यांच्यात काही कारणाने वाद झाला. चिडलेल्या सुभाष यांनी राजश्री यांना बेदम मारहाण केली. मारहाणीत राजश्री यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सुभाष यांनी विष प्राशन केले. शेजारच्यांना हा प्रकार कळताच त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. अत्यवस्थ असलेल्या सुभाष यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. कुंभार दाम्पत्यांना दोन मुले आहेत. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत. या प्रकारामुळे कोल्हापुरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
व्हीएस न्यूज - ‘पद्मावती’ चित्रपटावरुन सुरु असलेला वाद शमण्याची चिन्हे नाहीत. चित्रपट प्रदर्शित झाल्यास १ डिसेंबर रोजी भारत बंदचा इशारा करणी सेनेने दिला असून फक्त राजपूत समाजच नव्हे तर हिंदू आणि मुस्लिमही या चित्रपटाच्या विरोधात असल्याचे करणी सेनेने म्हटले आहे. या चित्रपटाचे ट्रेलर ज्या चित्रपटगृहात दाखवले जातील, तिथे जाळपोळ करु, अशी धमकीच करणी सेनेने दिली आहे.
‘पद्मावती’ चित्रपटावरुन वाद निर्माण झाला असून राजस्थानमधील करणी सेनेने या चित्रपटावर आक्षेप घेतला आहे. करणी सेनेचे नेते लोकेंद्रसिंह कलवी यांनी बुधवारी चित्रपटाविरोधातील आंदोलन तीव्र करणार असल्याचे सांगितले. ‘पद्मावती’ चित्रपटाविरोधात देशभरात नाराजी आहे. या वादात आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची गरज आहे, कारण चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याचे अधिकार फक्त केंद्र सरकारकडेच असतात, असे त्यांनी सांगितले.
‘पद्मावती’ हा चित्रपट १ डिसेंबररोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यास त्या दिवशी देशभरात कडकडीत बंद पाळला जाईल, असा इशाराच त्यांनी दिला आहे. आम्हाला सर्व धर्मीय आणि समाजाचा पाठिंबा आहे. आम्ही यासंदर्भात गुरुग्राम, पाटणा आणि भोपाळ येथे जाहीर सभाही घेणार आहोत, असे करणी सेनेच्या नेत्यांनी सांगितले.
‘पद्मावती’ चित्रपटात प्रमूख भूमिका साकारणाऱ्या दीपिका पदुकोणने मंगळवारी चित्रपटाला विरोध करणाऱ्यांना सुनावले होते. आम्ही फक्त सेन्सॉर बोर्डालाच उत्तर देण्यास बांधिल आहोत. आता कितीही विरोध झाला तरीही ‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच असे तिने म्हटले होते. या पार्श्वभूमीवर करणी सेनेने हा इशारा दिला आहे. राजस्थानमधील चित्रपटगृह चालक- मालक आणि वितरकांनी ‘पद्मावती’ चित्रपट प्रदर्शित करणार नाही, असा पवित्रा घेतल्याचा दावाही करणी सेनेने केला आहे. दरम्यान, चित्रपटाचे दिग्दर्शक संजयलीला भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान संजयलीला भन्साळी यांना करणी सेनेने धक्काबुक्की केली होती. या पार्श्वभूमीवर संजयलीला भन्साळी यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात यावी अशी मागणी सिनेनिर्मात्यांच्या असोसिएशनने महाराष्ट्र सरकारकडे केली होती. बुधवारी भन्साळी यांचे निवासस्थान, कार्यालयाबाहेरील सुरक्षेत वाढ करण्यात आली.
व्हीएस न्यूज - भारतीय स्थलांतरित लोकांमुळे अमेरिकेतील लोकांचे रोजगार कमी झाले असा आरोप अमेरिकी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला असला तरी प्रत्यक्षात भारतीय कंपन्यांमुळे तेथे ११३००० रोजगार निर्माण झाले असून एकूण १८ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय उद्योग महासंघाच्या अहवालात देण्यात आली आहे.
इंडियन रूट्स अमेरिकन सॉइल हा अहवाल महासंघाने प्रसारित केला असून त्यात म्हटले आहे, की भारतीय कंपन्यांनी अमेरिकेत कंपनी सामाजिक उत्तरदायित्वापोटी १४७ दशलक्ष डॉलर्स, तर संशोधन व विकासावर ५८८ दशलक्ष अमेरिकी डॉलर्स खर्च केले आहेत.
या वार्षिक अहवालात बरीच माहिती तपशिलाने देण्यात आली असून त्यात अमेरिकेच्या प्रगतीत भारताचे असलेले योगदान सामोरे आले आहे. अमेरिका, प्युटरेरिको व इतर भागात भारतीय कंपन्यांची मोठी गुंतवणूक आहे. अमेरिकेतील पन्नास राज्यात तसेच कोलंबिया व प्युटरेरिकोत १०० भारतीय कंपन्यांमधून ११३४२३ कामगार आहेत.
एकूण गुंतवणूक १७.९ अब्ज डॉलर्सची असून पाच प्रमुख राज्यात भारतीय कंपन्यांचे अस्तित्व मोठय़ा प्रमाणात आहे. पाच राज्यात भारतीय कंपन्यांमध्ये जास्त रोजगार असून कामगारांची संख्या पुढीलप्रमाणे आहे. न्यूजर्सी (८५७२),टेक्सास (७२७१), कॅलिफोर्निया (६७४९), न्यूयॉर्क (५१३५), जॉर्जिया (४५५४). भारतीय कंपन्यांची गुंतवणूक सर्वाधिक असलेली राज्ये पुढीलप्रमाणे आहेत- न्यूयॉर्क (१.५७ अब्ज डॉलर्स), न्यूजर्सी (१.५६ अब्ज डॉलर्स), मॅसॅच्युसेट्स (९३१ दशलक्ष डॉलर्स) कॅलिफोर्निया (५४२ दशलक्ष डॉलर्स), व्योमिंग (४३५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स), प्रत्येक राज्य किंवा प्रदेशात भारतीय कंपन्यांची सरासरी १८७ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून तेथे आणखी गुंतवणूक करण्याचा ८५ टक्के कंपन्यांचा इरादा आहे. ८७ टक्के कंपन्या पुढील पाच वर्षांत जास्तीत जास्त स्थानिक कामगारांना रोजगार देणार आहेत. काँग्रेस सदस्य राजा कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार इलिनॉइस येथे भारतीय कंपन्यांची १९५ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक असून ३८०० रोजगार निर्माण झाले आहेत.
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भारतीय उद्योग व व्यावसायिकांचे मोठे योगदान आहे. या कंपन्यांची गुंतवणूक वाढतच जाणार असून त्यातून अमेरिकेत हजारो रोजगार निर्माण होतील.’
– नवतेज सरना, अमेरिकेतील भारताचे राजदूत…
व्हीएस न्यूज - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कायम असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा खूप पुढे आहेत. अमेरिकन थिंक टँक प्यू रिचर्सच्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. या सर्वेक्षणात मोदी ८८ टक्क्यांसह पहिल्या स्थानावर आहेत. तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी ५८ टक्क्यांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (५७ टक्के) यांचा क्रमांक लागतो.
प्यू रिसर्च संस्थेने २,४६४ भारतीयांशी संवाद साधून सर्वेक्षणाची आकडेवारी जाहीर केली. २१ फेब्रुवारी ते १० मार्च दरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. या कालावधीत उत्तर प्रदेशासह पाच राज्यांमध्ये निवडणुका सुरु होत्या. ‘बहुतांश जनता देशाच्या अर्थव्यवस्थेच्या स्थितीबद्दल समाधानी आहे. त्यामुळेच मोदींची लोकप्रियता कायम आहे,’ असे प्यू रिसर्च संस्थेने म्हटले आहे. दर दहापैकी आठ भारतीयांना देशाच्या अर्थव्यवस्थेची स्थिती ‘चांगली’ वाटते, अशी आकडेवारी संस्थेने दिली आहे. हे प्रमाण २०१४ नंतर १९ टक्क्यांनी वाढले आहे.
‘अर्थव्यवस्थेची स्थिती ‘अतिशय उत्तम’ असल्याचे मत व्यक्त करणाऱ्यांचे प्रमाण गेल्या तीन वर्षांमध्ये तिपटीने वाढले आहे. तर दर १० पैकी ७ लोक देशातील परिस्थितीविषयी समाधानी आहेत. अशा लोकांचे प्रमाण २०१४ नंतर दुपटीने वाढले आहे,’ असे सर्वेक्षणातील आकडेवारी सांगते. ‘आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि तेलंगणा या दक्षिणेतील राज्यांपैकी दर दहापैकी नऊजणांनी मोदींवर विश्वास दाखवला आहे,’ असेही आकडे सांगतात.
पूर्व भारतातही मोदींची लोकप्रियता कायम आहे. बिहार, झारखंड, ओदिशा आणि पश्चिम बंगालमधील १० पैकी ८ जणांनी मोदींना पसंती दिली. तर उत्तर भारतातील दिल्ली, हरयाणा, मध्य प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही मोदींची लोकप्रियता कायम आहे. ‘२०१५ पासून मोदींची उत्तर भारतातील लोकप्रियता किंचतही कमी झालेली नाही. तर पश्चिम आणि दक्षिणेतील त्यांची लोकप्रियता वाढली आहे. मात्र पूर्व भारतातील मोदींच्या लोकप्रियतेत थोडी घट झालेली आहे,’ असे सर्वेक्षण सांगते.
व्हीएस न्यूज - हिंदू महासभेने महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे मंदिर तयार केले आहे. विशेष म्हणजे प्रशासनाची कोणताही परवानगी नसतानाही हिंदू महासभेच्या कार्यकर्त्यांनी ग्वाल्हेरमध्ये नथुराम गोडसेचे मंदिर उभारले आहे. कार्यकर्त्यांनी गोडसेची मूर्ती तयार केली असून यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
‘आम्ही ९ नोव्हेंबरला प्रशासनाकडे नथुराम गोडसे यांचे मंदिर उभारण्यासाठी जमीन मागितली होती. मात्र प्रशासनाने जमीन देण्यास नकार दिला. त्यामुळेच दौलतगंजमधील आमच्या कार्यालयातच गोडसे यांचे मंदिर तयार केले,’असे हिंदू महासभेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष जयवीर भारद्वाज यांनी सांगितले. याप्रकरणी कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. ‘या प्रकरणाची माहिती आम्हाला मिळाली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक या प्रकरणात लक्ष घालत आहेत. कायदेशीर सल्ला घेऊन यातील दोषींवर कारवाई केली जाईल,’ असे पोलीस महानिरीक्षक मकरंद देऊस्कर यांनी म्हटले.
या प्रकरणाचे पडसाद मध्य प्रदेशच्या विधानसभेतही पाहायला मिळाले. नथुराम गोडसेचे मंदिर उभारण्यात आल्याने राष्ट्रपिता महात्मा गांधींचा अपमान झाल्याचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजय सिंह यांनी म्हटले. ‘याआधी मुरैना येथे महात्मा गांधींच्या प्रतिमेला आग लावण्यात आली होती. यानंतर आता हिंदू महासभेने महात्मा गांधीच्या मारेकऱ्याचे मंदिर उभारले आहे. त्यामुळे या प्रकरणात दोषी असलेल्या लोकांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा,’ अशी मागणी सिंह यांनी केली.
व्हीएस न्यूज - भ्रष्टाचाराला आळा न घातल्यास चीनदेखील सोव्हिएत संघासारखा उद्ध्वस्त होईल, असा घरचा आहेर चीन सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिला आहे. देशातील भ्रष्टाचाराचे प्रमाण कमी न झाल्यास चीनचेही सोव्हिएत संघासारखे तुकडे पडतील, असा इशारा सत्ताधारी कम्युनिस्ट पक्षाच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य यांग शिआओडू यांनी दिला. विशेष म्हणजे शिआओडू चीन सरकारच्या भ्रष्टाचारविरोधी मोहिमेशी संबंधित अधिकारी आहेत.
‘भ्रष्टाचारविरोधी अभियानात अयशस्वी ठरणे चीनसाठी घातक असेल,’ असा धोक्याचा इशारा शिआओडू यांनी दिला. शिआओडू यांना केंद्रीय शिस्तपालन आयोगाच्या उपसचिव पदावरुन पॉलिट ब्युरोच्या सदस्यपदी बढती देण्यात आली आहे. त्यामुळे भ्रष्टाचारविरोधी अभियानातील अधिकाऱ्यांच्या यादीत ते आता दुसऱ्या क्रमांकावर आहेत. चीन सरकारवर पॉलिट ब्युरोचे संपूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे शिआओडू यांच्या विधानाला महत्त्व आहे.
शिआओडू यांनी आधीच्या सरकावर जोरदार टीका केली आहे. ‘आधीच्या सरकारच्या काळात भ्रष्टाचारात मोठी वाढ झाली होती. त्यावेळी सत्ताधारी पक्षाचे नेतृत्त्व भ्रष्टाचाराला आळा घालण्यात कमी पडले. त्या काळात भ्रष्टाचाराच्या प्रकरणांकडे कोणाचेही लक्ष नव्हते. भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचे काम आधीच्या सरकारने केले. त्यावेळी भ्रष्टाचाराच्या विरोधात ठोस भूमिका घेण्यात आली नाही. त्यामुळे दोषींवर कोणती कारवाईदेखील झाली नाही,’ असे शिआओडू यांनी म्हटले.
भ्रष्टाचाराच्या वाढत्या प्रमाणावर शिआओडू यांनी चीनचे सरकारी वृत्तपत्र असलेल्या पीपल्स डेलीमध्ये संपादकीय लेख लिहिला आहे. ‘भ्रष्टाचाराला आळा न घातल्यास त्यामुळे संपूर्ण चीनचे स्वरुपच बदलेल. भ्रष्टाचारामुळे चीन उद्ध्वस्त होईल. लवकरात लवकर भ्रष्टाचारावर नियंत्रण न मिळवल्यास चीनची अवस्थाही सोव्हिएत युनियनसारखी होईल. चीनचे तुकडे पडतील,’ असे शिआओडू यांनी लेखात नमूद केले आहे. १९९० मध्ये सोव्हिएत रशियाचे तुकडे झाले होते.
व्हीएस न्यूज - जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. लष्कर आणि राज्याच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत कुलगामसह तीन भागांमधून तीन दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. यामधील एक दहशतवादी जखमी आहे. ऑपरेशन हलनकुंडच्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. जोपर्यंत आवश्यकता असेल, तोपर्यंत हे अभियान सुरुच ठेवण्यात येईल, अशी माहिती सुरक्षा दलाकडून देण्यात आली आहे.
१४ नोव्हेंबरपासून ऑपरेशन हलनकुंड सुरु असल्याची माहिती जम्मू काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक मुनीर खान यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘ऑपरेशन हलनकुंडच्या अंतर्गत आतापर्यंत तीन दहशतवादी पकडण्यात आले आहेत. यामधील एक दहशतवादी जखमी अवस्थेत असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत,’ असे खान यांनी सांगितले. ‘काश्मिरी तरुणांना आमिष दाखवून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करुन घेतले जात आहे. त्यासाठी पाकिस्तानमधून सोशल मीडियाच्या माध्यमातून अपप्रचार सुरु आहे,’ अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस आणि लष्करात चांगला समन्वय असून दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी ऑपरेशन हलनकुंडच सुरुच राहिल, असे त्यांनी सांगितले.
स्थानिकांनी हिंसेचा मार्ग सोडून मुख्य प्रवाहात यावे, असे आवाहन लष्कराने केले आहे. काश्मीरमधील तरुणांची माथी भडकावण्यात येत असल्याने अनेक तरुण दहशतवादी संघटनांमध्ये सामील होत आहेत. काही दिवसांपूर्वीच काश्मीरमधील २० वर्षांचा माजिद खान दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. जिल्हा स्तरावरील फुटबॉलपटू असलेला माजिद अनंतनागचा रहिवासी होता. माजिदने दहशतवादी संघटनेत प्रवेश केल्याने त्याच्या कुटुंबीयांना,नातेवाईकांना आणि मित्रांना मोठा धक्का बसला आहे.
व्हीएस न्यूज - भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या गोलंदाजी व अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वल स्थान मिळवण्याची संधी आहे. त्यासाठी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत तो कशी कामगिरी करतो याची उत्कंठा निर्माण झाली आहे. या मालिकेला कोलकाता येथे गुरुवारपासून प्रारंभ होत आहे.
जडेजाने आतापर्यंत ३२ कसोटी सामन्यांमध्ये १५५ बळी टिपले असून १,१३६ धावा केल्या आहेत. गोलंदाजीत इंग्लंडचा जेम्स अँडरसन आघाडीवर असून त्याच्यापेक्षा १२ गुणांनी जडेजा मागे आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत आघाडीच्या स्थानावर असलेल्या बांगलादेशच्या शकीब अल हसनपेक्षा जडेजा ९ गुणांनी पिछाडीवर आहे. गोलंदाजी व फलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर जडेजाने चांगले यश मिळविले, तर तो अव्वल स्थानावर झेप घेऊ शकतो.
भारताचा कर्णधार विराट कोहलीलाही फलंदाजीत पहिल्या पाच खेळाडूंमध्ये स्थान मिळविण्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार आहे. पाचव्या स्थानावर असलेल्या डेव्हिड वॉर्नरपेक्षा तो एक गुणाने मागे आहे. कोहलीबरोबरच लोकेश राहुल (आठवे स्थान), अजिंक्य रहाणे (नववे स्थान) यांनाही आपल्या क्रमवारीत बढती घेण्याची संधी आहे. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन हा चौथ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद शमी (१९वे स्थान), उमेश यादव (२७वे स्थान), ईशांत शर्मा (२९वे स्थान) व भुवनेश्वर कुमार (३७वे स्थान) हे पहिल्या ४० खेळाडूंमध्ये आहेत.
कसोटी क्रमवारीत अग्रस्थान राखण्याचे ध्येय - रहाणे
कोलकाता : श्रीलंकेतील यापूर्वीच्या मालिकेत एकतर्फी विजय मिळवला असला तरीही मायदेशात होणाऱ्या मालिकेत आम्ही कसोटी क्रमवारीतील अग्रस्थान टिकविण्यासाठी सर्वोच्च कामगिरी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे, असे भारतीय क्रिकेट संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सांगितले.
श्रीलंकेतील दौऱ्यात भारतीय संघाने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. या पाश्र्वभूमीवर भारतीय संघ आगामी मालिकेत वर्चस्व राखणार अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. भारत व श्रीलंका यांच्यात कसोटी, एकदिवसीय आणि ट्वेन्टी-२० असे प्रत्येकी तीन सामने होणार आहेत.
रहाणे म्हणाला, ‘कसोटीत अव्वल स्थान टिकविण्यासाठी प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे. पुढील वर्षी दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यासाठी ही मालिका उपयुक्त ठरणार आहे. आफ्रिकेतील मालिका पूर्णपणे वेगळ्या वातावरणात होणार असली, तरीही श्रीलंकेविरुद्धची कामगिरी आम्हाला पूर्वतयारी म्हणून लाभदायक होईल. श्रीलंकेच्या खेळाडूंना दुय्यम मानत नाही. प्रतिस्पर्धी संघाची व्यूहरचना कशी असेल यापेक्षा आमची बलस्थाने व कमकुवत दुवे कोणती यावरच सध्या लक्ष केंद्रित केले आहे.’
व्हीएस न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे बंडखोर नेते सुरेश धस यांच्यावर टीका केली आहे. जोपर्यंत आपण राष्ट्रवादीमध्ये कार्यरत असू तोपर्यंत बंडखोरी केलेल्या गद्दारांना पुन्हा पक्षात घेणार नाही, अशा निर्वाणीच्या भाषेत त्यांनी धस यांचे नाव न घेता त्यांना फटकारले. एखाद्याला संधी दिल्यानंतर त्याचं सोनं करायचं की त्याची राख करायची हे ज्याच्या त्याच्या हाती असते. पण ज्यांनी स्वत:च्या पहिलीला सोडले नाही, ते इतरांना काय सोडणार असा टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान, सुरेश धस यांनीही पवारांच्या या टीकेला उत्तर दिले असून येत्या दोन दिवसांत पवारांना त्यांच्याच शब्दांत उत्तर देऊ असा इशाराही दिला.
बीड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर धस यांच्या ५ सदस्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यापासून राष्ट्रवादीचे नेते आणि सुरेश धस यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. दरम्यान एका कार्यक्रमानिमित्त इथे आल्यानंतर पवारांनी धस यांचे नाव न घेता त्यांच्या बंडखोरीवर भाष्य केले. पवारांची टीका जिव्हारी लागलेल्या धस यांनीही प्रत्युत्तर देत, येत्या एक दोन दिवसांत पवारांना त्यांच्याच भाषेत उत्तर देऊ, असा इशाराच दिला. पवारांचं आपलं ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचं पाहायचं वाकून असा स्वभाव असल्याचे ते म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002