व्हीएस न्यूज - बदलत्या माध्यमांच्या स्वरूपामुळे शासकीय जनसंपर्कात समाजमाध्यमांचा प्रभावी व सकारात्मक वापर ही काळाची गरज आहे. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या धुळे जिल्हा माहिती कार्यालयाचे डिजिटल साप्ताहिक ‘यशार्थ’चा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले.
धुळे येथे नियोजन सभागृहात धुळे व नंदुरबार जिल्ह्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाची बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हा माहिती कार्यालयाच्या‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या ‘दुष्काळासंगे लढाया... तुफान आलंया’ ! या वॉटर कप स्पर्धेवरील विशेषांकाचे प्रकाशन मंत्री श्री.पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. पर्यटनमंत्री जयकुमार रावल, आमदार अनिल गोटे, जिल्हाधिकारी डॉ.दिलीप पांढरपट्टे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता हेमंत पगारे, दक्षता व गुणवत्ता विभागाचे अभियंता एस. एस. पाटील, अधीक्षक अभियंता चंद्रकांत वाघ यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री श्री.पाटील म्हणाले, अभिनव व नावीण्यपूर्ण जनहिताच्या उपक्रमांचे स्वागत करून त्यांना प्रोत्साहन देण्याची भूमिका महाराष्ट्र शासनाची आहे. ‘यशार्थ’ या डिजिटल साप्ताहिकाच्या माध्यमातून अत्यंत कमी खर्चात लाखो लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी समाजमाध्यमांत निर्माण केलेल्या नेटवर्कची किमया, त्यातील सातत्य व वाचकांची वाढती संख्या निश्चितच प्रशंसनीय आहे. त्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिकारी, कर्मचारी यांचे व ‘टीम यशार्थ’चे अभिनंदन करायला हवे. लोकाभिमुख शासनाची प्रतिमा निर्माण करणारे असे अभिनव प्रयोग प्रत्येक जिल्ह्यातून सुरू व्हावेत यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतरत्न आदरणीय अटलबिहारीजी वाजपेयी यांचा जन्मदिन तथा सुशासन दिनाच्या पार्श्वभूमीवर ‘यशार्थ’ च्या अंकाचे प्रकाशन केल्याबद्दल जिल्हाधिकारी डॉ.पांढरपट्टे यांचे कौतुक करून मंत्री श्री.पाटील यांनी ‘यशार्थ’ च्या सर्व अंकांचे अवलोकन केले. तसेच निर्मितीची प्रक्रिया, विषयाची निवड, डिझायनिंग, व्हायरल करण्याचे तंत्र, त्यास मिळत असलेल्या प्रतिसाद यांची माहिती करून घेतली.
‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा - पर्यटनमंत्री जयकुमार रावल
‘यशार्थ’ची संकल्पना राज्यात सर्वप्रथम प्रायोगिक तत्त्वावर धुळे जिल्ह्यात राबविण्यात आली. त्याला अल्पावधीत मिळालेला प्रतिसाद, उपयुक्तता व त्याची गरज बघून त्यास जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला आहे. ‘यशार्थ’ विकास प्रशासनाचा आरसा असून जिल्ह्यातीलच नाही, तर राज्यातील महत्वाच्या घडामोडी व त्याचे जिल्ह्यावर होणारे सकारात्मक परिणामांचे प्रतिबिंब त्यात नियमितपणे उमटताना दिसते. डिझायनिंग, विषय निवडीचे टायमिंग यामुळे डिजिटल युगातल्या रिडर्सला त्याने भुरळ घातली आहे.‘यशार्थ’ ला मिळणारा प्रतिसाद हा जिल्हा प्रशासन व जिल्ह्याची नवी ओळख आणि प्रतिमा निर्माण करणारा आहे. जिल्हा नियोजनाच्या माध्यमातून आम्ही एक परिणामकारक, व्यापक तसेच थेट जनतेत भिडणारा उपक्रम राबवू शकलो याचे समाधान आपणांस असल्याचे मनोगत यावेळी पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी यावेळी व्यक्त केले. ‘यशार्थ’च्या उपक्रमाची संकल्पना, उद्देश व चालू अंकाच्या विषयाची पार्श्वभूमी तसेच वाचकांचा प्रतिसाद याबतची माहिती यावेळी प्रास्ताविकातून जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाळ साळुंखे यांनी केले, तर सादरीकरण मनोहर पाटील व संदीप गावित यांनी केले.
काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु
व्हीएस न्यूज - काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने अफगाणिस्तान आणि भारताचे उद्योग-व्यापारविषयक संबंध अधिक वृध्दिंगत होतील असा विश्वास राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी व्यक्त केला. राजभवन येथे अफगाणिस्तानच्या वाणिज्य शिष्टमंडळाने राज्यपालांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. राज्यपाल म्हणाले, अफगाणिस्तान आणि भारताचे संबंध प्राचीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी दोन्ही देशांदरम्यान व्यापार चालायचा. आज पुन्हा त्या जुन्या संबंधाना उजाळा मिळाला आहे. दोन्ही देशात पर्यटनाला चांगला वाव आहे. अफगाणिस्तानच्या उभारणीसाठी भारत ठामपणे उभा राहिलेला आहे. राजनैतिक संबंध उत्तम प्रकारे प्रस्थापित झाले आहेत. दोन्ही देशादरम्यान व्यापार विषयक देवाण-घेवाण वाढली पाहिजे. त्यासाठी विविध शहरे विमान सेवेने जोडली पाहिजेत, म्हणजे उद्योग-व्यवसायाला चालना मिळून पर्यटन क्षेत्राचा विकास होईल.
अफगाणिस्तान मधील सुकामेवा (ड्रायफ्रुटस) भारतात प्रसिद्ध आहे, तर भारतातील मोती आणि मोत्यांचे दागिने अफगाणिस्तानात प्रसिद्ध आहेत. असे सांगून ते म्हणाले, भारताने जवळपास 16 हजार अफगाणी विद्यार्थ्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती दिली आहे. पुणे,मुंबई आणि अन्य शहरात ते उच्च शिक्षण घेत आहेत. भारताने अफगाणिस्तानात अनेक शाळा सुरु केल्या आहेत. दहशतवाद संपविणे हे दोन्ही देशाचे उद्दिष्ट आहे. व्यापार आणि उद्योग व्यवसायात दोन्ही देशांनी चांगली भरारी घेतली तर अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. भारतातील अनेक भाषातील चित्रपटाचे चित्रीकरण हे अफगाणिस्तानात केले जाते. तेथील सुंदर प्रेक्षणीय स्थळांची मोहिनी भारतीयांवर आहे. त्याच बरोबर भारतीय चित्रपटाचा खास शौकीन वर्ग अफगाणिस्तानात आहे. असेही शेवटी राज्यपाल म्हणाले. प्रारंभी अफगाणिस्तानचे राजदूत मोहमंद झीया सालेही यांनी राज्यपाल विद्यासागरराव यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी कार्गो सेवेद्वारे दाखल फळांची पहिली पेटी राज्यपाल विद्यासागर राव यांना सन्मानपूर्वक भेट दिली. या भेटी दरम्यान अफगाणिस्तान दूतावासातील अधिकारी, व्यापारी शिष्टमंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
काबूलचे सफरचंद मुंबईत…
काबूल ते मुंबई कार्गो सेवा सुरु झाल्याने फळे आणि भाजीपाला आयात-निर्यातीला चालना मिळणार आहे. कालच जवळपास 40 टन सफरचंद घेऊन अफगाणिस्तानचे विमान मुंबईत दाखल झाले. आता नियमित विविध फळे, सुकामेवा येथील बाजार पेठेत उपलब्ध होणार आहेत. भारतातील केळी आणि द्राक्षाला चांगली मागणी असल्याचे अफगाण शिष्टमंडळाने चर्चा करताना सांगितले.
अफगाणिस्तानचे व्यापारी शिष्टमंडळ आणि मुंबईतील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळांची एकत्रित बैठक घेऊन फळे, भाजीपाला व अन्य जिवनावश्यक वस्तूंची देवाण-घेवाण वाढविण्याबाबत चर्चा घडवून आणण्याच्या सूचना यावेळी राज्यपाल सी.विद्यासागरराव यांनी दिल्या. यावेळी सर्वश्री हाजी मोहमंद (आशिक अफगाण लि.) हाजी फरहार (फरहाद लि.) हाजी सादुद्दीन (खंदा फूड लि.), हाजी अहमद शाह (अल मन्सूर झम झम लि.), मोहमंद अली खान (क्रिस्टाल इन्टरप्राईजेस) आदी उद्योग-व्यापारविषयक शिष्टमंडळातील व्यापाऱ्यांनी चर्चेत भाग घेतला. यावेळी राज्यपाल यांचे प्रधान सचिव वेणूगोपाल रेड्डी, राजशिष्टाचार विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा, पणन विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार आदी उपस्थित होते.
व्हीएस न्यूज - नवी मुंबईसह कोकणासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (एमटीएचएल) प्रकल्पाच्या टप्पा एक व टप्पा दोनच्या कामांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जपानचे परिवहन जमीन पायाभूत सुविधा आणि पर्यटन मंत्री किशी इशी यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए आणि कंत्राटदार यांच्यातील सामंजस्य करारावर आज स्वाक्षरी करण्यात आली.
याप्रसंगी भारतातील जपानच्या दूतावासाचे वित्तीय आणि विकासमंत्री केनको सोने, मुंबईतील जपानचे वाणिज्य दूत रोजी नोदा, एमएमआरडीएचे महानगर आयुक्त यूपीएस मदान, जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सीचे (जायका) भारतातील वरिष्ठ प्रतिनिधी ताकायोशी तांगे आदी उपस्थित होते. एमटीएचएल या प्रकल्पासाठी जायका कर्ज स्वरूपात निधी पुरविणार आहे. हा एकूण दोन 2.8 अब्ज डॉलर्सचा (सुमारे 17 हजार 843 कोटी रुपये) प्रकल्प आहे. त्यापैकी 85 टक्के म्हणजेच सुमारे 15 हजार शंभर कोटी रुपये जायका एमएमआरडीएला देणार आहे. टप्पा एक हा 10.38 कि.मी. चा असून त्याचे बांधकाम एल अँड टी आणि आयएचआय, जपान यांच्या संयुक्त उपक्रमाद्वारे करण्यात येणार आहे. त्यासाठी 7 हजार 767 कोटी रुपये खर्च येणार आहे. टप्पा 3 हा 3.60 कि.मी. चा असून बांधकाम एल अँड टी करणार आहे त्यासाठी 1 हजार 13 कोटी 79 लाख रुपये खर्च होणार आहे. याप्रसंगी एमएमआरडीए आणि एल अँड टी आणि आयएचआय यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी एल अँड टी च्या अवजड नागरी पायाभूत सुविधा व्यवसायाचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख एस. व्ही. देसाई, आयएचआय इन्फ्रास्ट्रक्चर सिस्टीम कं.लि.चे अध्यक्ष ताकेशी कावाकामी, एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे तसेच संजय खंदारे आदी उपस्थित होते.
कमला मिल आग प्रकरण : पाच अधिकारी निलंबित
व्हीएस न्यूज - कमला मिल आवारातील आग दुर्घटनेप्रकरणी निष्काळजीपणा करणाऱ्या आणि प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या मुंबई महापालिकेतील पाच अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी बेकायदेशीररित्या परवानग्या दिल्याचे स्पष्ट झाल्यास अधिकाऱ्यांवर तसेच संबंधित मालक-चालकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील मोजो आणि वन अबव्ह या उपाहारगृहांना (पब-रेस्टो) गुरुवारी मध्यरात्री आग लागून त्यात 14 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करून 15 दिवसांत अहवाल देण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत. शुक्रवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणाच्या प्राथमिक चौकशीत दोषी आढळलेल्या पाच अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. मात्र, घटनेतील मृत्यूप्रकरणी अधिकारी किंवा संबंधित मालक जबाबदार असल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर फौजदारी व इतर गुन्हे दाखल करण्यात येतील. दोषींवर निश्चित कारवाई केली जाणार असून कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. अशा घटनांना आळा घालण्यासाठी अशा पद्धतीने परवानग्या देण्यात आलेल्या इमारतींचे तत्काळ सुरक्षा ऑडिट करण्यासह विनापरवानगी करण्यात आलेली व सुरू असलेली बांधकामे युद्धपातळीवर तोडण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
व्हीएस न्यूज - नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या `अटल टिंकरिंग लॅब` या अभिनव योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील 1504 शाळांचा समावेश करण्यात आला आहे, यामध्ये महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. नीती आयोगाने नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनाना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी देशातील928 शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 75 शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील 191 शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरातील 2 हजार 432 शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे.
महाराष्ट्रातील 116 शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा -
शालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयातील नव्या संकल्पना रुजविणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहे, यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता 6 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
निती आयोगाने जाहीर केलेल्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश आहे तर मुबई शहरामधील 10 शाळा तर त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शाळांचा समावेश आहे.
महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे, अहमदनगर- 04, अकोला -01, अमरावती- 06, बीड- 01, बुलडाणा- 04, चंद्रपूर- 01, धुळे- 02,गडचिरोली- 02, गोंदिया- 07, हिंगोली- 01, जळगाव- 03, जालना- 01, कोल्हापूर- 10, लातूर- 04, मुंबई शहर- 10, मुंबई उपनगर- 04, नागपूर- 07, नांदेड- 01, नंदुरबार- 01, नाशिक-05, उस्मानाबाद- 02, पुणे- 11, रायगड- 02, रत्नागिरी-02, सांगली- 02, सातारा- 08, सोलापूर- 02, ठाणे- 03, वर्धा- 02, वाशीम- 04 आणि यवतमाळ- 03.
व्हीएस न्यूज - देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे. विशेष म्हणजे देशात पहिल्या पाचमध्ये राज्यातील तीन शहरे असून पिंपरी चिंचवड दुसऱ्या तर औरंगाबाद पाचव्या स्थानावर असल्याची माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली. देशात 251 केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्प्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील 59केंद्रापैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहरे पहिल्या पाचमध्ये आहेत.
कोल्हापुरातून 21 हजार 95 पासपोर्टचे वितरण -
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून 21 हजार 95 पासपोर्टचे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड पासपोर्ट वितरण केंद्रातून 20हजार 83 तर औरंगाबाद केंद्रातून 14 हजार 973 पासपोर्ट वितरित करण्यात आले. कर्नाटकातील म्हैसूर तिसऱ्या क्रमांकावर असून या केंद्रातून 16 हजार 446 आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भूज (गुजरात) केंद्रातून 15 हजार 281 पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती श्री. मुळे यांनी परिचय केंद्रास दिली आहे.
व्हीएस न्यूज : आखाडा परिषदेने दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितच्या कारनाम्यानंतर, साधू-संतांची प्रतिमा मलिन होत आहे. त्या पार्श्वभूमीवर भोंदू बाबांची दुसरी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या बाबा वीरेंद्र देव दीक्षितसह, उत्तर प्रदेशमधील बस्तीच्या सचिदानंद सरस्वती आणि अलाबादच्या त्रिकाल भवंता यांच्या नावाचा या यादीत समावेश आहे.
१३ आखाड्याचे प्रमुख आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सहभागी होते. महंत नरेंद्र गिरी यांनी या बैठकीनंतर भोंदू बाबांपासून सावध राहण्याचे आवाहन करताना सांगितले. आखाडा परिषदेतून राजस्थानच्या अलवरचे फलाहारी बाबांनाही निलंबित केल्याची घोषणा गिरी यांनी यावेळी केली. २०१९मध्ये प्रयागमध्ये होणाऱ्या कुंभ मेळ्याच्या तयारीसंदर्भात आढावा आखाडा परिषदेच्या या बैठकीत घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
नव्या यादीत असलेला राजधानी दिल्लीत ‘आध्यात्मिक यूनिव्हर्सिटी’ नावाने एक आश्रम बाबा वीरेंद्र दीक्षित चालवत होता. तरुण मुली आणि महिलांचे लैंगिक शोषण या आश्रमातून होत असल्याचा आरोप आहे. पोलिसांनी यात बाबाच्या एकूण पाच आश्रमतून १५० तरुणी आणि महिलांची सुटका केली आहे. बाबा वीरेंद्र दीक्षित सध्या फरार असून, दिल्ली उच्च न्यायालयाने त्याला ४ जानेवारीपर्यंत हजर करण्याचे आदेश दिले आहेत.
त्याचबरोबर आपल्या संत कुटिल आश्रमात बाबा सचिदानंद सरस्वती धर्म प्रसाराच्या नावावर २० वर्षांपासून तरुणींना शिष्य बनवत होता. त्यानंतर त्यांचे लैंगिक शोषण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल आहे.
उत्तर प्रदेशच्या मिर्झापूर जिल्ह्याची मूळ रहिवासी असलेली त्रिकाल भवंता ऊर्फ अनीता शर्माने पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर अलाहबादमधील एका खासगी रुग्णालयात काहीकाळ नर्स म्हणून काम केल्यानंतर अलाहाबादमधील दारागंजमध्ये स्वत: चे क्लीनिक सुरु केले. तिचे जवळपास २०वर्षांपूर्वी अलाहबादमधील राम शर्मा नावाच्या एका शिक्षकासोबत लग्न झाले. तिला एक मुलगा रवी शर्मा आणि एम मुलगी अपराजिता शर्मा अशी दोन मुले आहेत. हे दोघेही अलाहबादजवळच्या शहरात शिक्षण घेत आहेत. तिने नाशिकमधील कुंभ मेळ्यात महिलांचा स्वतंत्र आखाडा बनवून धर्माचार्यांनाच आव्हान दिल्यानंतर ती सर्वाधिक चर्चेत राहिली होती. दरम्यान, आखाडा परिषदेने यापूर्वी १० सप्टेंबर रोजी १४ भोंदू बाबांची यादी जाहीर केली होती. आसाराम बापू, गुरमीत राम रहीम, सुखविंदर कौर ऊर्फ राधे माँ, सच्चिदानंद गिरी, ओमबाब ऊर्फ विवेकानंद झा, नर्मल बाबा, स्वामी असीमानंद, इच्छाधारी भीमानंद ऊर्फ शिवमूर्ती द्विवेदी, ओम नम: शिवाय बाबा, नारायण साई, रामपाल, कुश मुनी, मलखान गिरी, आणि बृहस्पती गिरी आदींचा या यादीत समावेश होता.
व्हिएस न्यूज - राष्ट्रवादीचे आमदार सतीश पाटील यांच्या सत्कार सोहळ्याला मी उपस्थीत असलो तरी, तुमच्या मनात जे आहे ते माझ्या मनात नाही. माझ्या मनात जे आहे ते मी अजित दादांच्या कानात सांगितले आहे, असे विधान माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी आज सायंकाळी जळगाव येथे केले. हाच धागा पकडून अजित पवार म्हणाले की, खडसे यांनी जे माझ्या कानात सांगितले आहे ते मी येथे जाहीर रित्या सांगणार नाही, अशी गुगली टाकत राज्यात निर्माण झालेला संभ्रम कायम ठेवला. मोपालवर सारख्या अधिकाऱ्याची चौकशी होऊन परत नियुक्तीही केली जाते मात्र चाळीस वष्रे पक्षाला देणारया जेष्ठ नेत्याला असे ताटकळत ठेवले जाते, हे योग्य नाही,असेही पवार म्हणाले. मुख्यमंत्री अजित दादा पवार होतील अशी अपेक्षा कार्यक्रमात व्यक्त झाली, पण यामुळे अजून चौकशी लागून जाईल, असा टोलाही खडसे यांनी लगावला. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. सतीश पाटील यांचा सर्वपक्षीय सत्कार सोहळा आज जळगाव येथे पार पडला. यावेळी खडसे व पवार एकाच व्यासपीठावर असल्याने सर्वाचे लक्ष या सोहळ्याकडे होते. दोन्ही नेत्याच्या सूचक गुगल्यामुळे राजकीय संभ्रम कायम राहिला.
यावेळी आ. सतीश पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील आठवणींना उजाळा दिला. मोदींचा करिष्मा कसा होता याची उदाहरणे दिली. पाटील बोलत असतानाच, व्यासपीठावरून पंधरा लाखांच्या आश्वासनांचा मुद्दा माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवारांनी मांडला व एकच हस्यकल्लोळ उडाला.
सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, मी पूर्वी एरंडोलचा आमदार होतो, त्यामुळे एरंडोल नावातच जादू आहे. एरंडोली करून सर्वपक्षीय सत्कार समारंभ हा होतोय. योगायोगाने नाथाभाऊ, अजितदादा सर्वपक्ष,एकत्र आले, समारंभात पक्ष नसतात, पक्ष वेगळे असले तरी आम्ही एकच, राष्ट्रवादीचे ते एकमेव आमदार असले तरी एकटे आहे, असे वाटत नाही, आम्ही एकच आहोत. लढाई ही विचारांची असते, माणुसकीची नसते, असे गुलाबराव पाटील यांनी सांगितले. त्यांनी राजकीय घडामोडींवर बोलणे टाळले. विधानसभेचे माजी सभापती अरूण गुजराथी म्हणाले की,राजकरणात हेही करावे लागते तेही करावे लागते, मात्र आता काळ बदलला असून एकनाथराव खडसे, तुमच्या शेजारी बसले आहे. आजचा गौरव हा आपल्या कार्याचा,विकासाचा गौरव आहे. आज दोन तोफांची उपस्थिती आहे. एक विरोधी पक्षाची व एक सत्ताधारी पक्षाची, मात्र आज काल विधानसभेत सत्ताधारी तोफाही जोरात आहे,नक्की मनात काय आहे, काय माहीत, शेवटी हे राजकारण आहे. अशी फटकेबाजी मनोगतात माजी विधानसभा गुजराथी यांनी केली.
व्हिएस न्यूज - नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ३१ डिसेंबरच्या रात्री मोठ्या संख्येने रस्ते, समुद्र किनारे यावर होणारी नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी सुरक्षा बंदोबस्त चोख ठेवला असून पोलिसांच्या सुट्टया रद्द केल्या आहेत. इतकेच नव्हे तर ३० हजार अतिरिक्त पोलिस रस्त्यांवर तैनात केले गेले आहेत. या दिवशी इसिस दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता लक्षात घेता मरीन ड्राईव्ह, वरळी सीफेस, बँड स्ट्रँड या सारख्या अति गर्दीच्या ठिकाणी नो पार्किंग झोन तयार केले गेले असल्याचे समजते. या परिसरात फटाके वाजविण्यावरही बंदी घातली गेली आहे.
या दिवशी दरवर्षी चौपाट्या तसेच रस्त्यांमध्ये अतोनात गर्दी होते. लोक नव वर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतात. लोकांनी स्वतःची वाहने रस्त्यावर आणून गर्दी करू नये म्हणून बेस्ट व रेल्वेने मध्यरात्री पासून विशेष सेवा देणार असल्याची घोषणा केली आहे. बेस्ट जादा बसेस सोडणार आहे तर पश्चिम मध्य रेल्वे मध्यरात्रीपासून विशेष लोकल्स चालविणार आहे.
व्हिएस न्यूज – लोअर परळ येथील कमला मिल कंपाऊंड परिसरातील एका इमारतीला गुरुवारी रात्री साडेबाराच्या सुमारास भीषण आग लागली. १५ जणांचा या आगीमध्ये होरपळून मृत्यू झाला. तर, १४ हून अधिक लोक जखमी झाले आहेत.
रात्री साडेबाराच्या सुमारास कमला मिल कंपाऊंड परिसरातील हॉटेल मोजेसला आग लागली. या आगीमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान,ही आग शर्तीच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. केईम रुग्णालयात या आगीत जखमी झालेल्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, जखमींचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
आगीत मृत्यू झालेल्यांची नावे – जीत (४९), प्रिती (३६),तेजल, प्रमिला, विश्वा (२३), विणा (२८), कविता (३६),परोली (३०), धैर्या (२६), मनिषा (३०), यश (२६)
आगीत जखमी झालेल्यांची नावे – शेफाली, खुशबू,रोहन (२२), अभिषेक (२२), दीप (३१), उत्सव (२७),अंकिता (३०), सिद्धार्थ (२४), नेहा (२८), शंक्रा, जीत (२१), यश (२२)
यातील शेफाली व खुशबू या दोघींची प्रकृती गंभीर आहे. मृतांमध्ये १२ मुलींचा, ३ मुलांचा समावेश असून त्यांचे मृतदेह केईएम रुग्णालयात ठेवण्यात आले आहेत. भीषण आगीमुळे येथे असलेल्या ईटी नाऊ, मिरर नाऊ,झूम या वाहिन्यांची सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कमला मिल परिसरात असलेल्या टीव्ही ९ मराठी,झूम टिव्ही, ईटी नाऊ, मिरर नाऊ या वृत्त वाहिन्यांच्या कार्यालयांना झळा पोहोचल्या आहेत. पब ‘वन अबव्ह’च्या मालकावर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
व्हिएस न्यूज - राज्यसभेच्या जागेवरून आम आदमी पक्षात सुंदोपसुंदी सुरू झाली असून गुरुवारी कार्यकर्त्यांनी या विषयावरून धरणे आंदोलन केले. कुमार विश्वास यांच्या समर्थकांनी आपच्या कार्यालयात येऊन तेथे तंबू लावले.
कुमार विश्वास यांना राज्यसभेवर पाठवावे, अशी या कार्यकर्त्यांची मागणी आहे. दिल्लीतील वेगवेगळ्या विधानसभांसोबतच उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाणा आणि राजस्थान येथूनही कार्यकर्ते आले असल्याचे अविनाश त्रिपाठी नावाच्या समर्थकाने नवभारत टाईम्स वृत्तपत्राला सांगितले.
विश्वास यांचे पाठिराखे गुरुवारी सकाळी 10वाजल्यापासूनच पक्षाच्या कार्यालयात गोळा व्हायला सुरूवात झाली. गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियातून कार्यकर्ता आणि विश्वास समर्थकांना मेसेज पाठवून कार्यालयात येण्यास सांगण्यात आले होते.
या संदर्भात आपकडून पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. याच्या उत्तरादाखल विश्वास यांच्या पाठिराख्यांनाही पोलिसांना लिहून दिले, की आम्ही पक्षाचे कार्यकर्ते असून पक्षाच्या आंतरिक स्वराजाच्या अंतर्गत शांततेने कार्यकर्ता संमेलन करत आहोत. मात्र पोलिसांनी पक्षाच्या लेटरहेडवर हे निवेदन नाही, असे सांगून ते घेण्यास नकार दिला तसेच विश्वास यांच्या समर्थकांना कार्यालयातून जाण्यास सांगितले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002