व्हीएस न्यूज - मॅक्फीच्या अभ्यासातून ८४ टक्के भारतीय जोडीदाराबरोबर त्यांचे पासवर्ड शेअर करत असल्याचे समोर आले आहे. नोव्हेंबर २०१७मध्ये मुंबई,दिल्ली आणि बंगळुरूमध्ये ६०० लोकांचा सर्व्हे करण्यात आला. ही बाब या सर्व्हेतून समोर आली आहे. ७७ टक्के भारतीय लोकांना तंत्रज्ञान नात्यातील महत्त्वाचा भाग असल्याचे वाटत असल्याचेही या अभ्यासातून समोर आलं आहे.
८९ टक्के भारतीयांना नात्यामध्ये प्रायव्हसी महत्त्वाची असते असे वाटते. पण ८४ टक्के भारतीय लोक त्यांचे मोबाइल पासवर्ड, सोशल मीडिया पासवर्ड आणि पिन नंबर त्यांच्या जोडीदाराबरोबर शेअर करतात. आपल्या जोडीदाराशी खासगी माहिती शेअर करताना सतर्कता बाळगण्याचे आवाहनही केले आहे.
एका वक्तव्यात मॅक्फीचे उपाध्यक्ष व्यंकट कृष्णापूर यांनी म्हटले की, तंत्रज्ञान आणि अप्लिकेशनच्या माध्यमातून आज कनेक्टेड लाइफस्टाइलमध्ये रोजची कामें आणि ग्राहकांशी संपर्क केला जातो. आपण तंत्रज्ञानावर विश्वास ठेवतो तसेच अवलंबूनही आहोत. पण तरीही आपली खासगी माहिती त्यावर शेअर करू नका. गरजेपेक्षा जास्त माहिती सांगण्यापासून सतर्क राहायला हवे, असे त्यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - अज्ञात मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना 1 फेब्रुवारी रोजी यमुनानगर येथील व्दारका स्वीट समोर रात्री आठ वाजता घडली होती.
श्रवण परमार हरीजन (वय-18, रा. ज्योतीबानगर, तळवडे, मुळ. चितोड, गुजरात) असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा मित्र अशोक ठाकुर (वय-20) याने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 फेब्रुवारी रोजी श्रवण हा रात्री आठच्या सुमारास यमुनानगर येथील व्दारका स्वीट समोरून दुचाकीवरून जात होता. भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्याच्या दुचाकीला पाठीमागून धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या श्रवणला उपचारासाठी खासगी रूग्णालय़ात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान श्रवणचा सोमवारी मृत्यू झाला. तर आरोपी मोटार चालकाने घटनास्थळी न थांबता पोबारा केला. फौजदार सुर्यवंशी अधिक तपास करत आहेत.
व्हीएस न्यूज - पिंपरी चिंचवड महापालिकेच्या राष्ट्रवादीच्या नगरसेविका पोर्णिमा सोनवणे यांनी आज अनोखे आंदोलन करत सत्ताधारी भाजपचा निषेध केला. प्रशासन आणि सत्ताधार्यांनी आंदोलन करणार्या नगरसेवकांवर गुन्हे दाखल करताना दुजाभाव केला होता.
गेल्या महिन्यात पौर्णिमा सोनवणे यांनी महापालिका मुख्यालयात कचरा टाकला होता. त्यांच्यावर दखलपात्र गुन्हा दाखल केला होता. दरम्यान भाजपाचे नगरसेवक तुषार कामठे यांनी देखील अनधिकृत फलक आणून मुख्यालयासमोर टाकले होते. त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दुटप्पी भूमिकेचा निषेध करत सोनवणे यांनी आज प्रशासन आणि सत्ताधारी भाजपच्या दुजाभावाच्या भूमिकेचा निषेध केला. सोनवणे यांच्या निषेधाचे समर्थन करत विरोधी पक्षनेते योगेश बहल आणि राष्ट्रवादीच्या नगरसेविका मंगला कदम यांनी प्रशासनासह सत्ताधारी भाजपचा निषेध व्यक्त करत जोरदार टिका केली.
व्हीएस न्यूज - विराट कोहली, जहीर खान, युवराज सिंग आणि हरभजन सिंगने काही दिवसांपूर्वीच अभिनेत्रींसोबत लग्न केले. आता आपल्या हृदयातली गोष्ट आणखी अभिनेत्रीने बोलून दाखवली आहे. ही अभिनेत्री भारतीय टीमचा युवा गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या प्रेमात पडली आहे. ती सोशल मीडियावर नेहमी बुमराहबाबतच बोलत असते.
बुमराहच्या प्रेमात पडली आहे अभिनेत्री राशी खन्ना की फक्त तो खेळत असलेले सामनेच बघते. दक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीमधील राशी हे एक मोठे नाव आहे. तिने जिल, हायपर, बंगाल टायगर, शिवम आणि सन ऑफ सथ्यमूर्ती-२ या चित्रपटामध्ये काम केले आहे. बॉलिवूडमधील ‘मद्रास कॅफे’ या चित्रपटामध्ये राशीने काम केले आहे. राशी क्रिकेटची चाहती आहे. ती टीम इंडियाचे ते सामने खूप आवडीने बघते पण ज्यामध्ये बुमराह असतो. राशीने स्वत: या गोष्टीचा खुलासा केला आहे. ती नेहमी सोशल मीडियावर बुमराहचे कौतूक करत असते.
व्हीएस न्यूज -‘पद्मावत’ या चित्रपटावरुन सुरु झालेला वाद नुकताच संपला असला तरी कंगना राणावतचा आगामी ‘मणिकर्णिका’ हा चित्रपटही वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या चित्रपटावर राजस्थानमधील ब्राह्मण महासभेने आक्षेप घेतला असून राणी लक्ष्मीबाई यांच्याबाबत चुकीची माहिती चित्रपटात दाखवण्यात आल्याचा आरोप महासभेने केला आहे.
‘मणिकर्णिका - द क्वीन ऑफ झाँसी या चित्रपटात राणी लक्ष्मीबाईची भूमिका कंगना राणावत साकारत असून सध्या राजस्थानमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. आता या चित्रपटावरही आक्षेप घेण्यात आला आहे. या चित्रपटावर सर्व ब्राह्मण महासभेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश मिश्रा यांनी आक्षेप घेतला आहे.
आमचा चित्रपटातील काही दृष्य आणि एका गाण्यावर आक्षेप आहे. राणी लक्ष्मीबाई यांचे एका इंग्रज अधिकाऱ्याशी प्रेमसंबंध असल्याचे यामध्ये दाखवण्यात आले असल्याचा दावा सुरेश मिश्रा यांनी केला. लंडनमधील लेखिका जयश्री मिश्रा यांच्या पुस्तकावर आधारित चित्रपटांमधील काही भाग आहे. या पुस्तकावर वादग्रस्त उल्लेखांमुळे उत्तर प्रदेशमध्येही बंदी आहे. मग बंदी असलेल्या पुस्तकाच्या आधारे चित्रपट तयार करण्याचा खटाटोप निर्मात्यांनी का केला, असा सवाल मिश्रा यांनी केला आहे.
मिश्रा हे काँग्रेसचे स्थानिक नेते देखील असून आमच्या आक्षेपांची दखल घेऊन त्यावर स्पष्टीकरण दिले नाही तर राजस्थानमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरणच होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आम्ही निर्मात्यांना ९ जानेवारी रोजी पत्र पाठवले आहे. पण अजूनही त्यांनी प्रतिसाद दिलेला नाही, असे शर्मा यांचे म्हणणे आहे. महाराणी लक्ष्मीबाई या ब्राह्मण होत्या. त्यामुळे हा विषय ब्राह्मण वर्गाच्या भावनांशी संबंधित आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
कोणकोणत्या इतिहासकारांचा सल्ला चित्रपटाचे लेखक आणि चित्रपटासंदर्भात घेतला होता याची माहिती द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासभेने पत्राद्वारे केली आहे. राजस्थानमधील गृहमंत्री गुलाबचंद कटारिया याची आम्ही भेट घेणार आहोत. दिग्दर्शक आणि निर्मार्त्यांकडून सरकारने प्रतिज्ञापत्र घ्यावे की या चित्रपटातील आक्षेपार्ह दृश्य वगळण्यात येतील. राजस्थान सरकारलाही चित्रपटाचे कथानक दाखवावे. निर्मात्यांनी जर या गोष्टीची दखल घेतली नाही तर त्यांची अवस्थाही ‘पद्मावत’ सारखीच होईल, असा इशारा महासभेने दिला आहे.
व्हीएस न्यूज - नुकताच अक्षय कुमारच्या आगामी ‘गोल्ड’ चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. १९४६च्या पार्श्वभूमीवर आधारित असलेल्या या चित्रपटात मी भारताला ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवून देऊ शकतो हे आपल्या टीमपासून सरकारपर्यंत पटवून देणाऱ्या हॉकी प्रशिक्षकाचा प्रवास यात दाखवण्यात आला आहे.
यापूर्वी कधीही न दिसलेल्या बंगाली व्यक्तीच्या भूमिकेत एक मिनिटाच्या या टीझरमध्ये अक्षय दिसतो. हॉकी आणि देशावर ज्याचे असीम प्रेम असते. यावर्षी स्वातंत्र्यदिनी देशभक्तीपर आधारित ‘गोल्ड’ प्रदर्शित होईल. ‘गोल्ड’मध्ये मौनी रॉय, कुणाल कपूर, अमित सध, विनीत सिंग आणि सनी कौशल यांच्याही भूमिका आहेत. ‘गोल्ड’चे दिग्दर्शन रीमा कागतीने केले असून, याची निर्मिती फरहान अख्तर आणि रितेश सिधवानीच्या एक्सेल एण्टरटेन्मेन्टने केली आहे.
अक्षयच्या भूमिकेने टीझरचा बराचसा भाग व्यापला असला तरी मौनी आणि अमितच्या भूमिकांची हलकीशी झलकही यात पाहावयास मिळते.
व्हीएस न्यूज - मुंबई पोलिसांना बॉलिवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याची माहिती मिळाली असून सोनू निगमच्या सुरक्षेत पोलिसांना मिळालेल्या माहितीनंतर वाढ करण्यात आली आहे. सोनू निगमच्या हत्येचा कट काही कट्टरपंथी संघटना रचत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. पोलिसांना गुप्तचर विभागाने पाठविलेल्या अॅडव्हायजरीमध्ये सोनू निगमच्या जीवाला धोका असल्याचे सांगितले आहे.
याबाबत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गुप्त माहितीनुसार सोनू निगमला कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी तसेच इव्हेन्ट प्रमोशनच्या वेळी कट्टरपंथी संघटना निशाणा बनवू शकतात. मुंबई पोलीस या माहितीनंतर सतर्क झाले असून सोनू निगमची सुरक्षा वाढविण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
अजानच्याविरूद्ध केलेल्या वक्तव्यामुळे गायक सोनू निगम चर्चेत आला होता. सोनू निगमने अजानच्या आवाजाला विरोध केल्यानंतर वाद ओढावून घेतला. अनेक कट्टरपंथी संघटनांनी त्यावेळी त्याला धमक्या दिल्या होत्या. तसेच सोनू निगमने चित्रपटागृहात राष्ट्रगीत वाजविण्याच्या सक्तीवरूनही वक्तव्य केले होते.
व्हीएस न्यूज – येत्या एक-दोन वर्षात आपले मुख्यालय मुंबईतील वानखेडे स्टेडियमवरुन बेंगळूरला हलवण्याची तयारी जागतिक स्तरावरील सर्वात गर्भश्रीमंतांपैकी एक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सुरु केली आहे. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची येत्या काही वर्षात उभारणी पूर्ण झाल्यानंतर यावर अंमलबजावणी अपेक्षित आहे. बीसीसीआयची स्वतःच्या मालकीची बेंगळूरमध्ये ४० एकर जागा असून येथेच एनसीए व अन्य सेवासुविधांची उभारणी केली जाणार आहे.
मुंबईतील क्रिकेट सेंटरची जागा सध्या भाडे तत्वावरील असल्याने तसेच पंचतारांकित लॉजिंग सुविधेवरील बेसुमार खर्च टाळण्यासाठी बीसीसीआयने याकडे मोर्चा वळवला आहे. मंडळाच्या ज्या-ज्यावेळी बैठका आयोजित केल्या जातात, त्या-त्या प्रत्येक वेळी सध्या दिल्ली, मुंबई किंवा बेंगळूर अशा मेट्रो शहरात पंचतारांकित हॉटेल्सचा खर्च प्रचंड सोसावा लागतो. त्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सीके खन्ना यांनी मंडळाच्या सर्व सदस्यांना लेखी पत्र सुपूर्द करत त्यांच्या सूचनाही मागवल्या आहेत. त्यातील योग्य सूचना बैठकीत चर्चेतही आणल्या जाणार आहेत.
व्हीएस न्यूज - भारतीय कायदा व्यवस्थेत फाशी सर्वात मोठी शिक्षा मानली जाते. या शिक्षेविषयी आपल्याला फारशी माहिती नसते मात्र हिंदी सिनेमातून फाशीची शिक्षा सुनावली कि जज पेनाची निब मोडतात हे आपण पाहिलेले असते. असे करण्यामागे खास कारण आहे. ते म्हणजे एकदा फाशी सुनावल्यावर ती रद्द करण्याचा अधिकार त्या न्यायाधीशांना राहत नाही अथवा ते शिक्षेत बदल करू शकत नाहीत. पेनाची निब मोडणे म्हणजे त्या कैद्याचे आयुष्य संपले असे मानले जाते. या पेनाचा पुन्हा उपयोग नको म्हणून निब मोडले जाते.
फाशी नेहमी सुर्योदयापूर्वी दिली जाते. यामागे बाकीच्या कैद्यांच्या कामावर परिणाम होऊ नये असा उद्देश असतो. तसेच फाशी देणारा जल्लाद कैद्याच्या कानात असे सागतो मला माफ कार. मी हुकुमाचा गुलाम आहे. मला शक्य असते तर तुझी मुक्तता होवो व तुला आयुष्य चांगल्या मार्गावर चालण्याची संधी मिळो अशी प्रार्थना केली असती.
कायद्यानुसार कैद्याची फाशीची तारीख नक्की झाली कि त्याअगोदर १५ दिवस त्याच्या नातेवाईकांना तशी कल्पना द्यावी लागते. फाशी साठी तयार केला जाणारा दोर बिहारच्या बक्सर तुरुंगात तयार केला जातो. ब्रिटीश काळापासून हीच व्यवस्था आहे. शेवटची इच्छा पूर्ण केल्यावरच गुन्हेगाराला फाशी दिले जाते. नॅशनल क्राईम रेकोर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २००४ ते २०१३ पर्यंत १३०३ जणांना फाशी दिली गेले आहे.
व्हीएस न्यूज – राफेल कराराशी संबंधीत माहिती सार्वजनिक करण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. राफेल लढाऊ विमानासाठी फ्रान्ससोबत जो करार झाला आहे, ती दोन देशाच्या सरकारमधील एक तडजोड असून अनेक गुप्त सूचना देखील त्यात असल्यामुळे या कराराशी संबंधीत माहिती सार्वजनिक केली जाऊ शकत नाही, असे स्पष्टीकरण संरक्षण मंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत दिले.
सीतारामण यांनी राज्यसभेत समाजवादी पार्टीचे सदस्य नरेश अग्रवाल यांच्याकडून विचारण्यात आलेल्या एका प्रश्नावर लेखी उत्तरात सभेला ही माहिती दिली. नरेश अग्रवाल म्हणाले होते की, असे काय कारण आहे की या कराराविषयी माहिती देण्यास सरकार नकार देत आहे. एनडीए सरकारवर राफेल जेट विमानासाठी यूपीए सरकारच्या आधीच्या करारापेक्षा अधिक पैसे मोजल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
सीतारमण यावर म्हणाल्या, भारत आणि फ्रान्स यांच्यात राफेल विमानाच्या खरेदीसाठी अंतर-सरकार करारच्या अनुच्छेद १० नुसार, २००८ मध्ये भारत आणि फ्रान्समध्ये झालेला सुरक्षा करार हा विमानाची खरेदी, गुप्त सूचनांचे संरक्षण आणि सामग्रीच्या देवाण-घेवाणीवर लागू आहे. या करारामध्ये एका खासगी कंपनीचा समावेश आहे का? या प्रश्नावर सीतारमण म्हणाल्या, या करारात कोणत्याही खासगी किंवा सार्वजनिक कंपनीचा समावेश नाही.
काँग्रेसने फ्रान्सकडून ३६ राफेल लढाऊ विमानांच्या खरेदीत अनियमितता बाळगण्याचा आरोप केला आहे. काँग्रेसचा दावा आहे की, या करारात आधी १२६ लढाऊ विमान (एमएमआरसीए) च्या खरेदीच्या करारापेक्षा जास्त किंमत दिली आहे. तसेच पूर्वीच्या करारात अनेक विमान भारतात तयार करण्याची अट देखील होती. काँग्रेसचे हे आरोप निराधार आहेत, असे सीतारमण म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने आधीच्या करारापेक्षा कमी किंमतीत विमानांच्या खरेदीचे करार केले आहेत. काँग्रेससह विरोधी पक्षातील काही नेत्यांनी या करारातील आर्थिक व्यवहाराच्या स्पष्टीकरणाची मागणी केली आहे.
व्हीएस न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पलटवार करत मोदींकडे भ्रष्टाचारांचे पुरावे मागितले असून माझ्यावर झालेले आरोप हे निराधार आहेत. मोदींच्या आरोपांना उत्तर देताना देशाच्या पंतप्रधानांनी असे बेजबाबदार वक्तव्य करणे हे चुकीचे असल्याचेही त्यांनी म्हटले.
पंतप्रधानांनी केलेले आरोप हे निराधार असून मोदींच भाषण हे पुर्णपणे खोटारडे असल्याचा आरोप त्यांनी केला. भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार बी. एस. येडियुरप्पा याच्यांवरही सिद्धरामय्या यांनी जोरदार टीका केली. गोध्रा हत्याकांडाचे उदाहरण देत भाजप सरकारच्या काळात अल्पसंख्यांक समुदाय सुरक्षित नसल्याचाही आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सत्ताधारी काँग्रेसवर कर्नाटकात सध्या कमिशनशिवाय कोणतीही कामे केली जात नसल्यामुळे राज्यातील काँग्रेस सरकार कमिशन घेणारे सरकार म्हणून ओळखले जात आहे. हे सरकार लवकरच काँग्रेसमुक्त होईल, अशा शब्दांत निशाणा साधला होता.
व्हीएस न्यूज - आयसीसीच्या एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीमध्येही कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असेल्या भारतीय संघाने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. सोमवारी आयसीसीने क्रमवारी प्रसिद्ध केली. भारताने त्यामध्ये द. आफ्रिकेकडून अव्वलस्थान काबीज केले. भारतीय संघ १२० गुणासह एकदिवसीय क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तर दक्षिण आफ्रिकेच्या संघाची घसरण होऊन दुसऱ्या स्थानावर ढकलला गेला आहे. भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत अपयशी ठरल्यानंतर एकदिवसीय मालिकेमध्ये सलग दोन सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला. भारतीय संघाला याचाच फायदा आयसीसीच्या क्रमवारीत झाला. पराभवामुळे दक्षिण आफ्रिकेला एका गुणाचा फटका बसला आहे. आता अव्वलस्थान कायम राखण्यासाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका ४-२ अशा फरकाने जिंकावी लागणार आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002