व्हीएस न्यूज – केंद्रातील मोदी स्वत:च्या फायद्यासाठी मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयकाचा वापर करत असल्याचा आरोप जमियत उलेमा-ए-हिंदचे सरचिटणीस मौलाना मेहमूद मदनी यांनी केला आहे. तसेच मुख्य विषयापासून देशातील नागरिकांचे लक्ष्य वळविण्यासाठी सरकारने विधेयकाचा घाट घातल्याचे त्यांनी म्हटले आहे.
राज्यसभेत मुस्लिम महिला (विवाह संरक्षण हक्क) विधेयक मांडल्यानंतर प्रचंड गदारोळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मदनी यांनी त्या पार्श्वभूमीवर माध्यमांसमोर हा आरोप केला आहे. ट्रीपल तलाकच्या घटनांचे प्रमाण अत्यल्प आहे. केवळ स्वत:चे हित साधण्याकरता सरकार विधेयकाचा वापर करत असल्यामुळे त्याचा मुस्लिम महिलांना विशेष फायदा होणार नाही. तसेच याकरिता केवळ कायदेशीर पातळीवर केलेल्या बदलाने प्रश्न सुटणार नाहीत. तर त्यासाठी सामाजिक परिवर्तनाची गरज असल्याचे मौलाना मेहमूद मदनी यांनी म्हटले आहे. ट्रीपल तलाक कायदा संमत करणे योग्य निर्णय आहे. पण, संमत करण्यामागचा सरकारचा उद्देश योग्य नसल्याचा आरोप मदनी यांनी यावेळी बोलताना केला.
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वंयसेवक संघानेच (आरएसएस) भारतातील लोकांना संविधान, लोकशाही आणि सैन्यदलानंतर सुरक्षित ठेवल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती के.टी.थॉमस यांनी व्यक्त केले आहे. धर्मनिरपेक्षतेचा विचार धर्मापासून दूर ठेवला जाऊ नये, असेही ते म्हणाले. केरळमधील कोट्टयम येथे आरएसएसच्या प्रशिक्षण शिबिरात ३१ डिसेंबर रोजी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. मला जर आणीबाणीपासून सुटका करण्याचे श्रेय कोणा एका संस्थेला द्यावयाचे म्हटले तर मी ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला देईन, असे सांगत आपल्या स्वंयसेवकांमध्ये राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी संघ शिस्तबद्धता शिकवते.
पुढे ते म्हणाले, आपल्यावर साप विषाचा उपयोग होणाऱ्या हल्ल्याविरोधात हत्यार म्हणून करतात. पण एखाद्यावर हल्ला करण्यासाठी मानवाची शक्ती तयार केलेली नाही. मी आरएसएसचे कौतुक शारीरिक शक्तिचा अर्थ हल्ल्यांपासून स्वत:ला वाचवणे असा आहे. असे सांगण्यासाठी आणि विश्वास निर्माण करण्यासाठी करतो. एखाद्या हल्ल्यावेळी देश आणि समाजाचे रक्षण करण्यासाठी आरएसएसचे शारीरिक प्रशिक्षण असते, असे मला वाटते.
मला कोणी जर विचारले की, भारतात लोक सुरक्षित आहेत का?, तर मी सांगेन की, देशात एक संविधान आहे, लोकशाही आहे, सैन्यदल आहे आणि चौथा संघ आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही आणीबाणीविरोधात आरएसएसच्या मजबूत आणि संघटीत कार्याची चाहूल लागली होती. तेव्हाच त्यांना समजले होते की, आणीबाणीचे प्रकरण जास्त दिवस चालू शकणार नाही, असे त्यांनी यावेळी सांगितले.
व्हीएस न्यूज - भीमा-कोरेगाव हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आज महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली आहे. या बंदचा परिणाम सामान्य जनजीवनावर झाला आहे. अनेक शाळा आणि कार्यालयांनीही बंदचा त्रास होऊ नये म्हणून सुट्ट्या दिल्या आहेत. आज विधी आणि इंजिनियरींगबरोबरच एकूण १३ अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. परंतु बंदमुळे त्या रद्द केल्या जाणार नाहीत असे विद्यापीठाकडून कळवण्यात आले आहे. मुंबईमध्ये बंदमुळे वाहतूक संथ गतीने सुरु आहे. काही मार्गांवर रेल्वे अडवल्याने रेल्वेच्या नियमित वेळापत्रकापेक्षा रेल्वे उशीराने धावत आहेत. तर दुसरीकडे आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने तेथील वाहतूकही थंडावली असल्याचे चित्र आहे.
शहरात अशाप्रकारचे वातावरण असताना परीक्षा होणार की नाही याबाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र परीक्षा नियोजित वेळेतच होईल असे विद्यापीठाकडून सांगण्यात आले आहे. मात्र यामध्ये विद्यार्थ्यांना थोडी सूट दिली जाणार असल्याचेही विद्यापीठ प्रशासनाने सांगितले आहे. परीक्षेच्या वेळेपेक्षा एक तास उशीरा आले तरीही विद्यार्थ्यांना पेपर देता येईल. त्यामुळे ज्यांचे पेपर सकाळी ११ ला आहेत त्यांनी १२ पर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचले तरी चालेल, तर ज्या विद्यार्थ्यांचा पेपर दुपारी ३ वाजता आहे ते विद्यार्थी ४ वाजेपर्यंत पोहोचले तरी चालणार आहे. त्यामुळे काहीसा उशीर झाला तरीही वेळेची मुभा देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी परीक्षा द्यावी असेही विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.
व्हीएस न्यूज - २०१७सालातील सर्वोत्तम एकदिवसीय संघाची घोषणा क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली असून विशेष म्हणजे या संघामध्ये ऑस्ट्रेलियाच्या कोणत्याही खेळाडुला स्थान मिळालेले नाही.
या एकदिवसीय संघामध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेच्या २ आणि इंग्लंडच्या ३ खेळाडूंना स्थान दिले आहे. या संघात पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानमधील १-१ खेळाडूला स्थान मिळाले असून भारतीय क्रिकेट संघातील रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पंड्याचा या संघात समावेश करण्यात आला आहे.
संघाचा कर्णधार विराट कोहलीला बनवण्यात आला आहे. २०१७ मध्ये २६ पैकी १९ सामन्यांमध्ये कोहलीने विजय मिळवला आहे. सलामीवीर म्हणून रोहित शर्मा आणि क्विंटन डी. कॉकला निवडण्यात आले आहे. २०१७ मध्ये सर्वाधिक एकदिवसीय धावा करणारा रोहित शर्मा दुसरा खेळाडू आहे. त्याने ६ शतक आणि पाच अर्धशतकांसह १२९३ धावा केल्या.
असा आहे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय संघ – रोहित शर्मा (भारत), क्विंटन डी कॉक (द अफ्रिका), विराट कोहली (कर्णधार, भारत), जो रूट (इंग्लंड), एबी डिव्हिलियर्स (द आफ्रिका), बेन स्टोक्स (इंग्लंड), हार्दिक पंड्या (भारत), लियाम प्लंकेट (इंग्लंड), ट्रेंट बोल्ट (न्यूझीलंड), हसन अली (पाकिस्तान), रशीद खान (अफगाणिस्तान).
व्हीएस न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षांकडून लक्ष्य करण्यात येत आहे. संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख डॉ. मनमोहन वैद्य यांनी या पार्श्वभूमीवर एका निवेदनाद्वारे संघटनेची भूमिका मांडली. काही घटक समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींना बळी पडू नका, शांतता राखा, असे आवाहन त्यांनी केले.
भीमा कोरेगावाचा हिंसाचार आणि त्यानंतर मुंबई, पुण्यासह त्याचे राज्यभरात उमटलेले पडसाद ही खूप दु:खद बाब आहे. जो काही प्रकार भीमा कोरेगावमध्ये घडला तो निंदाजनक असून याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तीव्र निषेध करत असल्याचे वैद्य यांनी सांगितले. यात जे दोषी आढळतील त्यांना कायद्यानुसार शिक्षा झाली पाहिजे. समाजात काही घटक जाणीवपूर्वक द्वेष आणि वैरभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा शक्तींच्या सुप्त हेतूंना लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले. विरोधी पक्षांकडून संघ आणि भाजपला भीमा कोरेगाव घटनेच्या पार्श्वभूमीवर मंगळवारपासून लक्ष्य केले जात आहे. कोरेगाव येथील ‘विजय दिवस’ देशविरोधी ठरवत त्याबद्दल उजव्या विचारसरणीच्या संघटनांनी आक्षेप घेतला होता. संघ आणि भाजपनेच या हिंसाचाराला खतपाणी घातल्याचा आरोप काँग्रेससह अन्य विरोधी पक्षांकडून या पार्श्वभूमीवर केला जात आहे.
व्हीएस न्यूज – भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भीमा कोरेगाव परिसरात झालेल्या दगडफेकीच्या प्रकरणानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. बंदला राजधानी मुंबईसह राज्यभरातील प्रमुख शहरात सुरुवात झाली असून आंदोलकांनी ठाण्यात रेल्वे स्थानकामध्ये ट्रॅकवर उतरून सुमारे १० मिनिटे लोकल रोखून धरली. तसेच मुंबईच्या चेंबुर नाका परिसरात स्कूल बसची तोडफोड करण्यात आल्याने तणावपूर्ण शांतता आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी बंद शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले आहे. या बंदला महाराष्ट्र लोकशाही आघाडी, डावी लोकशाही आघाडी, संभाजी ब्रिगेड यांसह अडीचशेहून आधिक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दर्शविला आहे. दरम्यान वाहतुकीचा खोळंबा होणार असल्याने डबेवाल्यांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतही भिमा-कोरेगाव घटनेच्या पडसादानंतर बंद पुकारण्यात आला आहे. वाहतुकीचा खोळंबा होणार झाल्याने जेवणाचे डबे चाकरमान्यांना वेळेवर कार्यालयात पोहोचू शकत नाहीत. त्यामुळे डब्यांचा काही उपयोग होत नाही, त्यामुळे आज मुंबईत जेवणाचे डबे पोहोचविण्याची सेवा बंद ठेवण्यात आली आहे.
व्हीएस न्यूज – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भीमा-कोरेगाव हिसांचाराच्या घटनेमागे राजकीय षड्यंत्र असून त्यामुळेच उर्वरित महाराष्ट्रात याचे पडसाद उमटले असल्याचा आरोप केला आहे. आज महाराष्ट्र जातीय रेषेमध्ये विभागला जात असून या सर्वामागे एक राजकीय षड्यंत्र असून असे जातीवरून राजकारण यापूर्वीच्या नेत्यांनी केले नसल्याचेही राऊत म्हणाले.
राऊत म्हणाले, महाराष्ट्रातील हा हिंसाचार धक्कादायक आणि सर्वासाठीच ही चिंतेचे बाब असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकरणी अपराध्यांचा शोध घेण्याची गरज असल्याचेही ते म्हणाले. तसेच काही अदृश्य हात या घटनांमागे आहेत जे याचा राजकीय स्वार्थासाठी महाराष्ट्राला उद्ध्वस्त करू इच्छितात आणि हे कोण आहेत, यांचा शोध घेणे पंतप्रधानांचे कर्तव्य असल्याचे ही ते म्हणाले. कोरेगाव भीमा येथील विजय दिनाच्या कार्यक्रमानंतर झालेल्या हिंसाचार प्रकरणी राज्यभरात तीव्र पडसाद उमटत आहे.
व्हीएस न्यूज – संघ आणि भाजप दलितविरोधी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी केले होते. गृहराज्य मंत्री हंसराज अहिर यांनी त्यावर प्रत्युत्तर देत कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी परिस्थितीची पूर्ण माहिती घ्यावी, असे म्हटले आहे.
कोणतेही वक्तव्य करण्यापूर्वी लोकांना घटनास्थळाची संपूर्ण परिस्थिती माहीत असावी. लोकांना शांतता राखण्याचे आवाहन करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश दिलेले आहेत, असे गृहराज्य मंत्री हंसराज अहिर म्हणाले.
भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी राहुल गांधी यांनी भाजप आणि संघाला जबाबदार ठरवले. तसेच दलितविरोधी संघ आणि भाजप असल्याचे गांधी यांनी मंगळवारी म्हटले. संघ आणि भाजपची दलित हे सगळ्यात खालच्या स्तरावर समाजात राहिले पाहिजेत, ही विचारसरणी आहे. उना येथे दलितांना झालेली मारहाण, रोहित वेमुलाची आत्महत्या आणि आता भीमा कोरेगावची घटना या तीन घटना त्याची उदाहरणे आहेत, अशी टीका राहुल गांधी यांनी ट्विटरद्वारे केली होती.
व्हीएस न्यूज – महाराष्ट्रासह देशभर भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणाचे पडसाद उमटले असून भीमा कोरेगावच्या घटनेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपला काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी जबाबदार धरले आहे. तर महाराष्ट्र सरकारवर बहुजन समाजवादी पक्षाच्या अध्यक्षा मायावतींनी टीका केली आहे.
भीमा कोरेगाव हिंसाचार रोखता आला असता. सुरक्षेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना महाराष्ट्र सरकारने करायला हव्या होत्या. भाजपचे सरकार महाराष्ट्रात आहे. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि जातीवादी संघटनांचा या हिंसाचारामागे हात असल्याचे मायावतींनी म्हटले आहे. सोमवारी घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002