व्हीएस न्यूज - गुजरात विधासभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात ९७७ उमेदवार रिंगणात आहेत. निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील ९२३ उमेदवारांचे विश्लेषण केले असता, १३७ उमेदवारांविरोधात गंभीर गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यात खून, अपहरण, बलात्कार यांचे आरोप असल्याचे दोन स्वयंसेवी स्वंस्थांनी केलेल्या विश्लेषणात उघड झाले आहे. जवळपास १५ टक्के उमेदवार असे आहेत.
असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉम्र्स व गुजरात इलेक्शन वॉच या संस्थांनी विश्लेषण केले. भाजपच्या ८९ पैकी १० उमेदवारांविरोधात गंभीर गुन्हे आहेत. तर काँग्रेसचे असे २० उमेदवार आहेत. ५४ उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र अपुरे असल्याने त्याचे विश्लेषण करता आले नाही असे गुजरात इलेक्शन वॉचचे पंकज जोग यांनी स्पष्ट केले. संयुक्त जनता दलाचे माजी आमदार छोटू वसावा यांचा मुलगा महेश याच्याविरोधात सर्वाधिक २४ गुन्हे आहेत.
२१ टक्के उमेदवार करोडपती….
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ९९७ उमेदवारांपैकी १९८ म्हणजेच २१ टक्के उमेदवार करोडपती आहेत. त्यापैकी ६० जणांनी आपली मालमत्ता पाच कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे. राजकोट पश्चिममधील काँग्रेस उमेदवार इंद्रनील राजगुरू हे सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. त्यांनी १४१.२२ कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे.
पंतप्रधानांचा कार्यकर्त्यांशी संवाद
अहमदाबाद : चौफेर टीका होऊनही देश आत्मविश्वासाने पुढे जात असून चारही बाजूंनी चांगल्या बातम्या येत आहेत अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील निकालावर व्यक्त केली. गुजरात विधानसभा निवडणुकीपूर्वी पंतप्रधानांनी साडेसात हजार महिला कार्यकर्त्यांशी नमो अॅपच्या माध्यमातून संवाद साधला. जनतेने साथ दिल्याचे पंतप्रधानांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - महाराष्ट्र राज्य महिलांसाठी असुरक्षित असल्याचे वास्तव राष्ट्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (एनसीआरबी) अहवालातून समोर येत आहे. यामध्ये धक्कादायक बाब म्हणजे बेपत्ता लोकांच्या यादीत आघाडीवर असलेल्या महाराष्ट्रातून ४९ हजार महिला बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ महिला नाहीशा होण्यामागे महाराष्ट्र दुस-या क्रमांकावर आहे ही बाब चिंताजनक आहे.
विशेष बाब म्हणजे बेपत्ता घटनांच्या यादीत महाराष्ट्र आघाडीवर आहे. त्यापाठोपाठ पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशचा क्रमांक लागतो. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रातून ९४ हजार ९१९ लोक नाहीसे झाले आहेत. पश्चिम बंगालपाठोपाठ पुरुषांच्या तुलनेत महिलांचे प्रमाण अधिक आहे. राज्यातून ४९ हजार ३३८ महिला बेपत्ता झाल्या आहेत. देशभरातून गेल्या वर्षभरात ५ लाख ४९ हजार नागरिक बेपत्ता झाल्याची नोंद आहे. यापैकी २ लाख २९ हजार ३८१ नागरिकांचा शोध घेण्यास तपास यंत्रणेला यश आले असून, अजूनही ३ लाख १९ हजार नागरिकांची नोंद बेपत्ता नागरिकांच्या यादीत आहेत. यामध्ये १ लाख ७४ हजार ८१६ महिला आहेत.
हेतूपूर्वक अत्याचारातही आघाडी…
हेतूपूर्वक करण्यात आलेल्या महिलांवरील हल्ल्यांमध्येही महाराष्ट्राची आघाडी कायम आहे. राज्यात तब्बल ११ हजार ३९६ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश आहे. या गुन्ह्यांच्या बरोबरीने ६४ हजार ५१९ जणींचे अपहरण झाल्याची नोंद आहे. अपहरणाच्या गुन्ह्यांमध्ये दुस-या, तर बलात्काराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिस-या क्रमांकावर आहे. अशामध्ये राज्यातून ६ हजार १७० स्त्रियांचे अपहरण करण्यात आले आहे. तर ४१८९ जणी बलात्काराच्या शिकार ठरल्या आहेत. यामध्ये अल्पवयीन मुलींपासून वयोवृद्ध महिलांचाही समावेश आहे. पश्चिम बंगालमधून ५३ हजार ६५४ महिला बेपत्ता आहेत. पश्चिम बंगालमधून अनेकदा नोकरीच्या बहाण्याने महिलांना मुंबईसह राज्याच्या विविध भागांमध्ये वेश्याव्यवसायात अडकविले जात असल्यामुळे त्यांचे नाहीसे होण्याचे प्रमाण अधिक आहे. अशी परिस्थिती असताना पश्चिम बंगालपाठोपाठ राज्यातूनही महिला नाहीशा होण्याचे प्रमाण सर्वाधिक असणे ही निश्चितच चिंताजनक बाब आहे.
काही महिला प्रेमभंग, पूर्ववैमनस्य, ऑनर किलिंग, एकतर्फी प्रेमाच्या शिकार ठरतात. यामध्ये अनेकदा त्यांची हत्या करण्यात येते. मात्र मृतदेह सापडत नाहीत. काही जणी स्वत:हून पळून जातात, भवितव्य घडविण्यासाठी, नोकरीच्या शोधात अनेक जणी घर सोडतात. अशा विविध बाबी महिला बेपत्ता होण्यामागे असतात.
– प्रवीण दीक्षित, माजी पोलीस महासंचालक.
व्हीएस न्यूज - उत्तरांना प्रश्न करणारे राहुल गांधी आता कमीत कमी प्रश्न विचारायला शिकले, असा टोला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी लगावला आहे. जी व्यक्ती आजपर्यंत उत्तरांना प्रश्न विचारायची, ती व्यक्ती कमीतकमी प्रश्न विचारायला शिकली, अशा शब्दांमध्ये इराणी यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दररोज मोदींना एक प्रश्न विचारत आहेत. याबद्दल स्मृती इराणी यांना विचारण्यात आले असता, त्यांनी राहुल गांधी यांना चिमटा काढला. आज राहुल गांधींनी खासगी वीज कंपन्या आणि महागडे वीज दर यावरून मोदींना लक्ष्य केले. सरकारी वीज निर्मिती प्रकल्पांमधील निर्मिती कमी करुन ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरले?, असा सवाल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विचारला.
जनतेच्या पैशांची मोदींनी लूट का केली?, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. २००२-१६ या काळात ६२ हजार ५४९ कोटी रुपयांची वीज खरेदी करून ४ खासगी कंपन्यांचे खिसे का भरण्यात आले? सरकारकडून केली जाणारी वीज निर्मिती क्षमता ६२ टक्क्य़ांनी कमी करुन ३ रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज खासगी कंपन्यांकडून २४ रुपये दराने का खरेदी करण्यात आली?, असे प्रश्न राहुल गांधींनी ट्विटरवरून विचारले आहेत. जनतेच्या कमाईची लूट का करण्यात आली? असा सवालदेखील राहुल गांधींनी या ट्विटमधून उपस्थित केला.
गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, २२ वर्षाचा हिशोब द्या, जनतेला उत्तर द्या, असे ट्विट करून राहुल गांधींकडून दररोज मोदींना प्रश्न विचारले जात आहेत. काल (गुरुवारी) राहुल गांधींनी मोदींच्या जाहिरातबाजीमुळे गुजरातवर कर्जाचा डोंगर असल्याची टीका केली होती. मोदींच्या जाहिरातबाजीचा आर्थिक भार जनतेने का वाहायचा, असा प्रश्न राहुल यांनी विचारला होता.
‘१९९५ मध्ये गुजरातवर ९ हजार १८३ कोटी रुपयांचे कर्ज होते. २०१७ मध्ये कर्जाचा हा आकडा २ लाख ४१ हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे. म्हणजेच गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीवर ३७ हजार रुपयांचे कर्ज आहे, अशी आकडेवारी राहुल यांनी ट्विटमध्ये दिली होती. तुमच्या आर्थिक गैरव्यवस्थापनाची आणि जाहिरातबाजीची शिक्षा जनतेने का भोगायची?, असा सवाल राहुल गांधींनी मोदींना विचारला होता.
व्हीएस न्यूज - पोलिसांची खासगी सुरक्षा घेणा-यांना आता आपला खिसा अधिकच रिकामा करावा लागणार आहे. कारण आता पोलिसांची खासगी सुरक्षा घेण्यासाठी एक लाख रुपये इतकी घसघशीत रक्कम आकारण्यात येणार आहे. आतापर्यंत ही रक्कम ७५ हजार रुपये इतकी होती. राज्य सरकारतर्फे हा नवा नियम लागू करण्यात आला आहे. यासंबंधी आलेल्या प्रस्तावाला मुख्य न्यायधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने मंजुरी दिली आहे.
ब्लॅकमेलर, चोर, दरोडेखोरांपासून जीवाला धोका असणारे अनेक जण पोलिसांचे संरक्षण घेतात. संरक्षण घेणा-याची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल, तर सर्वसामान्यांच्या करातील पैशांचा वापर यासाठी का करावा, असा सवाल उपस्थित केला होता. यापुढे पोलीस संरक्षण घेण्यासाठी राज्य सरकारला दरमहिना एका हवालदारासाठी ९५,४१८ रुपये, तर पोलीस नाईकसाठी १.२ लाख रुपये भरावे लागणार आहेत. ही रक्कम त्या व्यक्तीच्या वार्षिक उत्पन्नाच्या १५ टक्क्यांहून जास्त नसणार याचीही राज्य सरकार काळजी घेईल. तीन महिन्यांच्या सुरक्षेचा खर्च अनामत रक्कम म्हणून सरकारच्या खात्यात भरावी लागणार आहे.
तसेच पोलीस गाडीची मागणी असल्यास अधिकचे पैसे आकारले जाणार आहेत. दरम्यान, पन्नास हजारपेक्षा कमी उत्पन्न असणा-यांना ही रक्कम भरावी लागणार नाही. राज्य सरकारचे वकील आशुतोष कुंभारकोनी यांनी राज्य सरकारच्या या नव्या नियमाचा प्रस्ताव उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायधीश मंजुळा चेल्लूर आणि न्यायमूर्ती मंगेश सोनक यांच्यापुढे सादर केला होता.
व्हीएस न्यूज - राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ६१ वर्षांपूर्वी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो अनुयायांसह हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्मात प्रवेश केला होता. या धर्मांतराच्या मुख्य सोहळ्यात सहभागी झालेल्या सात बौद्ध धर्मगुरुंपैकी एक असणारे भन्ते प्रज्ञानंद यांनी गुरुवारी अखेरचा श्वास घेतला, ते ९० वर्षांचे होते.
वृद्धापकाळामुळे गेल्या दोन वर्षांपासून भन्ते प्रज्ञानंद हे श्वासाच्या विकाराने त्रस्त होते. तसेच मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचाही त्यांना त्रास होता. दरम्यान, ताप आणि छातीत दुखत असल्याने त्यांना २६ नोव्हेंबरपासून लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल युनिवर्सिटीमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. त्यांच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग झाल्याचे रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधीक्षक प्रा. एस. एन. शंखवार यांनी सांगितले.
भन्ते प्रज्ञानंद हे लखनऊ येथील बुद्ध विहाराची व्यवस्था पाहणारे सर्वात वरिष्ठ भन्ते होते. त्यांचे शिष्य भन्ते सुमन यांनी ही माहिती दिली. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी डॉ. आंबेडकरांनी नागपुरातील दीक्षाभूमीवर केलेल्या धर्मांतरावेळी त्यांना बुद्ध धम्माची दीक्षा देणाऱ्या सात भन्तेंपैकी ते एक होते, असे भन्ते सुमन यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना अनेकदा सरकारकडून रोख रक्कम, सरकारी नोकरी, जमीन अशी बक्षीसे दिली जातात. आता या यादीत गायीचे नावदेखील जोडावे लागणार आहे. हरयाणाचे पशुसंवर्धन मंत्री ओम प्रकाश धनकर यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी करणाऱ्या राज्याच्या खेळाडूंना गाय बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.
हरियाणा बॉक्सिंग असोसिएशनचे प्रमुख असलेल्या धनकर यांनी रोहतकमध्ये एका कार्यक्रमात बोलताना दुधाचे फायदे सांगितले. ‘गायीच्या दूधात फॅटचे प्रमाण कमी असते. त्यामुळे हे बॉक्सर्ससाठी फायदेशीर आहे. गायी कायम सक्रीय असतात. तर म्हशी बराच वेळा झोपेतच असतात,’ असे धनकर यांनी म्हटले. बॉक्सर्सनी जगात देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. त्यांना कायम अशीच कामगिरी करावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
पदकांची कमाई करणाऱ्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या गायी देशी असतील, अशी माहिती त्यांनी दिली. या गायी दिवसाला १० लीटर दूध देतील, असेही ते म्हणाले. नीतू (४८ किलो वजनी गट), ज्योती गुलिया- (५१ किलो वजनी गट),साक्षी धंदा (५४ किलो वजनी गट), शशी चोपडा (५७ किलो वजनी गट), अनुपमा (८१ किलो वजनी गट), नेहा यादव (८१ किलो वजनी गट) यांनी युवा महिला चॅम्पियनशीप स्पर्धेत पदक विजेती कामगिरी केली होती. या सर्व खेळाडूंच्या घरांचे पत्ते घेण्यात आले असून लवकरच त्यांच्या घरी गायी पोहोचवल्या जातील, असे धनकर यांनी सांगितले.
मंत्र्यांच्या या घोषणेमुळे खेळाडू आश्चर्यचकीत झाले आहेत. याबद्दल बोलताना, ‘मला आतापर्यंत अनेक बक्षीसे मिळाली. देवदेवतांच्या मूर्तीं, पुस्तके देऊन अनेकदा कामगिरीचे कौतुक झाले. मात्र कधीच गाय मिळाली नव्हती. मला गाय खूप आवडते. गेल्या वर्षी रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या साक्षी मलिकला चांदीची गाय देण्यात आली होती, असे मी वाचले होते. मात्र मला खरीखुरी गाय बक्षीस म्हणून मिळाली आहे,’ अशी प्रतिक्रिया नीतूने दिली.
व्हीएस न्यूज - मुंबईत परप्रांतीयांच्या मुद्द्यावरुन काँग्रेस आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. शुक्रवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला केला. ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भय्या संजय निरुपमच्या कार्यालयावर सर्जिकल स्ट्राईक केला असून इट का जवाब पथ्थर से मिलेगा’, असा धमकीवजा इशाराच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी दिला आहे.
रविवारी विक्रोळीत मनसेकडून मराठी पाट्या लावण्यासाठी दुकान मालकांना निवेदन दिले जात होते. यादरम्यान, काँग्रेस कार्यकर्ता अब्दुल अन्सारी आणि त्याच्या १५ ते २० साथीदारांनी मनसेच्या पदाधिकाऱ्यांवर हल्ला केला होता. या घटनेत मनसेचे विभागप्रमुख विश्वजित ढोलम आणि अन्य चार जण जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी मनसेवर टीका केली होती. मनसेच्या गुंडांनी परत मारा खाल्ला, असं खोचक ट्विट त्यांनी केले होते.
विक्रोळीतील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील आझाद मैदान परिसरातील काँग्रेसच्या कार्यालयावर मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी हल्ला केला. कार्यालयातील काचा आणि सामानाची कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. ‘ईद’निमित्त कार्यालय बंद होते, असे समजते. या हल्ल्याचा काँग्रेसने निषेध केला असून प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण हे कार्यालयाची पाहणी करणार आहेत. सुरुवातीला हा हल्ला कोणी केला याबाबत संभ्रम होता. मात्र, मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी ट्विटर हा हल्ला मनसेनेच केल्याचे सांगितले आणि संभ्रम दूर झाला.
व्हीएस न्यूज - उत्तर भारतीय आणि इतर राज्यातून येणारे लोक मुंबईला महान बनवतात, त्यांनी मुंबईचा गौरव वाढवला, असे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. मुंबईतल्या घाटकोपरमध्ये शिक्षण महर्षी आय. डी. सिंह यांच्या नावाने उभारलेल्या चौकाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. तेव्हा ते बोलत होते.
मुंबईतील उत्तर भारतीय तसेच वेगवेगळ्या राज्यातून येणारे लोक हे मुंबईला महान बनवतात. त्यांनी मुंबईचा गौरव आणखी वाढवला आहे. भाषा हे संपर्काचे साधन आहे. भाषा माणसाला जोडते त्यामुळे भाषा हे विवादाचे माध्यम होऊ शकत नाही. हा वाद निर्माण करणे चुकीचे आहे.
मतांच्या राजकारणासाठी कोणी भाषिक वाद करु नये. मराठी संस्कृतीचा आम्हाला अभिमान आहेच. पण याच मराठी आणि मुंबईतील संस्कृतीबरोबर उत्तर भारतीय संस्कृतीही एकजीव झाली आहे, असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. सध्या मुंबईत काही लोक उत्तर भारतीय लोकांना निशाणा करत आहेत. परंतु आम्ही सक्षम असून तक्रार करण्याआधीच अशा लोकांवर कारवाई करत आहोत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी मनसेला लगावला आहे. या वक्तव्यावरून मनसेने मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
मुख्यमंत्र्यांना भैय्या भूषण पुरस्कार…
आगामी काळात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना महाराष्ट्र भूषण नाही, तर भैय्या भूषण हा पुरस्कार नक्की मिळेल, अशी टीका मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
व्हीएस न्यूज - राहुल गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा येण्यापूर्वीच पक्षामध्ये विरोधी आवाज उमटू लागला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव शहजाद पूनावाला यांनी राहुल गांधींच्या अध्यक्षपदाच्या निवडीवर आक्षेप घेताना‘ते इलेक्टेड नव्हे, तर सिलेक्टेड अध्यक्ष’ होणार आहेत, असा आरोप केला आहे. शिवाय पक्षात घराणेशाही असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.
काँग्रेस अध्यक्षपदासाठी केवळ निवड होणार आहे. याला निवडणूक म्हणता येणार नाही. या निवडणुकीत मतदान करणा-या प्रतिनिधींचे मत आधीच फिक्स झाले आहे. राहुल यांना निवडून आणण्यासाठीच या प्रतिनिधींच्या ठराविक पदांवर नियुक्त्या झाल्या असल्याचा आरोप शहजाद पूनावाला यांनी केला. असे आरोप करण्यासाठी हिंमत लागते. या आरोपांनंतर माझ्यावर हल्ले होऊ शकतात. पण मी सत्य तेच बोलत आहे. पक्षामध्ये एका कुटुंबातील एकाच व्यक्तीला पद मिळायला हवे, असेही पुनावाला यांनी सांगितले.
राहुल गांधींवरील आरोपांमुळे पूनावाला भावंडांचे नाते मात्र अडचणीत आले आहे. शहजाद यांचे बंधू तहसीन यांनी आपल्या भावासोबतचे नाते तोडले आहे. शहजाद यांच्यावर तोफ डागताना राहुल यांच्यावर शहजाद यांनी केलेली टीका अत्यंत खेदजनक असल्याचे तहसीन पूनावाला यांनी म्हटले आहे. शहजादच्या आरोपांमुळे आपण व्यथित झाल्याचे तहसीन यांनी सांगितले. शिवाय आजपासून आपण शहजादशी भाऊ म्हणून असलेले नाते तोडत असल्याचेही त्यांनी ट्विटरवरुन जाहीर केले. तहसीन पूनावाला काँग्रेसचे समर्थक असून ते रॉबर्ट वाड्रा यांचे मेहुणेही आहेत.
दरम्यान, काँग्रेसने एक परिपत्रक प्रसिध्दीस दिले आहे. यात म्हटले आहे की, शहजाद पूनावाला मागच्या समितीत होते. यावेळी जी समिती स्थापना झाली आहे, त्यात ते नाहीत. इतकेच नाही तर यावेळी ते काँग्रेसचे सदस्यही बनलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे वक्तव्य गांभिर्याने घेऊ नये.
व्हीएस न्यूज - माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी नव्याने स्थापन केलेल्या ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्षा’ला निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. पक्षाची नोंदणी केल्याबाबतचे प्रमाणपत्र कालच प्राप्त झाले.
दरम्यान, पक्षाची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आता पक्षाचा अधिकृत ध्वजही लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले. काँग्रेसमुक्त झाल्यानंतर राणे यांनी ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली होती. त्याचवेळी त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पक्ष नोंदणीसाठी अर्जही सादर केला होता. पक्ष नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करून आयोगाने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाला मान्यता दिल्याचे पत्राद्वारे कळविले आहे.
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची स्थापना करताना राणे यांनी आपण लवकरच राज्याचा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र पक्ष नोंदणीची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांचे राज्यव्यापी दौरे सुरू झाले नव्हते. निवडणूक आयोगाकडे पक्षाची नोंदणी झाल्यानंतर लवकरच ध्वजही जाहीर केला जाणार असून त्यानंतर राणे आपला राज्याचा दौरा करणार आहेत. त्याचाच भाग म्हणून येत्या ८ ते १० डिसेंबर दरम्यान ते पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर जाणार आहेत. आता राज्यभरात दौरे, बैठका व सभा घेऊन सभासद नोंदणीचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
व्हीएस न्यूज - भारतीय चलनात असलेल्या एक रुपयाच्या नोटेला ३० नोव्हेंबर २०१७ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. चांदीचे नाणे ते कागदी नोट असा एक रुपयाच्या चलनाचा प्रवासही रंजक आहे.
भारतात ३० नोव्हेंबर १९१७ मध्ये चलनात आलेली एक रुपयाची नोट आजच्या चलनी नोटांच्या तुलनेत जरा साधीच वाटते. फिकट, पिवळसर रंगाच्या या नोटेचीही काही खास वैशिष्टय़े आहेत. इंग्लंडमध्ये छापण्यात आलेल्या या नोटांच्या दर्शनी बाजूला वर डाव्या कोप-यात इंग्लंडचे राजे जॉर्ज पंचम यांची प्रतिमा असलेल्या नाण्याचा छाप आहे. नोटेच्या याच बाजूला वरच्या उजव्या कोप-यात तसेच खालच्या डाव्या कोप-यात १ रुपी असे इंग्रजीत लिहिले आहे.
पहिल्या महायुद्धाचा तो काळ होता आणि भारतात इंग्रजांची सत्ता होती. त्यावेळी भारतात एक रुपयाचे नाणे चलनात होते. हे नाणे चांदीपासून बनविले जात होते. मात्र युद्धादरम्यान चांदीचे नाणे बनवणे परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे १९१७ मध्ये पहिल्यांदा एक रुपयाची नोट चलनात आणली गेली आणि या नोटेने चांदीच्या नाण्याची जागा घेतली.
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या वेबसाईटवरील माहितीनुसार, एक रुपयाच्या नोटेची छपाई पहिल्यांदा १९२६ मध्ये बंद करण्यात आली होती. कारण नोट छापण्याचा खर्च परवडत नव्हता. त्यानंतर १९४० मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली, जी १९९४ पर्यंत सुरू होती. त्यानंतर २०१५ मध्ये पुन्हा छपाई सुरु करण्यात आली.
गेल्या शंभर वर्षात एक रुपयाच्या १२५ वेगवेगळ्या नोटा चलनात आल्या. एकूण २८ वेळा या नोटांचे डिझाईन बदलले गेले. एक रुपयाचे मूल्य आज खूप जास्त नसले तरी रुपयाच्या नोटेचे महत्त्व मात्र कायम आहे. भारताच्या स्वातंत्र्यानंतर इंग्लंडच्या राजाऐवजी भारतीय राजमुद्रेला एक रुपयाच्या नोटेवर स्थान मिळाले. पण स्वातंत्र्य मिळाल्यावर जारी करण्यात आलेली एक रुपयाची नोट काही काळ पाकिस्तानातही चलनात होती.
केवळ एक रुपयाची नोटच भारत सरकार थेट चलनात आणते, तर बाकीच्या नोटा रिझर्व्ह बँकेमार्फत चलनात आणल्या जातात. त्यामुळे एक रुपयाच्या नोटेवर ‘भारत सरकार’ असा उल्लेख असतो आणि भारताच्या वित्त सचिवांची स्वाक्षरी असते. कायद्याच्या आधारे एक रुपयाची नोट ही ख-या अर्थाने ‘मुद्रा नोट’ (करन्सी नोट) आहे. इतर नोटा या ‘प्रॉमिसरी नोट’ असतात. प्रॉमिसरी नोटांवरुन केवळ नमूद रक्कम देण्याचे वचन दिले जाते.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002