व्हीएस न्यूज - कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन त्रुडो आठवड्याच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. परंतु, त्रुडो यांना भारत दौऱ्यात योग्य तो सन्मान मिळाला नसल्याचे वृत्त माध्यमांत येत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने स्पष्टीकरण देताना त्रुडो यांच्या दौऱ्यात शिष्टाचाराचे पालन करण्यात आल्याचे म्हटले आहे. सात दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले त्रुडो गुजरात दौऱ्यावर गेल्यानंतर त्यांच्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्हते. इतकेच काय तर विमानतळावर पंतप्रधान त्यांच्या स्वागतासाठीही आले नव्हते. याच सर्व घटनांचा मुद्दा बनवत कॅनडातील माध्यमांनी भारतविरोधात वृत्त प्रसिद्ध केले. एनएसजीमध्ये भारताच्या सदस्यत्वाचे समर्थन करणाऱ्या कॅनडाकडून उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचा भारताने खुलासा केला. दरम्यान, त्रुडो यांच्या दौऱ्यावरून नाराजी व्यक्त करणारे पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग हे बुधवारी त्यांची भेट घेतील.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, शिष्टाचार लक्षात घेता त्रुडो यांचे स्वागत एका राज्यमंत्र्याने केले होते. ते म्हणाले की, पंतप्रधान मोदी हे चीनचे राष्ट्राध्यक्ष शी झिनपिंग यांचेही स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले नव्हते. हे समजण्याची गरज आहे. एखाद्या पाहुण्याला घ्यायला जाणे किंवा त्यांना निरोप देण्यासाठी विमानतळावर जाणे हा एक खास क्षण असतो. हे काही पाहुण्यांपुरतेच मर्यादित राहिले आहे. मोदींनी आतापर्यंत अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, जपानचे पंतप्रधान शिंजो आबे, अबु धाबीचे राजकुमार मोहम्मद बिन जायद अल नहयान, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना आणि इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचेच स्वागत करण्यासाठी विमानतळावर गेले होते.
शनिवारी जेव्हा त्रुडो दिल्लीत पोहोचले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांनी ताजमहल पाहण्याचे नियोजन केले. त्यानंतर ते अहमदाबाद आणि मुंबईसाठी रवाना झाले. त्रुडो बुधवारी अमृतसरचा दौरा करतील. त्यानंतर शुक्रवारी ते दिल्लीला येतील. तिथे त्यांचे अधिकृतरित्या स्वागत होईल आणि पंतप्रधान मोदींबरोबर त्यांची बैठक होईल. भारत भ्रमण करत असलेल्या त्रुडो यांना इतर ठिकाणी जाण्यापूर्वी सर्वात प्रथम दिल्लीला येण्याचा सल्ला देण्यात आला होता. पण त्रुडो आणि त्यांच्या अधिकाऱ्यांनी स्वत:च अहमदाबादला जाण्याचे नियोजन केले होते. मोदींनी त्यांना अहमदाबादला जाण्याची परवानगीही दिली नव्हती. कॅनडातील माध्यमांनी पंतप्रधान मोदी हे झिनपिंग, आबे आणि नेतन्याहू यांच्या दौऱ्यावेळी स्वत: अहमदाबादला आले होते. पण त्रुडो यांच्यावेळी ते आले नसल्याचे अधोरेखित केले आहे.
व्हीएस न्यूज - नोटाबंदीच्या काळात नीरव मोदीकडून रोखीने हिर खरेदी करणारे देशातील ५० ख्यातनाम उद्योजक,बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटी आता आयकर विभागाच्या रडारवर आहेत. नीरव मोदीच्या कार्यालयांवरील छाप्यामुळे ही बाब समोर आली असून हे सर्व जण आता चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची चिन्हे आहेत.
पंजाब नॅशनल बँकेला सुमारे ११ हजार ४०० कोटी रुपयांचा गंडा घातल्याच्या प्रकरणात हिरे व्यापारी नीरव मोदी हा मुख्य सूत्रधार आहे. या प्रकरणी सीबीआय आणि ईडीने नीरव मोदीविरोधात गुन्हा दाखल करत चौकशीला सुरुवात केली आहे. नीरव मोदी कुटुंबीयांशी संबंधित २९ मालमत्ता आणि १०५ बँक खाती प्राप्तिकर खात्याने गोठवली असून त्याच्या घर व कार्यालयावरही छापा टाकण्यात आला. या छाप्यांमधून तपास यंत्रणांना काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याचे वृत्त ‘आज तक’ या वृत्तवाहिनीने दिले आहे. ‘देशातील ख्यातनाम उद्योजक, बॉलिवूडमधील कलाकार आणि सेलिब्रिटींनी नीरव मोदीकडून रोखीने हिरे खरेदी केले. हे सर्व व्यवहार नोटाबंदीच्या काळात झाले होते’, असे वृत्तात म्हटले आहे. आयकर विभागाने आता या सर्वांची चौकशी करण्याची तयारी सुरु केल्याचे सूत्रांकडून समजते.
दरम्यान, सोमवारी ईडीने नीरव मोदीच्या दक्षिण मुंबईतील वरळी येथील समुद्र महाल बंगल्यावर छापा टाकला. तसेच मुंबई, पुणे, औरंगाबाद, ठाणे, कोलकाता, दिल्ली, लखनौ, बेंगळुरु आणि सुरत या शहरांसह देशभरात ३४ ठिकाणी छापे घातले होते. तर पंजाब नॅशनल बँकेच्या फोर्ट शाखेला सीबीआयने सोमवारी टाळे ठोकले. बँकेतील अनेक व्यवहारांमध्ये आक्षेपार्ह बाबी आढळल्यानंतर सीबीआयने या बँकेला टाळे ठोकले. आता या शाखेतील कर्मचाऱ्यांना मंगळवारी सीबीआयने चौकशीसाठी कार्यालयात बोलावले आहे. या प्रकरणात सीबीआयने सोमवारी या शाखेतील तीन कर्मचाऱ्यांना अटकही केली होती. दुसरीकडे नीरव मोदीने बँकेला पत्र पाठवले असून मी बँकेला फक्त ५ हजार कोटी रुपयांचे देणे लागतो. बँकेने कर्जाची रक्कम वाढवून सांगितली असून बँकेने प्रसिद्धीमाध्यमांकडे वाच्यता केल्यामुळेच कर्जफेडीचे मार्ग बंद झाला आहे, असे त्याने बँकेला कळवले आहे.
व्हीएस न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज हे आमचा स्वाभिमान आहेत. भारतीय जनता पक्षासाठी महाराजांचे स्थान नेहमीच पूजनीय आहे. श्रीपाद छिंदम याने केलेले विधान आक्षेपार्ह असून त्या विधानाचा आणि भारतीय जनता पक्षाचा संबंध जोडणे बालिशपणाचे आहे. पक्षाने छिंदमला पदावरून बडतर्फ करीत पक्षातून तात्काळ बेदखल केले आहे, अशी वृत्ती समाजाला व पक्षाला घातक असून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खासदार साबळे यांनी केली.
अहमदनगरचे उपमहापौर श्रीपाद छिंदम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले. छिंदम हे भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी असल्यामुळे विरोधकांनी पक्षावर टीका केली होती. त्या पार्श्वभूमीवर खासदार साबळे यांनी पक्षाच्यावतीने आपली भूमिका मांडली.
व्हीएस न्यूज - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी सोमवारी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना लोकांनी बीफ खावे,एकमेकांना किस करावे, पण या सगळ्याचे उत्सव साजरे करण्याची काय गरज असल्याचा सवाल उपस्थित केला.
गेल्यावर्षी केंद्र सरकारने कत्तलीसाठी जनावरांच्या खरेदी-विक्रीवर बंदी घातली होती. विरोधकांकडून त्यानंतर भाजपवर मोठ्याप्रमाणावर टीका करण्यात आली होती. या निर्णयाचा अनेक राज्यांतील महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांनी बीफ पार्टीज आयोजित करून निषेध केला होता. नायडू यांनी त्यावेळी विरोधकांवर बीफ बंदीचे राजकारण करत असल्याचा आरोप केला होता.
मी स्वतः मांसाहारी असून, कुणी काय खावे, काय खाऊ नये, ही ज्याची-त्याची आवड आहे. प्रत्येक मुद्द्याला काही लोक राजकीय रंग देण्यासाठी काहीही बोलत सुटले आहेत, असे नायडूंनी म्हटले होते. मुंबईच्या पोद्दार महाविद्यालयात नायडू यांनी पुन्हा एकदा त्यानंतर आज बीफ बंदीच्या मुद्द्यावर भाष्य केले. ते विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हणाले की, तुम्हाला बीफ खायचे तर खा. त्यासाठी महोत्सव कसले आयोजित करता? त्याचप्रमाणे किस फेस्टिव्हलही कशाला? तुम्हाला जर एखाद्याला किस करायचे असेल तर फेस्टिव्हल अथवा कुणाच्या परवानगीची गरज का भासते? अफझल गुरुच्या नावाचा जप काही लोक करतात. हे काय सुरू आहे? त्याने संसद उडवून देण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात राहू द्या, असे नायडूंनी सांगितले.
व्हीएस न्यूज – २१ फेब्रुवारीला मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकट मुलाखत घेणार असून ही मुलाखत याआधी ३ जानेवारीला होणार होती. पण मुलाखतीचा कार्यक्रम कोरेगाव भीमा हिंसाचारामुळे रद्द करण्यात आला होता. या मुलाखतीची उत्सुकता राज ठाकरे आणि शरद पवार यांच्या समर्थकांसह संपुर्ण महाराष्ट्राला होती. या मुलाखतीला अखेर मुहूर्त मिळाला असून पुण्यात २१ फेब्रुवारीला संध्याकाळी ५ वाजता बीएमसीसी महाविद्यालयात ही मुलाखत होणार असल्याची माहिती राज ठाकरे यांनी स्वतः आपल्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन दिली आहे.
लोक नेहमीच आपल्या रोखठोक वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्द असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मुलाखती पाहण्यासाठी उत्सुक असतात. पण राज ठाकरेंना यावेळी वेगळ्या म्हणजेच मुलाखतकाराच्या भूमिकेत पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. त्यांच्यासमोर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार असणार आहेत. राज ठाकरे शरद पवारांची मुलाखत घेणार असल्याने ही मुलाखत रंगतदार होणार यात काही प्रश्न नाही. लोकांनाही या कार्यक्रमाची उत्सुकता लागून राहिली आहे.
०००००००
व्हीएस न्यूज – अस्मिता पुरुष छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिवादन केले. त्यांनी आपल्या ट्विटर खात्यावरुन एक व्हिडिओ पोस्ट केला. दृकश्राव्य स्वरुपाच्या व्हिडिओत पंतप्रधानांनी शिवरायांचा कार्यकर्त्तृत्वाचा गौरव केला तसेच यानिमित्ताने देशवासीयांना संदेशही दिला.
अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य राष्ट्रनिर्माणाची प्रयोगशाळा होती. सर्वधर्मसमभावाचे बीज शिवाजी महाराजांनी देशाच्या मातीत साडेतीनशे वर्षापूर्वी रोवले. कर्तृत्वशाली शिवाजी राजांसारखा राजा जन्माला येणे पुन्हा शक्य नाही. त्यामुळे कोट्यवधी भारतीयांना शिवाजी बनता नाही आले तरी चालेल. मात्र, त्यांनी देशकार्यासाठी ‘सेवाजी’ व्हावे असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले. दुसरीकडे शिवजयंतीनिमित्त काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले आहे. विशेष म्हणजे राहुल यांनी यावेळी मराठीतून ट्विट करत महाराजांना मानाचा मुजरा केला आहे. मराठीतून काँग्रेस अध्यक्षांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवाजी महाराजांचा फोटो ट्विट करत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त माझा मानाचा मुजरा असे राहुल यांनी ट्विट केले आहे. देशभरात आज शिवजयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाजी महाराजांचे वंशज खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी राजधानी दिल्लीमध्येही शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
व्हीएस न्यूज - एका गारपीटग्रस्त शेतकऱ्याने काटोल भाजपचे आमदार आशिष देशमुख यांच्या ठिय्या आंदोलनाच्या मंडपामागे आत्महत्या केली असून त्या आत्महत्या केलेल्या गारपीटग्रस्त शेतकऱ्याचे नाव दिलीप लोहे असे आहे.
काटोल शहरात दिलीप लोहे हे ऑटो चालवतात, त्यासोबतच ते ठेक्याने शेती करत असल्याचे गावकरी सांगतात. ते काटोल शेजारी लाडगावात ठेक्याने शेती घेवून लागवड करायचे. पण त्यांच्या पिकांचे नुकत्याच झालेल्या गारपीटीने मोठे नुकसान झाल्यामुळे तणावात असलेल्या दिलीप लोहे यांनी विष पिऊन आत्महत्या केल्यामुळे आता सरकारला जाग यावी म्हणून आज काटोलच्या व्यापाऱ्यांनी काटोल बंदची हाक दिली आहे.
१२ तारखेला नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या गारपीटीचा काटोल परिसरातील १२५ गावांना फटका बसला. संत्रा, मोसंबी, चना, गहू आणि भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्यामुळे आर्थिक संकटात सापडेलेले शेतकरी आता मरणाला जवळ करत आहेत. शनिवारी प्रल्हाद धोटे या शेतकऱ्याने आत्महत्या केली,तर रविवारी रात्री दिलीप लोहे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. सर्वात धक्कादायद म्हणजे सरकारी कार्यलय असलेल्या तहसील ऑफीसच्या परिसरात त्यांनी आत्महत्या केली.
व्हीएस न्यूज – दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात एक खास विक्रम भारतीय संघाचा यष्टीरक्षक महेंद्रसिह धोनीने केला असून धोनीने या सामन्यात खेळताना रिझा हेन्ड्रिक्सचा झेल घेऊन टी-२० मध्ये सर्वात जास्त झेल टिपण्याचा विक्रम आपल्या नावे केला.
टी-२० मध्ये २६२ डावात १३४ झेल यष्टीरक्षक म्हणून धोनीने टिपले आहेत. त्याने हा विक्रम करताना कुमार संगकाराचा १३३ झेलचा विक्रम मागे टाकला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक झेल घेणाऱ्या यष्टिरक्षकांमध्ये धोनी आणि संगकाराच्या पाठोपाठ १२३ झेलांसह भारताचाच यष्टीरक्षक दिनेश कार्तिक आहे.
व्हीएस न्यूज – मुंबई-पुण्यातील अघोरी शक्ती डी.एस.कुलकर्णींच्या बरबादीमागे असल्याचा आरोप शिवसेनेने केला असून मराठी उद्योगपतीच्या मागे विजय माल्ल्या, नीरव मोदी यांच्याबाबत एक शब्दही न काढणाऱ्या अघोरी शक्ती हात धुऊन लागल्या आहेत. आतापर्यंत डीएसकेंनी सचोटीने काम केले. त्यांनी माल्ल्या-मोदींप्रमाणे पळ न काढता ते देशातच राहिले. एका प्रतिष्ठित व प्रेरणादायी उद्योगपतीची ही धूळधाण क्लेशदायक असल्याचे म्हणत मोदी यांचे राज्य देशात आल्यापासून व नोटाबंदीचे तांडव सुरू झाल्यापासून आर्थिक मंदीची लाट उसळली आणि डीएसकेच नव्हे तर अनेक उद्योजक त्यात देशोधडीला लागल्याचे सांगत मोदी सरकारवरही टीकास्त्र डागले.
नोटाबंदीच डीएसकेंच्या अधोगतीस कारणीभूत असल्याचे सेनेने म्हटले. सेनेने डीएसकेंच्या माध्यमातून मोदी सरकारवर ‘सामना’या आपल्या मुखपत्रातून निशाणा साधला. डीएसके हे बांधकाम व्यवसायात प्रतिष्ठेचे नाव होते. पण आर्थिक मंदीची लाट नोटाबंदीच्या निर्णयानंतर उसळली. त्यांना त्यात प्रचंड नुकसान सहन करावे लागले. घराची विक्री मंदावली. ९ हजार १२४ कोटी रूपयांची डीएसके समूहाची एकूण मालमत्ता तर कर्ज १५०० कोटींचे आहे. पण त्यांची ही मालमत्ता विकली जाऊ नये व डीएसके पूर्ण बरबाद होऊन तुरूंगात जावेत यासाठी काही अघोरी शक्ती मुंबई-पुण्यात कार्यरत होत्या. हे अघोरी लोक फक्त मराठी लोकांच्या मागे लागले आहेत.
वर्षभरात सोळाशे किंवा सोळा हजार पटीने भाजप परिवारातील तरूण वर्गाची संपत्ती वाढते, त्यावर संशोधन नाही पण भ्रष्टाचारमुक्तीचा फणा डीएसके व इतरांच्या बाबतीत त्यांचा नागोबा काढतो, असे म्हणत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहांना नाव न घेता टोला लगावला.
००००००
व्हीएस न्यूज – रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारी यांनी अलाहाबाद बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, इंडियन ओव्हरसीज बँक आणि युनियन बँकेचे ८०० कोटी रुपयांचे कर्ज बुडवल्याप्रकरणी मौन सोडले असून अजूनही मी भारतातच आहे.कोणताही घोटाळा मी केला नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
भारतातील पाच बँकांकडून सुमारे ८०० कोटी रुपयांचे कर्ज रोटोमॅक पेनचे मालक विक्रम कोठारी यांनी घेतले आहे. पण त्यांनी अद्याप कर्जाची परतफेड केलेली नाही. त्यात कानपूरमधील रोटोमॅकचे मुख्यालय गेल्या आठवडाभरापासून बंद असल्यामुळे भारताबाहेर विक्रम कोठारी यांनी देखील पळ काढल्याची चर्चा सुरु झाली होती. पण विक्रम कोठारी यांनी रविवारी संध्याकाळी माध्यमांना एक पत्र पाठवत अजूनही भारतातच असल्याचे सांगितले. त्या पत्रात विक्रम कोठारी यांनी म्हटले आहे कि,कोणताही घोटाळा मी केलेला नाही. मी कर्ज घेतले होते. पण ते मी अजून फेडू शकलेलो नाही. त्याला बुडीत कर्ज बँकांनी म्हटले असून अजून मला डिफॉल्टर जाहीर केलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. हे सर्व प्रकरण न्यायप्रविष्ट असून मी कर्जाची परतफेड करणारच, असे देखील त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारवर पंजाब नॅशनल बँकेला ११ हजार कोटींचा गंडा घालून परदेशी पलायन करणारा हिरे व्यापारी नीरव मोदी प्रकरणावरुन टीकेची झोड उठवली आहे. राज ठाकरेंनी देशाचे रखवालदार बदलले तरीही परिस्थिती काही बदलली नाही, झोपा काढण्याचे काम आताचे रखवालदारही करत असल्यामुळे बँकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालून विजय मल्ल्या, नीरव मोदी सारखी माणसे देशाबाहेर पळून जात असल्याची, टीका केली आहे. राज ठाकरेंनी आपल्या फेसबुक अकाऊंटवर मोदी-जेटली जोडीवर टीका करणारे व्यंगचित्र टाकलेले आहे.
राज ठाकरे यांनी आपल्या व्यंगचित्रात मोदी आणि जेटली यांना रखवालदाराच्या वेशात एका बँकेबाहेरील बाकड्यावर बसून झोपा काढताना दाखवले आहे. तर माल्ल्या, मोदी सारखी माणसे याचा फायदा घेत पळून जाताना पाहून सामान्य माणूस काय विचार करत असेल हे देखील राज यांनी आपल्या व्यंगचित्रातून दाखवले आहे. राज यांच्या या व्यंगचित्राला सोशल मीडियावर नेहमीप्रमाणे चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
व्हीएस न्यूज - दरमहा ५० कोटी रुपये, याप्रमाणे परतफेड करून पै न पै चुकती करण्याची ताजी ऑफर पंजाब नॅशनल बँकेच्या ११,४०० कोटी रुपयांच्या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला आघाडीचा हिरे व्यापारी नीरव मोदी यांनी दिली आहे. मोदी सरकारने तडजोड करणे शक्य व्हावे, यासाठी या घोटाळ्यावर कोणतेही थेट भाष्य न करता, दोन हात दूर राहून बँका आणि तपासी यंत्रणांना हे प्रकरण हाताळू देण्याचा सावध पवित्रा घेतला आहे.
नीरव मोदीने दिलेल्या ‘ऑफर’चा मुद्दा सुनिल मेहता यांनी घेतलेल्या पहिल्या पत्रकार परिषदेतही निघाला होता. पण मेहता यांनी तो विषय ती ऑफर मोघम असल्याचे सांगून तेवढ्यावरच सोडला होता. पण त्यानंतर निरव मोदीने पंजाब नॅशनल बँक,प्राप्तिकर विभाग व ईडी यांना पाठविलेल्या ताज्या ई-मेलमध्ये दरमहा ५० कोटी रुपये याप्रमाणे परतफेड करण्याची ऑफर दिली आहे. यावर निरव मोदीची ही ताजी ऑफर स्वीकारणे कितपत शक्य आहे, यावर पंजाब नॅशनल बँक व अन्य बँकांचे वरिष्ठ अधिकारी अहोरात्र खल करत आहेत. ते त्यासाठी मेहुल चोकसी यांच्या गितांजली ग्रुपला वेगळे काढून फक्त निरव मोदीशी संबंधित कंपन्यांची देणी निश्चित करण्यात व्यग्र आहेत.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002