व्हिएस न्यूज - सार्वत्रिक बदल्यांमध्ये मोक्याची तसेच मनासारखी नियुक्ती मिळावी, यासाठी आतापासूनच पोलीस अधिकाऱ्यांकडून मंत्री वा आमदारांच्या शिफारशी राज्याच्या पोलीस महासंचालक तसेच आयुक्तालय वा अधीक्षक कार्यालयाला पाठविल्या जातात. अशा शिफारशी यावेळी मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना महाग पडणार आहेत. अशा शिफारशी आलेल्या अधिकाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. तूर्तास या पोलिसांना १५ फेब्रुवारीपर्यंत आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली आहे.
मंत्री वा आमदारांची शिफारसपत्रे सादर करून हव्या त्या ठिकाणी नियुक्ती घेण्याची पद्धत पोलीस दलात नवी नाही. त्यामुळे सार्वत्रिक बदल्यांचा मोसम सुरू झाल्यानंतर अशा शिफारशींचा पाऊस महासंचालक, आयुक्त तसेच अधीक्षक कार्यालयात पडू लागतो. असा दबाव आणणे हे शिस्तभंगाच्या कारवाईत मोडत असल्याची बाब सामान्य प्रशासन विभागाने २९ डिसेंबर २०१७ च्या परित्रकाद्वारे स्पष्ट केलेली असतानाही अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी शिफारसपत्रे सादर केली आहेत वा अशी शिफारसपत्रे महासंचालक कार्यालयाला मिळाली आहे. विद्यमान पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनी मात्र अशा शिफारशी सादर झालेल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले आहे. या सर्व अधिकाऱ्यांची यादी तयार करून त्यांच्याविरुद्ध शिस्तभंगविषयक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. काही अधिकारी गृहखात्याकडेही अशा शिफारशी सादर करतात. गृहखात्याने अशा ४२ अधिकाऱ्यांची एक यादीही तयार केली आहे. या अधिकाऱ्यांकडून खुलासा मागविण्यात आला आहे. संबंधित शिफारसपत्राशी आपला काहीही संबंध नाही, असे त्यांना या खुलासाद्वारे स्पष्ट करावयाचे आहे.
नियुक्तीसाठी दबाव आणणे हे नागरी सेवाशर्ती कायद्याचे उल्लंघन आहे. अशा शिफारशी आणणाऱ्या अधिकाऱ्यांकडून खुलासा घेण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते.
– राजकुमार व्हटकर, विशेष पोलीस महानिरीक्षक (आस्थापना)
व्हिएस न्यूज – गारपिटीचा तडाखा बसल्याने विदर्भासह मराठवाड्यातील अनेक भागांतील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने तातडीने नुकसानीचे पंचनामे करावेत,या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले असून त्यांनी मंगळवारी सकाळी नागपूर-अमरावती मार्गावर रास्ता रोको केला. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही वेळ विस्कळीत झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: येऊन नुकसानीची पाहणी करावी अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली आहे. या आंदोलनात भाजपचे नाराज आमदार आशिष देशमुखही सहभागी झाले होते.
राज्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे ११ जिल्ह्यातील सुमारे ५० तालुक्यांमधील १०८६ गावांमधील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये गहू, हरभरा, ज्वारी,कांदा आणि रब्बी हंगामामधील फळ पिकांना मोठा फटका बसला आहे. सर्वाधिक फटका बुलडाणा, अमरावती आणि जालना जिल्ह्याला बसला आहे. कृषीमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी याबाबत माहिती दिली. शनिवारी आणि रविवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे विदर्भ,मराठवाडा तसेच उत्तर महाराष्ट्रातील काही भागात शेतीचे आणि काढणी झालेल्या मालाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत पंचनामा करण्याचे आदेश सोमवारीच कृषीमंत्र्यांनी दिले होते. या बाधित जिल्ह्यांमध्ये कृषी अधिका-यांनी क्षेत्रिय पाहणी केली. महसूल प्रशासन आणि कृषी अधिकारी यांनी राज्य शासनाला नुकसानीबाबत प्राथमिक अहवाल सादर केला आहे. बाधित ११ जिल्ह्यांमध्ये बीड, जालना, परभणी, जळगाव, बुलढाणा, अमरावती,अकोला, वाशिम, लातूर, उस्मानाबाद, हिंगोली यांचा समावेश आहे.
विदर्भात अमरावती, बुलडाण्याला फटका
तालुक्यातील २७० गावातील २६ हजार ५९८ हेक्टर क्षेत्रावरील संत्रा, हरभरा, गहू, कांदा, भाजीपाल्याचं नुकसान झालं आहे. अकोला जिल्ह्याती मुर्तीजापूर, बार्शी टाकळी,अकोला, अकोट, पातूर, बाळापूर आणि तेल्हार या सात तालुक्यातील १०१ गावांमधील ४ हजार ३६० हेक्टरवरील संत्रा, हरभरा, गहु, कांदा या पिकांचे नुकसान झालं आहे.
वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यातील ३६ गावांमधील ८ हजार ५०९ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले आहे. अशा पद्धतीने एकूण १०८६ गावातील १ लाख २४ हजार २९४ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दरम्यान, बाधित क्षेत्राच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. क्षेत्रिय स्तरावरुन पुढील दोन ते तीन दिवसात नुकसानीचा परिपूर्ण अहवाल प्राप्त होईल, अशी माहिती पांडुरंग फुंडकर यांनी दिली.
व्हिएस न्यूज – देशातल्या शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या अनुषंगाने सरकारने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. येत्या १९ आणि २० फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदी देशभरातील २५० तज्ज्ञांसोबत चर्चा करणार आहेत.
शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची घोषणा करुन मोदी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. अनेकदा या घोषणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यामुळेच आता सरकारकडून पावलं टाकण्यास सुरुवात झाल्याचं दिसतं आहे. त्यासाठी येत्या १९ व २० फेब्रुवारीला दिल्लीत या विषयावर देशभरातल्या २५० तज्ज्ञांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महामंथन करणार आहेत. दिल्लीतल्या पुसा इन्सिट्यूटमध्ये यावर शेतीशी संबंधित तज्ज्ञांची मतं ऐकून घेणार आहेत,अशी माहिती राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. या कार्यक्रमासाठी एकूण सात टीमची रचना करण्यात आली आहे. यात शेतीच्या उत्पादन ते विक्री या साखळीतल्या विविध विषयांवर फोकस ठेवून या टीम बनवल्या गेल्या आहेत. त्यातल्या एका टीमचं नेतृत्व पाशा पटेल करत असून, ते स्वत: पंतप्रधानांसमोर प्रेझेंटेशन सादर करणार आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासंदर्भातली ही महापरिषद बोलवायला इतका उशीर का झाला? यावर याची घोषणा झाल्यापासूनच, विविध स्तरांवर काम सुरु आहे. आता त्याला आणखी मूर्त स्वरुप देण्यासाठी ही परिषद असल्याचं पाशा पटेल यांनी सांगितलं.
व्हिएस न्यूज - पुण्यभूमी असा लौकिक असलेल्या नाशिक महापालिकेत मात्र देवदेवतांना नो एंट्री करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी काढलेल्या नव्या आदेशामुळे ही देवबंदी लागू करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेचा कारभार हाती घेताच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी देव-देवतांचे फोटो महापालिकेतून हटवण्याचे आदेश दिले आहेत.
तुकाराम मुंढे यांनी दिलेल्या आदेशानुसार विविध दालनांमध्ये,कक्षांमध्ये, कर्मचाऱ्याच्या टेबलवर असलेले देवदेवतांचे फोटो काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन करत तातडीने कर्मचाऱ्यांनी देवदेवतांचे फोटो हटवण्यास सुरुवात केली आहे. तसेच प्रसारमाध्यमांशी बोलण्यासही नकार दिला आहे. एवढेच नाही तर नाशिक महापालिकेत स्वच्छता असलीच पाहिजे असेही त्यांनी बजावले आहे.‘एबीपी माझा’ने या संदर्भातले वृत्त दिले आहे. शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी नाशिक महापालिकेत स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. देवांचे फोटो काढण्यामागे विचारांची स्वच्छता होणे हा उद्देश असल्याचे स्पष्टीकरण तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. मात्र तुकाराम मुंढे देवबंदीच्या निर्णयामुळे काय साधणार याची चर्चा सध्या नाशिक महापालिकेत सुरु झाली आहे.
व्हिएस न्यूज - बँकेतील एखादा घोटाळा समोर येणे हे आता म्हणावे तितके नवीन राहीले नाही. पण दिवसागणिक या घटनांमध्ये भर पडत असल्याचे पहायला मिळत आहे. नुकताच पंजाब नॅशनल बँकेतील एक मोठा घोटाळा समोर आला असून मुंबईतील बँकेच्या एका शाखेतून १.१३ लाख कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे समोर आले आहे. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला बँकेकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे. मात्र इतक्या जास्त रकमेचा व्यवहार नेमका कोणाकडून करण्यात आला आहे त्याबाबत मात्र अद्याप माहिती समोर आलेली नाही.
हे व्यवहार काही खातेधारकांच्या फायद्यासाठी कोणाकडून तरी मुद्दामहून करण्यात आल्याचे सकृतदर्शनी आढळले आहे. त्यानुसार इतर बँकांकडून आगाऊ रक्कम घेण्यात आल्याचे बँकेचे म्हणणे आहे. कर्जवितरणाच्या बाबतीत पंजाब नॅशनल बँक ही देशातली दुसऱ्या क्रमांकाची तर एकूण मालमत्तेच्या बाबतीत चौथ्या क्रमांकाची बँक आहे. या घोटाळ्याबाबत मुंबईतील बँकेचे अधिकारी म्हणाले, ”बँकेत अशाप्रकारे समोर येणारे व्यवहार हे गुंतागुंतीचे असतात, त्यामुळे या गोष्टीची योग्य ती चौकशी करुन मगच त्याबाबत कायदेशीर कारवाई करणे योग्य होईल. तसेच या व्यवहाराबाबतची संपूर्ण माहिती चौकशीनंतर समोर येईल, त्यामुळे त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही.”
याआधीही पंजाब नॅशनल बँकेमध्ये काही अनियमित व्यवहार झाल्याने त्यांची चौकशी झाली होती. यावेळी ज्वेलर्सचा व्यवसाय असणाऱ्या देशातील श्रीमंतांपैकी निरव मोदी यांची चौकशी करण्यात आली होती. यावेळी २८२ कोटींचा घोटाळा झाल्याचे समोर आले होते. त्याचप्रमाणे आताचा घोटाळा हा खूप जास्त रकमेच्या असल्याने बँकिंग क्षेत्रातील सर्वांसाठीच ही मोठी घटना असल्याचे म्हटले जात आहे. मात्र अद्याप या घोटाळ्यात कोणाचेही नाव समोर आलेले नाही. या वृत्ताचा थेट परिणाम शेअर बाजारात दिसून आला. बँकेच्या शेअरचा भाव बुधवारी जवळपास पाच टक्क्यांनी घसरला.
व्हिएस न्यूज – सुंजवान हल्ल्यावरील संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांच्या वक्तव्यानंतर पाकिस्तान जणू वेडापिसा झाला आहे. भारताचे आक्रमक वागणे, रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दात भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल,असा इशारा पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर यांनी दिला आहे.
निर्मला सीतारामन यांनी सुंजवान दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही. याची पाकिस्तानला मोठी किंमत मोजावी लागेल, असे म्हटले होते. पाकिस्तान सरकारने यावर मंगळवारी भारताला त्याच शब्दांत प्रत्युत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री खुर्रम दस्तगीर म्हणाले, भारताचे आक्रमक वागणे,रणनीतिक चूक किंवा कोणतीच चुकीची कारवाई सहन केली जाणार नाही. त्यांच शब्दांत भारताला त्यांच्या प्रत्येक कारवाईचे उत्तर दिले जाईल. अजूनही भारताच्या सर्जिकल स्ट्राईकची भीती पाकिस्तानमध्ये असल्यामुळे भारताने सर्जिकल स्ट्राईकची तयारी देखील करु नये. ११ वर्षांपूर्वी समझौता एक्सप्रेसमध्ये मारले गेलेल्या ४२ पाकिस्तानी नागरिकांना न्याय देण्यात भारत अपयशी ठरले.
भारताने आधी आपला गुप्तहेर कुलभूषण जाधव यांच्याबद्दल कोणत्याही पुराव्यांशिवाय पाकिस्तानवर आरोप करण्यापूर्वी बोलावे, असे यांचा मुद्दा उपस्थित करत ते म्हणाले,पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मद यांनी सुंजवान येथील दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. पण, या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारण्यास पाकिस्तानने नकार देत पूर्ण चौकशी केल्यानंतर भारताने पाकिस्तावर आरोप करावे, असेही ते पुढे म्हणाले.
व्हिएस न्यूज – मुंबई - अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनचा प्रवास साहसी ठरणार असून मुंबईतील ठाणे-विरार टप्प्यातून जाताना समुद्रातून २१ कि.मी. लांबीच्या बोगद्यातून या बुलेट ट्रेनचा प्रवास होणार आहे. मुंबई-अहमदाबाद हे ५०८ कि.मी.चे अंतर अगदी कमी काळात पार करणारी बुलेट ट्रेन ठाणे खाडीनजीक सागराखालील बोगद्यातून जाणार आहे.
या बोगद्यासाठी आवश्यक असणारी १५ दिवसांची स्टेसमिक रजिटिव्हीटी टेस्ट पुर्ण करण्यात आली असून, जपानला तसा अहवाल पाठविण्यात आलेला आहे. ही चाचणी ११ ते २४ डिसेंबर दरम्यान करण्यात आली आहे. १ लाख ८ हजार कोटी रुपये खर्च बुलेट ट्रेनसाठी अपेक्षित आहे. देशाच्या ७५ व्या स्वातंत्रदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट २०२२ रोजी मुंबई-अहमदाबाद मार्गावर धावणारी पहिली बुलेट ट्रेन धावणार आहे. येत्या जुन महिन्यापासून बुलेट ट्रेनसाठी आवश्यक असणारे सिव्हिल काम सुरु करण्यात येणार आहे. या गाडीचा वेग ताशी साडेतीनशे किलोमीटर असला तरी प्रत्यक्ष सरासरी वेग ताशी ३२० किलोमीटर असेल. ५०८ किलोमीटर अंतर ही गाडी दोन तासात कापणार आहे. सध्या दुरांतो एक्सप्रेस सात तासात हे अंतर कापते. मुंबई-अहमदाबाद रेल्वेचा बहुतांश मार्ग हा उन्नत असला तरी ठाणे खाडी ते विरार दरम्यान ही गाडी सागरी बोगद्यातून जाईल.
बुलेट ट्रेनची माहिती देण्यासाठी मॅग्नेट महाराष्ट्रामध्ये इ ५ सिरीजचे कोच दाखविण्यात येणार आहे. सध्याच्या घडीला जपानमधील संकेशनमधील बुलेट ट्रेनसाठी या प्रकारचे कोच चालविण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी जे टेंडर काढण्यात येणार आहे, त्यामध्ये २० टक्के जपानसाठी आरक्षित ठेवण्यात येणार आहे. तर उरलेल्या ८० टक्क्यामध्ये देशातील किंवा परदेशातील कोणत्याही कंपन्या सहभागी होऊ शकणार आहेत. बुलेट ट्रेनसाठी ठाणे जिल्ह्यातील जी जमीन आवश्यक आहे, त्यासाठी जमिन हस्तांतरणासाठीचा प्रस्ताव स्थानिक जिल्ह्याधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती राष्टीय हाई स्पीड रेल निगम लिमिटेडचे जनसंपर्क अधिकारी धनंजय कुमार यांनी दिली. बुलेट ट्रेनच्या एकुण मार्गात ८ बोगदे असणार आहेत. त्यामध्ये ठाण्यातील खाडीतून जाणारा बोगदा सर्वात मोठा असणार आहे. बुलेट ट्रेनसाठी एकुण २९ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता भासणार आहे. त्यापैकी २५ हजार कर्मचारी हंगामी तत्वावर असणार आहेत तर ४ हजार कायमस्वरुपी कर्मचाऱ्यांना रेल्वेच्या वडोदरा येथील रेल्वे विद्यापठात प्रशिक्षण देण्यात येणार आहे. बुलेट ट्रेनच्या मार्गात एकूण ४७ आरओबी असणार आहे. त्यापैकी २७ आरओबी राज्यात असणार आहेत.
व्हिएस न्यूज - गेल्या २५ वर्षांपासून द.आफ्रिकेचे दौरे करत असलेल्या आणि आत्तापर्यंत एकही सिरीज जिंकू न शकलेल्या टीम इंडियाने यंदा सहा सामन्याच्या एक दिवसीय मालिकेत ४-१ ने आघाडी घेत मालिका जिंकून नवा इतिहास रचला आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या पाचव्या वनडे मध्ये भारताने ७३ धावांनी सामना जिंकून ४-१ अशी आघाडी घेतली आहे. या विजयाचा शिल्पकार कप्तान विराट कोहली ठरलाच पण त्याला चायनामन कुलदीप आणि चहल या फिरकी गोलंदाजांनीही महत्वाची साथ दिली.
या विजयाने द.आफ्रिकेत मालिका जिंकणारा विराट पहिला कप्तान बनला तसेच वन डे मध्ये द.आफ्रिकेत ४०० पेक्षा अधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. डर्बन येथे झालेला सामना भारताने ६ विकेत्ने, सेंच्युरीयन येथील सामना ९ विकेटनी तर केपटाऊन येथील सामना १२४ रन्सनी जिंकून मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली होती. मात्र शनिवारी पावसाने व्यत्यय आणलेल्या सामन्यात द.आफ्रिकेने भारताला हरवून ३-१ अशी स्थिती केली होती. या मालिकेत कुलदीपने ५ सामन्यात १६ तर चहलने १४ विकेट घेतल्या आहेत. तर विराटने ५ सामन्यात ४२९ धावा फटकावताना दोन शतके व एक अर्धशतक ठोकले आहे.
व्हिएस न्यूज - वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहणारे नेते व माजी केंद्रीय मंत्री मणिशंकर अय्यर यांना पक्षातून बरखास्त करा, अशी मागणी एका काँग्रेस नेत्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. पाकिस्तानबाबत अय्यर यांनी केलेल्या ताज्या वक्तव्यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.
“मणिशंकर अय्यर यांनी अशा मुद्द्यांवर टिप्पणी करणे बंद करायला हवे. त्यांना यापूर्वीच निलंबित करण्यात आले आहे. त्यांनी आता गप्प राहायला हवे. भारतीय जनता पक्ष याचा फायदा घेऊ शकते. अय्यरना पक्षातून काढावे, यासाठी मी राहुल गांधींना पत्र लिहिणार आहे,” असे काँग्रेस नेते व्ही. हनुमंत राव यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले. हनुमंत राव हे तेलंगाणातील खासदार आहेत.
‘भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यानच्या मद्द्यांचा एकच मार्गच आहे – निरंतर आणि विना-अडथळा चर्चा. पाकिस्तानने या धोरणाचा स्वीकार केला आहे याचा मला अभिमान आहे. परंतु भारताने धोरण म्हणून त्याचा स्वीकार केलेला नाही, याचे दुःखही आहे. मी पाकिस्तानवर प्रेम करतो कारण मी भारतावर प्रेम करतो, ’ असे कराचीतील एका कार्यक्रमात भाषण करताना अय्यर म्हणाले होते.
व्हिएस न्यूज – २०१९ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी समविचारी पक्षांनी युती करणे गरजेचे आहे. भाजपला आव्हान द्यायचे असेल तर समविचारी पक्षांनी वज्रमूठ बांधणे गरजेचे असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नेतृत्वातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला समविचारी पक्षांच्या एकत्र येण्याने तगडे आव्हान निर्माण होईल आणि भाजपला पराभूत करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
पुढे ते म्हणाले की शेतकरी, मध्यमवर्गीय आणि तरुणाईमध्ये सद्यस्थितीत असंतोष खदखदत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेली आश्वासने पूर्ण केलेली नाही. हे सरकार लोकांच्या अपेक्षांवर खरे उतरू शकलेले नाही. मोदींना तरुणांना रोजगार देण्यात अपयश आले, असे पवार म्हणाले. आजच्या स्थितीनुसार संसदेत मोदी यांची स्थिती मजबूत आहे. अनेक राज्यात त्यांची सत्ता आहे. पण शेतीप्रधान समाज, मध्यमवर्गीय, अल्पसंख्याक, तरुण वर्ग या सरकारवर नाखूश आहे, असे शरद पवार म्हणाले.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002