व्हीएस न्यूज - मला पक्ष सोडायची इच्छा नाही. गेली ४० वर्षे मी भाजपसाठी काम करत आहे. पण जर स्वतःच्या पक्षानेच मला दूर केले, तर माझ्यासमोर पर्याय उरणार नाही, राजकारणात काहीही शक्य असते, असे सूचक विधान करत एकनाथ खडसेंनी भाजपला इशाराच दिला आहे.
रावेरमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते राजू रघुनाथ पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. राजू रघुनाथ पाटील जळगाव जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष आहेत. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण,भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आदी मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमातील भाषणादरम्यान एकनाथ खडसेंनी भाजपला सोडचिठ्ठी देण्याचा इशारा देतानाच मनातील सलही बोलून दाखवली. खडसे म्हणाले, मी काय गुन्हा केला आहे हे मला सांगावे, मी कशात दोषी आहे हे सांगा. मी जर भ्रष्टाचार केला असेल तर मला तुरुंगात टाका. नाथाभाऊंनी पैसे खाल्ल्याचे जनतेला सांगा. पण मी कुठे दोषी आहे या प्रश्नाचे उत्तर मला हवेच आहे. माझा अपराध काय,माझी चौकशी झालेली आहे. पण यातून काही निष्पन्न झाले नाही. मी पक्षाच्या नेत्यांनाही याबाबत विचारले. पण त्यांच्याकडे उत्तर नव्हते, मला पक्षाबाहेर ढकललं जातंय, असे त्यांनी सांगितले. खडसे यांनी एका हिंदी गाण्याच्या काही ओळी सांगत व्यथा मांडली. ‘रहते थे कभी जिनके दिल में, हम जान से भी प्यारो की तरह. बैठे है उन्हीके कूंचे मे हम आज गुनहरगारों की तरह’, या गाण्याचा उल्लेख त्यांनी केला.
खडसेंनी व्यथा मांडल्यावर तिथे उपस्थित असलेले अशोक चव्हाणांनाही खडसेंना पक्षात येण्याची ऑफरच दिली. ‘नाथाभाऊ, तुमच्या मदतीसाठी आमचे दार सदैव उघडे आहेत. सत्ता गेली तरी बेहत्तर पण स्वाभिमान सोडणार नाही ही खडसेंची भूमिका स्वागतार्हच आहे. खडसेच खरे स्वाभिमानी असून स्वाभिमानी नावाने पक्ष काढणाऱ्यांची अवस्था आपण बघतच आहोत, असे सांगत चव्हाणांनी नारायण राणेंवरही निशाणा साधला. एकनाथ खडसे हे सध्या पक्षावर नाराज असून ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देतील, अशी चर्चा सुरु आहे. यापूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चाही रंगल्या होत्या.
व्हीएस न्यूज - फेब्रुवारीत होत असलेल्या मोबाईल वल्ड कॉंग्रेस २०१८ मध्ये एका पेक्षा एक दमदार स्मार्टफोन सादर होणार आहेतच पण अशी खबर आहे की नोकिया एचएमडी ग्लोबल चक्क ५ कॅमेरेवाला स्मार्टफोन सादर करत आहे. या प्रकारचा हा पहिलाच फोन ठरेल. यापूर्वी कंपनीने नोकिया ८०८ प्युअर व्ह्यू विंडोजवर आधारित लुमिया १०२० बाजारात आणला होता. या फोन ने एकाच खळबळ माजविली होती कारण या दोन्ही फोन साठी ४१ एमपी चे कॅमेरे दिले गेले होते.
नोकियाचा ५ कॅमेरेवाला फोन या वर्षअखेर बाजारात दाखल होईल असे सांगितले जात आहे. हा सर्वात नवा प्रयोग ठरेल कारण यापूर्वी ३ व चार कॅमेरेवाले फोन आले आहेत. नोकियाच्या नव्या फोन चा कॅमेरा गोलाकार असून त्याचे ७ भाग असतील. त्यातील पाच लेन्स कॅमेरे व बाकी दोन फ्लॅश असतील. यामुळे कमी उजेडात व विपरीत वातावरणात उत्तम फोटो काढता येणार आहेत. याच वेळी नोकिया ९ सादर केला जाईल असाही अंदाज आहे. या फोनला ड्युअल सेल्फी कॅमेरा, अतिशय पातळ बेजल,५.५ इंची ओलेड डिस्प्ले, १२ व १३ एमपी चे कॅमेरे असतील असे समजते.
व्हीएस न्यूज - विरोधाची आग हिंसेचे रुप धारण करूनही संजय लीला भन्साळीचा पद्मावत चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट देशभरातील ७००० स्क्रीन्सवर रिलीज झाला. करणी सेनेच्या या विरोधादरम्यान आंदोलनाने गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व गोव्यातील चित्रपटगृहांच्या मालकांनी हा चित्रपट न दाखवण्याचा निर्णय घेतला आहे.
करणी सनेने आता चित्रपटांचे ऑनलाईन टिकिटे बुक करणाऱ्या BookmyShow या वेबसाईटला आंदोलनाचा निशाणा बनविला आहे. करणी सेनेनी शोची ऑनलाईन बुकिंग बंद करावी अन्यथा यापुढे तुम्ही कधीच बुकिंग करण्याच्या लायकीचे राहणार नाही, अशी धमकी दिली आहे.
देशभर चित्रपटाच्या विरोधात आंदोलने तोडफोड करणे सुरू आहे. अनेक ठिकाणी दगड आणि काठ्यांनी शाळेच्या बसेस फोडण्यात आल्याने लहान मुलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. चित्रपटगृहांचे मालक या हिंसक प्रदर्शनांमुळे दहशतीत आहे. एकीकडे देशभर ‘पद्मावत’ला विरोध होत असताना प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह दिसून येत आहे. काही राज्यांचा अपवाद वगळता अन्य राज्यांत या चित्रपटाचे सर्व शो हाऊसफुल आहेत.
व्हीएस न्यूज – बहुतेक निवडणुकीच्या काळापुरतेच निवडणूक आयोगाचे अस्तित्व असे नागरिकांना जाणवत असते. पण सर्वसामान्यांना निवडणूक आयोगाचे अस्तित्व चांगलेच जाणवणार आहे. कारण नागरिकांना आता निवडणूक आयोगाबाबतची सर्व माहिती फेसबुक आणि युट्युब अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणार आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ओमप्रकाश रावत यांच्या हस्ते नुकतेच याबाबतच्या सोशल मीडिया कमिशन हबचे उद्घाटन करण्यात आले आहे.
निवडणूक आयुक्त सुनील अरोरा आणि निवडणूक आयुक्त अशोक लवास हे सोशल मीडिया कम्युनिकेशन हबच्या उद्घाटनाप्रसंगी उपस्थित होते. या हबचा उद्देश नागरिकांमध्ये जागृती निर्माण करणे व आयोगाच्या उपक्रमाबाबत माहिती देणे असल्याची माहिती निवडणूक आयोगाच्या संवाद विभागाचे प्रमुख धिरेंद्र ओझा यांनी दिली. आजवर सोशल मीडियामध्ये निवडणूक आयोगाचे मर्यादित अस्तित्व जाणवले आहे. निवडणूक आयोगाने गतवर्षी ‘इंडिया व्होटस’ या पेजद्वारा विदेशातील नागरिकांमध्ये मतदान जागृती मोहीम राबविली. तसेच काही प्रशिक्षणाचे व्हिडिओ आयोगाने यु ट्युबमधून प्रसिद्ध केले होते.
महाराष्ट्राला एकूण 49 पदक
व्हीएस न्यूज - राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण ४९ पोलिसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये ३ पोलिसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक, ७ जणांना पोलीस शौर्यपदक तर ३९ जणांना ‘पोलीसपदक’जाहीर झाली आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलिसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत १०७ पोलीसांना ‘पोलीस शौर्य पदक’(पीएमजी), ७५ पोलिसांनाउत्कृष्ट सेवा ‘राष्ट्रपती पोलीस पदक’(पीपीएमडीएस ) आणि ६१३ पोलिसांना ‘पोलीस पदक’(पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण ४९ पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणिविशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलीस अधीक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक विनायक राजपूत यांचा समावेश आहे.
पोलीस शौर्य पदक -
महाराष्ट्रातील ७ पोलिसांना पोलीस शौर्ये पदक जाहीर झाले आहेत. त्यामध्ये, अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम राजकुमार, आयपीएस, पोलीस उपनिरिक्षक संदीप पुंजा मंडलिक, पोलीस उपनिरिक्षक रमेश ज्ञानोबा खांडवे,नाईक - नानगासू पंजामी उसेंडी, पोलीस शिपाई निलेश जोगा मडवी, पोलीस शिपाई रमेश नटकू अतराम, पोलीस शिपाई बबलू दादूराम पुनगाडा यासह महाराष्ट्रातील 39 पोलिसांना ‘पोलीस पदक’ जाहीर झाले आहेत.
नावे पुढील प्रमाणे…
ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण,पोलीस उपायुक्त,परिक्षेत्र -2,दक्षिण विभाग मुंबई, महेश उदाजी पाटील, पोलीस अधीक्षक, ठाणे ग्रामीण. रवींद्र कुसाजी वाडेकर, सहाय्यक पोलीस आयुक्त, डोंबिवली विभाग,ठाणे शहर शांताराम तुकारामअवसरे सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा, ठाणे शहर. विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, नांदेड. जर्नाधन जगन्नाथ घाडगे, सहाय्यक समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट -3 जालना. संजीवकुमारविश्वासराव पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोल्हापूर. नेहरू दशरथ बंडगर ,पोलीस निरिक्षक, राज्य राखीव पोलीस दल (प्रशिक्षण), दौंड. बाळासाहेब रामचंद्र घाडगे, पोलीस निरीक्षक, उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष, मुंबईशहर. भीम वामन छापछडे, पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश), पोलीस संचालक (बिनतारी संदेश), पुणे. प्रकाश कचरू सहाणे, पोलीस निरीक्षक, विशेष शाखा, बुलढाणा. प्रकाश नागप्पा बिराजदार, पोलीस निरीक्षक, वसई-पालघर.संजय रामराव देशमुख, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ. शाम सखाराम शिंदे, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर. पांडूरंग नारायण शिंदे, पोलीस निरीक्षक, कुलाबा, मुंबई शहर. सुधीर प्रभाकर असपत, पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय, पुणे. सायरस बोमन ईरानी, पोलीस निरीक्षक, मुंबई शहर. अविनाश लक्ष्मीनारायण आघाव,पोलीस निरीक्षक,औरंगाबाद. सुनील दशरथ महाडीक, पोलीस निरीक्षक, नागपूर शहर. ज्ञानेश्वर रायभान वाघ, पोलीसनिरीक्षक, विशेष शाखा, मुंबई शहर. सुनिल विष्णुपंत लोखंडे, मुख्य सर्तकता अधिकरी, नागपूर. चंदन शंकरराव शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, मुंबई शहर. लहु परशुराम कुवारे, पोलीस उपनिरीक्षक, आतंकवादनिरोधी पथक, मुंबई शहर. अब्दुल गफुर गफार खान, पोलीस उपनिरीक्षक, राज्य राखीव पोलीस दल गट-14, औरंगाबाद. शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,ट्रॉम्बे पोलीस ठाणे,मुंबई शहर. युवराज मोतीरामपाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, विभागीय गुन्हे शाखा, जळगाव. विक्रम निवृत्ती काळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर. जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पुणे शहर. दिलीपपुंडलिक पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, राज्य राख्रीव पोलीस बल गट-6, धूळे. माताप्रसाद रामपाल पांडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नागपूर शहर. सुरेश गुणाजी वारंग, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सिंधुदूर्ग. विलासदगडू जगताप, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सातारा. चतुर डागा चित्ते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, नंदुरबार. प्रदीप काशिराम पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, धुळे. सोमनाथ रामचंद्र पवार, सहाय्यक पोलीसउपनिरीक्षक, पुणे शहर. राशीद उस्मान शेख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सांगली. दिलीप वासुदेव वाघमारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, अमरावती शहर. दिलीपकुमार बब्रुवान सवाने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, सोलापूरग्रामीण. नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर, पोलीस शिपाई, पोलीस नियंत्रन कक्ष, नाशिक.
आकुर्डीच्या एस.बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंटमध्ये राष्ट्रीय परिषदेत तज्ज्ञांचे विचार मंथन
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने नोटाबंदी, जीएसटीसारख्या मागील दोन वर्षात घेतलेल्या निर्णयांमुळे उत्पादन, अर्थ, उद्योग, व्यापार, सेवा, रोजगार अशा सर्वच क्षेत्रात मंदीचे सावट घोंगावत आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीमधील त्रुटी, व्यापा-यांचा विरोध आणि कामगार कायद्यात उद्योजकांच्या बाजुने केलेला बदल यामुळे सद्यस्थितीत रोजगार संधी कमी झाल्याचे दिसते, असे परखडमत आयबीएमआरचे ज्येष्ठ संशोधक प्रा. संतोष दास्ताने यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीइटी) एस.बी. पाटील इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या 'भारतीय अर्थव्यवस्थेतील सुधारणा आणि सत्यता' या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी प्रा. दास्ताने बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे खडकीतील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. मुकूंद तापकीर, व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. डॅनियल पेनकर, प्रा. डॉ. हंसराज थोरात, पिंपरीतील डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. किशोर निकम आदी उपस्थित होते. यावेळी परिषदेत देशभरातून 18 शोधनिबंध सादर करण्यात आले. या परिषदेत तज्ज्ञांनी आपापले स्पष्ट मत मांडून विचार मंथन केले.
भारताने 1990 मध्ये स्विकारलेले मुक्त अर्थ व्यवस्थेचे धोरण, त्यापूर्वी व त्यानंतर झालेला विकास, सरकारने स्विकारलेली ध्येय-धोरणे, त्याची अंमलबजावणी, विकासात येणा-या अडचणी, सरकारी अधिका-यांची मानसिकता, खासगी क्षेत्रांमुळे झालेला विकास, नोटबंदी, जीएसटीमुळे कमी झालेला विकासदर अशा अनेक विविध प्रश्नांवर प्रा. दास्ताने यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी बोलताना डॉ. किशोर निकम म्हणाले की, भारतात पुढील अनेक वर्षे पुरतील एवढया रोजगार संधी उपलब्ध आहेत. बाजारातील मागणीनुसार कौशल्य विकास केल्यास अनेक संधी आपल्यापुढे हात जोडून उभ्या आहेत. बेरोजगारांची संख्या वाढत आहे, हा समज चुकीचा आहे. नोटबंदीमुळे भ्रष्टाचाराच्या वाटा बंद झाल्या. त्याबरोबरच जीएसटी कर प्रणाली लागु झाल्याने व्यापारी, उद्योजकांना अनेक प्रकारच्या क्लिष्ट नियमातून सुटका झाली. आता एक देश एक कर ही संकल्पना ख-या अर्थाने अंमलात आली आहे. येत्या काही वर्षात सर्व व्यवहार हे डीजिटल स्वरूपात केले जातील. तंत्रज्ञानाची ही मोठी क्रांती असेल, असे डॉ. निकम यांनी सांगितले.
जगातील अनेक देशांमध्ये जीएसटी आकारला जातो. फ्रान्स सरकारने 1954 मध्ये प्रथम ही कर प्रणाली स्विकारली. तर सिंगापूर सारख्या देशाने जीएसटीच्या माध्यमातून जमा होणा-या महसुलाव्दारे मोठ्या प्रमाणावर भौतिक सुविधा उभ्या केल्या. तेथील अर्थव्यवस्था मजबूत झाली. भारताचा विचार केल्यास जीएसटी लागू करण्यास उशीर झाला, असे डॉ. निकम म्हणाले.
यानंतर झालेल्या तांत्रिक सत्रात देशभरातून आलेल्या विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले शोधनिबंध सादर केले. सहभागी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन प्रा. डॉ. किर्ती धारवाडकर, प्रा. डॉ. मनोज गद्रे यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. ऐश्वर्या गोपालकृष्णन, प्रा. इरम अन्सारी यांनी तर आभार प्रा. अनुराधा फडणीस, प्रा. स्वप्नाली कुलकर्णी यांनी मानले. कार्यक्रमास प्राध्यापक,व्यवस्थापनशास्त्र विद्याशाखेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या आयोजनास पीसीईटीचे अध्यक्ष माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, सचिव व्ही. एस. काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, विश्वस्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, भाईजान काझी, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्रशासन अधिकारी पद्माकर विसपुते यांनी मार्गदर्शन केले.
व्हीएस न्यूज – शहराच्या सौदर्यांला बाधा पाहेचवणाऱ्या अनधिकृत फेरीवाल्यांवर दिवसांतून दोनवेळा कार्यवाही करण्याच्या सूचना महापौर नितीन काळजे व सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या. तर हॉकर्सझोनचे उर्वरित काम जानेवारी अखेर पर्यंत पुर्ण करण्याचे आदेश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबधित अधिकाऱ्यांना दिले. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली हॉकर्सझोन संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रविण आष्टीकर, क्षेत्रीय अधिकारी विजय खोराटे, चंद्रकांत इंदलकर, अण्णा बोदडे, सदिप खोत, योगेश कडुसकर, आशा राऊत, आशादेवी दुरगुडे, सिताराम बहुरे आदी उपस्थीत होते. यावेळी बैठकीत राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिका हददीतील क्षेत्रिय कार्यालय निहाय फेरीवाल्यांची संख्या, बायोमेट्रीक सर्वेक्षण झालेल्या प्रात्र फेरीवाल्यांची संख्या क्षेत्रिय कार्यालय निहाय निश्चीत केलेल्या झोनची संख्या, उपलब्ध हॉकर्स क्षमता, फिरते, स्थिर, व चल हॉकर्स, भक्ती शक्ती चौकातील खेळणीवाले, नोंदणी न केलेले फेरीवाले, अनधिकृत बॅनर्स, गटई कामगार आदी बाबींवर चर्चा करण्यात आली.
राष्ट्रीय फेरीवाला धोरण २००९ अंमलबजावणी अंतर्गत डिसेंबर २०१३ मध्ये २९ सदस्यीय शहर फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली. सन २०१४ मध्ये मनपा हद्दीतील एकूण १०८३० फेरीवाल्यांचे सरक्षण पूर्ण करण्यात आले आहे. सर्व्हेक्षण झालेल्या फेरीवाल्यापैकी कागदपत्र तपासणीअंती एकूण ९०२५ फेरीवाले पात्र ठरविण्यात आले होते. पात्र फेरीवाल्यांपैकी एकूण ५९२३ फेरीवाल्यांचे बायोमेट्रीक सर्व्हेक्षण फेब्रुवारी २०१६ अखेर पूर्ण झालेले आहे. राष्ट्रीय फेरीवाला धोरणांतर्गत महापालिका हद्दीतील क्षेत्रनिहाय एकूण २४६ फेरीवाला झोनची निश्चिती करण्यात आली आहे. सदर निश्चित करण्यात आलेल्या जागांवर संबंधीत फेरीवाल्यांना जागा नेमून देणेबाबत क्षेत्रिय कार्यालयामार्फत कार्यवाही चालू असल्याचे महापौर नितीन काळजे व पक्षनेते एकनाथ पवार यांनी यावेळी बैठकीत सांगितले. अनधिकृत फेरीवाले, फ्लेक्स, अतिक्रमण यांच्यावर रोजच्या रोज क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी क्षेत्रनिहाय आपल्या अधिपत्या खालील कर्मचाऱ्यांद्वारे कारवाई करावी. असे निर्देश यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
व्हीएस न्यूज - भारतीय महिला टी-२० संघाचे नेतृत्व भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आले आहे. मंगळवारी रात्री उशिरा बीसीसीआयने भारतीय महिला टी-२० संघ जाहीर केला. उपकर्णधारपद महाराष्ट्राच्या स्मृती मानधनाकडे सोपवण्यात आले असल्याची माहिती बीसीसीआयमधील एका अधिका-याने दिली. भारतीय संघ द.आफ्रिका दौ-यात ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. मिताली राजकडे एकदिवसीय संघाचे कर्णधारपद कायम असेल.
भारतीय महिला टी-२० संघ – हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, मिताली राज, वेदा कृष्णमुर्ती, जेमिया रॉड्रिग्ज, अनुजा पाटील, तानिया भाटिया, नुझात परवीन, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, झुलन गोस्वामी, शिखा पांडे,पुजा वस्त्राकर, राधा यादव.
व्हीएस न्यूज - शिवसेनेने स्वबळावर निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर सर्वत्र डिसेंबरमध्येच लोकसभा, विधानसभा निवडणुका होऊ शकतात अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी गेल्या आठवड्यात भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीमध्येही कार्यकर्त्यांना तयारीला लागण्याचे संकेत दिलेत. या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका लवकर घेऊन त्यासोबत मोठ्या राज्यांच्या निवडणुका घेण्याचा भाजपचा मानस असू शकतो.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी व्हायला पाहिजेत, हा आपला जुना आग्रह असल्याचे मोदींनी एका वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखती दरम्यान म्हटले होते. त्यांनी त्यामागे नेत्यांचा वेळ खर्च होण्यापासून ते मनुष्यबळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याची अनेक कारणे सांगितली होती.
राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगड या भाजपशासित राज्यांमध्ये येत्या वर्षअखेरीस विधानसभा निवडणुका होऊ घातल्या आहेत. गुजरातमध्ये करावा लागलेला विरोधाचा सामना पाहता या निवडणुका भाजपला सोप्या जाणार नाहीत, अशी शक्यता आहे. वसुंधरा राजे, शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह यांना प्रस्थापित विरोधी लाटेचा फटका बसू शकतो. असे झाल्यास पुढल्या वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांवर त्याचा विपरित परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही.
व्हीएस न्यूज - मुंबईच्या नागपाडा भागात मंगळवारी झालेल्या सभेत एमआयएमचे अध्यक्ष आणि हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर बूट भिरकावल्याची घटना घडली आहे. असदुद्दीन ओवेसी रात्री पावणे दहाच्या सुमारास तीन तलाक कायद्याबाबत बोलत असताना, अचानक लोकांमधून ओवेसींच्या दिशेने बूट भिरकावल्यामुळे गोंधळ झाल्याने ओवेसींनी काही क्षण भाषण थांबवले.
हे सगळे निराश लोक आहेत, जे हे पाहू शकत नाहीत की, तलाकवर सरकारचा निर्णय जनतेने विशेषत: मुस्लीमांनी स्वीकारला नाही. पण मी लोकहितासाठी लढणारा नेता आहे. अशाप्रकारे द्वेष करणाऱ्या माणसांना घाबरत नाही. त्यांच्याविरोधात सत्य बोलण्यास ते आम्हाला रोखू शकत नसल्याचे म्हणत ओवेसी यांना पुन्हा सभेला सुरुवात केली. ओवेसी बूट फेकणाऱ्याबाबत बोलताना म्हणाले की, महात्मा गांधी, गोविंद पानसरे आणि नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांच्या विचारधारेचे अनुकरण करणारे हे लोक आहेत. दरम्यान ओवेसी यांनी बूट लागला नाही. पण सीसीटीव्ही फुटेजद्वारे आरोपीची ओळख पोलिसांनी पटवली असून त्याला अद्याप अटक केलेली नसल्याचे झोन ३ चे पोलिस उपायुक्त वीरेंद्र मिश्र यांनी सांगितले
व्हीएस न्यूज - गरीबांना जास्तीत जास्त गरीब करायचे आणि श्रीमंतांना जास्तीत जास्त श्रीमंत करायचे ही भाजपची नीती आहे. असल्या पक्षांना बाजूला करायचे काम आपल्याला करायचे आहे अशी टीका करत आज माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप सरकारवर ताशेरे झाडले. मंठा या ठिकाणी झालेल्या सभेत ते बोलत होते. भाजप सरकारविरोधात राष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा मराठवाड्यात सुरु आहे.
मंठा या ठिकाणी पोहचली त्याचवेळी झालेल्या सभेत अजित पवारांनी ही टीका केली. जालना जिल्ह्यात स्वर्गीय अंकुशराव टोपे यांनी सहकारी संस्था उत्तमरित्या चालविण्याचा आदर्श घालून दिला. राजेश टोपे हे त्यांच्याप्रमाणेच संस्थेचे काम पाहत आहेत. मात्र जालन्यातील इतर नेत्यांनी संस्था विकून खाल्ल्या असाही आरोप यावेळी अजित पवार यांनी केला.
राज्यात आज ९ हजार गावे ५० पैशांपेक्षा कमी आणेवारीतील आहेत. त्यातील ५ हजार गावे ही मराठवाड्यातील आहेत तरीही सरकारने मराठवाड्याकडे दुर्लक्ष केले आहे असाही आरोप त्यांनी केला. मराठवाड्यात सध्या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हल्लाबोल यात्रा काढण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारला या यात्रेमार्फत लक्ष्य केले जाते आहे.
यावेळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांनीही सरकारवर टीका केली. खरीप हंगामासाठी जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिक विमा भरला होता. पण त्याचे पैसे अजूनही मिळालेले नाहीत. हे पैसे लवकरात लवकर मिळाले नाहीत तर आम्ही हजारो शेतकऱ्यांना सोबत घेऊन मोर्चा काढू असा इशाराच यावेळी टोपे यांनी दिला.
तर धनंजय मुंडे यांनीही यावेळी सरकारविरोधात भाष्य केले. मंठा येथील राष्ट्रवादीच्या सभेला झालेली गर्दी अभूतपूर्व आहे. जिकडे जागा मिळेल तिकडे लोक बसले आहेत इतकी गर्दी आहे. घराच्या छपरावर बसूनही लोक राष्ट्रवादीच्या नेत्यांना ऐकत आहेत. ‘हवा का रुख बदल गया’ हेच या सभेचे सार्थ वर्णन करता येईल असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय जनता दलाचे सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागार घोटाळ्याप्रकरणी रांची येथील सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दोषी ठरवले असून त्यांना ५ वर्षांचा कारावास व ५ लाख रूपये दंड ठोठावला आहे. चारा घोटाळ्यातील हे तिसरे प्रकरण आहे. याप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांनाही दोषी ठरवण्यात आले असून त्यांनाही ५ वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. चाईबासा घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने ५६ आरोपींपैकी ५० जणांना दोषी तर सहा जणांना निर्दोष ठरवण्यात आले. ९५० कोटींच्या चारा घोटाळ्याशी निगडीत चाईबासा कोषागारमधून ३५ कोटी ६२ लाख रूपये काढण्यात आले होते. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते.
दोषी ठरवण्यात आल्यानंतर आरजेडीचे ज्येष्ठ नेते रघुवंशप्रसाद सिंह यांनी चारा घोटाळ्यातील सर्व निर्णयांविरोधात उच्च न्यायालयात अपील करणार असल्याचे सांगितले. लालूप्रसाद यांना चारा घोटाळ्यातील देवघर कोषागारशी निगडीत एका प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आल्यामुळे ते सध्या रांची येथील बिरसा मुंडा तुरूंगात कैदेत आहेत. चाईबासाची सुनावणी १० जानेवारीला पूर्ण झाली होती. माजी उपमुख्यमंत्री व लालूप्रसाद यांचे चिरंजीव तेजस्वी यादव यांनीही हा भाजप, राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा कट असल्याचा आरोप करत याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हटले. चाईबासा कोषागारप्रकरणी १२ डिसेंबर २००१ मध्ये ७६ जणांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले होते. सुनावणी दरम्यान १४ आरोपींचा मृत्यू झाला. याप्रकरण लालूप्रसाद यादव, जगन्नाथ मिश्रांसह सहा नेत्यांचा समावेश आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002