व्हीएस न्यूज – बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधु हिने ‘कौन बनेगा करोडपती’ या लोकप्रिय कार्यक्रमातून जिंकलेले बक्षीसाचे २५ लाख रुपये एका कर्करोग रुग्णालयाला दान केले आहेत. कर्करोग पीडित रुग्णांना ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्य पदक पटकावणाऱ्या आणि पद्मश्री, राजीव गांधी खेलरत्न आणि अर्जून पुरस्काराने सन्मानित असलेल्या सिंधुची देणगी जीवदान ठरू शकते. ‘कोन बनेगा करोडपती’मध्ये तिने यंदा २५ लाख रुपये जिंकले होते.
तेलुगु अभिनेता तथा बस्वतरकम इंडो अमेरिका कर्करोग रुग्णालय आणि संशोधन संस्थेचे अध्यक्ष एन. बालाकृष्णन याच्याकडे सिंधुने २५ लाख रुपयांचा धनादेश सुपुर्द केला. ज्येष्ठ कलाकार तथा तेलुगु देसम पक्षाचे संस्थापक एन.टी. रामाराव यांचा एन. बालाकृष्णन हा मुलगा आहे. बालाकृष्णनने सिंधुच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. सिंधुचा निर्णय कर्करोग विरोधात लढण्यासाठी इतरांना प्रेरणा देणारा ठरणार आहे, असेही त्याने म्हटले.
व्हीएस न्यूज – देशवासीयांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी लोहरी सणाच्या शुभेच्छा दिल्या असून त्यांनी लोहरी सणामुळे प्रत्येकाच्या जीवनात आनंद, समृद्धता आणि निरोगी आयुष्य लाभो अशा शब्दांत शुभेच्छा दिल्या आहेत.
व्हीएस न्यूज - सर्वोच्च न्यायालयाच्या ४ न्यायमूर्तींनी पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी केलेल्या भाष्यावर माजी अतिरिक्त महाधिवक्ता विकास सिंह यांनी चिंता व्यक्त केली आहे. न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत सर्वोच्च न्यायालयाच्या कारभाराविषयी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्याची गरज असल्याचेही विकास सिंह म्हणाले.
सर्वोच्च न्यायालयाबाबत जी बाब समोर आली आहे ती अत्यंत गंभीर बाब आहे. कुठलाही राजकीय नेता न्यायालय प्रशासनाबाबत असलेल्या समस्यांवर योग्य तोडगा काढू शकणार नाही. याशिवाय परिस्थिती आणखी बिघडवण्याचा ते प्रयत्न करतील. राजकीय नेत्यांवर ही समस्या सोडवण्यासाठी अवलंबून न राहता न्यायालयाच्या अंतर्गत यंत्रणेमार्फत या समस्येचे निराकरण केले पाहिजे, असे मत विकास सिंह यांनी व्यक्त केले आहे. लोकशाहीचा महत्वाचा स्तंभ सर्वोच्च न्यायालय असून सर्वांनी त्याचे संरक्षण करायलाच हवे. पण पत्रकार परिषद घेऊन सर्वोच्च न्यायालयाबाबत भाष्य केल्याने सामान्य जनतेच्या मनात संशय निर्माण झाला. न्यायपालिकेसाठी हे हितकारक नाही, असेही सिंह पुढे म्हणाले.
व्हीएस न्यूज - गुंतवणूकीच्या दुनियेचा बादशाह म्हणून ओळखले जाणारे वॉरेन बफे यांनी नुकताच बिटकॉईनच्या संदर्भात एक खुलासा केला. जर बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली असेल तर सावध रहा कारण हे एक मायाजाल असून हा फुगा केव्हाही फूटू शकतो, असा इशारा बफे यांनी गुंतवणूकदारांना दिला आहे.
बफे यांच्या मते, अधिक काळ ही क्रिप्टोकरंसी टिकू शकणार नाही. या प्रकारात आपण स्वत:देखील गुंतवणूक करत नाहीत. गुंतवणूकदारांचे यात मोठे नुकसान होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या बाबतीत भारत सरकारनेसुद्धा सूचना देत धोक्याची घंटा वाजवली आहे.
एकीकडे क्रिप्टोकरंसी यशस्वी होत असताना जगभरात मात्र याविषयी धोक्याची घंटा वाजवण्यात येते आहे. भारतासकट अनेक देशांत याला कायदेशीर मान्यता देण्यात आलेली नाही. दक्षिण कोरियाने बिटकॉईनवर बंदी घातलेली आहे.
व्हीएस न्यूज - आधार क्रमांकाऐवजी व्हर्च्युअल आयडीची सुविधा होणार असली तरी ती अनिवार्य नसल्याचे आधार कार्यक्रम चालवणाऱ्या युआयडीएआय अर्थात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे. लोकांना आधार क्रमांक द्यायचा असेल तर ते देऊ शकतात असे युआयडीएआयच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भूषण पांडे यांनी सांगितले.
आधारची माहिती सुरक्षित रहावी यासाठी युआयडीएआय आभासी ओळख क्रमांक अर्थात व्हर्च्युअल आयडी योजना आणणार असून ती जूनपासून अनिवार्य करण्यात येणार असल्याचे वृत्त होते. मात्र, या योजनेचा विचार असला तरी ती अनिवार्य नसेल असे युआयडीएआयने स्पष्ट केले आहे. व्हर्च्युअल आयडीची सुविधा १ मार्चपासून उपलब्ध होणार आहे. त्यानंतर १ जूनपासून ती अनिवार्य करण्यात येणार असल्याचे माध्यमांतील वृत्तांतून सांगण्यात आले होते. एनडीटीव्हीने याबाबत वृत्त दिले आहे.
अजय पांडे म्हणाले, सुरक्षेच्या मुद्द्यावरून आपल्याला संवेदनशीर असायला हवे त्याचबरोबर आव्हानांसाठी देखील तयार रहायला हवे. लोकांना आपल्या माहितीच्या सुरक्षेसाठी व्हर्च्युअल आयडीचा पर्याय देण्यात आलेला असला तरी लोकांना गरज पडल्यास त्यांचा आधार क्रमांकही वापरता येणार आहे. आधारची माहिती लीक होण्याच्या प्रकरणाबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. याप्रकरणी लॉग-इनचे अधिकार राज्यांतील युआयडीएआयच्या अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
व्हीएस न्यूज - दलित आणि ओबीसी समाज भाजप सरकारवर नाराज आहे. तरुणांमध्ये तर भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल असंतोष धुमसत आहे. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुका या वर्षांतच होतील आणि त्यात भाजपचा दारुण पराभव होईल, असे भाकीत भारिप-बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी गुरुवारी व्यक्त केले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा रिपब्लिकन ऐक्याचा प्रस्ताव फेटाळून लावताना, आठवले यांच्यात नेतृत्वाची बौद्धिक क्षमताच नसल्याची कठोर टीकाही त्यांनी केली. ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ आयोजित ‘आयडिया एक्स्चेंज’ कार्यक्रमात ते बोलत होते.
भीमा-कोरेगाव प्रकरणानंतर दलित राजकारणाच्या केंद्रस्थानी आलेल्या प्रकाश आंबेडकर यांनी देशातील सध्याच्या राजकीय, सामाजिक, आर्थिक स्थितीबद्दल आपली ठोस व अभ्यासपूर्ण मते मांडली. ‘आंबेडकरी चळवळ चालविण्यासाठी मी सक्षम आहे, यापुढील राजकारणाचा राष्ट्रीय अजेंडा माझा असेल,’ असा आत्मविश्वासही त्यांनी व्यक्त केला. सार्वत्रिक निवडणुका याच वर्षी होतील आणि २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची जी अवस्था झाली, तशी भाजपची होईल, असेही ते म्हणाले.
भीमा कोरेगाव येथे १ जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी गेलेल्या आंबेडकरी अनुयायांवर हल्ले करण्यात आले, दगडफेक,जाळपोळ करण्यात आली, त्याच्या निषेधार्थ आंबेडकर यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बंदच्या वेळी नागरिकांचे हाल झाले, याकडे आंबेडकर यांचे लक्ष वेधले असता, त्यांनी बंद पुकारण्यामागची भूमिका स्पष्ट केली. भीमा कोरेगावमधील हल्ल्यानंतर दलित समाजातून तीव्र उद्रेक बाहेर आला. त्याला महाराष्ट्र बंदची हाक देऊन संघिटत करुन दलितांच्या भावनाना मोकळी वाट करुन दिली. तसे केले नसते तर हा उद्रेक हाताबाहेर जाऊन त्याचे विपरित परिणाम झाले असते, अशा शब्दात त्यांनी बंदचे समर्थन केले.
व्हीएस न्यूज - बीड जिल्ह्याने स्त्री भ्रूणहत्येचा कलंक पुसून नाव कमावले असून बीडमध्ये स्त्री जन्माचे स्वागत करा, बेटी बचाओ, बेटी पढाओ’या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत एकाच वेळी तब्बल ३०६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा पार पडला. हा उपक्रम स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या १४ व्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात राजयोग फाउंडेशन व कुटे ग्रुप फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने पार पडला. विशेष म्हणजे ३०१ मुलींची नावनोंदणी झालेली असताना ऐनवेळी एकूण ३०६ मुलींचे नामकरण झाले. या मुलींचा जन्म १५ ऑक्टोबर २०१७ ते १ जानेवारी २०१८ या कालावधीत झालेला आहे.
सजवलेला भव्य मंडप, ३०१ पाळणे, बारशाची गीते अशा उत्साहात ३०१ मुलींच्या आत्यांनी कानात कुर्रर्रर्र करत बारसे केले. कीर्तन महोत्सवाचा समारोप अशा अनोख्या पद्धतीने झाला. गतवर्षी सोहळ्यात १०१ मुलींचे सामूहिक नामकरण केले होते. पुढील वर्षी ५०१ मुलींचेनामकरण करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. पाळणा, कपडे, खेळणी,चांदीचे वाळे मुलींना भेट देण्यात आले. आईंना साडीचोळीचा आहेर व फेटा बांधून हळदी-कुंकू करत स्वागत झाले. लंडनच्या ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्ड’ या आंतरराष्ट्रीय संस्थेने सोहळ्याची नोंद घेतली. ‘मुलींचा असा सामूहिक नामकरण सोहळा जगात कुठेही झालेला नाही, असे कौतुक समन्वयकांनी केले.
व्हीएस न्यूज - पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी आपलेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री निधी उपलब्ध करून देत नाहीत. मी काय करू, असे हताश उद्गार त्यांनी काढले.
कन्नड तालुक्यातील पाणीपुरवठा योजनांना निधी मिळण्याच्या मागणीसाठी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यासह ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी बबनराव लोणीकर यांना औरंगाबाद विमानतळावरच घेराव घातला. ४ वर्षांपासून पाणीपुरवठा योजना रखडल्या आहेत. योजनेची कामे कधी सुरू करणार, असा सवाल करीत ग्रामपंचायत सदस्यांनी लोणीकर यांना धारेवर धरले. तेव्हा लोणीकर यांनी अत्यंत हतबला व्यक्त केली. ते म्हणाले की, कुठलेही काम सुरू झालेले नाही. कर्जमाफीमुळे कामे होण्यास विलंब होतो आहे. ४ वर्षांपासून कर्जमाफी सुरू आहे काय, असा सवाल हर्षवर्धन जाधव यांच्यासह शेतक-यांनी केला. त्यावर ते म्हणाले, विधानसभा अध्यक्षांच्या मतदारसंघातील देखील काम झालेले नाही. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री पैसे देत नाहीत. त्यांनी पैसे दिल्याशिवाय मी तरी काय करू शकतो. विधानसभा अध्यक्षांचे काम होत नव्हते. ते स्वत: मुख्यमंत्र्यांना बोलले होते. १०० कोटी शहरनिहाय दिले जातात. २०० कोटी एका जिल्ह्याला मिळणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले होते. ७०० कोटी रुपयांची घोषणा पाणीपुरवठा योजनांसाठी झाली; परंतु प्रत्यक्षात २१० कोटीच मिळाले, अशी वस्तुस्थिती पाणीपुरवठामंत्र्यांनी मांडली. उन्हाळ्याच्या तोंडावर हा सगळा प्रकार घडल्यामुळे आगामी काळात ग्रामीण भागात पाण्यासाठी वणवण यंदाही कायम राहणार असल्याचे दिसते.
शासनाने ग्रामीण पाणीपुरवठा योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून दिलेला आहे, असे असतानाही औरंगाबाद जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाच्या अकार्यक्षमतेमुळे पाणीपुरवठा योजनांची कामे रेंगाळली आहेत. त्यामुळे अशा अधिका-यांवर कारवाई करण्याचे संकेत पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांनी ७ जानेवारी रोजी जालना येथे घेतलेल्या बैठकीत दिले होते. त्यानंतर दोन दिवसांतच त्यांनी मुख्यमंत्री, अर्थमंत्री निधी देत नसल्याचे सांगून सरकारला घरचा अहेर दिला.
व्हीएस न्यूज - राज्यातील विविध कौटुंबिक न्यायालयांमध्ये ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. प्रलंबित असलेल्या दाव्यांच्या आकडेवारीमध्ये पुणे कौटुंबिक न्यायालय राज्यात तिस-या क्रमांकावर आहे. पुण्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत, तर सर्वाधिक दावे मुंबईच्या वांद्रे येथील कौटुंबिक न्यायालयामध्ये प्रलंबित आहेत.
राज्यातील कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ३४ हजार ३५९ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये दिवाणी स्वरूपाचे २५,१८६ दावे, तर फौजदारी स्वरूपाचे ९,१७३ दावे प्रलंबित आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाचे २०३, फौजदारी स्वरूपाचे २८५ असे मिळून एकूण ४८८ दाव्यांचा समावेश आहे. महिलांनी दाखल केलेल्या दिवाणी स्वरूपाच्या १०,६०१, फौजदारी स्वरूपाच्या ८,०५८ अशा मिळून एकूण १८ हजार ६५९ दाव्यांचा समावेश आहे.
प्रलंबित असलेल्या दाव्यांमध्ये दहा वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेले २९ दावे आहेत, तर पाच ते दहा वर्षांच्या कालावधीत प्रलंबित असलेले ६१४ दावे आहेत. दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ७,४७७ दावे प्रलंबित आहेत. दोन वर्षांपेक्षा कमी काळ प्रलंबित असलेले २६,२३९ दावे राज्यात प्रलंबित आहेत. पुणे कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्या ५,१९७ दावे प्रलंबित आहेत.
यामध्ये महिलांनी दाखल केलेले दिवाणी स्वरूपाचे १६५८, फौजदारी स्वरूपाचे १०२० अशा मिळून २,६७८ दाव्यांचा समावेश आहे. दहा वर्षाहून अधिक काळ पुण्यात प्रलंबित असलेले दावे सध्या केवळ पाच आहेत. पाच ते दहा वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेल्या १२२, दोन ते पाच वर्षे या कालावधीत प्रलंबित असलेले ११४८, तर दोन वर्षांहून कमी काळ प्रलंबित असलेले ३९२२ दावे सध्या प्रलंबित आहेत.
पुण्यातील कौटुंबिक न्यायालयासाठी उभारण्यात आलेल्या नवीन इमारतीत कौटुंबिक न्यायालयाचे स्थलांतर करण्यात आल्यानंतर न्यायालयात दाखल होणा-या दाव्यांची संख्या गेल्या काही महिन्यांत वाढली आहे. शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाजवळ कौटुंबिक न्यायालयाची नवीन इमारत उभारण्यात आली आहे. शिवाजीनगर न्यायालयात वकिली करणा-या वकिलांना यापूर्वी असलेल्या कौटुंबिक न्यायालयात ये-जा करताना अडचणी येत असत. मात्र, हा प्रश्न सोडवण्यात आला आहे.
कौटुंबिक न्यायालयात सध्या दररोज १५ ते १६ दावे दाखल होत आहेत. न्यायालयात वाढत्या दाव्यांची संख्या लक्षात घेऊन न्यायाधीशांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे, असे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. गणेश कवडे यांनी सांगितले.
व्हीएस न्यूज - सुदैवाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला. मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईजवळील भाईंदरमध्ये लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. या हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा अपघात सुदैवाने टळला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी मीरा भाईंदर येथे आले होते. पण त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे. पण या घटनेला ठाणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. महेश पाटील यांनी दुजोरा दिलेला नाही. त्यांनी कॅमेरासमोर बोलण्याचे टाळले आहे. हे हेलिकॉप्टर आमदार नरेंद्र मेहता यांच्या शाळेच्या प्रांगणात उतरवण्यात आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मोटारीने प्रयाण केले.
व्हीएस न्यूज – तामिळनाडूत पोंगलची धामधूम सुरू असतानाच गतवर्षी त्यांच्या पारंपारिक जल्लीकट्टू खेळावर घातलेल्या प्रतिबंधामुळे आंदोलने केली गेली होती. यंदा हा पारंपारिक खेळ पूर्ण सुरक्षा व नियम कायद्यानुसार लोकांना खेळता येणार आहे मात्र त्यासाठी या खेळात सहभागी होऊ इच्छीणार्या जल्लीकट्टूपटूंना आधारकार्ड सादर करावे लागणार आहे. मदुराईसमेत दक्षिण तमीळनाडूत हा खेळ मोठ्या प्रमाणावर खेळला जातो.
यंदा १४ जानेवारी रोजी हा खेळ अवनियापुरम, १५ जानेवारीला पालमेडू व १६ जानेवारीला अलंगानल्लूर येथे साजरा केला जात आहे. त्यासाठी सांड व जल्लीकट्टूत सांडाशी झुंजणारे वीर यांनी जोरदार तयारी सुरू केली असून अनेक ठिकाणी त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. खेळाडूंनी नोंदणीसाठी लांब रांगा लावल्या आहेत. मात्र त्यांच्यासाठी आधारकार्ड सादर करणे यंदा बंधनकारक केले गेले आहे. त्यासोबत निवास प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट साईज फोटोही द्यायचे आहेत. आधारकार्ड सक्ती केल्याने खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. १६ तारखेच्या खेळाचे उदघाटन मुख्यमंत्री ई.के.पलानीस्वामी करणार आहेत. या खेळात २० ते ४० वयोगटातील खेळाडूच सहभागी होऊ शकणार आहेत.
व्हीएस न्यूज – कलकत्ता विद्यापीठाकडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मानद डॉक्टर पदवी प्रदान करण्यात आल्यामुळे आता त्या डॉ. ममता बॅनर्जी झाल्या आहेत. डॉक्टर ऑफ लिटरेचर (डी.लिट) पदवी त्यांना देण्यात आली आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल केसरी नाथ त्रिपाठी यांच्या हस्ते ही पदवी त्यांना देण्यात आली. विद्यापीठाने ममता यांच्या सामाजिक कार्याचा गौरव केला आहे. याच विद्यापीठाच्या त्या माजी विद्यार्थिनी आहेत. ममता यांनी पदवी प्रदानाच्या भाषणात असहिष्णुतेवर भाष्य केले. त्या म्हणाल्या,की देशात असहिष्णुता वाढत आहे. इतिहासाची विकृती केली जात आहे. विविधता हीच देशाची ओळख आहे. त्याचा आपण सन्मान केला पाहिजे,असे त्या म्हणाल्या.
ADDRESSVS News, Khararwadi,Pimpri-Chinchwad CONTACTS Email: vsnews24x7@gmail.com Phone: +91 91724 53002