व्हीएस न्यूज - पुढाऱ्यांच्या मागे फिरून कोणीही नेता होत नाही. नेता होण्यासाठी कष्ट उपसावे लागतात. स्वतःला सिद्ध करावे लागते त्यामुळे पुढाऱ्यांच्या मागे फिरणे सोडा, कारण त्या पुढाऱ्यांच्याच अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी औरंगाबादमध्ये म्हटले आहे. औरंगाबादमध्ये काँग्रेस कार्यकर्ता शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्याचवेळी तरूण कार्यकर्त्यांना राधाकृष्ण विखे पाटील यांनी हा सल्ला दिला.
जनतेची कामे करण्यासाठी युवक काँग्रेस हे मोठे व्यासपीठ आहे. पक्षाकडून काही कार्यक्रम नसेल तर राजीव गांधी आरोग्यदायी योजना तसेच इतर योजना राबवा. लोकांमध्ये मिसळून काम करा. आरोग्याचा प्रश्न मोठा आहे, सरकारने जाहीर केलेल्या घोषणांची अंमलबजावणी होते की नाही ते पाहण्याची जबाबदारी आपली आहे असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. जनतेच्या कोणत्या प्रश्नांवर आवाज उठवण्यात आला. मतदारसंघात किती काम केलेत हे आता पाहिले जाणार आहे त्यामुळे ज्येष्ठ आणि युवक कार्यकर्त्यांमध्ये स्पर्धा आहे. त्याचमुळे उत्साहाने कामाला लागा असेही राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
युवक संघटनेतून विविध पदांवर काम केल्यावर आपल्याला काँग्रेस पक्षात चांगली संधी मिळाली असे माणिकराव ठाकरे यांनी यावेळी म्हटले आहे. आज मी जो काही आहे तो काँग्रेस पक्षासाठी केलेल्या कामाच्या जोरावर असेही ठाकरे यांनी म्हटले आहे. तर सध्याचे युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमकपणे काम करत नसल्याचे राजू वाघमारे यांनी म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - आज स्कॉर्पिअन श्रेणीतील तिसरी पाणबुडी ‘करंज’ भारतीय नौदलात दाखल होणार असून ६७.५ मिटर लांब, १२.३ मिटर उंच आणि १५६५ टन वजनाची करंज पाणबुडी आहे. स्वदेशी बनावटीच्या या करंज पाणबुडीचे मुंबईतील माझगाव डॉक येथे जलावरण करण्यात आले.
प्रत्येक प्रकारातल्या युद्धास मेक इन इंडिया मोहिमेतंर्गत तयार झालेली ही पाणबुडी उपयुक्त ठरेल, असे तिचे डिझाईन केले आहे. शत्रूवर करंज पाणबुडीतून अचूक निशाणा साधणे सहज शक्य होणार असल्यामुळे कलवरी, खांदेरीनंतर आता करंज पाणबुडीमुळे नौदलाची ताकद वाढणार आहे. नौदलाचे प्रमुख सुनील लांबा करंजच्या जलावरणावेळी उपस्थित होते. आयएनएस करंज पाणबुडी एक वर्षाच्या चाचणीनंतर नौदलाच्या ताफ्यात सामील होईल. या श्रेणीतील पहिली पाणबुडी INS कलवरी आणि दुसरी INS खांदेरी आहे. ६ पाणबुड्या मेक इन इंडियाअंतर्गत बनवण्यात येणार आहेत.
व्हीएस न्यूज - बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याच्या अलिबाग येथील अतिभव्य फार्महाउसला आयकर विभागाने बेनामी संपत्ती मानून सील ठोकले असून शाहरुखला या नोटीसीला उत्तर देण्यासाठी ९० दिवसाची मुदत दिली आहे. या काळात उत्तर न दिल्यास हि मालमत्ता जप्त केली जाणार असल्याचे समजते.
आयकर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार या पूर्वीही शाहरुखच्या मालकीच्या रेड चिली एन्टरटेनमेंट व कोलकाता नाईट रायडर्स प्रमुखांना या संदर्भात नोटीस दिली गेली होती मात्र त्याचे उत्तर दिले गेलेले नाही. शाहरुखने ही जागा शेतजमीन म्हणून खरेदी केली होती मात्र त्याचा वापर खासगी कामांसाठी केला जात आहे. येथे शाहरुखने त्याच्या वाढदिवसाची जंगी पार्टी दिली होती. या बेनामी संपत्तीची किंमत खरेदीच्या वेळी १४ कोटी २० लाख रु. होती. ही मालमत्ता लिलावात निघाली तर त्याची पाचपट अधिक किंमत येईल असेही समजते. येथे सुमारे २० हजार चौरस मीटर क्षेत्रात बांधकाम केले गेले असून स्विमिंग पूलही बांधला गेला आहे.
व्हीएस न्यूज – शिवसेनेने भाजपचे सध्या दुर्लक्षित असलेले नेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. आज उपेक्षा आणि मानहानी मुक्ताईनगरात शिवसेना जिल्हाप्रमुख व इतरांना संपवण्यासाठी सत्तेचा गैरवापर करणाऱ्या खडसेंना सहन करावी लागते. सत्ता त्यांच्यावरच उलटली असल्यामुळे या जन्मातील कर्माचे फळ याच जन्मात फेडायचे असते, असा टोला शिवसेनेने लगावला आहे.
जुन्या जमान्यातील चारित्र्य, निष्ठेचा दाखला देत मीच हरिश्चंद्राचा अवतार असल्याचे सांगत लाल दिव्याच्या पालखीत बसण्यासाठी ते कधी काँग्रेस तर कधी राष्ट्रवादीचा आधार घेत आहेत. भाजपच्या राजकारणातून खडसे हे बाद झाल्याने पूर्वीचे स्थान त्यांना उरले नसल्याची विखारी टीका सेनेने केली.
खडसेंच्या राजकीय परिस्थितीवर शिवसेनेने ‘सामना’ या आपल्या मुखपत्रातून बोचऱ्या शब्दांत निशाणा साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री व्हायला निघालेल्या खडसेंना मिळालेला ‘साईड रोल’ही काढून घेतला. जेथे फुले वेचली तेथे गोवऱ्या वेचण्याची वेळ राजकारणातून बाद झालेल्या खडसेंवर आली आहे. आजन्म मी भाजपतच राहणार असल्याचे ओरडून सांगणारे खडसे आता मला पक्ष सोडून जाण्यास भाग पाडू नका असे म्हणत आहेत. खडसेंना भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे मंत्रिपद सोडावे लागल्यामुळे आता चौकशीचे भिजत घोंगडे ठेवण्यात आले आहे.
खडसेंनी सत्तेचा वारेमाप गैरवापर करून राजकीय विरोधकांना त्रास देण्याची एकही संधी सोडली नव्हती. त्यांची विरोधी पक्षनेता असताना कशी ‘दुकानदारी’ सुरू होती, यावर शरद पवार यांनीही भाष्य केल्याचा दाखला सेनेने दिला. खडसे पक्षात राहिले काय किंवा गेले काय, भाजपला आता काहीच फरक पडत नाही, असे म्हणत खडसे यांचा ढळलेला पदर ओढण्याचे काम अधूनमधून काँग्रेसवाले करत आहेत. आता भाजपच्या कार्यक्रमाचे नव्हे तर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाचे निमंत्रण खडसेंना असते त्यामुळेच अजित पवार, अशोक चव्हाण त्यांना खुली ऑफर देत असल्याचे सामनामध्ये म्हटले आहे.
व्हीएस न्यूज - केंद्र सरकारने २७ जानेवारीला एक पत्रक प्रसिद्ध करून सर्वोच्च न्यायालय आणि २४ उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांचा पगार दुप्पट होणार असल्याचे म्हटले आहे. मुख्य न्यायाधीशांना त्यानुसार महिन्याला २.८० लाख पगार मिळणार आहे. हाच पगार आधी १ लाख रुपये होता. वाढीव पगारासह सरकारी निवास, सेवक आणि इतर सुविधाही मिळणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती आणि सर्व उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांना महिन्याला २.५० लाख पगार मिळणार आहे. हा पगार आतापर्यंत ९० हजार एवढा होता. कॅबिनेट सचिव, कॅग, सीईसी सारख्या अधिकाऱ्यांप्रमाणे समान सुविधा त्यांना मिळणार आहे. तर आतापर्यंत उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना ८० हजार पगार मिळत होता. त्यांना आता २.२५ लाख पगार मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सचिव स्तराच्या अधिकाऱ्याप्रमाणे उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सुविधा मिळणार आहे.
खंडपीठाच्या न्यायाधीशांसह निवृत्त न्यायाधीशांनाही केंद्र सरकारने घेतलेला हा निर्णय लागू होणार आहे. नवीन पगार वाढ ही १ जानेवारी २०१६ पासून लागू होणार आहे. हा निर्णय सातव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवरच घेण्यात आला आहे.
व्हीएस न्यूज - नुकत्याच जाहीर झालेल्या न्यू वल्ड हेल्थ रिपोर्ट नुसार २०१७ मध्ये श्रीमंत देशांच्या यादीत यंदा भारत ६ व्या स्थानी असून नंबर एक वर यंदाही अमेरिका आहे. अमेरिकेची संपत्ती ६४५८४ अब्ज डॉलर्स आहे तर त्याखालोखाल चीन २४८०३ अब्ज डॉलर्स, जपान १९५२२ डॉलर्स संपत्तीने दुसऱ्या व तिसऱ्या नंबरवर आहेत.
कोणत्याची देशाची एकूण संपत्ती देशाच्या सर्व शहरातील नागरिकांच्या वैयक्तिक संपत्ती वरून मोजली जाते. यात सरकारी संपत्तीचा समावेश नसतो. या यादीत ९९१९ अब्ज डॉलर्सनी ब्रिटन ४ नंबरवर आहे तर जर्मनी ९६६० अब्ज डॉलर्स सह पाचव्या नंबरवर आहे. भारताची संपत्ती आहे ८२३० अब्ज डॉलर्स. त्याखाली फ्रांस ६६४९, कॅनडा ६३९३, ऑस्ट्रेलिया ६१४२, इटली ४२७६ अब्ज डॉलर्स असे क्रमांक आहेत.
भारताने यंदा २०१६ मधील ६५८४ अब्ज डॉलर्स वरून ८२३० अब्ज डॉलर्सवर झेप घेतली असून ही वाढ २५ टक्के आहे. जगातील करोडपतीच्या यादीत भारत ७ व्या नंबरवर आहे तर अब्जाधीशांच्या यादीत ३ नंबरवर आहे. भारतात २०७३० करोडपती व ११९ अब्जाधीश आहेत.
व्हीएस न्यूज - टपाल खात्यात काम करणाऱ्या लोकांसाठी केंद्र सरकारने नवीन गणवेश आणला असून पोस्टातील कर्मचारी आता खादीच्या वर्दीत दिसणार आहेत. खादीला प्रोत्साहन देण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
दळणवळण राज्यमंत्री मनोज सिन्हा यांनी पोस्टमनच्या नवीन गणवेशाचे उद्घाटन केले. ‘पंतप्रधानांनी खादीला प्रोत्साहन देले आहे. आम्ही सुमारे 25 दिवसांपूर्वी ही प्रक्रिया सुरू केला आणि खाकी रंगात खादीच्या कपड्यात समोर येण्याचा निर्णय घेतला. खादी आणि टपाल खात्यासाठी मोठ्या प्रमाणात संभावना आहेत,’ असे ते म्हणाले. या गणवेशाचे डिझाईन राष्ट्रीय फॅशन तंत्रज्ञान संस्थेने (एनआयएफटी) तयार केले आहे. नव्या गणवेशात पोस्टमनच्या डोक्यावर गांधीटोपीऐवजी पी-कॅप असेल. पोस्टमन आणि पोस्टवुमन यांच्यासाठी गणवेशाचा रंग एकच राहील आणि त्यावर ‘इंडिया पोस्ट’ चा लोगो असेल. खांद्यावर लाल पट्टी लावलेली असेल.
टपाल खात्यात गेल्या काही वर्षांपासून तळाच्या कर्मचाऱ्यांबाबत गणवेशाबाबत गोंधळाची परिस्थिती होती. वेगवेगळ्या राज्यांमध्ये कर्मचारी वेगवेगळ्या रंगाचा गणवेश घालत होते. या पावलामुळे सरकारला 31 कोटी रुपयांचा खर्च करावा लागणार आहे. प्रत्येक कर्मचाऱ्याला एका वर्षात एक जोडी गणवेश व स्वेटर मिळणार आहेत. त्याचा पुरवठा खादी ग्रामोद्योग मंडळ करणार आहे.
व्हीएस न्यूज - नागालँड राज्य विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय सर्व पक्षांनी घेतला आहे. यात भारतीय जनता पक्ष व काँग्रेस यांचाही समावेश असणार आहे. राज्यात येत्या 27 फेब्रुवारी रोजी निवडणूक होणार असून या निर्णयामुळे त्यावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.
राज्यातील आदिवासी संघटनांनी प्रथम नागा समस्येवर तोडगा काढावा आणि मगच निवडणूक घ्यावी, अशी मागणी केली होती. या संदर्भात सर्व राजकीय पक्षांची बैठक सोमवारी झाली. त्यात आदिवासी संघटनांच्या भूमिकेला पाठिंबा व्यक्त करण्यात आला. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर प्रसिद्ध जालेल्या निवेदनावर 11 पक्षांच्या स्वाक्षऱ्या असून नागा पीपल्स फ्रंट, नॅशनल पीपुल्स पार्टी आणि आम आदमी पक्ष हेही यांच्या प्रतिनिधींच्याही त्यावर स्वाक्षऱ्या आहेत. कोणत्याही उमेदवाराने विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरू नये, असे आवाहन या पक्षांनी केले आहे. तसेच आपण कोणत्याही उमेदवाराला तिकिट देणार नाही, असेही त्यांनी जाहीर केले आहे.
भाजपचे नागालँड प्रभारी राम माधव यांनी 22 जानेवारी रोजी दीमापुर येथे सांगितले होते, की राज्यातील नवे सरकार नागा समस्येवर तोडगा काढेल आणि त्यासाठी निवडणुका होणे ही पहिली घटनात्मक गरज आहे.
व्हीएस न्यूज – शिलाँगमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे एका काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसून आले होते. जवळपास ७० हजार रुपये ऐवढी त्या जॅकेटची किंमत आहे. ते जॅकेटभाजपच्या नजरेतून सुटले नाही आणि त्यांनी लगेच राहुल गांधीवर निशाना साधण्याची संधी गमावली नाही. मेघालय भाजपने राहुल गांधी यांचा तो महागडे जॅकेट परिधान केलेला फोटो ट्विटरवर पोस्ट केला. मंगळवारी शिलाँगमधील एका संगीत कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी ते जॅकेट परिधान केले होते.
मेघालयच्या सरकारी तिजोरीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यानंतर ‘काळ्या पैशाच्या सुटाबुटातील सरकारने आमच्या दुखावर गीत गायन करण्याऐवजी मेघालयातील अकार्यक्षम सरकारचा अहवाल सादर करु शकले असते, असे म्हणत तुमची मौनवृत्ती ही आमची खिल्ली उडवत असल्याचे मेघालय भाजपने प्रसारित केलेल्या त्या ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच त्यांचा तो जॅकेट परिधान केलेला फोटोही त्या ट्विटसोबत पोस्ट केला आहे. राहुल गांधी यांचे हे जॅकेट ब्रिटिशांच्या विलासी जीवनशैलीतील प्रतिष्ठतेला साजेशे बरबरी ब्रँडचे आहे. राहुल गांधी यांनी परिधान केलेल्या जॅकेटची ब्लूमिंग्डेल्स या वेबसाईटवर किंमत ही ६८ हजार १४५ रुपये ऐवढी सांगण्यात येत आहे.
व्हीएस न्यूज – एकदिवसीय मालिकेपूर्वी भारताविरूद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका २-१ ने जिंकणाऱ्या द. आफ्रिकेच्या संघाला धक्का बसला असून आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डीव्हिलिअर्स दुखापतीमुळे पहिल्या तीन सामन्यांना मुकणार आहे. तो पहिले तीन सामने त्याच्या बोटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकणार नाही.
डीव्हिलियर्सच्या उजव्या हाताच्या बोटाला भारताविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी दरम्यान दुखापत झाली होती. ही दुखापत बरी होण्यासाठी त्याला जवळपास दोन आठवडे लागणार आहेत. तो वॅन्डरर्समध्ये होणाऱ्या चौथ्या सामन्यामध्ये खेळेल, अशी आपेक्षा आहे. १ फेब्रुवारीपासून भारत आणि द.आफ्रिकेमध्ये ६ सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरू होत आहे. मात्र एबी डीव्हिलिअर्स दुखापतग्रस्त झाल्याने आफ्रिकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. एबीडी व्हिलिअर्स सध्या चांगल्या फॉर्मात असून कसोटी मालिकेमध्ये त्याने आफ्रिकेच्या विजयामध्ये महत्वाची भुमिका बजावली होती. आता एबी डी व्हिलिअर्सच्या जागी पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यांसाठी आफ्रिकेच्या संघात खाया झोन्डोची निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
व्हीएस न्यूज - महात्मा गांधीजी गोळी लागल्यावर ‘हे राम’ म्हटले नसल्याचा दावा गांधीजींचे तत्कालीन वैयक्तिक सचिव वेंकिता कल्याणम यांनी केला आहे. १९४३ ते १९४८ या काळात वेंकिता कल्याणम (वय ९६) हे गांधीजींचे वैयक्तिक सचिव होते.
कल्याणम यांनी २००६ मध्ये एका पत्रकार परिषदेमध्ये केलेल्या विधानामुळे खळबळ उडाली होती. नथुराम गोडसेने गोळी मारल्यावर गांधींजींनी ‘हे राम’ असे म्हटले नसल्याचे कल्याणम म्हणाले होते. कल्याणम यांचे हे विधान चुकीचे असल्याचे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांनी तेव्हाच म्हटले होते. पण आपल्या विधानाबाबत बोलताना कल्याणम म्हणाले की, माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला आहे. गांधींजींनी गोळी लागल्यानंतर ‘हे राम’ म्हटल्याचे मी ऐकले नाही, असे मी म्हणालो होतो. मला गांधीजींना गोळी लागल्यानंतर निर्माण झालेल्या गोंधळात काही ऐकू आले नाही. कदाचित ते ‘हे राम’ म्हटले असतील. गांधीजींना गोडसेने एकदाच मारले, पण राजकीय पक्ष त्यांच्या शिकवणीचा अवलंब न करून त्यांना रोज मारत आहेत, अशी टीकाही कल्याणम यांनी केली.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002