व्हीएस न्यूज - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इमिग्रेशन धोरणात बदलाचे संकेत देत भारतीयांना दिलासा दिला आहे. ग्रीन कार्डसाठी लॉटरीऐवजी गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली आहे, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे.
राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी आपल्या ‘स्टेट ऑफ युनियन अॅड्रेस’मध्ये सत्तेत आल्यावर केलेल्या कामांचा पाढाच वाचून दाखवला. जवळपास ८० मिनिटे त्यांनी भाषण केले. अमेरिकेतील सत्ताधारी रिपब्लिक आणि विरोधक डेमोक्रेटिक पक्षांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. चीन आणि रशिया अमेरिकेची अर्थव्यवस्था, हितसंबंध आणि मुल्यांसाठी आव्हान ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. ट्रम्प इमिग्रेशन धोरणाबाबत काय भूमिका मांडतात, याकडे भारतीयांचे लक्ष लागले होते.
अमेरिकेत ग्रीन कार्डसाठी दरवर्षी हजारो एच-१बी व्हिसाधारक अर्ज करतात. ‘एच १ बी’ व्हिसा लॉटरीद्वारे दिला जातो. ट्रम्प यांनी ही पद्धतच बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे अकुशल लोकांनाही अमेरिकेत ग्रीन कार्ड मिळू शकत होते. आता याऐवजी गुणवत्तेच्या आधारेच व्हिसा दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. याशिवाय ट्रम्प यांनी चेन मायग्रेशनवरही निर्बंध आणणार असल्याचे सांगितले. सध्या एखादा व्यक्ती त्याच्या नातेवाईकांना अमेरिकेत आणू शकत होता. आता यावर निर्बंध येतील. आता ती व्यक्ती फक्त पती किंवा पत्नी आणि मुलांनाच सोबत अमेरिकेत आणू शकेल, असे ट्रम्प यांनी सांगितले. जी व्यक्ती कुशल आहे. समाजात ते योगदान देऊ शकतात आणि जे अमेरिकेवर प्रेम करु शकतात, त्यांनाच व्हिसा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी आयसिस आणि दहशतवादावरही भाष्य केले. आम्ही जगातून आयसिसचा खात्मा करणारच अशी ग्वाही मी देतो. १ वर्षानंतर अमेरिकी आणि मित्र राष्ट्रांच्या सैन्याने इराक व सीरियातील १० टक्के भागातून आयसिसला हद्दपार केले आहे, असे त्यांनी भाषणात सांगितले. तर उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाचा उल्लेख करत ट्रम्प म्हणाले, उत्तर कोरियात अत्यंत क्रूरतेने जनतेचे शोषण सुरु आहे. आम्ही उत्तर कोरियावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - ठाण्याजनजीकच्या पालघर मतदारसंघातील भाजपा खासदार चिंतामण वनगा यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ६१ वर्षांचे होते. सकाळी ७.३०च्या सुमारास छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना राममनोहर लोहिया रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. १९९६ मध्ये ते पहिल्यांदा खासदार झाले होते. त्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत चिंतामण वनगा यांनी बहुजन विकास आघाडीचे बळीराम जाधव यांचा २ लाख ३९ हजार मतांच्या फरकाने पराभव केला होता.
व्हीएस न्यूज - अहमदनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी क्षेत्रफळाने राज्यातील सर्वात मोठ्या असणाऱ्या अहमदनगर जिल्ह्याचे लवकरच विभाजन होणार असल्याचे संकेत दिले आहेत. लवकरच राज्यसरकार जिल्ह्याच्या विभाजनाची लोकांची मागणी पुर्ण करणार असल्याचा दावाही राम शिंदे यांनी केला. दोन भागात क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा असलेल्या नगर जिल्ह्याचे विभाजन होणार आहे. जिल्ह्याचे विभाजन नगर दक्षिण आणि उत्तर अशा दोन भागात व्हावे ही अनेक वर्षापासून लोकांची मागणी असून एवढ्या मोठ्या जिल्ह्यात सुविधा देण्यास सध्या प्रशासनालाही अडचणी येत असल्यामुळे लवकरच जिल्ह्याचे विभाजन होणार असल्याचा दावा राम शिंदे यांनी शिर्डीत असताना केला आहे.
दरम्यान विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पोलीस हेरगीरी करत असल्याचा आरोप केला होता. मात्र त्यांच्या आरोपात काही तथ्य नसल्याच गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी म्हटले आहे. पोलिसांनी त्यांचे कर्तव्य पार पाडले असून पोलिसांचे विरोधी पक्षनेत्यांच्या पत्रकार परिषदेत जाणे म्हणजे त्यांचा कामाचा भाग असल्याचे म्हणत गृहराज्यमंत्री राम शिंदे यांनी पोलिसांचे समर्थन केले आहे.
शिवसेना साडे तीन वर्षांपूर्वी विरोधी पक्षात होती ते सत्तेत कधी आले हे त्यांना कळलेच नाही. स्वबळावर निवडणूक लढवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे हा त्यांच्या पक्षाचा निर्णय असून जे येतील त्यांना सोबत घेऊ, जे येणार नाही त्यांना सोडून भाजपा २०१९ला पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा दावा मंत्री राम शिंदे यांनी केला आहे.
व्हीएस न्यूज - क्रिकेटच्या एका फॉर्मेटमध्ये आयपीएलला पाहिले जाते, पण वास्तविक आयपीएलला बिझनेस म्हणूनच सुरू करण्यात आले, आयपीएलकडे फ्रेंचाइजीने देखील सुरुवातीपासून फक्त व्यवसाय म्हणूनच पाहिले आहे. क्रिकेट जगताला आयपीएलच्या माध्यमातून कॉर्पोरेट जोडण्यात आले. तसे हे सर्व सामान्य माणसाला सहज समजणार नाही, यासाठी हे समजून घेतले पाहिजे की, करोडो रूपये खर्च करून, त्याची वसूली आणि त्यानंतर पुढची कमाई आयपीएल संघ मालक कशी करून घेतात.
कॉर्पोरेट इंडियाला आयपीएलने सर्वात आधी स्पॉन्सर्ससाठी प्रेरित केले, कॉर्पोरेटकडून कधी प्लेअर्सच्या टीशर्टवर कंपनीचा लोगो लावण्यासाठी पैसे दिले जात नव्हते. पण आता यासाठी मोठा रक्कम मोजली जात आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय तसेच भारताच्या तमाम मोठ्या कंपन्या स्पॉन्सर करतात. ६० ते ७० टक्के आयपीएल संघाचा एकूण कमाईचा पैसा हा मीडिया राईटस मधून येतो. मीडिया राईटस म्हणजे आयपीएलचे प्रसारण करणाऱ्या चॅनेल्सकडून ते पैसे संघाला त्या संघाच्या परफॉर्मनुसार दिले जातात. टेलिव्हिजन चॅनेल्स आणि स्पोर्टस वेबसाईटचा यात समावेश आहे.
मोठ्या प्रमाणात पैसे लाईव्ह स्ट्रिमिंगसाठी देखील घेतले जातात. या पैशांचे वाटप संघाच्या जय-पराजयवरून जे रँकिंग होते, त्यावर संघाला पैशांचे वाटप केले जाते. जेवढे संघाचे रँकिंग चांगली तेवढा जास्त पैसा त्या संघाला मिळतो. फ्रेंचाईजी स्टेडियम तिकीट विक्रीपासून मोठी कमाई करते, संघाचा मालक तिकिटाचा दर ठरवत असतो, आयपीएल संघाचा महसुलाचा १० टक्के भाग, मॅचच्या तिकीट विक्रीतून येतो. संघाचा मालक आणि खेळाडू बक्षिसाची रक्कम वाटून घेतात, आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात रोख रक्कम बक्षिस म्हणून दिली जाते. ४७ कोटी बक्षिस म्हणून २०१७ मध्ये देण्यात आले होते. बक्षिसाची मोठी रक्कम चॅम्पियन्स संघाला मिळते.
आयपीएल संघाच्या मालकांना ब्रॅण्ड स्पॉन्सरशीपच्या माध्यमातून मोठी कमाई होते, फ्रेचायझी ब्रॅण्डसोबत सिझनचा करार करून त्यांच्या लोगोला संघाच्या किट आणि जर्सीवर जागा देतात. स्टेडियमच्या बाऊंड्रीवर लावण्यात येणाऱ्या जाहिराती, लांबी-रूंदी आणि दर्शनी भागाप्रमाणे विकल्या जातात. संघाच्या जर्सीच्या फ्रंट आणि बॅकवर लोगो छापून, सर्वात मोठी स्पॉन्सरशीप चुकवावी लागते. एकूण कमाईचा स्पॉन्सरशीपचा भाग २० ते ३० टक्के असतो. आयपीएलच्या या नव्या मंचावर नवीन ब्रॅण्ड खूप पैसा खर्च करतात, चीनी मोबाईल कंपनी ओप्पो याचे एक ताज उदाहरण आहे. भारतात क्रिकेट संघाच्या कपड्यांवर लोगोसाठी कंपनीने खर्च केला. त्यांनी हा अधिकार १ हजार ७९ कोटी रूपयात खरेदी केला. भारतात मजबूत पाय रोवण्यासाठी चीनी कंपनी वीवोने आयपीएलच्या माध्यमातून ७६८ कोटी लावले.
व्हीएस न्यूज – सोमवारी २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा आर्थिक सर्वेक्षण अहवाल केंद्र सरकारकडून संसदेत मांडण्यात आला. या अहवालानुसार भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर आगामी आर्थिक वर्षात ७ ते ७.५ टक्क्यांच्या आसपास राहील, असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. हा अहवाल संसदेच्या पटलावर केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी मांडला. तत्पूर्वी आजपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने सुरुवात झाली. अर्थमंत्री अरुण जेटली संसदेत १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प मांडतील. केंद्र सरकारच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाकडे या पार्श्वभूमीवर अनेकांचे लक्ष लागले होते.
हा अहवाल सादर करतेवेळी जेटली यांनी खनिज तेलाच्या वाढत्या दरांविषयी चिंता व्यक्त केली. पण यंदाच्या आर्थिक वर्षात विकासदर केंद्र सरकारच्या महत्त्वपूर्ण आर्थिक सुधारणांमुळे ६.७५ टक्क्यांपर्यंत पोहोचला. तो वाढून आगामी वर्षात ७ ते ७.५ टक्क्यांपर्यंत जाईल, असे जेटलींनी म्हटले. त्याचबरोबर या अहवालाप्रमाणे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करदात्यांच्या संख्येत गेल्या आर्थिक वर्षात मोठी वाढ झाली आहे. तसेच तयार कपड्यांची निर्यात केंद्र सरकारच्या अनुदानामुळे वाढल्याची बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे. विकासदराला आगामी आर्थिक वर्षात चालना देण्यासाठी बचत करण्यापेक्षा गुंतवणुकीच्या माध्यमातून निधी उभारणे जास्त गरजेचे आहे. देशातील राज्यांनी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांनी थेट कराच्या माध्यमातून वसूल केलेली रक्कम जगातील इतर संघराज्यीय देशांच्या तुलनेत कमी राहिली, या बाबीही आर्थिक सर्वेक्षण अहवालात नमूद करण्यात आल्या आहेत.
व्हीएस न्यूज - एअरसेल सिमकार्ड ३० जानेवारीपासून बंद होणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून झळकत होत्या. पण एअरसेल महाराष्ट्रात तरी बंद होणार नाही. या पार्श्वभूमीवर एअरसेलने ग्राहकांना मेसेजद्वारे एअरसेल बंद होणार असल्याच्या बातम्या निराधार आहेत, त्याबाबतच्या अफवांवर विश्वास ठेवू नका, असे स्पष्टीकरण दिले आहे.
एअरसेलने महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेश (पश्चिम) या राज्यातील परवाने परत केल्याचे म्हटले आहे. पण एअरसेल कस्टमर केअरशी संपर्क साधला असता,त्यांनी संबंधित ग्राहकांच्या नंबरवर मेसेज करुन, एअरसेल बंद होणार नाही, असे स्पष्ट केले. एअरसेल बंद होणार असण्याच्या भीतीने ग्राहक पोर्टसाठी मेसेज करतात, त्यावेळी त्यांना असे मेसेज येत आहेत. त्यामुळे किमान महाराष्ट्र/मुंबईतील ग्राहकांना तरी दिलासा मिळाला आहे.
व्हीएस न्यूज - इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलवर मुंबई उच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले असून सध्या तरुण क्रिकेटपटू देशासाठी खेळण्यापेक्षा आयपीएलमध्ये खेळून कोट्यवधी रुपये कमावण्यात धन्यता मानत असल्याचे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. आयपीएल हे निव्वळ मनोरंजनाचे साधन राहिलेले नसून यातून परदेशी चलनाचा मोठा आर्थिक गैरव्यवहार होत असल्याचेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे. उच्च न्यायालयाने हे ताशेरे आयपीएलचे माजी कमिश्नर ललित मोदी यांनी ईडीविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान ओढले. नुकताच यंदाच्या आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव झाला. या आयपीएलमध्ये अनेक युवा खेळाडू पदार्पण करणार आहेत. तर काही दिग्गज खेळाडूंना या लिलावात खरेदीदारच मिळाला नाही.
व्हीएस न्यूज – पुण्याच्या राष्ट्रीय हरित लवादाने हाजी अली ट्रस्टला धार्मिक स्थळे आणि तेथील परिसर स्वच्छ आणि सुंदर असायलाच हवा, असे म्हणत दणका दिला आहे. समुद्र हाजी अली दर्ग्यातून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्यामुळे प्रदूषित होत असल्याचे म्हणत हरित लवादाने हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली असून परिसर प्रदूषणरहित आणि स्वच्छ, सुंदर कसा राहील याकडे गांभीर्याने लक्ष देण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
रोज हाजी अली दर्ग्याला मुस्लीम बांधवांसह हजारो पर्यटक देखील भेट देतात. पण दर्गा ट्रस्टकडून हाजी अली दर्ग्याला भेट देणाऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक स्वच्छतेकडे मोठे दुर्लक्ष केले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. दर्ग्यातून आठवड्याला २० हजार लिटर मलमूत्र समुद्रात सोडले जात असल्यामुळे समुद्राचे पाणी प्रदूषित होत चालले आहे.
समुद्रात दर्ग्यात चढवण्यात येणाऱ्या चादरीसह पाण्याच्या बाटल्याही फेकण्यात येत असल्यामुळे प्रदूषणात आणखी भर पडत असल्याचेही समोर आले आहे. अॅड. सरोदे यांनी हीच बाब लक्षात घेत या अस्वच्छतेसह समुद्राच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधण्यासाठी हरित लवादात याचिका दाखल केली होती. लवादाने या याचिकेच्या सुनावणीदरम्यान मुंबई महापालिका तसेच राज्य सरकारची चांगलीच कान उघडणी करत यासंबंधीचे प्रतिज्ञापत्र ५ मार्चपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच हाजी अली ट्रस्टला नोटीस बजावली आहे. यासंबंधीची पुढील सुनावणी ५ मार्चला होणार आहे.
व्हीएस न्यूज - मायक्रोसॉफ्ट या तंत्र कंपनीचे प्रमुख व जगातील श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी युरोपिअन गायींपेक्षा जड दुध देऊ शकणाऱ्या व विपरीत परिस्थितीतही तग धरू शकणाऱ्या सुपर गायी निर्माण करण्याच्या उद्देशाने ४० दशलक्ष डॉलर म्हणजे २५०० कोटींची गुंतवणूक केली आहे. ब्रिटनच्या एडिनबर्ग विद्यापीठाच्या लिवस्टॉक वेटरनरी मेडिसिन रिसर्च सेंटर मध्ये ही गुंतवणूक केली गेली आहे.
या संस्थेतील संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार येथे सुपर कोंबडी बनविण्यासाठीही संशोधन सुरु असून या कोंबड्या नेहमीच्या कोंबड्यांच्या तुलनेत जादा अंडी देतील. सुपरगाय दुष्काळ, अन्य प्रतिकूल परिस्थितीत अधिक दुध देतील. या गायी तीव्र उन्हाळा, जादा थंडी सहन करतील व त्यांचा थेट फायदा शेतकऱ्यांना मिळणार आहे. आफ्रिकेत शेतकरी मोठ्या संख्येने आहेत मात्र नैसर्गिक संकटांमुळे त्यांना खाण्यापुरते उत्पन्न शेतीतून मिळत नाही. सुपरगायी अश्या गरीब १० कोटी शेतकऱ्यांना गरिबीतून बाहेर काढण्यास उपयोगी ठरणार आहेत असा दावा केला जात आहे.
व्हीएस न्यूज – भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे हाताचा पंजा हे निवडणूक चिन्ह असून भाजपचे नेते अश्विनी उपाध्याय यांनी या चिन्हावर निवडणूक आयोगाकडे आक्षेप नोंदविला आहे. निवडणुकीचे चिन्ह म्हणून मानवी शरीराच्या कोणत्याही अंगाला परवानगी देण्यात येऊ नये, असे त्यांनी आक्षेपात म्हटले आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या पत्रात अश्विनी उपाध्याय यांनी म्हटले आहे, की निवडणूक आयोगाने सुरुवातीला काँग्रेसला बैलजोडी असलेले चिन्ह दिले होते. त्यानंतर काँग्रेसची फूट झाल्यानंतर निवडणूक आयोगाने गायीचे दूध पिणारे वासरू, असे काँग्रेसला निवडणूक चिन्ह दिले. पुन्हा काँग्रेसचे विभाजन झाल्यानंतर हाताचा पंजा असे निवडणुकीचे चिन्ह काँग्रेसला निवडणूक आयोगाकडून मिळाले.
केवळ काँग्रेसलाच देशातील ६ राष्ट्रीय पक्षांमध्ये शारीरिक अंग असलेले चिन्ह देण्यात आले. तसेच देशातील ७५ प्रादेशिक पक्षांपैकी असे चिन्ह नसल्याचे त्यांनी आयोगाचे लक्ष वेधले. आचारसंहिता लागू असल्याने मतदानापूर्वी ४८ तास निवडणूक प्रचाराला बंदी असते. त्यामुळे मतदान केंद्रापासून १०० मीटर अंतरावर कोणत्याही पक्षाला चिन्ह दाखविता येत नाही. मात्र काँग्रेसचा उमेदवार हात दाखवून प्रचार करत असल्याचे उपाध्याय यांनी पत्रात म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणात सरकारवर ३०२ चा गुन्हा दाखल करण्याची मागणी करीत होते. आता सरकारी अनास्थेला कंटाळून धर्मा पाटील या शेतकऱ्याने मंत्रालयात विष पिऊन आत्महत्या केली. त्यांच्या मृत्यूसाठी फडवणीस सरकार कारणीभूत आहे, असा आरोप करत सरकारवर ३०२चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी आम आदमी पक्षाने केली. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सगळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, असेही ‘आपने म्हटले आहे. ‘आप’च्या नेत्या प्रीती मेनन यांनी त्याबाबचं प्रसिद्धी पत्रक काढत ही मागणी केली आहे.
धुळ्यातील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन सरकारनने औष्णिक विद्युत केंद्रासाठी संपादित केली होती. मात्र, योग्य मोबदला न मिळाल्याने त्यांना मंत्रालयाच्या पायऱ्या झिजवाव्या लागल्या होत्या. सरकारदरबारी काहीच होत नसल्याने त्यांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या ८० वर्षीय धर्मा पाटील यांचे सोमवारी अखेर निधन झाले. दरम्यान, धर्मा पाटील यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना प्रति हेक्टरी १० लाख रुपये सानुग्रह अनुदान देता येईल का, याबाबत सरकार विचार करत असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. १९९ हेक्टर जागेचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांवर अन्याय होणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.
धर्मा पाटील यांच्या निधनानंतर राज्य सरकारवर चोहोबाजूंनी टीका होत असून सोमवारी सकाळी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या वादाबाबत सविस्तर माहिती दिली. जुलै २००९ मध्ये प्रकल्पासाठी भूसंपादनाची प्रक्रिया सुरु झाली आणि मार्च २०१५ मध्ये ही प्रक्रिया पूर्ण झाली. या निवाड्याविरोधात धर्मा पाटील यांनी कलम १८ अंतर्गत कोर्टात जाणे अपेक्षित असते. भूसंपादनात कमी भाव मिळाला असेल, झाडांचे मूल्यांकन कमी झाले असेल कोर्टात दाद मागावी लागते. मात्र, धर्मा पाटील यांनी सुरुवातीला मोबदला स्वीकारला. मात्र, त्यानंतर त्यांनी जागेला कमी भाव मिळाला अशी तक्रार केली, असे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – काँग्रेसचे नेते संदीप दीक्षित यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत केलेल्या भाषणावर मोदी परदेशी कंपन्यांचे एजंट झाले आहेत, अशा शब्दात टीका केली आहे.
दीक्षित दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र आणि माजी खासदार असून, दीक्षित यांचा वादग्रस्त टिप्पणी असलेला व्हिडिओ संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या एक दिवस आधी सोशल मीडिया साइट्सवर व्हायरल झाला आहे.
तुम्ही भांडवलदारांसमोर ज्या पद्धतीने आपला देश विकत आहात, त्यामुळे तुम्ही परकीय कंपन्यांचे प्रतिनिधी झाला आहात. परदेशी कंपन्यांचे नरेंद्र मोदी हे नवीन व्हॉइसराय आहेत. दावोस हा उद्योजकांचे क्लब आहे, जिथे पैसे कमवण्यावर भर देतात, अशा शब्दात दीक्षित यांनी काम की बात या पोस्टमध्ये म्हटले आहे. इतर देशांसमोर तुम्ही जेव्हा भारताचे प्रतिनिधीत्व करता, परंतु जेव्हा भारतीय नोकऱ्या मागतात तेव्हा तुम्ही त्यांना ‘पकोडे’ विकण्याचा सल्ला देता, असेही दीक्षित यांनी म्हटले आहे. पंतप्रधान आणि भाजप जातीच्या आधारे समाजात विभाजन करण्याचा प्रयत्न करत असून,आपल्या राजकारणाचा प्रसार करण्यासाठी हिंसा पसरवत असल्याचा आरोप दीक्षित यांनी केला आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002