विराटला विश्रांती; रोहित शर्मा भारताचा नवीन कर्णधार
व्हीएस न्यूज - नागपूर कसोटीत श्रीलंकेवर मात केल्यानंतर बीसीसीआयच्या निवड समितीने श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वन-डे मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. गेले काही महिने सलग क्रिकेट खेळणाऱ्या भारताचा कर्णधार विराट कोहलीला वन-डे मालिकेसाठी विश्रांती देण्यात आलेली आहे. वन-डे मालिकेसाठी रोहित शर्मा भारताचं नेतृत्व करणार आहे. याचसोबत वन-डे मालिकेसाठी सिद्धार्थ कौलचा भारतीय संघात समावेश करण्यात आलेला आहे. विराट कोहलीला तिसऱ्या कसोटीत विश्रांती दिली जाईल अशी चर्चा होती, मात्र तिसऱ्या कसोटीसाठी विराट कोहलीच्या हाती संघाचे नेतृत्व देण्यात आलेलं आहे.
असा असेल श्रीलंकेविरुद्ध भारताचा वन-डे संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि सिद्धार्थ कौल.
तिसऱ्या कसोटीसाठी असा असेल भारताचा संघ –
विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, लोकेश राहुल, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), रविचंद्रन आश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा आणि विजय शंकर
व्हीएस न्यूज - भाजपचे खासदार वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीआधी वरुण गांधी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपचे खासदार असलेल्या वरुण गांधींनी याबद्दल अद्याप कोणतेही भाष्य केलेले नाही. मात्र गांधी घराण्यातील सर्व सदस्य लवकरच एकत्र येतील आणि हे २०१९ च्या निवडणुकीआधी घडेल, असे वृत्त ‘इंडिया टुडे’ने दिले आहे.
गांधी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येणार हे जवळपास निश्चित झाले आहे आणि लवकरच हे प्रत्यक्षात येईल, अशी माहिती काँग्रेस नेते हाजी मन्झूर अहमद यांनी ‘इंडिया टुडे’ला दिली. ‘वरुण गांधी लवकरच काँग्रेसमध्ये दाखल होतील. ३५ वर्षांनी गांधी कुटुंब एकत्र येणार असून यामध्ये प्रियांका गांधी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असेल,’ असेही अहमद यांनी सांगितले. भाजप खासदार वरुण गांधी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे चुलत बंधू आहेत. संजय गांधी यांचे सुपुत्र असलेल्या वरुण गांधी यांना भाजपमध्ये फारसे महत्त्व दिले जात नाही.
वरुण गांधी यांनी अनेकदा पक्षाच्या आणि सरकारच्या धोरणांवर टीका केली आहे. मात्र वरुण गांधी यांची आई मनेका गांधी या मोदी सरकारमध्ये मंत्री आहेत. वरुण गांधी यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर कधीही उघडपणे टीका केलेली नाही. त्यामुळे वरुण गांधी काँग्रेसवासी होऊ शकतात, असे मत उत्तर प्रदेश काँग्रेस समितीचे सदस्य राम टंडन यांनी व्यक्त केले. वरुण यांनी अनेकदा पक्षाविरोधात भूमिका घेतली आहे. त्यामुळे पक्षातून त्यांच्यावर टीकेची झोडही उठवण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वीच रोहिंग्या मुस्लिमांच्या मुद्द्यावरुन त्यांनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली होती. रोहिंग्यांच्या सुरक्षेची खातरजमा करुन त्यांना देशात आश्रय द्यावा, असे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या भूमिकेवर भाजपमधून जोरदार टीका झाली होती. ‘राष्ट्रीय हिताची काळजी असणारे लोक अशी विधाने करत नाही,’ अशा शब्दांमध्ये केंद्रीय मंत्री हंसराज अहिर यांनी वरुण गांधींच्या विधानाला उत्तर दिले होते. अहिर यांच्या टीकेला वरुण गांधींनी ट्विटरवरुन प्रत्युत्तर दिले होते. ‘रोहिंग्यांना आश्रय दिल्यास शरणार्थींबद्दलची भारताची भूमिका स्पष्ट होईल,’ असे वरुण यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
वरुण गांधी यांनी शेतकरी कर्जमाफी आणि त्यावरील राजकारणावरही टीका केली होती. कर्जमाफी दिल्यास आर्थिक शिस्त बिघडेल आणि कर्जाची परतफेड न करण्याची वृत्ती वाढेल. त्याचे विपरित परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होतील, असा धोक्याचा इशारा वरुण यांनी दिला होता. १९९० पासून घेण्यात आलेल्या कर्जमाफीच्या निर्णयांमुळे ग्रामीण भागातील पतपुरठ्यावर प्रतिकूल परिणाम झाल्याचे वरुण गांधी यांनी एका इंग्रजी दैनिकात लिहिलेल्या लेखात म्हटले होते. त्यांची ही भूमिकादेखील पक्षविरोधी होती.
‘पद्मावती’वरून सुप्रीम कोर्टाने केंद्राला फटकारले
व्हीएस न्यूज - सरकारमधील महत्त्वाच्या पदांवर असणाऱ्या व्यक्तींनी एखाद्या चित्रपटाला सेन्सॉर बोर्डाकडून मंजूरी मिळण्यापूर्वीच त्याविषयी वक्तव्य करणे अयोग्य असल्याचे सांगत सुप्रीम कोर्टाने मंगळवारी केंद्र सरकारला फटकारले. यावेळी न्यायालयाने पद्मावती चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यासंबंधीची याचिका फेटाळून लावत सेन्सॉर बोर्डाच्या कामात हस्तक्षेप करण्यास नकार दिला. यावेळी न्यायालयाने ‘पद्मावती’संदर्भात जाहीर मतप्रदर्शन करणाऱ्या सरकारमधील राजकीय नेत्यांना चांगलेच फैलावर घेतले. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी मंत्र्यांनी अशाप्रकारे वक्तव्य करणे हे सेन्सॉर बोर्डाच्या नियमांचे उल्लंघन ठरते. त्यामुळे सेन्सॉर बोर्डाच्या निर्णय प्रक्रियेवर दबाव येऊ शकतो, असे कोर्टाने सांगितले.
चित्रपटावर चर्चा होणे योग्य, पण चित्रपट न पाहताच नेत्यांनी यावर प्रतिक्रिया देणे चुकीचे आहे. चित्रपट प्रदर्शनासंदर्भातील निर्णय हे पूर्णपणे सेन्सॉर बोर्डाकडे असताना मंत्री त्याबाबत प्रतिक्रिया कशी देऊ शकतो, असा सवालही कोर्टाने केला. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘पद्मावती’ या चित्रपटाला राजपूत संघटनांचा तीव्र विरोध होत आहे. इतिहासाची मोडतोड करून चित्रपट निर्मिती केल्याचा त्यांचा आरोप आहे. प्रदर्शनाविरोधात वकील मनोहरलाल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेवर मंगळवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. यापूर्वीही ‘पद्मावती’विरोधात दाखल करण्यात आलेल्या याचिकांवर हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला होता.
करणी सेनेने अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि भन्साळी यांना धमक्याही दिल्या होत्या. तर दुसरीकडे राजपूत संघटनांबरोबरच काही राजकीय नेत्यांनीही या चित्रपटाला विरोध दर्शवला. सेन्सॉर बोर्डाने परवानगी दिल्यानंतरही चित्रपटावर बंदीचा निर्णय राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घेतला. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी तणाव निर्माण होऊ नये म्हणून त्यांच्या राज्यात ‘पद्मावती’वर बंदी घातल्याची प्रतिक्रिया सोमवारी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी दिली होती.
माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे प्रतिपादन
व्हीएस न्यूज – आर्थिकदृष्टय़ा सक्षम असतानाही आरक्षण मागणे ही माझ्या मते लाचारी आहे. मी स्वत: प्रतिकूल परिस्थितीत असताना आरक्षणाचा लाभ घेतला. परंतु सक्षम झाल्यावर मात्र स्वत:हून आरक्षण नाकारले. आता प्रत्येक जातीला आरक्षण हवे आहे. त्यामुळे ज्यांनी आधी आरक्षणाचा लाभ घेतला ते आता उच्चवर्णीय झाले की काय, असे वाटायला लागले आहे, असे प्रतिपादन भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केले आहे. मारवाडी फाऊंडेशनतर्फे दिला जाणारा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार ज्येष्ठ नाटककार प्रा. दत्ता भगत यांना शिंदे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला याप्रसंगी ते बोलत होते.
शंकर नगरातील साई सभागृहात रविवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती विकास सिरपूरकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर, काँग्रेसचे नेते सतीश चतुर्वेदी उपस्थित होते. शिंदे पुढे म्हणाले, दत्ता भगत हे केवळ एका व्यक्तीचे नाही तर विचाराचे नाव आहे. त्यांनी आपल्या नाटकांच्या माध्यमातून वैचारिक समाजजागृती केली. परंतु समाज आजही बदललेला दिसत नाही. बाबासाहेबांनी काळानुसार बदलायला सांगितले होते.
परंतु आजही काही लोक आधीच्या पिढीवर झालेल्या अन्याय-अत्याचाराचेच भांडवल करीत असतात. हे थांबले पाहिजे. ज्या व्यवसायामुळे आपली जात कळत असेल तो व्यवसायच सोडून दिला पाहिजे. दत्ता भगत हे नाटय़संमेलनाचे अध्यक्ष झाले. परंतु त्यांनी कधी त्यासाठी वशिला लावला नाही. साहित्य संमेलनात मात्र यासाठी भांडणे होत असतात.
नाटक हा माझ्याही आवडीचा विषय आहे. विद्यार्थीदशेत असताना मी नाटकात स्त्रीपात्र करायचो. राजकारणात तर नाटक ही कला जणू अनिवार्यच आहे, याकडेही त्यांनी मिश्कीलपणे लक्ष वेधले. संविधानदिनी दत्ता भगत यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा पुरस्कार मिळाल्याने विशेष आनंद झाला, अशी प्रतिक्रिया डॉ. यशवंत मनोहर यांनी व्यक्त केली. विकास सिरपूरकर म्हणाले, दत्ता भगत यांनी आपल्या नाटकातून आंबेडकरी विचारांची मांडणी केली. मारवाडी फाऊंडेशनने या पुरस्कारासाठी योग्य व्यक्तीची निवड केल्याचे त्यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - एनडीएमध्ये सामील झालेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे हे केवळ आमदारच नाही तर लवकरच ते मंत्री होतील, अशी ग्वाही भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी दिली. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा समावेश असेल असेही ते म्हणाले.
विधान परिषदेसाठी भाजपाचे उमेदवार प्रसाद लाड यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दानवे म्हणाले की, विधान परिषदेची ही जागा भाजपाच्या उमेदवारांनी लढवावी, असा कोअर कमिटीत निर्णय झाला. त्याबाबत नारायण राणे यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आहे. त्यावर त्यांचे समाधान झाले आहे.
नारायण राणे हे एनडीएत सामील झाले आहेत. आगामी काळात पक्ष नक्कीच त्यांच्याबाबत सकारात्मक भूमिका घेईल. ते आमदारच नव्हे, तर लवकरच मंत्री होतील. आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचा नक्कीच समावेश असेल,असेही दानवे म्हणाले.
भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांना देण्यात आलेल्या उमेदवारी बाबत बोलताना ते म्हणाले की, प्रदेश कोअर कमिटीच्या बैठकीत काही नावांची विधान परिषदेच्या उमेदवारी बाबत चर्चा झाली. त्यानंतर सर्व बाजूंनी विचार करून प्रसाद लाड यांचे नाव निश्चित करण्यात आले. ते केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला कळविण्यात आले. तिथून मान्यता मिळाल्यानंतर त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. लाड इतर पक्षातून आले असले तरी ते आता भाजपाचे आहेत. त्यामुळे त्यांना पाठबळ देणे हे पक्षाचे काम आहे, असेही दानवे म्हणाले.
व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या निवडणुकीत माझी उमेदवारी असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. शिवसेनेतच फूट पडली असती आणि त्यांच्या आमदारांनी मला मते दिली असती. माझ्या विरोधात तीन-तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष नारायण राणे यांनी सोमवारी व्यक्त केली. भाजपाची भूमिका पटल्यामुळेच आपण निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
विधान परिषद पोट निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपाच्या वतीने प्रसाद लाड यांची उमेदवारी जाहीर झाली. याबाबत प्रसार माध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, विधान परिषद पोटनिवडणुकीसंदर्भात भाजपची रणनीती मला पटल्यानेच मी निवडणूक लढवत नाही. माझ्या उमेदवारीला शिवसेनेच्या विरोधाचा कोणताही प्रश्न उपस्थित होत नाही, असेही राणे म्हणाले.
विधान परिषद निवडणूक न लढविण्याच्या आपल्या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले की, रविवारी रात्री मुख्यमंत्री आणि माझी ‘वर्षा’वर बैठक झाली. त्यावेळी भाजपची भूमिका त्यांनी मला सांगितली आणि मला ती पटली. त्यामुळे मी ही निवडणूक लढवत नाही. शिवसेनेमुळे मला उमेदवारी मिळाली नाही हे मला मान्य नाही. मला उमेदवारी मिळाली असती आणि शिवसेनेचा कितीही विरोध असता तरी १०० टक्के मीच निवडून आलो असतो. नारायण राणेंना विरोध करण्यासाठी तीन पक्ष एकत्र येतात हाच माझा विजय आहे, असेही राणे म्हणाले.
विधान परिषद निवडणुकीत राणे उमेदवार असतील तर तिन्ही पक्ष एकत्र येतील, असे माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले होते, त्यावर प्रतिक्रिया विचारली असता राणे म्हणाले की, पृथ्वीराज चव्हाण यांनी कधी आपल्या पक्षातल्या तरी एखाद्या आमदाराला प्रेमाने हाक मारली आहे का? असा प्रतिसवाल राणे यांनी केला.
शिवसेनेचा समाचार घेताना ते म्हणाले की, नारायण राणेंसारखे शिवसेनेत कार्यकर्ते होते म्हणून आज शिवसेना टिकली आहे. उध्दव ठाकरे हे आयत्या बिळावर नागोबा आहेत. जूनच्या आधी काहीही होऊ शकते. मी लवकरच आमदार होईन. मी मुख्यमंत्री राहिलोय, मला आमदारकीचे काय कौतुक आहे? असा सवाल करत माझा मुख्यमंत्र्यांवर विश्वास आहे, असेही राणे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज – लिंगबदल शस्त्रक्रियेसाठी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागणा-या महिला पोलीस कॉन्स्टेबलला महाराष्ट्र प्रशासकीय लवादाकडे दाद मागण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले. हे प्रकरण प्रशासकीय सेवेशी निगडित असल्याने याचिकाकर्त्यांनी थेट हायकोर्टात न येता आधी ‘मॅट’ मध्ये दाद मागणे अपेक्षित असल्याचे हायकोर्टाने स्पष्ट केले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठापुढे ही सुनावणी झाली.
बीड पोलीस अधीक्षक कार्यालयात काम करणा-या ललिता साळवेंनी लिंगबदल शस्त्रक्रियेकरता सुट्टी द्यावी, असा अर्ज केला. बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासह महाराष्ट्र पोलीसदलच नाही तर राज्याचे गृह विभागदेखील यासंदर्भात पुढे काय करायचे याचा विचार करत आहेत. कारण ललिताने मागणी लावून धरलीय की, ऑपरेशननंतरही पोलीस दलातील आपली नोकरी कायम राहावी. ललिता २३ जूनला मुंबईतील जेजे हॉस्पिटलमध्ये हार्मोन्स आणि शारीरिक चाचणी करता भरती झाली. २-३ तास चाचणी झाल्यानंतर जेजे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी या महिला पोलिसाला लिंग बदलण्यास हिरवा कंदील दाखवला.
त्यानंतर १७ सप्टेंबर २०१७ ला या महिला कॉन्स्टेबलने पोलीस अधीक्षक बीड यांना पत्र लिहून लिंग बदलाकरता सुट्टी पाहिजे, असा अर्ज केला. त्याची प्रत पोलीस महासंचालक सतीश माथूर यांनाही मेलद्वारे पाठवण्यात आली. पण, या महिला पोलिसाची महिला गटातून पोलीस दलात भरती झाली आहे, त्यामुळे लिंग बदलानंतर या महिलेला नोकरीला मुकावे लागेल असे पोलीस अधीक्षक कार्यालयातून सांगण्यात आले आहे. त्यानंतर तिने न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला होता.
२८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरदरम्यान मोहीम
व्हीएस न्यूज – भारतातले सुमारे २१७ अब्ज लोक फेसबुकवर आहेत. त्यामुळेच, १८ वर्षे वयाच्या नागरिकांना मतदार नोंदणी करायची आहे, हे आता निवडणूक आयोगातर्फे फेसबुकच्या माध्यमातून सांगितले जाणार आहे. या मोहिमेचा भाग म्हणून, २८ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर या काळात १८ वर्षे पूर्ण करणा-यांना वाढदिवसाच्या शुभेच्छांसोबतच न्यूज फीड रिमांइडर पाठवले जाईल आणि निवडणूक आयोगाकडे आपली नोंदणी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाईल. इतकेच नाही, याआधीच वयाची १८ वर्षे पूर्ण सर्व केलेल्या तरुण-तरुणींना ३० नोव्हेंबर रोजी नोंदणीची आठवण करून देण्यासाठी रिमांइडर पाठवले जाईल.
नव्याने मतदानासाठी पात्र ठरणा-या सर्व तरुण भारतीयांना हे मतदारनोंदणी रिमाइंडर पाठवले जाईल. हे रिमाइंडर इंग्रजीसह, हिंदी, गुजराती, तमिळ, तेलगु, मल्याळम, कन्नड, पंजाबी, बंगाली, उर्दू, आसामी, मराठी आणि उडिया आदी १३ भारतीय भाषांमध्ये असेल. ‘रजिस्टर नाऊ’वर क्लिक केल्यानंतर तुम्ही थेट National V’ters’ Services Portal इथे पोहोचाल आणि तिथे तुम्हाला नोंदणीसाठीच्या प्रकियेची माहिती दिली जाईल. भारतात पहिल्यांदाच नव्या मतदारांना ध्यानात घेऊन फेसबुकवर मतदार नोंदणी रिमाइंडरचा उपकम राबवण्यात येत आहे. भारतीय निवडणूक आयोगातर्फे १५ नोव्हेंबर रोजी पहिल्यांदाच मतदान करणा-या मतदारांच्या नोंदणीसाठी मोहीम जाहीर करण्यात आली आहे. आयोगाच्या या मोहिमेला हातभार लावण्यासाठीच फेसबुकवरील हा उपकम आखण्यात आला आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त आचल कुमार ज्योती म्हणाले, १ जानेवारी २०१८ रोजी १८ वर्षाचे होणा-या किंवा त्याआधीच १८ चे झालेल्या भारतातील सर्व तरुण पात्र आणि संभाव्य मतदारांची नोंदणी करण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने खास मोहीम सुरू केली आहे, ही घोषणा करताना मला फार आनंद होत आहे. निवडणूक आयोगाने माहितीचा प्रसार करण्यासाठी फेसबुकसोबत केलेल्या या भागीदारीमुळे भारतातील तरुण डिजिटल समुदायापर्यंत आमच्या ‘नो वोटर टू बी लेफ्ट बिहाइंड’ (कोणीही मतदार सुटता कामा नये) आणि ‘एव्हरी वोट काऊंट्स’ (प्रत्येक मत महत्त्वाचे आहे) या मोहिमा नेणे शक्य होणार आहेत.
भारत, दक्षिण आणि मध्य आशियाचे पॉलिटिक्स अॅण्ड गव्र्हर्न्मेंट आऊटरिच मॅनेजर नितीन सलुजा म्हणाले, स्वत:शी निगडित, जे जे काही आपल्याला ‘मॅटर करतंय’, त्या सर्व बाबतीतील माहिती मिळवणे, त्याबद्दल बोलणे, त्यात सहभागी होणे यासाठी लोक फेसबुक वापरतात. या पद्धतीच्या सामाजिक उपकमाला, निवडणुकीच्या दिवशीच नव्हे तर नेहमीच जोडून घेता येईल, अशी उत्पादने आम्ही तयार करू शकतो. या वर्षीच्या सुरुवातीपासून, भारतातील लाखो लोकांनी निवडणुकांच्या संदर्भात फेसबुकचा वापर केला आहे.
व्हीएस न्यूज - विधान परिषदेच्या होवू घातलेल्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक नारायण राणे उमेदवार असतील तर त्यांच्या विरोधात एकत्रितपणे लढण्याची घोषणा करणा-या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी शनिवारी एकमेकांची उणीदुणी काढत अख्ख्या महाराष्ट्राला हिडीस राजकारणाचे दर्शन घडविले.
काँग्रेस सोडताना नारायण राणे यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. त्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ७ डिसेंबर रोजी निवडणूक होत असून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत २७ नोव्हेंबर आहे. या निवडणुकीत नारायण राणे उमेदवार असतील तर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रितपणे निवडणूक लढविण्याची रणनीती आखली आहे. नारायण राणे यांनी उमेदवारी दाखल केली तर भाजपचे त्यांना समर्थन मिळण्याची शक्यता असल्याने शिवसेनेची पाचावर धारण बसली आहे. त्यामुळे केवळ राणेंना विरोध करण्यासाठी म्हणून भिन्न विचारधारेच्या या पक्षांची अभद्र युती होवू घातली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी एकिकडे एकत्र येणारी ही मंडळी शनिवारी पश्चिम महाराष्ट्राच्या दौ-यावर होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढत एकमेकांवर चांगलेच तोंडसुख घेतले. एकीकडे हे विधान परिषद निवडणुकीसाठी एकत्र येण्याची भाषा करतात आणि दुसरीकडे एकमेकांवर चौफेर हल्ला करतात हे पाहिल्यावर महाराष्ट्रातील राजकीय पातळी कमालीची घसरल्याचे पहायला मिळते. त्यावेळी शरद पवार यांनी मुख्यमंत्री आणि भाजपवरही टीकास्त्र सोडले. तर उध्दव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सत्तेतील मोठा भाऊ भाजप आणि मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका करून आपल्या संस्कृतीचे पुन्हा एकदा दर्शन घडविले आहे.
शिवसेनेचा पाय ‘फेव्हीकॉल’सारखा सत्तेला चिकटलेला- शरद पवार
शेतक-यांच्या हिताचा विचार होत नसेल तर आम्ही सत्तेवर लाथ मारु, असे उद्गार उद्धव ठाकरे यांनी काढले होते. त्याचा संदर्भ देत पवारांनी उध्दव ठाकरेंचा चांगलाच समाचार घेतला. तीन वर्षात शेतक-यांच्या हिताचा काहीच विचार झाला नाही. तरीही शिवसेनेचा पाय ‘फेव्हीकॉल’सारखा सत्तेत चिकटलेला असून तो बाहेरच निघत नाही, अशी टीका पवारांनी केली. उद्धव ठाकरे सत्तेत असूनही सरकार विरोधात बोलतात. सत्तेच जायचे आणि सत्तेला लाथा घालायच्या, हे आपण यापूर्वी पाहिले नाही. सत्तेत जावून, सत्तेचा पूर्ण लाभ घेत सत्तेच्या नावाने शंख कसा करायचा, याची एक नवी दिशा शिवसेनेने दाखवली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक करायला पाहिजे, असा टोलाही पवारांनी मारला. शेतक-यांचे हित होत नाही हे जगजाहीर असताना उध्दव ठाकरे कशासाठी सत्तेत आहेत? आमच्या मित्रांचे चिरंजीव आहेत त्यामुळे मी फार काय बोलत नाही, असेही पवार यावेळी म्हणाले.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य म्हणजे मोठा विनोद…
दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी पाहिलेले उज्ज्वल महाराष्ट्राचे स्वप्न यापूर्वीच्या राज्यकर्त्यांना पूर्ण करता आले नाही. ते स्वप्न आमचे सरकार पूर्ण करीत आहे, असे विधान मुख्यमंत्री फडणवीस यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थावर केल्याचे समजल्यानंतर पवार यांनी त्यांचाही समाचार घेतला. पवार म्हणाले, हा तर या वर्षातील सर्वात मोठा विनोद आहे. मुख्यमंत्री ज्या विचारधारेत वाढले आणि काम करीत आहेत, त्या विचारधारेचा यशवंतराव चव्हाणांना कधी स्पर्शही झाला नाही, ही त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे.
१५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर ६ हजार १५ कोटी कर्जमाफीची रक्कम जमा केल्याचे मुख्यमंत्र्यांनी शुक्रवारी सांगितले आहे. त्याबद्दल विचारले असता, यापूर्वीही दोनदा मुख्यमंत्र्यांनी असेच विधान केले होते. मात्र,कर्जमाफीचा फायदा शेतक-यांना झालेला नाही. त्यांचे विधान म्हणजे बोलाची कडी आणि बोलाचाच भात, असल्याची टीकाही पवार यांनी केली.
शिवसेना सत्तेतून बाहेर पडताच राष्ट्रवादी भाजपसोबत नांदायला जाईल : उद्धव ठाकरे
शरद पवार म्हणतात सत्तेत नांदता येत नसेल तर वेगळे व्हा, आम्ही वेगळे होताच हे भाजपासोबत नांदायला जातील, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या टीकेचा समाचार घेतला. मला माझ्या हक्काचे मंत्रिमंडळ हवे आहे. आता रडायचे नाही लढायचे. तुमची तयारी असेल, मी तुमच्यासोबत आहे, असे उद्धव म्हणाले. निवडणुकीच्या तोंडावर गुजरातमधील व्यापारी ‘जीएसटी’ कमी करून घेतात, तर मग महाराष्ट्रातील व्यापारी हे का करू शकत नाहीत?, तुम्ही दबलेले असतानाही तुम्ही गप्प का? अशी विचारणा करत तुमची सरकारविरोधात आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर येऊन मोर्चा काढण्याची तयारी असेल तर मी तुमच्यासोबत आहे, अशी ग्वाही देतानाच भाजपविरोधात रस्त्यावर उतरण्याची तयारी ठाकरे यांनी दर्शविली.
नवसाचे पोर उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे?
सरकार म्हणजे नवसाचे पोर असून ते उडाणटप्पू निघाल्यास काय बोलायचे? असा भाजपला टोला लगावत, ते पोर बिघडले म्हणून त्याला बोलण्याचे धाडस दाखवायचे का नाही? का नुसत्याच पेकाटात लाथा खायच्या असा सवालही ठाकरे यांनी केला.
दरम्यान, उद्धव ठाकरेंनी सरकारच्या जाहिरातबाजीवरही हल्लाबोल केला. मी खूप काही तरी करतोय असा आभास निर्माण करायचा आणि त्यावर जाहिराती करून भोळ्याभाबड्या जनतेला फसवायचे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्ला चढविला.
व्हीएस न्यूज - आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत देत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांनी संघटन अधिक मजबूत करा, कामाला लागा, असे निर्देश भाजप कार्यकर्त्यांना दिले आहेत. भाजपच्या मराठवाड्यातील पदाधिका-यांची आढावा बैठक दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. याप्रसंगी त्यांनी हे सूतोवाच केले.
प्रदेश सरचिटणीस, आमदार सुजितसिंह ठाकूर, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, गणेश हाके, आमदार अतुल सावे, प्रशांत बंब, माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड पाटील यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. व्यासपीठावर येताच प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी पदाधिका-यांना मोबाईल बंद करा, आपसात बोलू नका, अशी दमवजा सूचना केली. यानंतर त्यांनी जिल्हानिहाय पदाधिका-यांशी संवाद साधत कामाचा आढावा घेत अडीअडचणी समजून घेतल्या.
कार्यकर्त्यांनी संवाद साधताना प्रदेशाध्यक्ष दानवे यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होतील किंवा नाही, हे सांगता येत नाही, पण लोकसभा स्वबळावरच लढविल्या जातील, असे संकेत दानवे यांनी दिले आहेत. निवडणुका गांभीर्याने घेत त्यासाठी आतापासूनच कामाला लागा, संघटन बांधणीवर भर देत बूथ यंत्रणा अधिक सक्षम करा, असे निर्देश कार्यकर्त्यांना त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान, या बैठकीत प्रामुख्याने जिल्ह्यात संघटनात्मक पातळीवर झालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. बुथनिहाय रचना कशी झाली आहे, दिलेल्या कार्यक्रमानुसार पदाधिका-यांनी कामे केली आहेत किंवा नाहीत यावर अधिक भर देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
भाजप दबावाखाली येणारा पक्ष नाही…
नारायण राणे यांच्या राजीनाम्यामुळे विधान परिषदेची जागा रिक्त झाली आहे. त्यासाठी उमेदवार ठरविण्याबाबत शिवसेनेचा दबाव विचारात घ्यावा लागेल का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता दानवे यांनी भाजप हा कोणाच्या दबावाखाली येणारा पक्ष नाही. शिवसेनेला त्यांचा उमेदवार ठरविण्याचा अधिकार आहे. आमच्या पक्षाचे निर्णय कोणाच्या दबावाखाली होत नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
व्हीएस न्यूज – राज्यातील १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावाने मुंबईत पहिले जिल्हा भवन उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
वारणा विविध उद्योग समूह आणि शिक्षण संकुलातर्फे वारणानगर येथील इंजिनीअरिंग कॉलेजच्या मैदानावर रात्री वारणा परिवाराशी मुक्त संवाद ‘मुख्यमंत्री दिलखुलास’ प्रश्नोत्तर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात फडणवीस बोलत होते. या वेळी नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांना मुख्यमंत्र्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. सुमारे सव्वा तास संवाद चालला. व्यासपीठावर पालकमंत्री चंद्रकांत पाटील होते. या निमित्ताने वारणा परिसरात आकर्षक रोषणाई करण्यात आली होती.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ऊस उत्पादक शेतकरी प्रामाणिकपणे कर्ज परत करत असतो. त्यामुळेच ग्रामीण भागातील सोसायटय़ा टिकून आहेत. प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणा-या शेतक-यांना आम्ही प्रोत्साहन म्हणून २५ हजार रुपये देतो. या रकमेत निश्चितपणे वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मुळात कर्जमाफी ही योजना नाही तर अडचणीत सापडलेल्या शेतक-याला ती मदत आहे.
गेल्या वेळच्या कर्जमाफीत अनेक नेत्यांनी आपले हात धुऊन घेतले. तसा प्रकार होऊ नये आणि लोकांचा पैसा वाया जाऊ नये म्हणून अतिशय पारदर्शीपणे ही योजना राबविण्यासाठी आम्ही काही निकष लावले. त्यातून १५ लाख ४२ हजार शेतक-यांच्या खात्यावर आजच साडेसहा हजार कोटी रुपये जमा केले आहेत, असेही ते म्हणाले.
शिक्षकांच्या बदल्या मेमध्येच करण्यात येतील. विद्यार्थ्यांची संख्या अधिक असेल, तेथे एसटी बस उपलब्ध करून दिल्या जातील. माथाडी कामगारांच्या घरांसाठी जागा उपलब्ध करून दिली जाईल, असेही फडणवीस सांगितले.
कर्जमाफी योजनेतील महाराजांचे नाव बदलण्याची मागणी
शेतकरी कर्जमाफी योजनेला दिलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदलावे आणि त्यांचा अपमान थांबवावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली. यासंदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांंनी कऱ्हाडच्या विमानतळावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले.
मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवापासून कोल्हापूर दौ-यावर आहेत. दौ-यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांना कर्जमाफी प्रकरणी फसवणूक केल्याचा आरोप करत शेतकरी कृती समितीने काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्पूर्वीच पोलिसानी त्यांना ताब्यात घेतले.
धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे व्यक्त केली खंत
व्हीएस न्यूज - व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यांनी, सामांन्यांची बाजू घेऊन त्यांचे प्रश्न वेशिवर टांगण्याचा प्रयत्न करणाऱ्याच, संघटनांच्या माध्यमातून आपले प्रश्न मांडणाऱ्या राज्यातील काही पत्रकारांवर सरकारचे पोलीस खाते पाळत ठेऊन असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी या संदर्भात थेट मुख्यमंत्र्यांनाच पत्र लिहून पत्रकारांवर पाळत ठेवण्याच्या प्रकाराबद्दल चिंता आणि संताप व्यक्त केला आहे.
मराठी पत्रकार परिषद पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने देखील या संदर्भात चिंता व्यक्त केली आहे. पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम. देशमुख यांनी पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला आहे. मात्र, अशा कोणत्याही दडपशाहीला मिडिया भीक घालणार नाही, असेही त्यांनी एका पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे.
धनजंय मुंडे यांनी दोन पानी सविस्तर पत्रात जय महाराष्ट्रचे पत्रकार मंगेश चिवटे आणि फ्री प्रेस जर्नलचे पत्रकार विवेक भावसार यांची उदाहरणे दिली आहेत.मंगेश चिवटे करमाळा-टेंभुर्णी रस्त्याच्या दुरावस्थेबद्दल आवाज उठवित होते. त्यांनी ग्रामस्थांच्या मदतीने यासंदर्भात काही आंदोलने देखील केली होती. त्यांना यासंदर्भातली जाब विचारणारा दुरध्वनी 24 तारखेला आला. सदरचा दुरध्वनी 0217-2317044 या क्रमांकावरून आल्याचे मंगेश चिवटे यांनी आपल्या फेसबुक वॉलवर नमुद केलेले आहे. तसेच, एशियन एज विवेक भावसार यांनाही सतिश मांगले आणि मनिषा मोपलवार यांच्या संदर्भात छापलेल्या एका बातमीबाबत जाब विचारणारा धुरध्वनी ठाणे क्राईम ब्रांच मधून आल्याचे भावसार याचं म्हणणं आहे. भावसार यांचे फोन टॅप होत असावेत असाही त्यांना संशय आहे. दोन्ही प्रकरणांची चौकशी व्हावी, अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
राज्यातील इतरही विशेषतः सरकारच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या पत्रकारांवर पोलिसांची पाळत असल्याचे समोर येत आहे. पत्रकारांच्या समाजमाध्यमांवरील पोस्ट, त्यांच्या वृतांकनाच्या कृती, त्यांचा समाजातील वावर, त्यांच्या हालचाली, त्यांचे कार्यक्रम, त्यांची आंदोलन आदी गोष्टी देखील पोलिसांच्या रडारवर आहेत. जे पत्रकार राज्यातील भोंगळ कारभाराची लक्तरे वेशिवर टांगत आहेत, अशा पत्रकारांवर विविध प्रकरणात अडकवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात आहेत. नागपूर जिल्ह्यातील एका पत्रकारावर वृत्तसंकलानासाठी गेला असता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पत्रकारांमध्ये मोठी अस्वस्थतः आहे. जे पत्रकार राज्य सरकारच्या विरोधात भूमिका घेतात. अशा पत्रकारांच्या मालकावर दबाव आणून त्यांना नोकरीचे राजीनामे द्यायला भाग पाडले जात आहे. अलिकडंच एका मोठया मराठी वाहिनीच्या संपादकाला अशाच पध्दतीनं जावं लागलं आहे. या घटना पत्रकारांच्या अभिव्यक्ती आणि लेखन स्वातंत्र्याच्या संकोच करणाऱ्या असल्याने मुख्यमंत्र्यांनी तातडीने यामध्ये लक्ष घालून पत्रकारांना मुक्तपणे आपले काम करता येईल, असे वातावरण तयार करावे असे आवाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002